You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनींना उद्देशून ट्रम्प म्हणाले, 'आमचा संयम संपत चाललाय'
इस्त्रायल आणि इराण या दोन्ही देशांमधील संघर्ष विकोपाला गेला आहे. हे दोन्ही देश एकमेकांवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले करत आहेत. 13 आणि 14 जूनच्या मध्यरात्रीपासून हा संघर्ष सुरू झाला.
मध्य-पूर्वेतल्या या युद्धजन्य स्थितीमुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण आहे. अनेक देशांनी इस्रायलमध्ये असलेल्या त्यांच्या नागरिकांना शहर सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन केलंय.
शुक्रवारी (13 जून) इस्रायलनं इराणवर हल्ला केला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर देत इराणनंही इस्रायलवर क्षेपणास्त्र डागले.
ट्रम्प म्हणाले, 'आमचा संयम संपत चाललाय'
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर इराणबाबत अनेक पोस्ट केल्या आहेत. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे – 'बिनशर्त शरणागती.'
ट्रम्प यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, "इराणचे 'सर्वोच्च नेते' कुठे आहेत हे आम्हाला माहिती आहे. पण आम्ही आताच त्यांना मारणार नाही."
ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर लिहिले, "आम्हाला अचूक माहिती आहे की तथाकथित 'सर्वोच्च नेते' कुठे लपलेले आहेत. तिथपर्यंत पोहोचणं सोपे लक्ष्य आहे, पण सध्या तरी तिथे सुरक्षित आहेत."
त्यांनी पुढं म्हटलं आहे की, "आम्ही त्यांना इतक्यात मार्गातून दूर करणार नाही (मारणे या अर्थाने), किमान सध्या तरी नाही. पण सामान्य नागरिकांवर किंवा अमेरिकन सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागल्याचंही आम्ही पाहू इच्छित नाही. आमचा संयम आता संपत चालला आहे."
या पोस्टच्या काही मिनिटांपूर्वीच ट्रम्प यांनी म्हटले होते की, "आता इराणच्या हवाई क्षेत्रावर आमचा पूर्ण ताबा आहे."
त्यांनी म्हटलं, "इराणकडे चांगले स्काय ट्रॅकर्स आणि इतर संरक्षण उपकरणं होती आणि मोठ्या प्रमाणात होती. पण अमेरिकेत डिझाइन केलेल्या, निर्माण केलेल्या उपकरणांशी त्यांची तुलना होऊच शकत नाही. अमेरिकेपेक्षा चांगल्या पद्धतीने कोणताही देश हे करू शकत नाही."
अमेरिका गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायलला लष्करी मदत आणि शस्त्रास्त्रं पुरवत आहे, पण इस्रायलने शुक्रवारी(13 जून) इराणवर हल्ला केल्यावर अमेरिकेची अधिकृत भूमिका अशी होती की, इस्रायलच्या या हल्ल्यांमध्ये अमेरिका सहभागी नाहीये.
तेहरानमध्ये राहणाऱ्या भारतीयांना परतण्याचं आवाहन
इस्रायल आणि इराणमधील वाढत्या संघर्षादरम्यान इराणमधील भारतीय दूतावासाने तेहरानमध्ये राहणाऱ्या भारतीयांना शहर सोडून सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला दिलाय.
भारतीय दूतावासाकडून 'एक्स'वर एक पोस्ट करत लिहिलं की, "स्वतःच्या संसाधनांचा वापर करून तेहरानला स्थलांतर करू शकणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना शहराबाहेर सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे."
तसेच, जे भारतीय नागरिक तेहरानमध्ये आहेत आणि दूतावासाच्या संपर्कात नाहीत, त्यांनी त्यांचं ठिकाण आणि संपर्क क्रमांक तेहरानमधील भारतीय दूतावासाला तत्काळ देण्यास सांगण्यात आलं आहे.
भारतीय दूतावासाकडून तीन संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत :
- +989010144557
- +989128109115
- +989128109109
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्यांच्या नागरिकांना इराणची राजधानी तेहरान सोडण्याचा सल्ला दिलाय. त्यांनी त्यांच्या ट्रुथ या सोशल अकाउंटवर पोस्ट करत 'सर्वांनी तातडीनं तेहरान रिकामं करावं', असं म्हटलंय.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
ट्रम्प यांनी ट्रुथ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील पोस्टमध्ये लिहिलंय की, "मी इराणला ज्या 'करारावर' स्वाक्षरी करायला सांगितली होती, त्यावर स्वाक्षरी करायला हवी होती. हे खूपच लाजीरवाणं आणि मानवी जीवन उद्ध्वस्त करणारे आहे."
"सोप्या भाषेत सांगायचं तर, इराणकडे अण्वस्त्र असू शकत नाही. मी हे वारंवार सांगितलं आहे! प्रत्येकाने ताबडतोब तेहरान रिकामे केले पाहिजे!"
जी-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला गेलेले ट्रम्प एक दिवस आधीच मायदेशी परतले.
मध्य पूर्वेतील ताणलेली परिस्थितीमुळे त्यांच्या लवकर परतण्यामागचं कारण असल्याचं म्हटलं जातयं.
शिखर परिषदेतून ट्रम्प अचानक परतले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कॅनडातील कानानास्किस येथे सुरू असलेल्या जी-7 शिखर परिषदेत सहभागी झाले होते. मात्र, ही परिषद अर्ध्यावर सोडून ते वॉशिंग्टनला परतत असल्याची माहिती व्हाईट हाऊसनं दिलीय.
व्हाईट हाउसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी एक्सवर याबाबत माहिती देताना लिहिलं की, "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जी-7 परिषदेत छान दिवस गेला, त्यांनी युनायटेड किंग्डम आणि पंतप्रधान कियेर स्टार्मर यांच्यासोबत एक महत्वाचा व्यापार करारदेखील केला."
ट्रम्प आणि कियेर स्टार्मर यांनी जी-7 शिखर परिषदेतील बैठकीदरम्यान अमेरिका आणि ब्रिटनदरम्यानच्या टॅरिफ करारावर स्वाक्षरी केली.
लेविट यांनी पुढे लिहिलं की, "बरेच काही साध्य झाले, परंतु मध्य पूर्वेतील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आज रात्री राष्ट्रप्रमुखांसोबतच्या डिनरनंतर परतणार आहेत."
दरम्यान, या दोन्ही देशांतील तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलमधील चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांना शक्य तितक्या लवकर इस्रायल सोडण्यास सांगितलं आहे.
सोमवारी जारी केलेल्या सूचनेत, चीनी दूतावासाने चीनमधील लोकांना जॉर्डनमार्गे निघून जाण्याचे आवाहन केलं आहे.
त्यात म्हटले आहे की, इस्रायल-इराण संघर्ष वाढत आहे, ज्यामुळे नागरी सुविधांचं नुकसान होत असून नागरिकांच्या मृत्यूची संख्या वाढत आहे.
चिनी वृत्तपत्र 'ग्लोबल टाईम्स'नुसार, दूतावासाने म्हटलंय की, संबंधित इस्रायली सरकारी विभागांनी पुष्टी केली आहे की जॉर्डन आणि इजिप्सह इस्रायलच्या सीमा खुल्या राहतील.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)