इराण खरंच अणुबॉम्ब बनवण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता?

    • Author, डेव्हिड ग्रिटन
    • Role, बीबीसी न्यूज

इस्रायलनं इराणमधील नतांझ युरेनियम संवर्धन प्रकल्पासह अनेक अणू ठिकाणांवर हल्ले करून त्यांचं नुकसान केलं आहे. या हल्ल्यांमध्ये इस्रायलनं तेहरानमधील वरिष्ठ लष्करी कमांडर आणि अणुशास्त्रज्ञांनाही लक्ष्य करत त्यांना ठार केलं आहे.

गुरुवारी (12 जून) रात्री झालेल्या हल्ल्यांनंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी 'शांततापूर्ण अणू ठिकाणांवर' इस्रायलनं केलेल्या 'अंधाधुंध' हल्ल्यांचा निषेध केला होता. त्यानंतर इराणने इस्रायलवर प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ले सुरू केले.

अराघची यांनी सांगितलं की, नतांझचा कारभार जागतिक अणू निरीक्षण संस्था, आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा संस्था (आयएइए) यांच्या देखरेखीखाली चालवला जात होता.

या संयंत्रावर (प्लांट) झालेल्या हल्ल्यामुळे किरणोत्सर्गाचा (रेडिएशन) धोका निर्माण झाला आहे, असंही त्यांनी म्हटलं.

मात्र, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी इस्रायलच्या अस्तित्वासाठी हे ऑपरेशन आवश्यक असल्याचं जाहीर केलं. 'इराणला रोखलं नाही तर ते फार कमी वेळात अण्वस्त्रं बनवतील' म्हणून इस्रायलनं हे पाऊल उचलल्याचं नेतान्याहू यांनी सांगितलं.

"इराणला यासाठी एक वर्ष लागू शकतं किंवा ते काही महिन्यांतही करू शकतात."

सामान्यतः इस्राइलकडे अण्वस्त्रं आहेत, असं मानलं जातं. मात्र, ते याला दुजोराही देत नाहीत आणि नाकारतही नाहीत.

काही पुरावा आहे का?

इस्रायलच्या लष्करानं सांगितलं की, 'इराणनं अणुबॉम्बसाठी आवश्यक घटकांच्या उत्पादनाच्या प्रयत्नांत ठोस प्रगती केली आहे,' अशी गुप्त माहिती मिळाली आहे. यात युरेनियम मेटल कोअर आणि अणू स्फोट सुरू करण्यासाठी न्यूट्रॉन स्रोताचा समावेश आहे.

इस्रायलच्या पंतप्रधानांनी त्यांच्या दाव्याबाबत कोणताही ठोस किंवा स्पष्ट पुरावा सादर केलेला नाही, असं अमेरिकेतल्या आर्म्स कंट्रोल असोसिएशनमध्ये अण्वस्त्र अप्रसार धोरणाच्या संचालिका केल्सी डेव्हनपोर्ट यांनी म्हटलं आहे.

त्यांचं म्हणणं आहे की, "इराण काही महिन्यांत अणुबॉम्ब विकसित करू शकतो, हा अंदाजही नवीन नाही."

डेव्हनपोर्ट यांना वाटतं की, इराणची काही पावलं अणू बॉम्ब तयार करण्याकडे इशारा करू शकतात. परंतु, अमेरिकन गुप्तचर संस्थांना ते या दिशेने काम करत आहेत, असं वाटत नाही.

या वर्षी मार्चमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालिका तुलसी गबार्ड यांनी अमेरिकन काँग्रेसला सांगितलं की, इराणचे 'समृद्ध युरेनियम साठे' उच्चतम पातळीवर आहेत. हे 'अण्वस्त्रं नसलेल्या कोणत्याही देशासाठी अभूतपूर्व आहे,' असं त्यांनी म्हटलं.

परंतु, गबार्ड यांनी काँग्रेसला आणखी एक गोष्ट सांगितली होती. अमेरिकन गुप्तचर यंत्रणांच्या अंदाजानुसार इराण अण्वस्त्रं बनवत नाही, असं त्याचं म्हणणं होतं. इराणच्या सर्वोच्च नेत्यांनी अण्वस्त्र कार्यक्रम अधिकृत केलेला नाही, असं कारण त्यांनी सांगितलं होतं.

केल्सी डेव्हनपोर्ट म्हणाल्या, "जर नेतन्याहूंकडे अण्वस्त्र प्रसाराच्या धोक्याची माहिती असती, तर त्यांनी ती अमेरिकेबरोबर शेअर केली असती. शिवाय, अशी काही माहिती असती तर कदाचित इस्रायलनं सुरुवातीलाच इराणमधील सर्व प्रमुख आण्विक ठिकाणांना लक्ष्य केलं असतं."

मागील आठवड्यात आयएइएने आपल्या ताज्या तिमाही अहवालात म्हटलं आहे की, इराणनं 60 टक्के शुद्धतेपर्यंत समृद्ध युरेनियम जमा केले आहे. एजन्सीनुसार, जर हा स्तर 90 टक्क्यांपर्यंत पोहोचला, तर तांत्रिकदृष्ट्या त्यापासून नऊ अणु बॉम्ब तयार केले जाऊ शकतात.

एजन्सीनं ही गंभीर चिंतेची बाब असल्याचं म्हटलं होतं. इराणचा अणु कार्यक्रम शांततापूर्ण असल्याचा विश्वास नाही, असंही एजन्सीनं सांगितलं होतं.

इराणच्या अणू कार्यक्रमाबद्दल आपण काय जाणतो?

इराणनं नेहमीच सांगितलं आहे की, त्यांचा अणू कार्यक्रम पूर्णपणे शांततापूर्ण आहे आणि त्यानं कधीही अण्वस्त्रं विकसित करण्याचा प्रयत्न केलेला नाही.

परंतु, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीला (आयएइए) दहा वर्षांच्या तपासणीत आढळलं की, इराण 1980 ते 2003 या कालावधीत 'अण्वस्त्र स्फोटक यंत्र विकसित' करत होता. या प्रकल्पाला प्रोजेक्ट अमाद हे नाव देण्यात आलं होतं.

इराणनं वर्ष 2009 पर्यंत काही हालचाली सुरू ठेवल्या होत्या, असा एजन्सीचा निष्कर्ष होता.

त्यावर्षी पाश्चात्य शक्तींनी इराणच्या फोर्डो येथील गुप्तपणे तयार होत असलेल्या भूमिगत यूरेनियम संवर्धन केंद्राबद्दल माहिती दिली होती.

पण, त्यानंतर इराणमध्ये अण्वस्त्रांच्या विकासाची कोणतीही विश्वासार्ह चिन्हं दिसून आली नाहीत.

2015 मध्ये इराणनं जगातील सहा महाशक्तींशी एक करार केला, ज्यांत त्यांनी आपल्या आण्विक हालचालींवर (क्रियाकलाप) निर्बंध स्वीकारले.

तसंच, इराणनं कडक प्रतिबंध टाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय अणू ऊर्जा संस्थेच्या (आयएइए)निरीक्षकांच्या देखरेखीलाही मान्यता दिली होती.

परंतु, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 मध्ये त्यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिकेला या सहा देशांच्या करारातून बाहेर काढलं होतं.

इराणला अणु बॉम्ब बनवण्यापासून रोखण्यासाठी हा करार पुरेसा नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ट्रम्प यांनी इराणवर पुन्हा निर्बंध लादले होते.

त्या करारानुसार इराणला 15 वर्षे फोर्डोमध्ये कोणत्याही प्रकारचे संवर्धन करण्याची परवानगी नव्हती. मात्र 2021 मध्ये इराणनं 20 टक्के शुद्धतेपर्यंत युरेनियमचे संवर्धन पुन्हा सुरू केले.

दरम्यान, इराणनं 20 वर्षांत प्रथमच अणू अप्रसाराशी संबंधित आपल्या जबाबदाऱ्यांचं उल्लंघन केलं आहे, असं आयएइएच्या 35 देशांच्या गव्हर्नर्स बोर्डानं गुरुवारी जाहीर केलं.

आता इराणनं म्हटलं आहे की, ते एका 'नवीन सुरक्षित ठिकाणी' अधिक प्रगत, सहाव्या पिढीच्या यंत्रांच्या सहाय्यानं युरेनियम संवर्धन सुरू करणार आहेत.

आण्विक पायाभूत सुविधांचं किती नुकसान?

इस्रायलच्या लष्करानं शुक्रवारी (13 जून) सांगितलं की, त्यांच्या पहिल्या हवाई हल्ल्यात नतांझ येथील भूमिगत सेंट्रीफ्यूज हॉलचं नुकसान झालं आहे. तसेच या हल्ल्यांमध्ये केंद्र चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे.

आयएइएचे महासंचालक राफेल ग्रॉसी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला सांगितलं की, नतांझ येथील जमिनीवरील पायलट फ्युएल एनरिचमेंट प्लांट (पीएफइपी) आणि वीज पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालं आहे.

भूमिगत (अंडरग्राऊंड) हॉलवर थेट हल्ला झाल्याचे कोणतेही संकेत मिळालेले नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

अमेरिका येथील सायन्स अँड इंटरनॅशनल सिक्युरिटी इन्स्टिट्यूटनं सांगितलं की, पीएफइपीचं झालेलं नुकसान लक्षणीय आहे, कारण याचा वापर 60 टक्के संवर्धित युरेनियमच्या उत्पादनासाठी आणि प्रगत सेंट्रीफ्यूज विकसित करण्यासाठी केला जात होता.

डेव्हनपोर्ट यांनी सांगितलं की, नतांझवरील हल्ल्यामुळे इराणचा 'ब्रेकआउट टाइम' वाढेल, पण याचा संपूर्ण परिणाम काय होईल, हे सांगणं सध्या घाईचं ठरेल.

त्यांनी सांगितलं की, "जोपर्यंत आयएइए त्या ठिकाणी पोहोचत नाही, तोपर्यंत इराण तिथे किती लवकर काम सुरू करू शकेल किंवा युरेनियम इतर ठिकाणी हलवू शकेल की नाही याची स्पष्ट माहिती मिळणार नाही."

इस्रायलने फोर्डो एनरिचमेंट प्लांट आणि इस्फहान न्यूक्लियर टेक्नॉलॉजी सेंटरवरही हल्ला केला होता.

इस्फहानमधील हल्ल्यामुळे 'युरेनियम उत्पादनाची जागा, समृद्ध युरेनियम पुनःप्रक्रिया करण्यासाठीच्या पायाभूत सुविधा आणि अनेक प्रयोगशाळा नष्ट झाल्या आहेत,' असं इस्रायलच्या लष्करानं सांगितलं.

डेव्हनपोर्ट सांगतात, "जोपर्यंत फोर्डो चालू राहील, इराण नजीकच्या भविष्यात अण्वस्त्र प्रसाराचा धोका पत्करू शकतो. इराणकडे हा पर्याय आहे की, ते येथे शस्त्रं बनविण्यासाठी किंवा युरेनियम कोणत्याही गुप्त ठिकाणी पाठण्यासाठी त्याचे संवर्धन वाढवू शकतात."

त्यांनी म्हटलं, "हल्ल्यांमुळे ठिकाणं नष्ट होऊ शकतात आणि शास्त्रज्ञांचा मृत्यूही होऊ शकतो, पण इराणची आण्विक माहिती नष्ट केली जाऊ शकत नाही. इराण नष्ट झालेल्या गोष्टी पुन्हा तयार करू शकतो आणि युरेनियम संवर्धनातील प्रगतीमुळे आता ते पूर्वीपेक्षा अधिक वेगाने पुनर्निर्मिती करू शकतात."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.