गुजरातच्या रणसंग्रामात आता योगी आदित्यनाथ

    • Author, हरिता कांडपाल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी भाजपच्या गौरवयात्रेत सहभागी होणार आहेत.

नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत मोठ्या बहुमतानं केंद्रात निवडून गेले. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत अनेक राज्यात भाजपाला यश मिळाले. पण, मोदींच्या गुजरातमध्ये त्यांना मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागत आहे.

विकासाचा नारा देणारे मोदी आणि भाजपला सध्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागत आहे. त्यातच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी भाजपाला घेरण्यात कोणतीही उणीव सोडलेली नाही.

अशा परिस्थितीत हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या योगींना पाचारण करण्याचं काय महत्त्व आहे? याआधी योगी आदित्यनाथ केरळमध्ये झालेल्या राजकीय हत्येच्या विरोधात भाजपनं केलेल्या यात्रेत सहभागी झाले होते.

अहमदाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दयाल सांगतात, "2002 आणि 2007 साली गुजरात विधानसभा निवडणुका भाजपनं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या."

"या निवडणुकांच्या वेळी हिंदुत्वाचा अजेंडा होता. पण 2012 साली झालेल्या निवडणुकीत मोदींनी विकासाचा मुद्दा समोर आणला आणि 2014 च्या निवडणुकीत त्यांनी गुजरातचं विकास मॉडेल देशासमोर मांडलं. पण आता हे मॉडेल स्वीकारलं जात नसल्याची स्थिती आहे."

"मला असं वाटतं की भाजपनं पुन्हा आपल्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर निवडणुका लढायला हव्यात. यासाठीच कदाचित योगी आदित्यनाथ यांना पाचारण केलं आहे." असं ते म्हणाले.

भाजपच्या गौरवयात्रेला विरोध

गुजरातमध्ये गेल्या काही महिन्यांत सोशल मीडियावर 'विकास पगला गया' या ट्रेंडमुळे मोदी आणि भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

अशातच विधानसभा निवडणुकीत आपला बालेकिल्ला वाचवण्यासाठी एक ऑक्टोबरपासून भाजपच्या गौरव यात्रेची सुरुवात झाली आहे.

पंधरा दिवसांमध्ये ही यात्रा 149 विधानसभा मतदारसंघातून जाईल. याची सुरुवात भाजपनं सरदार पटेल यांचं जन्मस्थान करमसदपासून केली.

ज्येष्ठ पत्रकार आर के मिश्रा सांगतात, "अनेक ठिकाणी गौरवयात्रेला विरोधसुद्धा होतो आहे. पण त्याचवेळी राहुल गांधींच्या नवसर्जन यात्रेला मोठा प्रतिसाद मिळतो आहे."

"गौरवयात्रेला चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे भाजपचं राजकारण कोणत्या दिशेला जात आहे याचे संकेत मिळत आहेत. भाजपा पुन्हा आपल्या जुन्या फॉर्म्युलाकडे जात आहे."

भाजपाचं म्हणणं आहे की काँग्रेसकडे कोणीही नेता नाही. पण भाजपकडे अनेक नेते आहेत. राजनाथ सिंह, सुषमा स्वराज, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे देखील या यात्रेत सहभागी होणार आहेत.

भाजपाचे प्रवक्ते भरत पांड्या सांगतात, "योगी आदित्यनाथ एक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. त्यांना बोलावण्यात काय अडचण आहे? हिंदुत्वाच्या मुद्दयावर राजकारण व्हायला नको कारण ती एक जीवनशैली आहे"

भाजपाची स्थिती मजबूत?

2019 च्या आधी 2017ची ही गुजरात विधानसभा निवडणूक गुजरात आणि मोदी यांच्यासाठी एक मोठी लढाई आहे.

गुजरातमध्ये गेल्या 22 वर्षांपासून भाजपाचं सरकार आहे.

भाजपाचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह यांच्या रणनीतीमुळे अनेक राज्यांमध्ये भाजपाला चांगले परिणाम दिसून आले आहेत. पण गुजरातची निवडणूक मात्र नक्कीच सोपी नाही.

नोटाबंदी, जीएसटीमुळे व्यापाऱ्यांमधील नाराजी, पटेल आरक्षण आंदोलन, दलितांची नाराजी अशा अनेक अडचणी सरकारपुढे आहेत.

यादरम्यान काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. दोनदा गुजरात दौरा केलेल्या राहुल गांधीनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

पण प्रत्यक्षात भाजपाची तयारी मजबूत मानली जाते. भाजपा अगदी बूथ स्तरापर्यंत आपले कार्यकर्ते तयार करत आहे.

भाजपमध्ये निराशा

अशा परिस्थितीत कशा प्रकारचा मुकाबला होणार यावर प्रशांत दयाल म्हणतात, "दोन गोष्टी आहेत. गुजरात भाजपचा बालेकिल्ला आहे. इथे काँग्रेससाठी आपला जम बसवणं हे कधीच सोपं नव्हतं."

"पण नोटाबंदी, जीएसटी, गुजरातमध्ये झालेला पाऊस यामुळे स्थिती बदलली आहे. त्यातच काँग्रेसनं संघटनेमध्ये नव्यानं जीव ओतला आहे."

"त्याची सुरुवात अहमद पटेल यांच्या विजयानं झाली आहे. राहुल गांधी यांनी गुजरातच्या प्रश्नांची तयारी केली आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे. याचे परिणाम निवडणुकीत बघायला मिळणार आहेत."

RK मिश्रासुद्धा या मुद्द्याला दुजोरा देतात. "गुजरात भाजपामध्ये एक प्रकारची निराशा दिसून येते. राहुल गांधी द्वारका आणि चोटीलाला गेल्यावर लगेच दोन दिवसांनी नरेंद्र मोदी तिथे जातात. जे लोक पुढे होते, तेच आता मागे आहेत."

गौरव यात्रेचा समारोप 16 ऑक्टोबरला गांधीनगर इथल्या भाट गावात होणार आहे. तेथे गुजरात गौरव महासंमेलन आयोजित करण्यात आले असून त्या कार्यक्रमाला मोदी आणि अमित शाह उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनात लाखो कार्यकर्ते सहभागी होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. भाजपाचा दावा आहे की हे एक ऐतिहासिक संमेलन असेल.

पण यांचा निवडणुकांमध्ये किती प्रभाव पडेल हे निवडणुकांचे निकालच सांगतील.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)