You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायल-इराण संघर्षामुळे तेलाच्या दरात झपाट्यानं वाढ, सोन्यावरही परिणाम होईल?
- Author, पीटर हॉस्किन्स
- Role, बीबीसी न्यूज
इस्रायलनं इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यांमुळे जागतिक तेल बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळं तेलाचे दर झपाट्यानं वाढले आहेत.
बेंचमार्क ब्रेंट क्रूडच्या किंमतीत 10 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली, हे दर जानेवारीनंतरच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले, मात्र नंतर त्यात थोडी घट झाली.
त्याचबरोबर शेअर बाजारात घसरण झाली. या संघर्षामुळे मध्यपूर्वेतील ऊर्जा-संपन्न भागातून होणाऱ्या तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कच्च्या तेलाच्या दरांचा कारमध्ये पेट्रोल भरायला लागणाऱ्या पैशांपासून ते सुपरमार्केटमधील खाद्यपदार्थांच्या किंमतीपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम होतो.
'जगभरातील शेअर बाजारावर परिणाम'
सुरुवातीच्या उसळीनंतर तेलाचे दर थोडे खाली आले. तरीही ब्रेंट क्रूडने दिवसाचा शेवट गुरुवारच्या बंद किमतीपेक्षा 7 टक्क्यांहून अधिक वाढीसह केला आणि प्रति बॅरल 74.23 डॉलर या दराने व्यापार झाला.
शुक्रवारी दोन देशांमध्ये हालचाली झाल्या असल्या तरी, तेलाचे दर अजूनही गेल्या वर्षी याच काळातील किमतींपेक्षा 10 टक्क्यांहून कमी आहेत.
तसेच 2022 च्या सुरुवातीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर किमतींनी प्रति बॅरल 100 डॉलरच्या वर झेप घेतली होती. त्यापेक्षा सध्याच्या किमती खूपच खाली आहेत.
शुक्रवारी संपूर्ण आशिया आणि युरोपमध्ये शेअर बाजार घसरले. जपानचा निक्केई शेअर निर्देशांक दिवसाअखेर 0.9 टक्क्यांनी घसरला, तर ब्रिटनचा एफटीएसई 100 निर्देशांक 0.39 टक्के खाली बंद झाला.
अमेरिकेतील शेअर बाजारही घसरले. डाऊ जोन्स सरासरी 1.79 टक्क्यांनी घसरला, तर एसअँडपी 500 निर्देशांक 0.69 टक्क्यांनी खाली गेला.
अशा काळात सुरक्षित समजली जाणारी गुंतवणूक, जसं की सोनं आणि स्विस फ्रँक, यांच्या किंमती वाढल्या. काही गुंतवणूकदार अशा मालमत्तांना अनिश्चिततेच्या काळात अधिक विश्वासार्ह गुंतवणूक मानतात.
'परिस्थितीवर व्यापाऱ्यांचं बारीक लक्ष'
सोन्याचा भाव सुमारे दोन महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर पोहोचला, 1.2 टक्के वाढून प्रति औंस 3,423.30 डॉलरवर गेला.
इराणनं सुमारे 100 ड्रोन देशाच्या दिशेने सोडले आहेत, असं इस्रायली संरक्षण दलानं (आयडीएफ) इस्रायलच्या हल्ल्यानंतर सांगितलं.
'ऊर्जा व्यापारी आता येणाऱ्या दिवसांत संघर्ष कितपत चिघळतो याकडे लक्षपूर्वक पाहतील, असं अभ्यासकांनी 'बीबीसी'ला सांगितलं.
"ही एक स्फोटक परिस्थिती आहे, तरीही ती लवकर शांत होऊ शकते. कारण आपण गेल्या वर्षी एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये अशी स्थिती पाहिली, जेव्हा इस्रायल आणि इराण यांनी एकमेकांवर थेट हल्ले केले होते," असं वंदा इनसाइट्सच्या वंदना हरी यांनी 'बीबीसी'ला सांगितलं.
त्या म्हणाल्या, "ही परिस्थिती आणखी वाईट बनून मोठ्या युद्धातही याचं रूपांतर होऊ शकतं, त्यामुळे मध्यपूर्वेतील तेलपुरवठा बाधित होऊ शकतो."
कॅपिटल इकॉनॉमिक्समधील विश्लेषकांनी सांगितलं की, जर इराणच्या तेल उत्पादन आणि निर्यात सुविधांना लक्ष्य केलं गेलं, तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल सुमारे 80 ते 100 डॉलरपर्यंत वाढू शकते.
पुढं त्यांनी असंही म्हटलं की, किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यास इतर तेल उत्पादक उत्पादन वाढवतील, त्यामुळं किंमतीतील वाढ मर्यादित होऊन महागाईवर होणारा परिणामही नियंत्रित होईल.
यूकेची संघटना आरएसीचे प्रवक्ते रॉड डेनिस यांनी सांगितलं की, तेलाच्या किंमतीत नुकतीच झालेली वाढ, पेट्रोलच्या किमतींवर काय परिणाम करेल हे आत्ताच सांगणं "खूप घाईचं" ठरेल.
"या प्रकरणात दोन मुख्य घटक आहेत, येत्या काही दिवसांत घाऊक इंधनाच्या वाढत्या किंमती टिकून राहतील की नाही? आणि महत्त्वाचं म्हणजे, किरकोळ विक्रेत्यांनी किती नफा मार्जिन म्हणून ठेवायचा," असं त्यांनी सांगितलं.
'इराणनं 'होर्मुझ'ला लक्ष्य केल्यास परिस्थिती गंभीर'
अत्यंत गंभीर परिस्थितीत, इराणनं स्ट्रेट ऑफ होर्मुझमधील (सामुद्रधुनी) पायाभूत सुविधा किंवा जलवाहतूक (शिपिंग) लक्ष्य केल्यास दररोज लाखो बॅरल तेल पुरवठा खंडित होऊ शकतो.
ही सामुद्रधुनी जगातील सर्वात महत्त्वाच्या जलपरिवहन मार्गांपैकी एक असून, जगातील सुमारे एक पंचमांश तेलाची वाहतूक इथून होते.
एका वेळी अनेक टँकर जहाजं होर्मुझच्या सामुद्रधुनीकडे जात असतात किंवा तिथून निघत असतात. कारण मध्यपूर्वेतील मुख्य तेल आणि वायू उत्पादक व त्यांच्या ग्राहकांकडून इथून ऊर्जा वाहतूक केली जाते.
उत्तरेला इराण आणि दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) बांधलेली, होर्मुझची सामुद्रधुनी आखाताला अरबी समुद्राशी जोडते.
"आता आपण पाहत आहोत, ती फक्त सुरुवातीच्या जोखमीवर आधारित प्रतिक्रिया आहे. पण पुढील एक-दोन दिवसांत बाजाराला ही परिस्थिती पुढे कशी वाढू शकते हे समजून घ्यावं लागेल," असं एमएसटी फायनान्शियलमधील ऊर्जा संशोधन प्रमुख सॉल कावोनिक म्हणाले.
(केटी सिल्व्हर यांचं अतिरिक्त वार्तांकन.)
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.