अनुभव सिन्हा यांनी दिली बॉलिवूडला सोडचिठ्ठी

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये गेल्या काही दिवसापासून नेपोटिझम, गटबाजी या विषयांवर चर्चा होत आहे. कंगना रणौत, आलिया भट, अनुराग कश्यप, करण जोहर ही नावं सातत्याने चर्चेत येत आहेत. आता या नावांमध्ये दिग्दर्शक अनुभव सिन्हाचंही नाव आलं आहे.

थप्पड, आर्टिकल 15, मुल्क या चित्रपटांचा दिग्दर्शक अनुभव सिन्हाने म्हटलं आहे की, मी बॉलीवुडचा राजीनामा देत आहे. ट्विटरवर आपल्या प्रोफाइल समोरच अनुभव सिन्हाने 'नॉट बॉलीवु़ड' असं लिहिलं आहे.

अनुभव सिन्हाच्या ट्वीटनंतर दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांनी ट्वीट करून म्हटलं की, हे बॉलिवूड आहे तरी काय? सत्यजित रे, राज कपूर, गुरू दत्त, ऋत्विक घटक, बिमल रॉय, मृणाल सेन, हृषीकेश मुखर्जी, के. असीफ, विजय आनंद, तपन सिन्हा, गुलझार, शेखर कपूर, केतन मेहता, भारतन अरविंदन यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी चित्रपटसृष्टीत आलोय आणि नेहमी राहीन.

सुधीर मिश्रांच्या ट्वीटला उत्तर देत अनुभव सिन्हा यांनी म्हटलं की, आपण दोघं बॉलिवूडमधून बाहेर पडून फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहून चित्रपट बनवू.

सुधीर मिश्रांना दिलेल्या उत्तरामधून अनुभव सिन्हा यांनी आपण चित्रपट बनवणं सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यांनी फॅन्सना दिलेल्या रिप्लायमध्येही आपण चित्रपट बनवणं सोडणार नसल्याचं म्हटलं.

या कंगनाला मी ओळखत नाही -अनुराग कश्यप

कंगना एकेकाळी माझी चांगली मैत्रीण होती मात्र ही कंगना मला सहन होत नाही असं चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपने म्हटलं आहे.

चित्रपट दिग्दर्शक अनुराग काश्यप यांनी अभिनेत्री कंगना रणौतसंबंधी एकापाठोपाठ एक बरेच ट्वीट्स केले आहेत.

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर कंगना रणौत सातत्याने बॉलीवुडमधील नेपोटिझम आणि मुव्ही माफियांविषयी बोलतेय.

तिच्या या स्पष्टवक्तेपणावरून सोशल मीडियावर अनेकजण तिची थट्टा उडवत आहेत, तर अनेकांनी तिचं समर्थनही केलं आहे.

याचसंदर्भात अनुराग कश्यप यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये ते लिहितात, "काल कंगना रणौतची मुलाखत बघितली. एकेकाळी ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. प्रत्येक चित्रपटानंतर ती स्वतः येऊन मला प्रोत्साहित करायची. मात्र, या नव्या कंगनाला मी ओळखत नाही आणि आताच 'मणिकर्णिका' चित्रपटानंतर तिने दिलेली तिची ती भयंकर मुलाखतही बघितली."

यानंतरच्या दुसऱ्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "यश आणि सामर्थ्याची भुरळ प्रत्येकाला बरोबर पडते. मग ती व्यक्ती इनसाइडर असो की आउटसाइडर. 'माझ्याकडून शिका, माझ्यासारखे बना', हे मी 2015 पूर्वी तिच्या तोंडून कधीच ऐकलं नव्हतं आणि तिथपासून आता गोष्टी इथपर्यंत आल्या आहेत की, जो माझ्यासोबत नाही तो प्रत्येकजण स्वार्थी आणि लांगुलचालन करणारा आहे."

कंगनाचं कौतुक करणाऱ्यांवरही अनुराग कश्यप यांनी निशाणा साधला आहे. ते लिहितात, "कंगनाला आरसा दाखवण्याऐवजी उलट तिला डोक्यावर घेऊन तुम्ही तिलाच संपवत आहात. मला अधिक काही बोलायचं नाही. ती काय मूर्खासारखं बोलत आहे? आणि कशाच्या आधारावर बोलत आहे? या सर्वांचा शेवट हाच होणार आहे. आणखी एक गोष्ट, मी तिला खूप मानायचो आणि म्हणूनच मला ही कंगना सहन होत नाहीये."

लोक कंगनाचा वापर करत असल्याचा आरोपही अनुरागने केला आहे. याविषयीच्या ट्वीटमध्ये ते लिहितात, "मी म्हणेन, कंगना टीम, खूप झालं आता. हे तुझ्या कुटुंबीयांना दिसत नसेल आणि तुझ्या मित्रांनाही दिसत नसेल, तर मग एकच गोष्ट खरी आहे की प्रत्येकजण तुझा वापर करतोय आणि आज तुझं स्वतःचं असं कुणीच नाही. पुढे तुझी इच्छा. मला शिव्या घालायच्या असतील तर घाल."

टीम कंगनानेही अनुराग काश्यपला ट्वीटने उत्तर दिलं आहे. टीम कंगना लिहिते, "हे मिनी महेश भट्ट कंगनाला सांगत आहेत की, ती अशा मतलबी लोकांनी वेढलेली आहे जे तिचा वापर करत आहेत. राष्ट्रविरोधी आणि अर्बन नक्षल जसा दहशतवाद्यांचा बचाव करतात तशाच पद्धतीने ते आता मुव्ही माफियांचा बचाव करत आहेत."

यानंतर कमाल खान आणि रणवीर शौरी या बॉलीवूड कलाकारांनीही या वादात उडी घेतली.

कमाल खानने ट्वीट केलं, "अनुराग कश्यप, बॉलीवुडमध्ये तुमची आपली माणसं कोण आहेत हे तुम्ही जगाला सांगाल का? सलमान ग्रुप, यशराज फिल्म ग्रुप की करण जौहर ग्रुप?"

कीर्ती चित्रांशी नावाच्या युजरने अनुरागला विचारलं आहे, "तुम्हाला कंगनाची खरंच काळजी असेल तर तिला खाजगी मेसेज टाकणं जास्त योग्य ठरलं नसतं का?"

अनुराग यांनी या ट्वीटला उत्तर दिलं आहे. ते लिहितात, "गेल्या वेळी मेसेज पाठवला होता. तिने तो ट्वीटरवर टाकला आणि त्यानंतर ती याच व्यासपीठावरून माझ्याशी बोलते. ही वर्षभरापूर्वीची गोष्ट आहे."

कंगना गेल्या काही वर्षांपासून सतत वादात असते. नुकतंच कंगना रणौतने एका मुलाखतीत म्हटलं होतं, "तापसीसारखे लोक म्हणतीलही की, त्यांना नेपाटिझमचा त्रास नाही. त्यांना करण जौहर आवडतात. पण तरीही तुमच्यासारख्या बी ग्रेड अॅक्ट्रेसेस, ज्या दिसायलाही बऱ्या आहेत त्यांना काम का मिळत नाही?"

स्वरा भास्करनेही ट्वीटवरूनच कंगनाला उत्तर दिलं आहे. ती लिहिते, "जरुरतमंद आउटसाइडर, बी ग्रेड अॅक्ट्रेस...मात्र आलिया भट्ट, अनन्या पांडे यांच्यापेक्षा चांगल्या दिसणाऱ्या आणि त्यांच्याहून चांगल्या कलाकारही. एकंदरित मला वाटतं की, ही कॉम्प्लिमेंट आहे. धन्यवाद कंगना. मला वाटतं की, तू सुंदर आहेस, एक चांगली कलाकार आहे आणि चांगली व्यक्तीही. कायम चमकत रहा."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)