You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारत-चीन हे दोन्ही देश भूतानला का कुरवाळत आहेत?
- Author, भूमिका
- Role, बीबीसी प्रतिनिधी
कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक असो, हाँगकाँगमध्ये आणलेला नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा असो, विगर मुस्लिमांचा कथित छळ असो किंवा भारताबरोबरचा सीमासंघर्ष. चीन सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक वादांमध्ये अडकला आहे..
असं असतानाच चीनने एक नवा वाद उकरून काढला आहे. चीनने भूतानच्या पूर्वेकडे असलेल्या सकतेंग वन्यप्राणी अभयारण्यावर आपला दावा सांगितला आहे. इतकंच नाही तर भूतानच्या पूर्व सेक्टरलाही चीनने सीमावादात खेचलं आहे.
भूतान आणि चीनमधली सीमारेषा अजून निश्चित झालेली नाही आणि मध्य, पूर्व आणि पश्चिम सेक्टरमध्ये सीमारेषेवरून वाद आहेत, असं चीनचं म्हणणं आहे.
मात्र, हा वाद सोडवण्यासाठी चीनने 'पॅकेज तोडगा' देऊ केला आहे. त्यामुळे आता प्रश्न असा उपस्थित होतोय की भूतानला लागून असलेल्या सीमेवरून चीनने अचानक कठोर भूमिका घेतली आणि तेवढ्याच अचानकपणे नरमाईचीही भूमिका घेतली. असं का?
चीनने यापूर्वी असा दावा केलेला नाही
भूतानच्या पूर्व भागावर चीनने केलेला दावा नवा आहे. कारण यापूर्वी कधीही चीनने सकतेंग अभयारण्यावर दावा केलेला नाही. हे अभयारण्य अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत आहे.
विशेष म्हणजे 1984 सालानंतर वादग्रस्त सीमेविषयी 24 वेळा चर्चा झाली आहे. तोवर चीनने असा कुठलाच दावा केला नव्हता.
मंगळवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग बेनविन पत्रकारांशी बोलताना सीमा निश्चितीविषयी म्हणाले, "चीनची भूमिका तटस्थ आणि स्पष्ट आहे. दोन्ही देशांमध्ये अजून सीमा निश्चिती झालेली नाही. मध्य, पूर्व आणि पश्चिम सेक्टरवरून वाद आहेत."
पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले की दोन देशांमधल्या या मुद्द्याविषयी इतर व्यासपीठावर चर्चा होऊ नये, असं चीनला वाटतं. चीनने केलेल्या दाव्यावर दिल्लीतल्या भूतानच्या दूतावासानेही प्रतिक्रिया दिली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार चीनच्या दाव्याला भूतानने उत्तर दिलं आहे.
सामरिक विषयांचे जाणकार ब्रह्मा चेलानी म्हणतात, "चीनने यापूर्वी कधीही हा मुद्दा काढलेला नाही आणि अचानक गेल्या महिन्यात भूतानच्या पूर्वेकडच्या भागावर दावा केला. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की चीन कधीही कुठलाही नवीन दावा करू शकतो. चीनच्या शेजारील राष्ट्रांनाही कळणार नाही की चीन कधी कुठल्या प्रदेशावर दावा सांगेल."
गलवान खोऱ्यावर चीनने केलेल्या दाव्याचा उल्लेख करत चेलानी म्हणतात की चीनने यापूर्वी कधीही गलवान खोऱ्यावरही दावा सांगितलेला नव्हता.
ते म्हणतात, "निश्चितच ही चीनची रणनीती आहे. चीनची ही वर्तणूकही नवी नाही."
भारत-भूटान संबंध
एकीकडे चीनने भूतानच्या एका भागावर दावा सांगत हा वाद परस्पर चर्चेतून सोडवण्यावर भर दिला आहे तर दुसरीकडे भूतानशी असलेले संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने भारताचे प्रयत्न सुरू आहेत.
गेल्या काही दिवसातल्या घटनाक्रमावर नजर टाकली तर हे लक्षात येईल. नुकताच 15 जुलै रोजी भारत आणि भूतान यांच्यात एक नवा व्यापारी मार्ग खुला झाला आहे.
शिवाय, आणखी एक कायमस्वरुपी लँड कस्टम स्टेशन उभारण्यात यावं, अशी भूटानची मागणी आहे. ही मागणीही भारत स्वीकारेल, अशी शक्यता आहे. यामुळे भूतानला निर्यातवाढीसाठी मदत होणार आहे.
भारत आणि भूतान परस्पर सहकार्य नवीन नाही.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर या दोन देशांमध्ये एक करार झाला होता. यात अनेक तरतुदी होत्या. मात्र, त्यातली सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे संरक्षण आणि परराष्ट्र विषयांमध्ये भूतानचं भारतावर असणाऱ्या अवलंबित्वाची.
पुढे या करारात अनेक बदल झाले असले तरी आर्थिक सहकार्य मजबूत करणं आणि त्यांचा विस्तार करण्यासाठी संस्कृती-शिक्षण, आरोग्य, क्रीडा, विज्ञान-तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये परस्पर सहकार्य यासंबंधीच्या तरतुदी करण्यात आल्या. विकासासाठी आवश्यक तरतुदींचाही समावेश करण्यात आला.
भारत आणि भूटान यांना दूर करण्याचं चीनचं कारस्थान?
भूटान आणि भारत दक्षिण आशियातले सर्वात जवळचे मित्र मानले जातात.
जाणकारांच्या मते भूतानसंबंधी चीनचा सीमावाद भारताच्या स्ट्रेटेजिक हितसंबंधांना बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न असू शकतो.
भारताचे भूतानमधले माजी राजदूत पवन वर्मा यांच्या मते, "भूतानवर दबाव टाकण्याचा चीनचा प्रयत्न आहे. भारत-भूतान आणि चीन यांच्या सीमेवर एक ट्राय-जंक्शन तयार होतं. त्यामुळे चीनला याची पूर्ण कल्पना आहे की भूतानबरोबर सीमा निश्चित केल्यास त्याचा भारताच्या स्ट्रेटेजिक हितसंबंधांवर परिणाम होईल."
पवन वर्मा यांच्या मते फार पूर्वीपासून चीनचे यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. भूतानने भारताबरोबरचे संबंध तोडून त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करावे, अशी चीनची इच्छा आहे. मात्र, अजून चीन आणि भूतान यांच्यात राजनयिक संबंधही नाही.
2017 साली भूतानच्या मुद्द्यावरूनच भारत आणि चीन समोरासमोर उभे ठाकले होते. त्यावेळी दोन्ही देशांचं सैन्य तब्बल 75 दिवस समोरासमोर होतं.
त्यावेळीदेखील चीनने भूतानचा एक भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता.
भारताचे भूतानमधले माजी राजदूत इंद्रपाल खोसला यांनी बीबीसीशी बोलताना हा चीनच्या विस्तारवादी धोरणाचा परिणाम असल्याचं म्हटलं होतं. त्यांच्या मते चीनच्या या धोरणामुळेच चीन एकापाठोपाठ एका प्रदेशावर दावे करतो आहे.
आपलं हित साधून घेण्यासाठी भारत भूतानचा वापर करत असल्याचा चीनचा आरोप आहे.
डोकलाम वादावेळी ग्लोबल टाईम्स या चीनच्या सरकारी वृत्तपत्राने आरोप केला होता की भूतानच्या चेकपोस्टवर भारताने विनाकारण ढवळाढवळ केली.
चीनच्या या सरकारी मुखपत्रात म्हटलं होतं, "भूतकाळात चीन आणि भूतान यांच्या सीमेवर अनेक घटना घडल्या आहेत. सर्व समस्यांवर रॉयल भूतान आर्मी आणि चीनी लष्कर मिळून तोडगा काढायचे. यात भारतीय सैन्याची कधीच गरज भासली नव्हती."
वृत्तपत्रात पुढे म्हटलं आहे, "भूतानमध्ये भारतीय सैन्य आहे आणि भूतानच्या लष्कराला भारत प्रशिक्षण आणि निधी पुरवतो, यात शंका नाही. मात्र, भारत हे सगळं भूतानच्या सुरक्षेसाठी करत नाही. तर भारत स्वतःच्या सुरक्षेसाठी करतो. ही भारताची चीनविरोधी सामरिक योजना आहे."
दोन्ही देशांसाठी भूतान का आहे महत्त्वाचा?
भूटान भारत आणि चीन दरम्यान असलेलं एक बफर राष्ट्र आहे.
भारतात एक अनौपचारिक प्रथा आहे. भारताचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री, परराष्ट्र सचिव, सैन्य आणि रॉ यांचे प्रमुख यांचा पहिला परराष्ट्र दौरा हा भूतानचा असतो. यावरूनच भारताच्या दृष्टीने भूतान किती महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट होतं.
पवन वर्मा सांगतात, "नकाशावर भूतानचं भौगोलिक स्थान बघूनच भूतान भारतासाठी का महत्त्वाचा आहे, हे लक्षात येतं. आपल्या सुरक्षेसाठी आणि सामरिकदृष्ट्या भूतानशी संबंध कायम ठेवणं, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच कारणामुळे भारताचे जगात सर्वात चांगले संबंध भूतानशी आहेत."
भारताची भूतानला लागून 605 किमी सीमा आहे. त्यामुळे भूतानचं भारताच्या दृष्टीने सामरिक महत्त्व तर आहेच. शिवाय, भारत आणि भूतान यांच्यातले व्यापारी संबंधही दृढ आहेत. 2018 साली दोन्ही देशांमध्ये 9228 कोटी रुपयांचा द्विपक्षीय व्यापाार झाला होता.
भूतान भारतासाठी एक मुख्य जलविद्युत ऊर्जेचा स्रोतही आहे. शिवाय, भारताच्या सहकार्याने भूतानमध्ये अनेक योजनांवर काम सुरू आहे.
तर दुसरीकडे भूतान आणि चीन यांच्यात राजनयिक संबंधदेखील नाहीत.
पवन वर्मा सांगतात, "चीनसाठी भूतान महत्त्वाचा आहे कारण चीनने भूटानमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं तर तो भारताच्या सीमेच्या अधिक जवळ येईल. याशिवाय भारत-भूतान आणि चीन यांच्यात काही ठिकाणं अशी आहेत की तिथे जर चीन पोहोचला तर तो 'चिकन-नेक'च्या (ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यांना जोडणारा चिंचोळा पट्टा) अगदी जवळ येईल. यामुळे भारतावर निश्चितपणे दबाव निर्माण होईल. म्हणूनच एकतर दबाव टाकून किंवा प्रलोभन देऊन भूतानला आपल्याकडे वळवण्याचा चीनचा कायम प्रयत्न असतो."
पवन वर्मा यांच्या मते भूतानने चीनशी संबंध प्रस्थापित करावे, यासाठी याआधीही चीनचे प्रयत्न सुरू होते आणि यापुढे चीन तसे प्रयत्न करेल.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.