You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मनसुख हिरेन प्रकरणातील 9 अनुत्तरित प्रश्न
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं मिळाल्याच्या प्रकरणाचं गूढ दिवसेंदिवस वाढत चाललंय. स्फोटकं सापडलेल्या गाडीचे कथित मालक मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा एटीएसला संशय आहे.
शुक्रवारी मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाणे पोलिसांना मुंब्रा खाडीत आढळून आला होता.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी या प्रकरणी "एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे, या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे," असं निवेदन विधिमंडळात केलं.
दुसरीकडे, या प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूनंतर महाविकास आघाडी आणि भाजप आमने-सामने आलेत. या प्रकरणावर अनेक उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.
पण, काही महत्त्वाचे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. ज्यांची उत्तरं मिळालेली नाहीत.
1. त्या गाडीचा मालक कोण?
26 फेब्रुवारीला मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर हिरव्या रंगाची स्कॉर्पियो संशयास्पद अवस्थेत आढळून आली. गाडीत 20 जिलेटीन कांड्या आढळून आल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, स्कॉर्पियोची नंबर प्लेट अंबानींच्या सुरक्षा घेऱ्यातील गाडीसारखी होती.
ही स्कॉर्पियो ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांची असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मनसुख हिरेन यांची कसून चौकशी केली.
पण, या गाडीचा खरा मालक कोण? यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख गाडीचे मालक असल्याचा दावा केला. तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गाडी सॅम पीटर न्यूटनची असल्याचं सांगितलंय. न्यूटन यांनी गाडी इंटिरिअर करण्यासाठी मनसुख हिरेन यांना दिली होती. पैसे देऊ न शकल्याने हिरेन यांनी गाडी आपल्याकडे ठेवली असा दावा गृहमंत्र्यांनी केला.
2. गाडीतील ड्रायव्हर गेला कुठे?
मुकेश अंबानी यांच्या घरापासून काही अंतरावर स्कॉर्पियो पार्क करण्यात आली होती.
पण, गाडी चालवणारा व्यक्ती गाडीतून उतरून गेली कुठे? ही व्यक्ती कोण आहे? याचं उत्तर पोलीस अजूनही देऊ शकलेले नाहीत.
मुंबई पोलीस आणि एटीएसकडून याबद्दल अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. स्कॉर्पियोचा चालक त्यामागे असलेल्या इनोव्हा गाडीतून पळून गेल्याचा, पोलिसांना संशय आहे.
3. स्कॉर्पियोला फॉलो करणारी इनोव्हा गाडी कुठे गेली?
स्फोटक प्रकरणाचा तपास मुंबई क्राइम ब्रांचने सुरू केला. मनसुख यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर हा तपास एटीएसकडे देण्यात आला.
पोलीस दावा करतात की, अंबानींच्या घराबाहेर पार्क करण्यात आलेल्या स्कॉर्पियोसोबत एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी होती. या दोन्ही गाड्या मुलुंड टोल नाक्यावर एकत्र दिसून आल्या. त्यानंतर चेंबूरच्या प्रियदर्शनी पार्क परिसरात या गाड्या एकामागोमाग दिसून आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
स्कॉर्पियो पार्क केल्यानंतर इनोव्हो निघून गेली. ही इनोव्हा सकाळी 3 वाजता मुलुंड टोल नाक्यावर आढळून आली. गाडी चालवणारी व्यक्ती टोल भरताना दिसून येतेय. पण, इनोव्हाची नंबरप्लेट बनावट होती असा पोलिसांचा दावा आहे.
4. मनसुख यांना कोणाचा फोन आला?
शुक्रवारी 4 मार्चला संध्याकाळी आठ वाजता मनसुख हिरेन यांना एक फोन आला.
मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी हा फोन 'कांदिवली क्राइम ब्रांचच्या तावडे साहेबां'चा असल्याचा दावा प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.
'तावडे साहेबांनी बोलावलं आहे,' असं सांगून मनसुख हिरेन निघून गेले. त्यानंतर, 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचा फोन बंद झाल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे.
पण, ज्या फोनचा दावा कुटुंबाने केला आहे. ते 'तावडे' कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे.
मुंबई क्राइम ब्रांचच्या कांदिवली युनिटमध्ये तावडे नावाचे अधिकारी नाहीत. मात्र, दहिसर युनिटमध्ये महेश तावडे नावाचे अधिकारी आहेत. महेश तावडे 1 मार्चपासून सुट्टीवर असल्याची माहिती आहे.
5. मनसुख हिरेन यांचा फोन वसईत कसा पोहोचला?
मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत आढळून आला. मात्र, फोनचं शेवटचं लोकेशन वसईत आढळून येत असल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, वसईत ट्रेस करण्यात आलेला मनसुख यांचा फोन 11.30 पर्यंत सुरू होता. त्यानंतर फोन बंद झाला. या उलट, कुटुंबीयांनी रात्री 10 वाजल्यानंतर त्यांचा कॉल बंद झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.
मनसुख यांचा फोन पोलिसांना अजूनही सापडलेला नाही. हा फोन हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी चौकशीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.
6. आत्महत्या का हत्या?
मनसुख यांचा मृतदेह खाडीत आढळून आला. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असावी असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. पण, मनसुख यांच्या पत्नी विमला यांनी 'मनसुख आत्महत्या करू शकत नाहीत,' असं वक्तव्य केलं.
विमला यांच्या तक्रारीवरून एटीएसने हत्येचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
मनसुख यांची हत्या करून त्यांचा मृतदेह खाडीत फेकून देण्यात आला का? गुरुवारी रात्री बाहेर पडल्यांनंतर शुक्रवारी सकाळी मृतदेह मिळेपर्यंत काय झालं? या प्रश्नाचं उत्तर तपास यंत्रणांनी दिलेलं नाही.
7. मनसुख यांच्या चेहऱ्यावरील रुमालांचं रहस्य काय?
शुक्रवारी 5 मार्चला सकाळी मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर परिसरात खाडीत आढळून आला. पोलिसांनी स्थानिक लोक आणि फायर ब्रिगेडच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओमध्ये मनसुख यांच्या चेहऱ्यावर काही रूमाल बांधले असल्याचं दिसून येतं. पोलिसांनी हे रुमाल जप्त केले आहेत.
मनसुख यांच्या चेहऱ्यावर रुमाल का बांधण्यात आले होते. चेहऱ्यावरील रुमालांचं रहस्य काय? याबद्दल पोलीस काहीच बोलण्यास तयार नाहीत.
8. हिरेन यांच्यावर कोणाचा दवाब होता?
2 मार्चला मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र लिहिलं होतं.
या पत्रात त्यांनी 'माझा मानसिक छळ होतोय' असा आरोप केलाय.
मुंबई पोलिसांनी हिरेन यांनी पत्र लिहिल्याचं मान्य केलं आहे. या पत्रात क्राइम इंटेलिजन्स युनिटचे सचिन वाझे, पोलीस अधिकारी आणि काही पत्रकारांकडून छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे.
9. सचिन वाझे सर्वांत पहिले कसे पोहोचले?
मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयास्पद गाडी मिळाल्यानंतर सर्वात पहिले सचिन वाझे पोहोचल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
वाझे यांनी "मी पहिल्यांदा पोहोचलो नाही. गावदेवी पोलिसांचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी त्यानंतर क्राइम ब्रांचच्या टीमसोबत मी त्याठिकाणी पोहोचलो" अशी प्रतिक्रिया दिली आहे.
मात्र, सरकारकडून याबाबत अद्यापही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.
मनसुख हिरेन प्रकरणी वाझे यांची भूमिका काय? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. तर, वाझे "मी मनसुख हिरेन यांना ओळखत नाही" अशी प्रतिक्रिया वाझे यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)