You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
होर्मुझ सामुद्रधुनी : मुंबई-पुण्याएवढंच अंतर, पण हा जलमार्ग बंद होण्याच्या भीतीनं जग का घाबरलंय?
- Author, अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz) हा आखाती प्रदेशातला एक चिंचोळा जलमार्ग सध्या चर्चेत आहे.
इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान अमेरिकेनं इराणच्या तीन अणुकेंद्रांवर हल्ले केलं.
त्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीचा जलमार्ग बंद करण्याची भूमिका घेण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, अद्याप तसं काही ठोस समोर आलेलं नाही.
पण, त्यानंतर या सामुद्रधुनीबद्दल चांगलीच चर्चा सुरू झाली. त्यामुळं अनेकांना होर्मुझची सामुद्रधुनीबद्दल काही प्रश्न पडलेत.
- होर्मुझची सामुद्रधुनी नेमकी आहे कुठे?
- होर्मुझची सामुद्रधुनी किती महत्त्वाची?
- होर्मुझच्या सामुद्रधुनीवर ताबा कुणाचा आहे?
- होर्मुझच्या सामुद्रधुनीला पर्यायी मार्ग आहे का?
- क्रूड तेलाच्या किंमतींवर कसा परिणाम होईल?
अशा प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
सामुद्रधुनी किंवा 'Strait' म्हणजे दोन समुद्र वा दोन जलाशयांना जोडणारा पाण्याचा अरुंद प्रवाह. हा प्रवाह दोन भूभागांना वेगळा करतो. उदा. भारत आणि श्रीलंकेमध्ये असणारी पाल्कची सामुद्रधुनी.
होर्मुझची सामुद्रधुनी नेमकी आहे कुठे?
पर्शिया अर्थात इराणच्या आखातात (Persian Gulf) शिरण्याचा हा मुख्य मार्ग आहे.
या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या उत्तरेला आहे इराण, तर दक्षिणेला ओमान आणि संयुक्त अरब अमिराती (UAE) आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी पर्शियाच्या आखाताला ओमानच्या आखाताशी जोडते. इथल्या निसर्गरम्य होर्मुझ बेटावरून तिला हे नाव पडलं आहे.
हा जलमार्ग आकारानं लहान असला, तरी हा जगातला सर्वात महत्त्वाचा जहाजांसाठीचा जलमार्ग आहे.
या जलमार्गाची लांबी आहे साधारण 96 मैल म्हणजे 154.497 किलोमीटर आहे. तुलना करायची झाली, तर मुंबई ते पुणे हे अंतर आहे 152 किमी.
आणि सर्वात चिंचोळ्या भागामध्ये हा जलमार्ग फक्त 21 मैल म्हणजे 33.7962 किमी रुंद आहे.
याच्या प्रत्येक बाजूच्या शिपींग लेन्स फक्त 2 मैल म्हणजे 3.21 किमी रुंद आहेत.
हा मार्ग लहानसा, चिंचोळा असला तरी यातून जगातले सर्वात मोठे क्रूड ऑईल टँकर्स जाऊ शकतील, इतपत खोल आहे आणि मिडल ईस्ट म्हणजे मध्य-पूर्व अर्थात पश्चिम आशियामधले बहुतेक तेल आणि गॅस उत्पादक आणि त्यांचे ग्राहक या सामुद्रधुनीचा वापर करतात.
कोणत्याही वेळी काही डझन ऑईल टँकर्स या होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या दिशेने जात असतात किंवा त्यातून बाहेर पडत असतात.
गेल्यावर्षी जगभरातल्या एकूण क्रूड ऑईलपैकी 20% म्हणजे दररोज सुमारे 2.1 कोटी बॅरल तेल या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून गेलं होतं.
हिंद महासागर (Indian Ocean) मधला महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय जलमार्ग असणारा मलाक्काची सामुद्रधुनी (Strait of Malacca), सुएझ कालवा, लाल समुद्रातली बाब एल्- मांदेब सामुद्रधुनी हे इतर मोठे जलमार्ग आहेत, पण होर्मुझची सामुद्रधुनी हा तेलासाठीचा 'World's Busiest Sea Route' आहे.
होर्मुझची सामुद्रधुनी किती महत्त्वाची?
होर्मुझची सामुद्रधुनी ही गल्फ भागातल्या तेल निर्यातदारांसाठी महत्त्वाची आहे. कारण या देशांची संपूर्ण अर्थव्यवस्थाच तेल आणि गॅस उत्पादनावर आधारित आहे.
सौदी अरेबियाने 2018 साली या सामुद्रधुनीतून दररोज 64 लाख बॅरल्स तेलाची वाहतूक केली होती, तर इराकने 34 लाख, UAE ने 27 लाख आणि कुवेतने दररोज 20 लाखापेक्षा अधिक बॅरल्स तेलाची वाहतूक केली होती.
इराणही याच सामुद्रधुनीवर तेल निर्यातीसाठी अवलंबून आहे.
Liquefied Natural Gas (LNG) चा जगातला सर्वात मोठा उत्पादक असणारा कतारही जवळपास सगळ्या गॅसची निर्यात याच मार्गाने करतो.
गेल्या काही वर्षांमध्ये आशियातल्या बहुतेक सगळ्या अर्थव्यवस्थांसाठी हा मार्ग महत्त्वाचा झालाय.
भारत, चीन, जपान, दक्षिण कोरियापर्यंत पोहोचणारं बहुतेक क्रूड तेल याच मार्गाने येतं. अमेरिकाही याच मार्गाने तेल आयात करते.
युकेही या मार्गाने आखाती भागातून काही प्रमाणात तेल आणि LNG ची आयात करतो.
होर्मुझच्या सामुद्रधुनीला पर्यायी मार्ग आहे का?
मग आता होर्मुझच्या सामुद्रधुनी तणाव निर्माण झाला तर तेल व्यापारासाठी पर्यायी मार्ग आहेत का?
तर गल्फमधून तेल मोठ्या प्रमाणात बाहेर नेण्यासाठीचा होर्मुझची सामुद्रधुनी हाच सर्वोत्तम मार्ग आहे. आणि हा एकमेव समुद्री मार्ग आहे.
जमिनीवरून तेल वाहून नेणाऱ्या काही पाईपलाईन्स आहेत.
सौदी अरेबियातली एक पाईपलाईन लाल समुद्रापर्यंत दररोज 50 लाख बॅरल तेल वाहून नेते.
तर अबुधाबीमधली पाईपलाईन रोज 15 लाख बॅरल तेल होर्मुझच्या सामुद्रधुनी पलिकडच्या किनारपट्टीपर्यंत नेऊ शकते.
तर इराणचं तेल भूमध्ये किनाऱ्यापर्यंत (Mediterranean Coast) पर्यंत नेणारीही एक पाईपलाईन आहे. पण या सगळ्याच पाईपलाईन पूर्ण क्षमतेने काम करत नाहीयेत.
जहाजांद्वारे जेवढ्या प्रमाणात तेल वाहून नेलं जाऊ शकतं, तितक्या या पाईपलाईन्स वाहून नेऊ शकत नाहीत.
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर ताबा कुणाचा आहे?
संयुक्त राष्ट्राच्या नियमांनुसार, इथल्या देशांना त्यांच्या किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल म्हणजे 13.8 मैल - 22.20 किमी अंतरापर्यंत ताबा ठेवता येतो.
म्हणजे सर्वात चिंचोळ्या ठिकाणी ही सामुद्रधुनी आणि शिपींग लेन्स या पूर्णपणे इराण आणि ओमानच्या ताब्यातील जलभागात येतात.
पण आंतरराष्ट्रीय परिषदेतल्या ठरावानुसार लष्करी जहाजासकट इतर जहाजांना एखाद्या देशाच्या ताब्यातल्या जलभागातून (Territorial Waters) मधून मार्गक्रमण करण्याचा हक्क (Right of Passage) आहे.
इराण त्यांच्या अखत्यारित येणाऱ्या भागात कारवाई करू शकतो, पण परदेशी जहाजांचा प्रवासाचा हक्क हिरावून घेऊ शकत नाही.
मालवाहू जहाजांवर हल्ला करण्याचं दबावतंत्र
व्यापारी जहाजं वापरत असलेल्या मार्गांवर (Shipping Lanes) वर हल्ले करण्याचं दबाव तंत्र अनेकदा आंतरराष्ट्रीय तणावांदरम्यान वापरलं जातं. म्हणजे गाझाचं युद्ध सुरू झाल्यापासून येमेनमधल्या हुथी बंडखोरांनी बाब एल्-मांदेब सामुद्रधुनी या लाल समुद्राच्या मुखाशी असणाऱ्या मार्गावर अनेक हल्ले केले आहेत. आणि त्याचा परिणाम जागतिक व्यापारावर झालाय. तिथे व्यापारी जहाजांकडे हा मार्ग टाळून पर्यायी लांबच्या पण सुरक्षित मार्गाने जायचा पर्याय आहे.
पण होर्मुझच्या सामुद्रधुनीला पर्याय नाही.
1980-1988 मध्ये इराण-इराक युद्ध झालं, तेव्हा या दोन्ही देशांनी आखातामधल्या व्यापारी जहाजांवर हल्ले केले होते. याला टँकर वॉर म्हटलं गेलं होतं. पण त्यावेळी होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्यात आली नव्हती.
आता मात्र इराण हा मार्ग बंद करण्याचा विचार करत असल्याचं इराणची वृत्तसंस्था IRINN ने म्हटलंय.
क्रूड तेलाच्या किंमतींवर कसा परिणाम होईल?
इराण-इस्रायलमधला संघर्ष किती काळ चालतो, त्याचा परिणाम होर्मुझच्या सामुद्रधुनीमधल्या वाहतुकीवर होतोय का? या संघर्षामध्ये इतर देश ओढले जातायत का? अमेरिका यामध्ये उतरतेय का? यावर जगभरातला कच्च्या तेलाचा पुरवठा अवलंबून असेल.
जगभरातल्या मोठ्या भू-राजकीय घटनांचे पडसाद Brent Crude या आंतरराष्ट्रीय मानकावर पडत असतात. रशिया-युक्रेन युद्धाची सुरुवात झाली, तेव्हाही क्रूडच्या किंमती उसळल्या होत्या.
होर्मुझचा मार्ग बंद करण्याची धमकी यापूर्वीही इराणने दिली होती.
होर्मुझचा मार्ग इराणने बंद केला तर त्याचा परिणाम जगभरात पोहोचणाऱ्या तेल आणि गॅसवर होईल, या किंमती आणखी महागतील आणि परिणामी महागाईचं एक चक्रच सुरू होईल आणि दुसरीकडे इराण-इस्रायलमधला तणावही चिघळण्याची शक्यता वाढेल.