You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑक्सफर्ड कोरोना लसीचे अंतिम चाचण्यांचे निकाल येतील ख्रिसमसआधीच
कोव्हिड-19 या संसर्गजन्य आजारावर लस शोधण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. यातल्या सर्वाधिक अपेक्षा असलेल्या मोजक्या लसींपैकी एक असलेल्या ऑक्सफोर्डच्या लस संशोधनात एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी येतेय.
"ख्रिससमसपूर्वी या लसीच्या अंतिम चाचण्यांचे निकाल येतील," असं ऑक्सफोर्ड व्हॅक्सिन ग्रुपचे प्रा. अँड्रू पोलार्ड यांनी सांगितलं आहे. ते बीबीसी रेडियो-4 च्या टुडे प्रोग्राम या कार्यक्रमात बोलत होते.
ही लस कोव्हिड-19 ची लागण होण्यापासून रोखू शकेल का, याचं उत्तर आता लवकरच मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं. टुडे प्रोग्रामशी बोलताना प्रा. पोलार्ड म्हणाले, "लस संशोधनातली प्रगती बघता ख्रिसमसपूर्वी नक्कीच निकाल हाती येतील."
अंतिम चाचण्यांचे निकाल हाती आल्यानंतर लस निर्मितीच्या प्रक्रियेस गती येईल आणि लवकरच कोरोना आटोक्यात येऊ शकेल असा अंदाज आहे.
"याआधीच चाचण्यांचे निकाल हाती येणं अपेक्षित होतं. मात्र, उन्हाळ्यात कोरोनाग्रस्तांची संख्या घटली होती. त्यामुळे संशोधनाचा वेगही मंदावला होता.
"मात्र, गेल्या महिनाभरात केवळ युकेमध्येच नाही तर ऑक्सफोर्ड लसीची चाचणी सुरू असलेल्या इतरही अनेक देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आणि त्यामुळे संशोधनाला वेग आला आणि आता ख्रिसमसपूर्वी सर्व चाचण्यांचे निकाल हाती येतील आणि एका ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल," असं प्रा. पोलार्ड यांचं म्हणणं आहे.
- वाचा - युरेका! कोरोनावर प्रभावी औषध सापडलं, डेक्सामेथासोनकडून WHO ला पण आशा
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-सीरम इन्स्टिट्यूटला लशीची चाचणी पुन्हा सुरू करायला परवानगी
- वाचा- कोरोना व्हायरसचं संकट टाळण्यासाठी कोणते उपाय उपलब्ध आहेत?
आतापर्यंतच जे निकाल हाती येत आहेत त्यावर समाधानी असल्याचंही त्यांनी सांगितलं.
या लसीविषयी सांगताना ते म्हणाले, "सर्वच वयोगटात या लसीचा प्रतिसाद सारखाच आहे. अगदी 70 वर्षांहून मोठ्या व्यक्तींमध्येसुद्धा. इतकंच नाही तर 55 वर्षांहून मोठ्या व्यक्तीसुद्धा या लसीला चांगला प्रतिसाद देत आहेत."
"शरीराने लसीला चांगला प्रतिसाद देणे म्हणजे लसीचे कुणावरही दुष्परिणाम दिसून आलेले नाही. सर्वच वयोगटातल्या व्यक्ती लसीला उत्तम प्रतिसाद देत असतील तर जगभरात लस पोहोचवण्याच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिवाय, यामुळे वृद्धांमधलं कोव्हिड-19 मुळे होणारं मृत्यूचं प्रमाणही कमी होईल," पोलार्ड सांगतात.
'ऑक्सफर्डची लस गेमचेंजर ठरेल'
ऑक्सफोर्डची लस 'गेम चेंजर' ठरेल, अशी आशा असल्याचं युके सरकारच्या विज्ञानविषयक सल्लागार गटाचे सदस्य डॉ. मिशेल टिल्डस्ले यांनी बीबीसी ब्रेकफास्ट कार्यक्रमात बोलताना सांगितलं.
"यूके सरकारने ऑक्सफोर्ड लसीचे 10 कोटी डोस आधीच बुक करून ठेवले आहेत. सर्व चाचण्यांमध्ये लस यशस्वी ठरली तर एवढ्या डोसने ब्रिटन हर्ड इम्युनिटीचा टप्पा गाठेल," असंही डॉ. टिल्डस्ले यांचं म्हणणं आहे.
ऑक्सफोर्डच्या चाचण्यांमध्ये साठी आणि सत्तरीतल्या व्यक्तींमध्ये चांगले परिणाम आढळून आले आहेत. त्यामुळे कोव्हिडचा सर्वाधिक धोका असणाऱ्या वयोगटातल्या लोकांसाठी ही संजीवनीच ठरणार आहे.
560 सुदृढ प्रौढांवर करण्यात आलेल्या दुसऱ्या टप्प्याचे परिणाम 'उत्साहवर्धक' असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.
'तिसऱ्या टप्प्यात अनेक लसी'
सध्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्या सुरू आहेत. हा या संशोधनातला अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. येत्या काही आठवड्यात या टप्प्याच्या चाचण्यांचेही निकाल हाती येतील.
फायझर-बायोटेक, स्पुतनिक आणि मॉडर्ना या इतर तीन लसींच्या तिसऱ्या टप्प्याचे प्राथमिक निकाल आले आहेत. हे निकालही सकारात्मक आहेत. फायजरने तर 65 वर्षांवरील लोकांमध्ये ही लस 94% उत्तम रिझल्ट देत असल्याचं म्हटलं आहे.
ऑक्सफोर्डद्वारे विकसित करण्यात येणाऱ्या लसीचं उत्पादन अॅस्ट्रॅझेनका ही कंपनी करणार आहे. युकेने या लसीचे 10 कोटी डोस ऑर्डर केले आहेत. तर फायझर-बायोटेकच्या 4 कोटी आणि मॉडर्ना लसीच्या 50 लाख डोसची ऑर्डर दिली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)