You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सावधान! पृथ्वी बनत आहे प्लास्टिक प्लॅनेट
- Author, जॉनथन अॅमोस
- Role, BBC सायन्स प्रतिनिधी
अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार गेल्या 65 वर्षांत 8.3 अब्ज टन एवढ्या प्रचंड प्रमाणात प्लास्टिकचं उत्पादन झालं आहे. या प्लास्टिकचं वजन 1 अब्ज हत्तींच्या वजनाइतकं आहे.
प्लास्टिकच्या वस्तू फारच कमी कालावधीसाठी वापरून नंतर त्या फेकून दिल्या जातात. त्यामुळं एकूण उत्पादनाच्या 70 टक्क्यांहून अधिक प्लास्टिक आज कचऱ्यात पडलेलं दिसून येतं.
"आपली वाटचाल वेगानं प्लास्टिक प्लॅनेटकडं होत आहे. यातून मुक्ती मिळवायला प्लास्टिकच्या वस्तूंचा पुनर्वापर करण्याबद्दल गंभीरपणे विचार करायला हवा," असं डॉ. रोलंड गेयर सांगतात.
डॉ. गेयर यांच्यासोबत पर्यावरण तज्ज्ञ सेंट बार्बरा आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी सायन्स अॅडव्हान्स या जर्नलमध्ये एक शोध निबंध सादर केला. यात प्लास्टिकसंबंधी करण्यात आलेले खुलासे आश्चर्यकारक आहेत.
प्लॅस्टिकचा भस्मासूर
- आजवर 8.3 अब्ज टन एवढं प्लास्टिकचं उत्पादन झालं आहे.
- यातील अर्ध्यापेक्षा अधिक प्लास्टिक मागील 13 वर्षांत बनवलं गेलं आहे.
- 30 टक्के प्लास्टिक आजही वापरात आहे.
- केवळ 9 टक्के प्लास्टिक रिसायकल केलं गेलं आहे.
- 12 टक्के प्लास्टिक जाळून खाक झालं. तर 79 टक्के प्लास्टिक कचरा डेपोत जमा आहे.
- पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचं जीवनमान कमी असतं.
- प्लास्टिकचा दीर्घकालीन वापर बांधकाम व्यवसायात होतो.
- 2050 पर्यंत 12 अब्ज टन एवढं प्लास्टिक कचऱ्यात जमा होईल, असा अंदाज आहे.
- 2014 मध्ये प्लास्टिकच्या पुनर्वापराचं प्रमाण युरोपामध्ये 30 टक्के, चीनमध्ये 25 टक्के तर अमेरिकेत 9 टक्के एवढं होतं.
प्लास्टिक कचऱ्याची त्सुनामी?
1950 च्या दरम्यान पॉलिमरच्या उत्पादनाला सुरूवात झाली. याच पॉलिमरनं आज आपलं जीवन व्यापलं आहे. शॉपिंग बॅग असो वा विमानाचे भाग, पॉलिमरचा वापर अनेक वस्तू बनवण्यासाठी केला जात आहे. पण आता याच प्लास्टिकमुळे काही प्रश्नही निर्माण झाले आहेत.
सामान्यत: वापरात येणाऱ्या प्लास्टिकचं जैविक विघटन होत नाही. त्यामुळं प्लास्टिकची विल्हेवाट करायची झाल्यास त्याला जाळण्याशिवाय पर्याय नसतो. या प्रक्रियेला पायरोलिसिस असं म्हणतात. पण, यातून निघणारा धूर शरीरावर विपरित परिणाम करतो.
"जोवर आपल्याला एखादं भयंकर वास्तव कळत नाही तोवर आपण त्याबद्दल गांभीर्यानं विचार करत नाही. त्यामुळं आम्ही प्लास्टिकसंबंधीचं वास्तव आकडेवारीच्या माध्यमातून मांडायचं ठरवलं. त्याद्वारे आम्ही लोकांना ते काय करत आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला," असं डॉक्टर गेयर सांगतात.
जॉर्जिया युनिव्हर्सिटीच्या जेना जॅमबेक आणि सी एज्युकेशन असोसिएशनच्या कॅरा लवेंडर लॉ यांनी केलेल्या अभ्यासानुसार, सागरी किनारपट्टीवर दरवर्षी आठ दशलक्ष टन एवढा कचरा प्लास्टिकमुळे साचलेला दिसून येतो.
डॉ. एरिक वॅन सेबिल हे नेदरलॅंड येथील समुद्रशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी समुद्र किनाऱ्यांवरील प्लास्टिक कचऱ्याची नोंद ठेवली आहे. त्यांच्या मते, "सध्या आपल्याकडं प्लास्टिक कचऱ्याची त्सुनामी आली असून आपण त्यावर गांभीर्यानं विचार करायला हवा."
"प्लास्टिक कचऱ्याच्या संदर्भात आपण सर्वांनी एकत्र येऊन विश्व पातळीवर कार्य हाती घेणं गरजेचं आहे. जेणेकरून प्लास्टिकमुळं निर्माण होणाऱ्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावता येईल."
"प्लास्टिक पुनर्वापराचा सध्याचा वेग पाहता या संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 2060 सालापर्यंत वाट बघावी लागेल," डॉ. सेबिल यांनी बीबीसीला सांगितले.
प्लीमथ युनिवर्सिटीचे प्राध्यापक रिचर्ड थॉमसन यांच्या मते,
"पुनर्वापराचा विचार डोक्यात ठेवून जर आपण प्लास्टिकच्या वस्तू बनवल्या तर ते अधिक महत्त्वाचं ठरेल. काही जण तर असं म्हणतात की, पाण्याची बाटली 20 वेळा रिसायकल करता येते. असं असल्यास कचऱ्याचं प्रमाण नक्कीच कमी होईल."
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)