You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मनसुख हिरेन मृत्यू : माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत : विमला हिरेन
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1) माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत : विमला हिरेन
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांसाह सापडलेल्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील रेतीबंदर खाडीत सापडला. या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला जात असतानाच, मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
"माझे पती आत्महत्या करू शकत नाहीत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि सत्य समोर यावं. आमचं पूर्ण कुटुंब भरडलं जात आहे," असं विमला हिरेन माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
विमला हिरेन यांनी सांगितलं, "पोलिसांच्या सूचनेनुसार ते वेळोवेळी चौकशीला जात होते. दिवसभर त्यांना तिथं बसवलं जायचं. त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. कालही (4 मार्च) त्यांना बोलावलं, ते गेले पण परत आलेच नाहीत. रात्री दहा वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला."
कांदिवलीहून क्राईम ब्रॅंचच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता, त्यांनी घोडबंदरला भेटायला बोलावलं होतं, असाही दावा विमला यांनी केलाय.
मनसुख हिरेन हे कोणत्याही दबावात नव्हते, असंही त्या म्हणाल्या.
2) अधिवेशनात हजेरी लावलेल्या विजय वडेट्टीवारांना कोरोनाची लागण
महाराष्ट्राचे मदत व पुनर्विसन मंत्री, तसंच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांनी त्यांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली आहे.
विशेष म्हणजे, विजय वडेट्टीवार हे सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहभागी झाले होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर विलगीकरण कक्षात राहण्याचा सल्ला त्यांना देण्यात आलाय.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला एक मार्चपासून सुरुवात झाली. या अधिवेशनात वडेट्टीवार सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करावी, असं आवाहनही करण्यात आलं आहे.
3) 75 व्या स्वातंत्र्यदिनासाठी 259 जणांची समिती
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात 259 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. देशातील विविध क्षेत्रातील दिग्गजांचा या समितीत समावेश आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
मोदींच्या नेतृत्त्वात स्थापन झालेल्या या समितीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, गृहमंत्री अमित शाह, सरन्यायाधीश शरद बोबडे, योगगुरू रामदेवबाबा इत्यादी व्यक्तींचा समावेश आहे.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, हेही या समितीत आहेत.
भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कशाप्रकारे साजरा करावा, त्यासाठी काय नियोजन असावं, अशा सर्व गोष्टींचा विचार आणि निर्णय ही समिती घेणार आहे.
4) कोरोना काय पक्षाचा कार्यकर्ता नाही, राऊतांचा राज ठाकरेंना टोला
कोरोनाकाळात मास्क वापरण्यास नकार देणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. कोरोना काय आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, असं राऊत म्हणाले. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.
राज ठाकरे हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्ये त्यांच्या स्वागतासाठी आलेले मनसेचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी घातलेला मास्क राज ठाकरे यांनी काढायला लावला. याबाबत माध्यमांमध्ये प्रचंड चर्चा झाली.
याचबाबत संजय राऊत म्हणाले, "करोनाचे विषाणू काय आपल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. ते कोणालाही सोडत नाहीत. याच्यापासून तुम्हाला त्रास आहे आणि तुमच्यामुळे इतरांनाही त्रास आहे."
आपण सामाजिक जीवनात असताना भान बाळगलं पाहिजे, असंही संजय राऊत यांनी राज ठाकरेंना उद्देशून म्हटलं.
5) सोलापूरचे खासदार जात प्रमाणपत्रामुळे आणखी अडचणीत
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची चिन्हं आहेत. बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याच्या आरोपाची चौकशी आता उमरग्यापर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्र देशानं ही बातमी दिली आहे.
गुन्हे अन्वेषण विभागानं उमरग्यातील डिग्गी ग्रामपंचायत सदस्य गुरुबसय्या स्वामी यांची चौकशी केली. या पथकानं उमरग्याचे तहसीलदार संजय पवार यांची भेट घेत प्रमाणपत्रासाठी दाखल केलेल्या कागदपत्रांचीही चौकशी केली.
जात वैधत प्रमाणपत्रासाठी आवश्यक पुराव्यांची जमवाजमव डॉ. महास्वामी यांनी उमरग्यातून केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे या प्रकरणात विद्यमान खासदारांच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)