लास वेगासमध्ये मृत्यूचं तांडव, वृद्धानं केला गोळीबार

अमेरिकेच्या लास वेगासमध्ये एका कॉन्सर्टदरम्यान झालेल्या गोळीबारात किमान 59 ठार तर 500 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लास वेगासच्या सनसेट स्ट्रीप भागातील मंडाले बे हॉटेल परिसरात गोळीबार झाला आहे.

हा गोळीबार करणारा संशयित स्टीफन पॅडक यानं स्वतःवर गोळी झाडून घेतल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ट्विटरवरून मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या नातेवाईकांच त्यांनी सांत्वन केलं आहे. तसंच ट्रंप यांनी संवेदना सुद्धा व्यक्त केल्या आहेत.

लास वेगास हल्ल्याची दृश्य

कोण होता संशयित हल्लेखोर

स्टीफन पॅडक (वय 64) मेस्कॉईट येथील रहिवासी आहे. त्यानं मंडाले बे हॉटेलच्या 32 व्या मजल्यावरून गोळीबार केला. या हॉटेलच्या खोलीत तो 28 सप्टेंबरपासून होता. या खोलीतून पोलिसांनी 10 रायफल जप्त केल्या आहेत.

लास वेगासचे शेरिफ जोसेफ लोंबार्डो यांनी या वृत्ताला दुजोरा दिला.

ते म्हणाले, "पोलीस संशियाताच्या खोली बाहेर पोहचले होते, त्यावेळी त्यानं स्वतःवर गोळी झाडून घेतली."

हा गोळीबार दहशतवादी प्रकार होता का? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, "या क्षणाला तरी तसे वाटत नाही. या क्षणाला गोळीबार करणारा एकटाच होता, असं वाटतं."

सोशल मीडियावर आलेल्या व्हीडिओेत शेकडो लोक पळताना दिसत आहेत. तसंच गोळीबारासारखा आवाजही पार्श्वभूमीवर ऐकू येत आहे.

लंडन येथील माईक थॉम्पसन सुटीसाठी लास वेगासमध्ये होते. ही घटना कशी घडली याची माहिती त्यांनी बीबीसीला दिली. ते म्हणाले, "आम्ही जेवणानंतर आमच्या हॉटेलकडे परत जात होतो, तेव्हा लोका सैरावरा धावत होते. सर्व घाबरले होते."

"एका माणसाच्या सर्वांगावर रक्त लागलेलं होतं. मला गोळीबारचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मी माझ्या जोडीदारला घट्ट पकडलं आणि आम्ही मागच्या रस्त्यावर धावलो. लोक धावत होते आणि सर्वत्र गोंधळ माजला होता," असे ते म्हणाले.

नेवाडाचे गव्हर्नर ब्रायन सँडोव्हल यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ही घटना पाशवी आणि दुःखकारक असल्याच त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पूर्ण गोंधळाची स्थिती

लास वेगासमधील एका नर्सनं रॉयर्टस या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये लास वेगासमध्ये पूर्ण गोंधळाची स्थित असल्याचं सांगितल आहे. या नर्सचे नाव कोडी आहे. "माझा भाऊ घटनास्थळी होता, तो पूर्णपणे हदरून गेला आहे," असं तिनं म्हटलं आहे.

"पोलीस चांगल काम करत आहेत. ते प्रत्येकाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण सर्व लोक फार काळजीत आहेत. प्रत्येकाला घरी संपर्क करायचा आहे." असं या नर्सनं सांगितलं आहे.

वाहतूक कोंडी

सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हीडिओत लोक लास वेगास सोडण्यासाठी गर्दी करत आहेत. त्यामुळं रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली आहे.

एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये एका महिलेनं मला असुरक्षित वाटत आहे. माझ्याकडे बंदूक असती तर बरं झालं असत, असं म्हटलं आहे.

इतर काही ठिकाणीही अशा घटना घडल्याची माहिती चुकीची असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

यापूर्वी जून 2016 मध्ये फ्लोरिडातील ओरलॅंडोमधल्या नाईट क्लबमधील गोळीबारात 49 ठार झाले होते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)