भारत-चीन तणावामुळे नक्की नुकसान कोणाचं होणार?

    • Author, अरुणोदय मुखर्जी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारत आणि चीनमधील तणावपूर्ण संबंधांमुळे दोन्ही देशातील मूळ वाद अद्याप कायम असल्याचं दिसून येतं.

या परिस्थितीत दोन्ही देशांच्या नात्याचं भविष्य काय असेल, हे समजून घ्यायचं असेल तर भारताची परराष्ट्र व्यवहारविषयक भूमिका पाहणं अतिशय महत्त्वपूर्ण ठरतं.

भारताच्या माजी परराष्ट्र सचिव निरुपमा राव सांगतात, "गेल्या 45 वर्षांत एलएसीवर एकदाही गोळीबार झाला नाही. पण, आता गलवान खोऱ्यातील घटनेमुळे सगळं काही विखुरल्यासारखं दिसत आहे."

गेल्या दशकभरात भारताचे चीनसोबत मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. चीननं भारतात गुंतवणूक केली आहे आणि दोन्ही देशांमध्ये व्यापारही झाला आहे.

सीमावादानंतर भारतानं चीनी मोबाईल अॅप्सवर बंदी घातली आहे, पण हे एक मर्यादित पाऊल होतं.

युरेशिया समूहाचे अध्यक्ष इएन ब्रेमर यांच्या मते, भारताला सीमेवरील तणाव वाढवायचा नाहीये.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, "भारताचं सैन्य चीनी सैन्याची गोळीबार करण्याची जी क्षमता आहे, त्याच्या जवळपासही नाही आहे, हे खरं आहे. तसंच भारताला सीमेवरील तणावही वाढवायचा नाहीये. पण, भारताजवळ प्रचंड लोकप्रिय पंतप्रधान आहेत आणि चीनविरुद्ध बोलल्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादाच्या प्रतिमेला राजकीय फायदा मिळत आहे. यामुळे देशातील उद्योगालाही फायदा होत आहे आणि भारतीय लोकांना आपल्या पसंतीच्या क्षेत्रात पाय रोवण्याची ही एक संधी आहे."

भारत आणि चीनमधील व्यापार

भारत आणि चीनमधील व्यापाराची आकडेवारी चकित करणारी आहे.

2001मध्ये दोन्ही देशांमधील व्यवहार 3.6 अब्ज डॉलरचा होता, तर 2019 मध्ये तो 90 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला.

चीन भारताचा सगळ्यात मोठा व्यापार सहकारी (ट्रेडिंग पार्टनर) आहे.

हे नातं एकतर्फी नाही. आज भारत सामान्य औषधाच्या बाबतीत जगभरातील सगळ्यात मोठा निर्यातदार असेल, तर यात चीनचंही योगदान आहे. कारण, या औषधांसाठीचा कच्चा माल चीनमधूनच येतो.

व्यापाराशिवाय दोन्ही देशांनी एकमेकांच्या ठिकाणी गुंतवणूकही केली आहे. पण, ती या देशांतच्या एकूण क्षमतेपेक्षा कमी आहे.

1962चं युद्ध आणि लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (LOC) वर अनेक वर्षांपासून तणाव असला तरी या दोन्ही देशांतील व्यापार दिवसेंदिवस वाढत गेला आहे.

द्विपक्षीय व्यापारात चीनचा निर्यात हिस्सा दोन-तृतीयांश आहे, अशी भारताची तक्रार असते.

भारत आणि चीनमधील व्यापारात 50 बिलियन डॉलरचा तोटा झाला आहे. यामुळे अधिक कठोर पावलं उचलणं भारतासाठी धोकादायक ठरू शकतं.

त्यामुळे भारतानं सांभाळून पावलं उचलणं गरजेचं आहे. भारताला सीमाभागातील आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसोबतच आर्थिक गरजाही लक्षात घ्याव्या लागणार आहेत.

एकमेकांच्या देशातील उत्पादित वस्तूंसाठी चीन आणि भारत हे मोठं मार्केट आहे.

यासोबतच अमेरिका आणि पश्चिमेकडील देशांसाठीसुद्धा हे दोन्ही देश सगळ्यात मोठं मार्केट आणि आकर्षणाचं ठिकाण आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या 2019 सालच्या आकडेवारीनुसार, जगाची अर्थव्यवस्था जवळपास 90 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी आहे. यात चीनचं 15.5 टक्के, तर भारताचं 3.9 टक्के योगदान आहे,

जगाच्या अर्थव्यवस्थेतील 22 ते 23 टक्क्यांवर जगभरातील 37 टक्के लोकसंख्येची देखभाल करण्याची जबाबदारी आहे.

बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट भारतासाठी आव्हान

यासोबतच चीन बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट अंतर्गत शेजारील देशांमध्येही महामार्ग, रेल्वे आणि बंदराची उभारणी करत आहे. हा प्रोजेक्ट भारतासाठी येणाऱ्या काळात आव्हान ठरू शकतो.

इएन ब्रेमर यांच्या मते, "शेजारच्या देशांवर चीनचा मोठा प्रभाव राहिल. यामुळे भारतीय स्वत:ला बॅकफूटवर गेल्याचं समजतात. चीन एक भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे आणि तिथं सरकारच्या इशाऱ्यावर मोठी गुंतवणूक होत आहे. यामुळे तिथल्या सरकारला राजकीय फायदा होत आहे. भारतासाठी हे एक मोठं आव्हान आहे."

येणाऱ्या काळात दोन्ही देश कसं काम करतील, त्यावर सीमाभागातील स्थिरता अवलंबून राहिल.

चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडॉरसुद्धा (सीपेक) चीनच्या महत्त्वाकांक्षी 'बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट' अंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या व्यापारी नेटवर्कचा भाग आहे.

सीपेकच्या अंतर्गत पाकिस्तानात पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रोजेक्ट सुरू आहेत. यामध्ये चीननं 62 अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे.

चीन सीपेकला सगळ्यात जास्त महत्त्वपूर्ण योजना समजत आला आहे.

गलवान खोऱ्यातील 15 जूनची घटना

15 जून रोजी गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमधल्या सैन्यात हिंसक चकमक झाली होती. यात भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला होता. चीननं अद्याप मृतांच्या संख्येविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही.

तेव्हापासून सीमाभागात दोन्ही देशांचं सैन्य तैनात करण्यात आलं आहे.

दोन्ही देशांमध्ये सैन्य आणि राजकीय पातळीवर चर्चा सुरू आहे आणि तणाव कमी झाल्याचा दावाही केला जात आहे.

गेल्या महिन्यात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लडाखमध्ये म्हटलं होतं की, "दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे आणि समस्येवर तोडगा काढायला हवा." तसंच या समस्येचा निपटारा कधी होईल, याची काही हमी देता येत नाही, असंही ते म्हणाले होते.

15 जूनच्या घटनेनंतर भारत आणि चीनदरम्यान अनेकदा वेगवेगळ्या पातळीवर चर्चा झाली आहे.

दोन्ही देशांतील सैन्य अनेक भागांमधून मागे हटलं असलं, तरी काही भागांविषयी दोन्ही देशांमध्ये अद्याप चर्चा सुरू आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)