कंदहार विमान अपहरण : जेव्हा कट्टरतावाद्यांनी अजित डोभाल आणि अधिकाऱ्यांना दिल्या भेटवस्तू

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

तो 26 डिसेंबर 1999 चा दिवस होता. ए. आर. घनश्याम इस्लामाबादमध्ये त्यांची पत्नी रुची घनश्याम यांच्याबरोबर घरात टीव्हीवर बातम्या पाहात होते.

रात्री 10 वाजता त्यांचा फोन वाजला. पाकिस्तानातील भारताचे उच्चायुक्त जी पार्थसारथी यांनी त्या दोघांना लगेच घरी बोलावलं.

पार्थसारथी यांचं घर अगदी शेजारीच होतं. ते दोघे पायी चालत तिथे पोहोचले. दोघे पती-पत्नी भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकारी होते. त्यावेळी इस्लामाबादमध्ये त्यांची नियुक्ती झालेली होती.

भारताच्या उच्चायुक्तांनी त्यांना कोणतीही अधिक माहिती देता सांगितलं की, सरकारनं घनश्याम यांना कंदहारला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावेळी उप-उच्चायुक्त दिल्लीला गेले होते. अनेक दुसरे मुत्सद्दी अधिकारीही ख्रिसमसच्या सुट्टीसाठी भारतात गेलेले होते.

प्रकरण तालिबानशी संबंधित होतं. त्यामुळे पार्थसारथी यांनी रुची घनश्याम यांना न पाठवण्याचा निर्णय घेतला होता.

कंदहारला पाठवण्यासाठी व्यापार आणि आर्थिक बाबी पाहणारे त्यांचे पती ए. आर. घनश्याम यांची निवड करण्यात आली.

त्यांना सांगण्यात आलं की 27 डिसेंबरला सकाळी संयुक्त राष्ट्रसंघाचं एक विमान त्यांना इस्लामाबाद विमानतळावरून कंदहारला घेऊन जाईल.

कंदहारला पोहोचले घनश्याम

जवळपास तीन तासांच्या उड्डाणानंतर विमान कंदहार विमानतळावर उतरलं. घनश्याम विमानाच्या दरवाजात आले तेव्हा त्यांना इंडियन एअरलाईन्सचं आयसी-814 विमान दिसलं.

"आयसी-814 विमान आमच्या विमानापासून 150 मीटर अंतरावर उभं होतं. त्याच्या सर्व खिडक्या बंद होत्या. खाली पायऱ्यांजवळ दोन जण माझं स्वागत करण्यासाठी आल्याचं मी पाहिलं," असं घनश्याम सांगतात.

"त्यापैकी एकजण कंदहारमधील संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयाचा प्रमुख होता. तर दुसऱ्या व्यक्तीनं पांढरा अफगाण पोशाख परिधान केलेला होता.

त्याच्यावर त्यांनी बाह्या नसलेलं काळ्या रंगाचं जॅकेट घातलेलं होतं. ते तालिबानचे परराष्ट्र मंत्री, वकील अहमद मुतवक्कील होते. त्या दोघांशी हस्तांदोलन करत मी त्यांना अभिवादन केलं."

घनश्याम पुढे म्हणतात की, मुतवक्कील यांना कसं बोलावं ते कळत नव्हतं. "ते पश्तो भाषेत बोलत होते. मला ती भाषा येत नव्हती. मी इंग्रजीत बोलत होतो. मात्र त्यांना इंग्रजी फारच कमी समजत होती."

"ते दोघेजण मला म्हणाले की आपण लगेच अपहरण करण्यात आलेल्या विमानात बसलेल्या, हायजॅकर्सशी संपर्क केला पाहिजे. कारण आतापर्यंत भारत सरकारचा कोणताही प्रतिनिधी त्यांच्याशी बोलणी करण्यासाठी आलेला नाही, म्हणून ते खूप नाराज आहेत."

अपहरणकर्त्यांची वर्तणूक

घनश्याम यांनी 'अस्सलाम वालेकुम' म्हणत अपहरणकर्त्यांशी बोलायला सुरुवात केली. मात्र विमान अपहरण करणाऱ्यांनी त्यांच्या अभिवादनाला कोणतंही उत्तर दिलं नाही.

उलट ते काश्मीरमध्ये होत असलेल्या कथित अत्याचाराबद्दल सतत बोलत होते.

घनश्याम म्हणतात, "तो रमजानचा महिना होता. अपहरणकर्त्यांच्या प्रमुखानं सकाळी सूर्योदय होण्यापूर्वीच काही खाल्लं असेल. असं असूनही तो माझ्याशी मोठ्या आवाजात अस्खलित उर्दूमध्ये बोलत होता. तो जितका बोलत होता, तितकाच मला अधिक वेळ मिळत होता."

"ते माझ्यासाठी चांगलं होतं. मी त्याला थांबवलं नाही. बोलता बोलता जेव्हा तो थकला, तेव्हा मी त्याला उर्दूमध्ये विचारलं, जनाब, माझ्या सरकारपर्यंत पोहोचवावा यासाठी तुमचा काही संदेश आहे का?"

ते ऐकताच तो आणखी संतापला. मग तो पुन्हा ओरडून म्हणू लागला, "कोणत्या प्रकारचा देश आहे तुमचा? कोणत्या प्रकारचं सरकारचं आहे तुमचं? तुम्हाला विमानात बसलेल्या तुमच्या लोकांची थोडीसुद्धा काळजी नाही."

"आता थोडाही उशीर झाला, तर मी एक-एक करत त्यांना मारण्यास सुरुवात करेन. तुम्ही यासाठी तयार आहात का?"

घनश्याम त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत म्हणाले की भारतीय शिष्टमंडळ काही क्षणांमध्येच दिल्लीहून कंदहारला रवाना होणार आहे.

विमान अपहरण करणाऱ्यांशी बोलून घनश्याम जेव्हा परतले, तेव्हा संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अधिकाऱ्यानं त्यांना एक तपकिरी लिफाफा दिला. घनश्याम यांनी तो लिफाफा उघडला. त्यात काही चॉकलेट होते.

इंडियन एअरलाईन्सचं एक विशेष विमान 27 डिसेंबरला कंदहार विमानतळावर उतरलं. त्यामध्ये भारत सरकारचे 5 प्रतिनिधी आणि इंडियन एअरलाईन्सचे 10 तंत्रज्ञ यांचा समावेश होता.

या 5 प्रतिनिधींमध्ये रॉ मधून सी. डी. सहाय आणि आनंद आर्नी होते. तर अजित डोभाल आणि संधू इंटेलिजन्स ब्युरोमधून होते. तसंच परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक काटजू होते.

या लोकांना राहण्यासाठी अफगाण एअरलाईन्सच्या गेस्ट हाऊसमध्ये दोन खोल्या देण्यात आल्या होत्या.

सहाय, डोभाल आणि काटजू यांना एका खोलीत उतरवण्यात आलं तर दुसऱ्या खोलीत घनश्याम, आर्नी आणि संधू होते. सर्वात मोठी समस्या होती टॉयलेटची. इतक्या लोकांसाठी फक्त एक टॉयलेट होतं.

घनश्याम म्हणतात, "गर्दी टाळण्यासाठी मी सकाळी 3 वाजता उठायचो. मी तिथल्या एका केअरटेकरला विचारलं की इथे जवळपास दुसरं वॉशरुम आहे का? कारण मला उशीर होत होता. त्यानं मला काही अंतरावर एक इमारत दाखवली. मी माझा टॉवेल आणि टॉयलेट बॅग घेऊन तिथे गेलो आणि तिथलं वॉशरुम वापरलं."

"तिथे माझ्या लक्षात आलं की, त्या इमारतीत राहणारे लोक अफगाणी लोकांपेक्षा पूर्ण वेगळे होते. मी काटजू यांना ही गोष्ट सांगितली. काटजू यांनीदेखील तिथे जाऊन त्या ठिकाणचा आढावा घेतला."

"आम्हा दोघांना वाटत होतं की त्या इमारतीत सीमेपलीकडून आलेले लोक राहत होते. जेणेकरून त्यांना तालिबानला अपहरणाशी संबंधित बाबींमध्ये सल्ला देता येईल."

विमानातून खाली टाकण्यात आली चिठ्ठी

तिथे असलेल्या तालिबानच्या अधिकाऱ्यांनी भारतीय शिष्टमंडळाच्या काही सदस्यांना विमानाजवळ जाण्याची परवानगी दिली.

घनश्याम म्हणतात, "आम्ही जेव्हा विमानाच्या जवळ पोहोचलो, तेव्हा अचानक विमानाचा दरवाजा उघडला आणि तिथून एक कागद खाली टाकण्यात आला. त्यावेळेस थंड वारा वाहत होता. त्यामुळे तो कागद हवेत उडू लागला. ते एका वही किंवा डायरीतून फाडलेलं पान होतं."

"मी उडणाऱ्या कागदाच्या मागे पळालो आणि शेवटी तो कागद पकडला. मी पाहिलं की त्यावर अतिशय सुंदर हस्ताक्षरात त्यांच्या मागण्या लिहिलेल्या होत्या. त्यांच्या एकूण 38 मागण्या होत्या. भारतातील तुरुंगात असलेल्या 36 कैद्यांची सुटका करण्यात यावी, अशी त्यांची मागणी होती."

"तसंच भारतात दफन करण्यात आलेला हरकत-उल-अंसारचा संस्थापक सज्जाद अफगाणी याचे अवशेष परत पाठवण्यात यावे. याशिवाय, भारत सरकारनं त्यांना 100 डॉलर्सच्या बंडलमध्ये 20 लाख डॉलर्स द्यावेत," अशा मागण्याही करण्यात आल्या होत्या.

भारताच्या शिष्टमंडळासाठी पहिलं जेवण आलं, ते होतं कोंबडीची एक भाजलेली तंगडी, एक मोठा अफगाणी नान, काकडी आणि कांदा. ही त्यांच्या दृष्टीनं मोठी गोष्ट होती. कारण त्यांच्या आजूबाजूचे लोक रमजान असल्यामुळे काहीही खात-पित नव्हते.

दुसऱ्या दिवसापासून त्यांच्यासाठी सीमेपलीकडून पाकिस्तानातून जेवण येऊ लागलं. लाउंजमध्ये उपस्थित असलेल्या लोकांमध्ये एक विनोद प्रचलित झाला होता. तो म्हणजे अचानक इतके लोक आल्यामुळे छोट्याशा कंदहार शहरात कोंबड्यांचा तुटवडा निर्माण झाला होता.

शेवटी 3 कट्टरतावाद्यांना सोडण्यावर सहमती झाली.

सज्जाद अफगाणी यांचा मृतदेह कबरेतून बाहेर काढण्याची मागणी पूर्ण करणं भारतीय प्रशासनासाठी खूप कठीण होतं.

ए. आर. घनश्याम म्हणतात, "आमच्या विनंतीवरून, तालिबाननंही अपहरणकर्त्यांना सांगितलं की याप्रकारची मागणी इस्लामविरोधी आहे. याच प्रकारचा युक्तिवाद अमेरिकन डॉलर्सच्या मागणीसाठी देखील करण्यात आला."

"अनेक युक्तिवाद आणि चर्चांनंतर ती मागणीही मागे घेण्यात आली. कैद्यांच्या सुटकेच्या मागणीबाबत आमचा युक्तिवाद होता की, ते लोक भारताच्या कोणत्या तुरुंगात आहेत, याची आमच्याकडे ठोस माहिती नाही."

"त्यांच्या सुटकेसाठी आम्हाला न्यायालयातून परवानगी घ्यावी लागेल आणि आम्हाला त्यांना यासाठीचं कारणदेखील सांगावं लागेल. असं करण्यास अनेक आठवडे, महिने किंवा त्याहूनही अधिक काळ लागू शकतो. अपहरणकर्त्यांकडून बोलणारे लोक लवकर थकत होते."

"त्यांचा आवाजदेखील खाली जात होता. कारण त्यांना रिकाम्या पोटी बराच वेळ बोलावं लागत होतं. तिसऱ्या दिवसापर्यंत त्यांच्या मागण्या कमी होऊन तीन कैद्यांच्या सुटकेपर्यंत आल्या होत्या."

हे 3 कट्टरतावादी होते, मसूद अजहर, उमर शेख आणि मुश्ताक अहमद जरगर. विमानात अडकलेल्या भारतीय प्रवाशांची सुटका कोणत्याही परिस्थितीत करण्यात यावी, यासाठी सरकारवर खूप दबाव होता.

कट्टरतावाद्यांच्या नातेवाईकांनी पटवली ओळख

या 3 कट्ट्ररतावाद्यांना आणि परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांना घेऊन 31 डिसेंबरला इंडियन एअरलाईन्सचं एक विमान संध्याकाळी 5 वाजता कंदहारला पोहोचलं. त्यावेळेस सूर्यास्ताची वेळ झाली होती.

घनश्याम म्हणतात, "आमच्यासमोरची सर्वात मोठी समस्या होती की प्रवाशांना विमानातून कसं उतरवायचं. कारण कंदहारच्या विमानतळावर, विमानातून प्रवाशांना उतरवता यावं यासाठी विमानाला जोडण्यासाठी फक्त एकच शिडी होती."

"त्याचा वापर करून सर्वात आधी कट्टरतावाद्यांना आणि परराष्ट्र मंत्र्यांना उतरवण्यात आलं. मग तीच शिडी वापरून अपहरण केलेल्या विमानातून प्रवाशांना उतरवण्यात आलं. मग पुन्हा त्याच शिडीचा वापर करून त्या प्रवाशांना भारतातून आलेल्या विमानात चढवण्यात आलं. यासाठी बराच वेळ लागला."

"जसवंत सिंह, परराष्ट्र मंत्रालयातील संचालक व्ही. पी. हरन यांच्यासोबत सर्वात आधी उतरले. त्यांना तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटण्यासाठी नेण्यात आलं. जसवंत सिंहांनी मध्यस्थीसाठी त्यांचे आभार मानले."

नंतर ते 3 कट्टरतावादी उतरले. तालिबानच्या प्रतिनिधींनी त्यांना एकानंतर एक त्यांचं स्वागत केलं आणि नंतर ते तिघे बेपत्ता झाले.

जसवंत सिंह यांनी त्या प्रसंगाचं वर्णन, 'अ कॉल टू ऑनर' या त्यांच्या आत्मचरित्रात केलं आहे.

त्यांनी लिहिलं आहे की, "ते तिघे खाली उतरताच त्यांची गळाभेट घेऊन आणि घोषणा देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं. या सर्वांच्या नातेवाईकांना पाकिस्तानातून तिथे आणण्यात आलं होतं. त्या लोकांनी त्यांची ओळख पटवली."

"सोडण्यात आलेले कट्टरतावादी खरे आहेत, याची अपहरणकर्त्यांना खात्री पटली, तेव्हाच त्यांनी विमानातून उतरण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान मी वाट पाहत होतो. दरम्यान अंधार पडला. थंडी वाढली."

डोभाल यांना भेट म्हणून दिली दुर्बीण

त्याचदरम्यान एका अपहरणकर्त्यानं अजित डोभाल यांना एक दुर्बीण भेट दिली. नंतर याबद्दलचा तपशील देत डोभाल यांनी लिहिलं होतं, "तीन कट्टरतावाद्यांना अपहरणकर्त्यांच्या ताब्यात देण्याआधी मला खातरजमा करून घ्यायची होती की अपहरणकर्ते आणखी काही करण्याच्या तयारीत तर नाही ना."

"मी विमानात गेलो आणि प्रवाशांचं मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांना संबोधित केलं. मी जेव्हा विमानातून उतरत होतो, तेव्हा बर्गर आणि सँडी हे दोन अपहरणकर्ते माझ्याकडे आले. त्यांनी आठवण म्हणून मला एक छोटीशी दुर्बीण भेट दिली."

"त्यांचं म्हणणं होतं की, या दुर्बिणीतून ते बाहेरच्या घडामोडींवर लक्ष ठेवत होते. जेव्हा आम्ही दिल्लीला परतत होतो, तेव्हा मी ती दुर्बीण परराष्ट्र मंत्र्यांना दाखवली. त्यांनी ती दुर्बीण त्यांच्याकडे ठेवून घेतली. त्यांचं म्हणणं होतं की ती दुर्बीण त्यांना कंदहारच्या कटू अनुभवाची आठवण करून देत राहील."

त्या रात्री परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह सर्व प्रवाशांसह दिल्लीला परत आले. मात्र त्यांनी घनश्याम यांना निर्देश दिले की जोपर्यंत अपहरण करण्यात आलेलं भारतीय विमान दिल्लीत पोहोचत नाही, तोपर्यंत त्यांनी कंदहारमध्येच राहावं.

घनश्याम म्हणतात, "मी जेव्हा साधारण सात वाजेच्या सुमारास विमानात शिरलो, तेव्हा तिथे असह्य दुर्गंधी येत होती. कॉकपिटमध्ये चिकनची हाडं आणि संत्र्यांच्या साली पडलेल्या होत्या. टॉयलेट वापरण्यायोग्य नव्हते. त्या रात्री मी विमानतळाच्या लाउंजमध्येच राहिलो."

"कॅप्टन राव, 11 वाजेपर्यंत विमानातून परतले नव्हते. मी त्यांच्याबद्दल विचारण्यास विमानापर्यंत गेलो. मी कॅप्टन राव यांना माझ्यासोबत लाउंजमध्ये घेऊन आलो होतो. त्या रात्री आम्ही सर्वजण लाउंजमध्येच झोपलो होतो."

तालिबानकडून घनश्याम यांना भेटवस्तू

दुसऱ्या दिवशी 1 जानेवारीला इस्लामाबादला परतण्याआधी घनश्याम तालिबानच्या अधिकाऱ्यांना भेटून त्यांचे आभार मानू इच्छित होते. मात्र त्यांना भेटायला कोणीही आलं नाही.

जवळपास 11 वाजता कंट्रोल रूममधील इंग्रजी बोलणाऱ्या एका अधिकाऱ्यानं घनश्याम यांना एक पॅकेट दिलं.

घनश्याम त्याबद्दल म्हणतात, "त्या पॅकेटमध्ये काही बदाम आणि किशमिश होतं. त्याव्यतिरिक्त त्यामध्ये एक छोटा कंगवा, एक नेलकटर, नायलॉनच्या मोज्यांची एक जोडी आणि अफगाणी पोशाख शिवून घेण्यासाठी काही मीटर सुती कापड होतं."

"तो व्यक्ती मला म्हणाला की ही तालिबानच्या नागरी विमान वाहतूक मंत्र्यांकडून मला पाठवण्यात आलेली भेटवस्तू आहे. त्यानंतर 12 वाजता मी संयुक्त राष्ट्रसंघाच्या विमानातून इस्लामाबादला निघून गेलो."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)