You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना व्हायरस नाही तर 'हा' रोग ठरतोय भारतात जास्त जीवघेणा
- Author, नितिन श्रीवास्तव
- Role, बीबीसी प्रतिनिधी
साधारण एका वर्षापूर्वी मुंबईत राहणाऱ्या, 41 वर्षांच्या पंकज भवनानींचं आयुष्य सुरळीत चाललं होतं. पत्नी राखी, दोन जुळी मुलं आणि कॉर्पोरेट क्षेत्रातली चांगल्या हुद्द्याची नोकरी सगळं जागच्या जागी होतं.
पण ऑक्टोबर 2019 मध्ये त्यांना आपल्याला ट्युबरक्युलॉसिस म्हणजेच टीबी असल्याचं कळालं. पंकज यांच्या दोन्ही फुप्फुसांवर टीबीने हल्ला केला होता. पण जवळपास 6 महिन्यांच्या उपचारांनंतर त्यांनी 80 टक्के रिकव्हरी केली. पण इतक्यात संकटं संपणार नव्हती.
फेब्रुवारी 2020 मध्ये केलेल्या टेस्टवरून कळालं की, टीबीच्या बॅक्टेरियाने त्यांच्या मेंदूलाही संक्रमित केलं आहे. यानंतर तीन महिन्यातच पंकज यांना अंधत्व आलं. त्यांच्या पायांचं संतुलनही बिघडायला लागलं होतं.
"लॉकडाऊन संपल्यानंतर 16 जुलैला माझ्या मेंदूचं ऑपरेशन झालं. हे ऑपरेशन जवळपास 6 तास चाललं. यात मेंदूला झालेलं इन्फेक्शन साफ केलं. त्यानंतर मी 10 दिवस दवाखान्यात अॅडमिट होतो आणि मला खूप स्ट्राँग गोळ्या चालू होत्या. मला डिस्चार्ज दिल्यानंतरही पुढचं वर्षभर या गोळ्या चालू ठेवायला सांगितलं होतं."
यानंतर खरी अडचण सुरू झाली. डिस्चार्ज मिळाल्यानंतर एका आठवड्यानी या गोळ्या कुठे मिळूच शकल्या नाहीत. पंकज म्हणतात, "जर टीबीची ट्रीटमेंट अर्ध्यात थांबली तर पेशंटला बरं वाटणं तर दूर, त्याचा जीवही जाऊ शकतो. जेव्हा माझी औषधं संपायला लागली तेव्हा पाच दिवस माझ्या घरातलं कोणीच झोपलं नाही. सतत भीती वाटत होती की, माझ्या मुलांना मी संक्रमित करतो की काय."
पंकजच्या कुटुंबाने पंतप्रधान कार्यालय, महाराष्ट्र सरकार, सगळे मोठे हॉस्पिटल्स आणि खाजगी संस्थांकडे मदत मागितली. पण यात अडचण अशी होती की या गोळ्या जपानहून आयात होत होत्या आणि त्यांचा पुरवठा कोरोना व्हायरसच्या जागतिक संकटामुळे खंडित झाला होता.
सुदैवानी पत्नी राखी यांच्या ट्वीट्समुळे ही गोष्ट पसरली आणि त्यांना औषधं मिळायला मदत झाली. ते अवघड दिवस आठवले की पंकज भावूक होऊन म्हणतात, "काही दिवस तर वाटलं की हा टीबी माझा जीव नक्की घेणार."
भारतात टीबीची स्थिती
जागतिक आरोग्य संघटना, अर्थात WHOच्या अहवालानुसार क्षयरोग हे जगात मृत्यूच्या दहा कारणांपैकी एक आहे. तसंच एकाच जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये टीबीनं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण सर्वांत जास्त आहे.
WHO नं 2018 साली जाहीर केलेल्या अहवालानुसार, वर्षभरात जगात सुमारे एक कोटी 40 लाख लोकांना टीबीची लागण होते, त्यातले 20 लाख लोक भारतात आहे. तसंच टीबीनं होणाऱ्या जगभरातल्या 15 लाख मृत्यूंपैकी सुमारे वीस टक्क्यांहून अधिक मृत्यू हे भारतात होतात.
भारत सरकारच्या अहवालानुसार (RNTCP report) देशात गेल्या वर्षी उत्तर प्रदेशात सर्वाधिक 4 लाख 20 हजार, तर महाराष्ट्रात सुमारे 2 लाख 9 हजार रुग्ण आढळून आले. मुंबई महापालिकेच्या आकडेवारीनुसार 2017-18 साली शहरात आढळून आलेल्या क्षयरोगग्रस्तांची संख्या 46 हजारांहून अधिक होती. देशात ड्रग रेझिस्टंट म्हणजे औषधाला प्रतिसाद न देणाऱ्या क्षयरोगानं ग्रस्त रुग्णांचं प्रमाण मुंबईत सर्वाधिक असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
ही आकडेवारी कोरोना व्हायरसने भारतात पाय ठेवण्याच्या आधीची आहे. सरकारी आकड्यांची तुलना केली तर लक्षात येतं की, नव्याने नोंद होणाऱ्या टीबी पेशंट्सच्या संख्येत घट झालीये. अशा केसेसचं प्रमाण जवळपास निम्म्यावर आलंय.
बिहारचे प्रमुख टीबी अधिकारी डॉक्टर केएन सहाय यांच्यामते, "सगळा फोकस सध्या कोव्हिड -19 चं निदान करण्यावर शिफ्ट करावा लागला." पंकज भवनानींसारखे असे अनेक पेशंट होते ज्यांना या साथीच्या काळात औषधं मिळवायला अडचण आली. कित्येकांना आपले उपचार अर्ध्यातच सोडावे लागले.
संक्रमणाचा धोका
आता यात कम्युनिटी स्प्रेड वाढण्याचाही धोका आहे. शाकिब खान (बदललेलं नाव) गाजियाबाद-नोएडा सीमेवर राहात होते. त्यांच्या वडिलांना टीबी होता आणि त्यांच्यावर दिल्लीतल्या एका दवाखान्यात उपचार सुरू होते. लॉकडाऊनच्या काळात हाताला काम आणि खिशात पैसे नसल्याने त्यांचं कुटुंब गावी गेलं.
त्यांनी सांगितलं की, "लॉकडाऊनच्या काळात वडिलांची औषधं संपली. पुन्हा उपचार सुरु करण्यात तीन आठवड्यांचा वेळ गेला. आता डॉक्टर म्हणत आहेत की, पुन्हा वर्षभराची औषधं घ्यावी लागतील."
योग्य वेळेवर निदान आवश्यक
नरेंद्र मोदीं सरकारने 2025 पर्यंत देशातून टीबीला हद्दपार करण्याची शपथ घेतली आहे. पण कोव्हिड -19 चा परिणाम टीबीच्या उपचारांवर झाल्याचं दिसून येतंय.
'एपिडेमियोलॉजी अँड ग्लोबल हेल्थ'मध्ये कॅनडा रिसर्च चेअर आणि मॅकगिल आंतरराष्ट्रीय टीबी सेंटरच्या प्रमुख डॉ मधू पै या पूर्ण घटनाक्रमाचा अभ्यास करत आहेत आणि त्यांच्या मते, " भारताचं टीबीला 2025 पर्यंत हद्दपार करण्याचं स्वप्न कमी कमी पाच वर्षं पुढे ढकललं जाऊ शकतं."
बीबीसी हिंदीला दिलेल्या एका इंटरव्ह्यू दरम्यान त्यांनी म्हटलं होतं, "कोव्हिड -19 मुळे लोकांना घरात बसावं लागलं आणि त्यात लाखो टीबीचे पेशंटही होते. बरं, यात असेही लोक होते ज्यांना हे माहिती नसेल की आपल्याला टीबीचं संक्रमण झालंय. आताही डेटा सांगतोय, की टीबीच्या नोटिफिकेशन (नवीन केसेस समोर येणं) मध्ये जवळपास 40 टक्के घट झालीये."
अनेक वर्षं टीबीवर भारतात उपचार घेतल्यानंतर नुकत्याच युरोपमध्ये राहायला गेलेल्या रिया लोबो यांचीही कोव्हिड -19 बद्दल एक तक्रार आहे.
त्या म्हणतात, "आता वेळ आली आहे की, जगाला सगळ्यात जीवघेणा आजार कुठला आहे हे कळावं आणि कोव्हिड-19 बरोबरच क्षय रोगालाही त्यांनी महत्त्व द्यावं. सगळ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. कोणता रोग झालाय हे महत्त्वाचं न मानता, सगळ्यांनाच उपचार मिळणं, चांगलं आरोग्य मिळणं ही प्राथमिकता असायला हवी. इतकी वर्षं झाली क्षयरोगासाठी कुठलीही लस आलेली नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)