You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दृष्टिकोन : गुजरातेत मोदींना राहूल गांधी टक्कर देऊ शकतील का?
गुजरातमध्ये निवडणुकांची वातावरण तापत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरात दौरा संपला आहे आणि सोमवारपासून काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी यांचा इथला दौरा पुन्हा सुरू होत आहे.
यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष अनेक मंदिरांना भेटी देत आहेत.
गुजरातमध्ये काँग्रेसचं सामर्थ्य काय, पटेल आणि दलित मतं कुठे आहेत, या सगळ्या प्रश्नांबद्दल आमचे सहकारी मोहंमद शाहीद यांनी गुजरातचे ज्येष्ठ पत्रकार अजय उमट यांच्याशी केलेली ही बातचीत.
अजय उमट यांचा दृष्टिकोन त्यांच्याच शब्दात
मागच्या 22 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचं राज्य आहे आणि या राजकारणात नरेंद्र मोदींचा सक्रिय सहभाग नसण्याची ही पहिलीच वेळ आहे.
निवडणूक आव्हानात्मक होणार आहे, असं वाटल्याने आनंदीबेन पटेल यांच्या जागी विजय रुपाणी यांना मुख्यमंत्रीपदी आणण्यात आलं. पण गेल्या तीन महिन्यांत मात्र एक वेगळंच चित्र तयार झालं आहे.
हार्दिक पटेलच्या अनामत आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यात भाजपला यश आलेलं नाही. शिवाय, अल्पेश ठाकूर नामक युवकाने तयार केलेल्या ओबीसी मंचने भाजपबरोबर समझोता केला नाही.
त्यानंतर दलितांचा नेता म्हणून वर आलेले जिग्नेश मेवाणी यांचं आंदोलनसुद्धा भाजपच्या विरोधात जात आहे.
भाजपसमोर सध्या अनेक आव्हानं आहेत. मागच्या दोन महिन्यांत भाजपच्या विरोधात सोशल मीडियावर मोठी मोहीम सुरू आहे. सोशल मीडियाच्या बळावर सत्ता मिळवणाऱ्या भाजपासाठी 'विकास पागल हो गया है' हे हॅशटॅग डोकेदुखी ठरत आहे.
गुजरातमध्ये जो विकास झाला आहे तो बेरोजगारी सोबत घेऊन आला आहे. युवकांना रोजगार मिळत नाही. नोटाबंदी, GST आणि रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट (रेरा) कायद्यांमुळे उत्पादन, रियल इस्टेट, टेक्स्टाईल, डायमंड या क्षेत्रांमध्ये विकास झालेलाच नाही.
या कारणांमुळे मंदीचं वातावऱण आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदीसुद्धा चिंतेत आहेत. गुजरात दौऱ्यात या सगळ्या गोष्टी बघूनच GSTमध्ये बदल करण्याची घोषणा केली आणि सांगितलं की ते दिवाळी चांगल्या प्रकारे साजरी व्हावी यासाठी आलेले आहेत.
गुजरातेमधलं वातावरण सुधारायला हवं, या उद्देशाने मोदी वारंवार गुजरातमध्ये येत आहेत. दोन दिवसांत त्यांनी मध्य, दक्षिण गुजरात, सौराष्ट्र आणि वडनगर भागात दौरे केले.
काँग्रेस किती शक्तिशाली?
या तुलनेत काँग्रेस आणि पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधींकडे बघितलं तर त्यांनी मागच्या वेळेला सौराष्ट्रचा दौरा केला होता आणि सध्या ते मध्य गुजरातच्या दौऱ्यावर आहेत.
काँग्रेस मुस्लिमांचं लांगूलचालन करत नाही पण ते सॉफ्ट हिंदुत्वाकडे वळत आहेत, हे मात्र नक्की. हाच संदेश देण्यासाठी ते द्वारका, चोटिला मंदिरात गेले होते.
या वेळेला ते फागवेल मंदिरात जाणार आहेत. हा पट्टा ओबीसी मतांसाठी अनुकूल मानला जातो आणि तिथूनच राहुल गांधींनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी 2002च्या गुजरात दंगलीनंतर निवडणूक प्रचार दौरा फागवेल मंदिरापासूनच सुरू केली होता.
पटेल आणि दलित मतं
गुजरातमध्ये पटेल समुदायाची मतं निर्णायक असतात आणि ती नेहमी भाजपालाच जातात. पण हे आता भूतकाळ झालं आहे.
पण ही सगळी मतं काँग्रेसला जातात आहे, असंही नाही.
हार्दिक पटेलच्या अनामत आंदोलनातील कार्यकर्त्यांना काँग्रेस तिकीट देत आहे. हार्दिक यांचा गट 182 पैकी 20 जागांची मागणी करत आहे ज्यात 9 जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
पटेलांचे अनेक गट आहेत जे सध्याच्या सत्तेसोबत राहू इच्छितात. पटेलांच्या मतामध्ये विभागणी होऊ शकते, ज्यात 60-40 या प्रमाणात भाजप आणि काँग्रेसला मत जातील. आणि हे समीकरण बदलतीलही.
दलितांचे बहुतांशी मत काँग्रेसला जात आहेत. त्यांना चिथावण्याचे प्रयत्न केले जात आहेत आणि त्यांच्यावर झालेला अन्यायाचा राग देखील दिसतो आहे.
काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी राज्यसभा निवडणूक जिंकून पक्षाला एक नवीन उभारी दिली आहे. गुजरातेत निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे आणि ही निवडणूक राहुल गांधी विरुद्ध मोदी होणार असल्याची चिन्हं आहेत.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)