You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना लस : ऑक्सफर्ड लशीच्या संशोधक - प्रा. सारा गिल्बर्ट
प्रा. सारा गिल्बर्ट यांनी त्यांच्या मनाचं ऐकलं असतं तर कदाचित आश्वासक निकाल देणाऱ्या सध्याच्या कोरोना व्हायरसवरच्या लशीचं चित्रं काहीसं वेगळं असतं.
अनेक वर्षांपूर्वी पीएचडीचा अभ्यास करत असताना हे विज्ञान क्षेत्रंच सोडून द्यावं, असं सारा यांच्या मनात आलं होतं. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट आंग्लियामध्ये जीवशास्त्राचा अभ्यास करताना त्यांच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होते.
पण नंतर युनिव्हर्सिटी ऑफ हाल मधून डॉक्टरेट करताना फक्त एकाच विषयावर लक्ष केंद्रित करून अभ्यास करणं आपल्याला तितकंसं आवडत नसल्याचं त्यांना वाटू लागलं.
"काही संशोधक असे असतात जे एकाच विषयावर दीर्घकाळ एकटे काम करतात...मला तसं काम करायला आवडत नाही. मला विविध क्षेत्रांतल्या विविध कल्पनांवर काम करायला आवडतं. विज्ञान क्षेत्र सोडून वेगळं काहीतरी करावं, असा विचार मी तेव्हा केला होता," बीबीसी रेडिओ 4 च्या 'द लाईफ सायंटिफिक' कार्यक्रमातल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं.
पण अखेरीस त्यांनी विज्ञान क्षेत्रात करियर करण्यासाठी आणखी एकदा प्रयत्न करायचं ठरवलं.
याच निर्णयामुळे कदाचित आपल्याला ऑक्सफर्ड विद्यापीठ विकसित करत असलेली कोरोना व्हायरसवरची लस अतिशय परिणामकारक असल्याची बातमी ऐकायला मिळतेय.
ही लस 70 टक्के संरक्षण देत असल्याचं चाचण्यांमध्ये आढळून आलंय. तर लशीच्या डोसचं प्रमाण बदलल्यास ही परिणामकारकता 90 टक्क्यांपर्यत वाढू शकते, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
मलेरियावरचं संशोधन
सारा गिल्बर्ट यांचा जन्म एप्रिल 1962मध्ये नॉर्दम्पटनशरमधल्या केटरिंगमध्ये झाला. त्यांचे वडील फुटवेअरचा व्यवसाय करत तर आई इंग्लिश शिक्षिका होती.
डॉक्टरेट पूर्ण केल्यानंतर सारा गिल्बर्ट यांना ब्रुईंग रिसर्च सेंटरमध्ये नोकरी मिळाली. यानंतर त्यांनी मानवी आरोग्यावरच्या संशोधनाचं काम सुरू केलं. लशीच्या संशोधनात तज्ज्ञ होण्याचं त्यांनी कधीच ठरवलं नव्हतं.
90च्या दशकाच्या मध्यात त्या ऑक्सफर्ड विद्यापीठात शैक्षणिक क्षेत्रात नोकरी करत होत्या. मलेरियाच्या जेनेटिक्सवर त्यांचा अभ्यास सुरू होता आणि यातूनच पुढे त्यांनी मलेरियावरच्या लशींच्या संशोधनाचं काम केलं.
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
एकाच वेळी जन्मलेल्या त्यांच्या तीन मुलांच्या (तिळे) जन्मानंतर त्यांचं आयुष्यं काहीसं कठीण झालं. आपल्या आईने कायमच आपल्याला साथ दिली आणि तिच्या मनात नेहमीच मुलांच्या भल्यासाठीचे विचार असतात, असं सारा यांचा मुलगा फ्रेडी आईबद्दल बोलताना सांगतो.
सारा गिल्बर्ट यांच्या तीनही मुलांनी आता आपापल्या क्षेत्राची निवड केली असून ते विद्यापीठात बायोकेमिस्ट्रीचा अब्यास करत आहेत.
करियरमधली झेप
ऑक्सफर्ड विद्यापीठात डॉ. सारा गिल्बर्ट यांनी झपाट्याने वरची पदं गाठली आणि त्या विद्यापीठातल्या मानाच्या जेनर इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापक झाल्या. फ्लूवरची जागतिक लस तयार करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या रिसर्च ग्रुपची स्थापना केली. विषाणू कोणत्याही प्रकारचा (Strain) असला तरी त्यावर परिणामकारक ठरणारी लस शोधण्याचं त्यांचं उद्दिष्टं होतं.
2014मध्ये त्यांनी ईबोलावरच्या पहिल्या लशीच्या ट्रायलचं नेतृत्व केलं. मर्स - मिडल ईस्ट रेस्पिरेटोरी सिंड्रोम आल्यानंतर त्यांनी सौदी अरेबियामध्ये जाऊन तिथे या प्रकारच्या कोरोना विषाणूवरची लस विकसित करण्याचा प्रयत्न केला.
2020च्या सुरुवातीला या लशीची दुसरी ट्रायल सुरू होत असतानाचा चीनमध्ये कोव्हिड 19ला सुरुवात झाली. कदाचित हीच दिशा नवीन कोरोना व्हायरसवरच्या लशीच्या संशोधनात वापरता येऊ शकते, हे प्रा. गिल्बर्ट यांच्या लक्षात आलं.
"आम्ही झपाट्याने काम केलं. चीनी संशोधकांनी नवीन व्हायरसचा जेनेटिक आराखडा प्रसिद्ध केल्यानंतरच्या वीकेंडपर्यंत आम्ही लशीची आखणी जवळपास केलेली होती. खूप वेगाने हे काम केलं आम्ही," सारा गिल्बर्ड यांच्या ऑक्सफर्डमधल्या सहकारी प्रा. टेरेसा लँबे सांगतात.
कोरोना व्हायरसमुळे जगभरात होत असलेले मृत्यू पाहता आपल्या कामामध्ये झपाटा आल्याचं त्या सांगतात. प्रा. सारा गिल्बर्ट पहाटेपासूनच कामाला सुरूवात करतात आणि रात्री उशीरापर्यंत त्या काम करत असल्याचं प्रा. लँबे सांगतात.
प्रयोगशाळेमध्ये कोव्हिडवर प्रभावी ठरणारी लस तयार करायला काही आठवड्यांचा कालावधी लागला. त्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला लशीच्या पहिल्या बॅचची निर्मिती सुरू झाली आणि लशीच्या चाचण्यांचा परीघ वाढत गेला. ही सगळी प्रक्रिया म्हणजे एका फटक्यात एक मोठी झेप घेण्याऐवजी, सातत्याने एकामागोमाग एक उचललेली लहान पावलं असल्याचं प्रा. गिल्बर्ट सांगतात.
"सुरुवातीपासूनच आम्ही याकडे व्हायरसविरोधातली स्पर्धा म्हणून पाहत होतो. लस विकसित करणाऱ्या इतरांसोबतची ही स्पर्धा नाही. आम्ही एका विद्यापीठाचा भाग आहोत. यामध्ये आम्ही पैसे कमावण्यासाठी उतरलेलो नाही." या लशीबद्दल बोलताना प्रा. गिल्बर्ट यांनी सांगितलं होतं.
त्यांचे शाळेतले, विद्यापीठातले मित्र-मैत्रिणी आणि सहकारी, डॉ. सारा गिल्बर्ट यांचं 'सारासार विचारशक्तीच्या, शांत आणि निश्चयी व्यक्ती' असं वर्णन करतात.
"कधीकधी त्या लोकांना लाजाळू आणि गंभीर स्वभावाच्या वाटू शकतात. जेनर इन्स्टिट्यूटमधल्या माझ्या काही सहकाऱ्यांना सारा यांच्यासोबत काम करताना दडपण यायचं. पण एकदा त्यांच्याशी नीट ओळख झाली, त्यांच्यासोबत वेळ घालवला, की असं वाटत नाही.
कोव्हिडवरची लस तयार करणाऱ्या शिल्पकारांपैकी एक म्हणून आता साऱ्या जगाचं लक्ष डॉ. सारा गिल्बर्ट यांच्यावर आहे.
त्यांच्य सहकारी बायोकेमिस्ट डॉ. अॅन मूर सांगतात, "त्यांना हे अजिबात आवडणार नाही. सारा यांना प्रकाशझोतात वा चर्चेत रहायला अजिबात आवडत नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)