अली खामेनी : गेली 35 वर्षे 'सुप्रीम लीडर' असलेल्या इराणच्या सर्वात 'शक्तिशाली' नेत्याचा प्रवास

    • Author, बीबीसी न्यूज पर्शियन

इराणमधील वाढत्या महागाईविरोधातील आंदोलन आता इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी यांच्या राजवटीचा शेवट करण्याच्या मागणीपर्यंत पोहोचलं आहे.

अयातुल्लाह अली खामेनी यांनी मात्र आंदोलकांना 'अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना खुश करण्याचा प्रयत्न करणारे', 'नासधूस करणाऱ्या विध्वंसक लोकांचा समूह' आणि 'उपद्रव निर्माण करणारे' म्हटलं आहे.

खामेनी यांनी 9 जानेवारी 2026 रोजी टीव्हीवरील भाषणात म्हटलं की, "प्रत्येकाला हे माहित असलं पाहिजे की, इस्लामिक प्रजासत्ताक हजारो, लाखो सन्माननीय लोकांचं रक्त सांडलं गेल्यानंतर सत्तेत आलं आहे. जे लोक याला नाकारतात, त्यांच्यासमोर हे इस्लामिक प्रजासत्ताक मागे हटणार नाहीत."

यानंतर, समर्थकांच्या एका सभेत केलेल्या आणि सरकारी टीव्ही प्रसारित झालेल्या भाषणात अयातुल्लाह अली खामेनी भूमिका आणखी कठोर करत म्हणाले की, "इराण विध्वंसक घटकांशी सामना करण्यापासून मागे हटणार नाही."

वयाच्या 86 व्या वर्षात असणारे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी कोण आहेत? त्यांच्या हातात देशातली किती सत्ता आहे आणि त्यांची इराणच्या राजकारणात काय भूमिका आहे, हे आपण जाणून घेऊया.

धर्मगुरू ते शक्तिशाली नेता

अयातुल्ला अली खामेनी हे 1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर देशातील केवळ दुसरे सर्वोच्च नेते आहेत आणि 1989 पासून ते या सर्वोच्च पदावर आहेत.

इराणमधील एक अख्खी पिढी अशी आहे, ज्यांनी खामेंनीशिवाय दुसरं कुणाचं नेतृत्व पाहिलेलं नाहीय.

सार्वजनिक धोरणासंबंधी कोणत्याही विषयावर ते व्हेटो (नकाराधिकार) वापरू शकतात आणि सार्वजनिक पदांसाठी स्वतः उमेदवार निवडू शकतात.

खामेनी हे राष्ट्राचे प्रमुख आहेतच, पण त्याचबरोबर इराणी रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचा (आयआरजीसी) समावेश असलेल्या लष्कराचेही कमांडर-इन-चीफ आहेत. हे अधिकार त्यांना अधिकच सामर्थ्यशाली बनवतात.

इराणमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या मशहद इथे 1939 साली त्यांचा जन्म झाला.

आठ भावंडांपैकी दुसरे असलेल्या अली खामेनी यांचा जन्म एका धार्मिक कुटुंबात झाला. त्यांचे वडील शिया पंथातील धर्मगुरू होते. इराणमध्ये शिया हा प्रमुख पंथ आहे.

खामेनींच्या शिक्षणामध्ये कुराणाच्या अध्ययनाला प्रमुख स्थान होतं आणि केवळ 11 व्या वर्षी ते धर्मगुरू म्हणून पात्र ठरले होते.

पण, त्या काळातील अनेक धार्मिक नेत्यांप्रमाणेच, त्यांचे कार्य जितके धार्मिक होते तितकेच राजकीयही होते.

प्रभावी वक्ता असलेले खामेनी हे इराणच्या शाहच्या विरोधात होते. शाह हे इराणचे राजे होते. इराणमधील इस्लामिक क्रांतीनंतर त्यांना सत्तेवरून हटविण्यात आलं.

खामेनी हे अनेक वर्षं भूमिगत किंवा तुरुंगात कैदेत राहिले. शाहच्या गुप्त पोलिसांनी त्यांना सहा वेळा अटक केली होती. यात त्यांना छळ सहन करावा लागला आणि त्यांना हद्दपारही करण्यात आलं होतं.

1979 मधील इस्लामिक क्रांतीच्या एका वर्षानंतर इराणचे तत्कालीन सर्वोच्च नेते आणि धर्मगुरू अयातुल्ला रुहोल्ला मौसावी खोमेनी यांनी त्यांना राजधानी तेहरानच्या शुक्रवारच्या प्रार्थनेचे प्रमुख म्हणून नेमलं. नंतर 1981 मध्ये खोमेनी राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले.

वयाच्या 86 व्या वर्षी खोमेनी यांचं निधन झालं. तत्पूर्वी 1989 मध्ये धार्मिक नेत्यांनी अयातुल्ला अली खोमेनींचा उत्तराधिकारी म्हणून खामेनींची निवड केली होती.

किती प्रभावशाली आहे त्यांचा मुलगा मोज्तबा?

अयातुल्ला अली खामेनी क्वचितच परदेशात जातात. ते मध्य तेहरानमधील एका संकुलात आपल्या पत्नीबरोबर साधेपणानं राहतात.

त्यांना बागकाम आणि कविता वाचनाची आवड आहे. तरुणपणी ते धूम्रपान करत असल्याचं सांगितलं जातं. इराणमध्ये धार्मिक नेत्यांनी धूम्रपान करणं ही सर्वमान्य गोष्ट नाही.

1980च्या दशकात एका हत्येच्या प्रयत्नात त्यांनी आपला उजवा हात गमावला होता.

ते आणि त्यांची पत्नी, मन्सुरी खोझस्ते बाकरझादेह यांना सहा मुलं आहेत. यात चार मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे.

खामेनी कुटुंब सार्वजनिक किंवा माध्यमांमध्ये क्वचितच दिसले आहे आणि त्यांच्या मुलांच्या खासगी आयुष्याबद्दल अधिकृत व खात्रीशीर माहिती कमीच उपलब्ध आहे.

त्यांच्या चार मुलांपैकी दुसरा मुलगा मोज्तबा सर्वाधिक परिचित आहे. याचं कारण म्हणजे त्याचा प्रभाव आणि वडिलांच्या आतल्या वर्तुळात त्याची महत्त्वाची भूमिका.

मोज्तबा यांनी तेहरानमधील अल्वी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. ही शाळा पारंपरिकपणे इस्लामिक रिपब्लिकच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलांसाठी असल्याचे मानलं जातं.

त्यावेळी एक प्रभावशाली राजकीय नेते असलेले घोलाम अली हद्दाद अदेल यांच्या मुलीशी मोज्तबा यांचा विवाह झाला. त्यावेळी मोज्तबा अजून मौलवीही नव्हते आणि कोम येथील धार्मिक शिक्षण देणाऱ्या शाळेत आपलं धार्मिक अभ्यास सुरू करण्याचा ते विचार करत होते.

वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी कोम सेमिनरीमध्ये औपचारिक धार्मिक शिक्षण सुरू केलं. ही धार्मिक शाळा इराणमधील सर्वात प्रमुख शिया धर्मविषयक शाळा आहे.

माध्यमांमध्ये त्यांची फारशी दखल घेतली जात नसली तरी 2000 च्या दशकाच्या मध्यात मोज्तबा यांचा राजकीय क्षेत्रातील प्रभाव अधिक स्पष्ट होऊ लागला होता.

2004 मध्ये झालेल्या वादग्रस्त अध्यक्षीय निवडणुकीनंतर मोज्तबा प्रकाशझोतात आले. त्यावेळी प्रमुख उमेदवार मेहदी कर्रुबी यां खामेनी यांना लिहिलेल्या एका खुल्या पत्रात मोज्तबा यांच्यावर महमूद अहमदीनेजाद यांना पाठिंबा देण्यासाठी गुप्तपणे हस्तक्षेप केल्याचा आरोप केला.

2010 च्या दशकापासून मोज्तबा खामेनी यांना इस्लामिक रिपब्लिकमधील सर्वाधिक प्रभावशाली व्यक्तींपैकी एक मानलं जातं.

अयातुल्ला खामेनी यांच्यानंतर त्यांचा वारसदार म्हणून मोज्तबा हे त्यांच्या पसंतीचं नाव असल्याचं म्हटलं जातं. मात्र, काही अधिकृत सूत्रांनी हे दावे नाकारले आहेत.

अली खामेनी हे इराणचे राजे नाहीयेत आणि आपल्या मुलाकडे ते सहजपणे सत्ता हस्तांतरित करू शकत नाहीत. मात्र, मोज्तबा हे त्यांच्या वडिलांच्या कट्टर समर्थक वर्तुळातील मोठे प्रभावशाली नाव आहे.

इतर मुलांचाही धर्माकडे ओढा

मुस्तफा खामेनी हे कुटुंबातील ज्येष्ठ पुत्र आहेत. त्यांची पत्नी ही कट्टर पारंपरिक विचारसरणी असलेले धर्मगुरू अजिझोल्लाह खोशवग्त यांची मुलगी आहे.

1980 च्या इराण-इराक युद्धादरम्यान मुस्तफा आणि मोज्तबा दोघांनीही आघाडीवर काम केलं आहे.

अली खामेनी यांचा तिसरा मुलगा मसूद. याचा जन्म 1972 मध्ये झाला. त्याचा विवाह सुसान खराझीशी झाला.

सुसान या कोम येथील धार्मिक शिक्षक संघटनेशी संलग्न असलेले प्रख्यात धर्मगुरू मोहसेन खराझी यांची कन्या आणि मोहम्मद सादिक खराझी यांची बहीण आहे. मोहम्मद सादेग खराझी हे माजी राजनयिक अधिकारी असून ते सुधारणावादी विचारसरणीचे मानले जातात.

मसूद खामेनी यांनी राजकीय वर्तुळांपासून स्वतःला दूर ठेवलं आहे आणि त्यांच्याबद्दल सार्वजनिकरीत्या फारशी माहिती उपलब्ध नाही.

मसूद हे पूर्वी त्यांच्या वडिलांच्या कार्याचं निरीक्षण आणि देखरेख करणाऱ्या आणि प्रमुख प्रचार शाखा असलेल्या कार्यालयाचे प्रमुख होते. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या वडिलांचे चरित्र आणि आठवणी संकलित करण्याची जबाबदारीही पार पाडली होती.

सर्वात धाकटा मुलगा, मैसम, यांचा जन्म 1977 मध्ये झाला. आपल्या तिन्ही मोठ्या भावांप्रमाणे तेही मौलवी आहेत. त्यांचा विवाह झाला आहे, मात्र त्यांच्या पत्नीचं नाव माध्यमांमध्ये जाहीर झालेलं नाही. त्या महमूद लोलाचियन यांची कन्या आहेत. लोलाचियन हे 1979 च्या क्रांतीपूर्वी क्रांतिकारी धर्मगुरूंना आर्थिक मदत करणाऱ्या श्रीमंत आणि प्रभावशाली व्यापाऱ्यांपैकी एक होते.

मैसम यांनी आपला भाऊ मसूदसोबत त्यांच्या वडिलांच्या कार्याचं जतन करणं, त्यांचं चरित्र आणि आठवणी संकलित करण्यासाठी काम केलं आहे.

'मुलींबद्दल फारशी चर्चा नाही'

खामेनींच्या मुलींबद्दल सार्वजनिकरीत्या फारशी माहिती उपलब्ध नाही.

बुशरा आणि होदा या खामेनी कुटुंबातील सर्वात लहान सदस्य आहेत आणि त्या दोघींचाही जन्म 1979 च्या क्रांतीनंतर झाला आहे.

बुशराचा जन्म 1980 मध्ये झाला आणि तिचा विवाह मोहम्मद-जावेद मोहमदी गोलपायेगानी यांच्याशी झाला आहे. मोहम्मद हे खामेनींच्या कार्यालयाचे प्रमुख घोलामहोसेन (मोहम्मद) मोहम्मदी गोलपायेगाणींचे पुत्र आहेत.

होदा या सर्वात लहान असून त्यांचा जन्म 1981 मध्ये झाला. तिचा विवाह मेस्बाह अल-होदा बाघेरी कानीसोबत झालेला आहे. मेस्बाह यांनी मार्केटिंगमध्ये शिक्षण घेतलं आहे आणि इमाम सादिक युनिव्हर्सिटीमध्ये ते शिक्षक होते.

(संपादन - अलेक्झांड्रा फौचे)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.