You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : वितरणासाठी टास्क फोर्स स्थापन - उद्धव ठाकरे
कोरोनाच्या लशीचं वितरण आणि लसीकरण यासाठी महाराष्ट्र सरकारने टास्क फोर्स स्थापन केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (24 नोव्हेंबर) कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लशीच्या वितरणासंदर्भात पंतप्रधानांना माहिती दिली.
कोरोना लशीबाबत आम्ही पुण्यातील सिरम इन्स्टिट्युटचे अदर पुनावाला यांच्याशी सातत्याने बोलत आहोत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं.
तसंच, "लसीकरणाच्या बाबतीत काही गोष्टींची स्पष्टता आवश्यक असून लशीची उपलब्धता, लशीची संख्या, लशीचे दुष्परिणाम, लशीचा परिणाम, लशीवरील येणारा खर्च आणि त्याचे वितरण याबाबतीत महाराष्ट्रात एक टास्क फोर्स स्थापन केला असून त्यामध्ये या सर्व विषयांवर चर्चा केली जाणार आहे," असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
राजकारण न करण्याच्या सूचना द्याव्यात - ठाकरे
कोरोना परिस्थितीत जनतेच्या जीवाशी खेळणारे राजकारण न करण्यासाठी राजकीय पक्षांना सूचना देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, "पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी देशातील सर्व राजकीय पक्षांची एक बैठक घेऊन परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे आणि राजकारण न करता उपाययोजनांत सहकार्य करण्याच्या सूचना द्याव्यात."
"आज एकीकडे आम्ही कोरोनाला रोखण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्क घालणे हे आवाहन करीत असून दुसरीकडे राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून राजकारण करीत आहेत. त्यामुळे आमचे सर्व प्रयत्न असफल होऊ शकतात आणि कोरोना लाटेला आमंत्रण मिळू शकते," या गोष्टीकडे उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.
"कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील काळात लस वितरण, राज्याराज्यांतून नागरिकांचा होणारा प्रवास तसंच कंटेन्मेंट क्षेत्र निश्चिती याबाबत देशव्यापी धोरण असेल तर अधिक नियोजनबद्ध रीतीने हा लढा देता येईल," अशी आशाही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
'माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेला यश'
केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या सूचना कटाक्षाने पाळण्याचा प्रयत्न महाराष्ट्र करत असून, राज्यात दोन टप्प्यात राबवण्यात आलेल्या 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने संसर्ग रोखण्यात यश मिळाल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
शिवाय, या मोहिमेमुळे प्रत्येक घरात आरोग्य चौकशी करण्यात आल्याने 11 कोटी 92 लाख लोकांचा आरोग्य डेटा आपल्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात गेल्या दोन आठवड्यात दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्ण संख्येत घसरण झाली असून आठ राज्यांच्या तक्त्यात आता महाराष्ट्र सर्वांत खालच्या क्रमांकावर आहे.
"पुढील काळात संक्रमणाची साखळी तोडणे गरजेचे आहे. 5 टक्क्यांपेक्षा कमी पॉझिटीव्हीटी दर आणणे गरजेचे आहे. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर जनजागृती वाढविणे आवश्यक आहे," अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)