'इनकॉग्निटो मोड'वर सर्च केलेल्या गोष्टींवर खरंच कुणाचीच नजर नसते का? हे किती गोपनीय आणि सुरक्षित आहे?

    • Author, सिराज
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

'इनकॉग्निटो मोड' किंवा 'प्रायव्हेट ब्राउझिंग', हे शब्द इंटरनेटच्या युगात तसे नवीन नाहीत.

'इंटरनेटवर एखादी माहिती शोधत असताना किंवा एखाद्या विशिष्ट वेबसाईटवर माहिती पाहत असताना, ब्राउझरवर या फीचरचा वापर केल्यामुळे आपण काय माहिती शोधत आहोत किंवा कोणती वेबसाईट पाहत आहोत, ते गोपनीय राहील', ही अनेकजणांची समजूत आहे.

जर तुम्हालाही असंच वाटत असेल, तर तुम्हाला धक्का बसेल.

2020 मध्ये गुगलच्या विरोधात एक खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यात आरोप होता की गुगल त्याच्या युजर्सच्या ॲक्टिव्हिटींवर लक्ष ठेवतं, अगदी युजर्सनी त्यांच्या ब्राउझरमध्ये 'इनकॉग्निटो' फीचर (गुगल क्रोम) वापरलं तरीदेखील गुगलचं त्यावर लक्ष असतं.

अनेक युजर्सना 'प्रायव्हेट मोड' म्हणजे काय, याबद्दल गैरसमज आहेत. मात्र असं असलं तरीदेखील, गुगलनं म्हटलं आहे की या मोडचा वापर करून इंटरनेटवरून माहिती गोळा करण्यासंदर्भात ते पारदर्शक आहेत.

नंतर 2024 मध्ये, या खटल्यातून मार्ग काढण्यासाठी गुगल लाखो गोष्टींचा डेटा हटवण्यास आणि युजर्सच्या ट्रॅकिंगसंदर्भात काही बंधनं स्वीकारण्यास तयार झालं होतं.

त्यावेळेस गुगलचा हा निर्णय इंटरनेटवर व्हायरल झाला होता. अनेकजणांनी 'इनकॉग्निटो मोड' बाबत शंका उपस्थित केल्या होत्या.

इनकॉग्निटो किंवा प्रायव्हेट मोड म्हणजे काय?

इनकॉग्निटो किंवा प्रायव्हेट ब्राउझिंग हे वैशिष्टं किंवा सुविधा बहुतांश आधुनिक ब्राउझरमध्ये आढळते. अनेक ब्राउझर्समध्ये ते वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं.

उदाहरणार्थ, गुगल क्रोममध्ये इनकॉग्निटो मोड, मोझिला फायरबॉक्स आणि सफारीमध्ये 'प्रायव्हेट ब्राउझिंग' आणि मायक्रोसॉफ्ट एजमध्ये 'इनप्रायव्हेट'.

"तुम्ही ब्राउझरचा वापर करून इंटरनेटवर जे काही शोधत असता किंवा ब्राउझरवर जे काही करत असता, ते त्याच उपकरणाचा वापर करणाऱ्या इतर युजर्सपासून लपवण्याचं काम इनकॉग्निटो मोड करतं," असं स्पष्टीकरण गुगलनं दिलं आहे.

म्हणजेच, जर तुम्ही तुमच्या ऑफिसमधील कॉम्प्युटरवर ब्राउझिंगचा वापर करत असाल आणि इतर लोकांनाही त्या कॉम्प्युटरचा ॲक्सेस असेल किंवा तो कॉम्प्युटर वापरता येत असेल, तर इनकॉग्निटो मोड किंवा प्रायव्हेट ब्राउझिंगचा वापर केल्यामुळे तुम्हाला तुम्ही नेमकं काय ब्राउझिंग करत आहात हे इतरांपासून लपवण्यासाठी मदत होते.

जरी इतर युजर्सनी ब्राउझरच्या 'हिस्ट्री' पेजवर जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील तुम्ही नेमकं काय ब्राउझ केलं आहे त्याची माहिती तिथे दिसत नाही.

इनकॉग्निटो मोड एक तात्पुरत्या स्वरुपाचं ब्राउझिंग सेशन तयार करतो. त्यामुळे एकदा का तुम्ही ब्राउझिंग विंडो बंद केली की त्यासंदर्भातील कोणतीही हिस्ट्री, कुकीज किंवा कॅशे, किंवा लॉग इनबद्दलची माहिती तिथे सेव्ह केली जात नाही.

त्याचप्रमाणे, तुम्हाला तुमच्या मुख्य ब्राउझिंग सेशनमधील माहितीही मिळू शकणार नाही.

"काहीजण अगदी त्यांचे बँकिंग व्यवहारदेखील प्रायव्हेट ब्राउझिंगचा वापर करून करतात. मात्र यामागील सत्य असं आहे की तो डेटा फक्त त्याच उपकरणावर साठवला जात नाही. नाहीतर, तुमच्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरकडे (आयएसपी) तो डेटा असेल," असं सायबर गुन्हे प्रतिबंधक तज्ज्ञ मुरलीकृष्णन चिन्नादुराई म्हणतात.

यामागचं कारण असं आहे की प्रायव्हेट ब्राउझिंग मोडचा वापर करताना तुमच्या उपकरणाचा आयपी ॲड्रेस (जो त्या उपकरणाच ओळख असतो) लपलेला नसतो.

अगदी तुम्ही तुमच्या उपकरणावरून प्रायव्हेट ब्राउझिंगचा वापर करून एखादी विशिष्ट वेबसाईट पाहत असाल, तरीदेखील ते उपकरण आणि तुमच्या इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरला माहीत असेल की ते तुम्हीच आहात, असं मुरलीकृष्णन चिन्नादुराई नमूद करतात.

आयपी ॲड्रेस म्हणजे एक विशिष्ट क्रमांक असतो, जो इंटरनेटला जोडलेल्या प्रत्येक उपकरणाला दिलेला असतो. हा क्रमांक म्हणजे त्या उपकरणाची एकप्रकारे ओळखच असते.

इनकॉग्निटो मोडबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात?

मुरलीकृष्णन म्हणतात, "जेव्हा तुम्ही ऑफिसमधील कॉम्प्युटरवर इनकॉग्निटो मोडचा वापर करत असता, तेव्हा त्या ऑफिसच्या नेटवर्क ॲडमिनलादेखील त्यासंदर्भातील सर्व तपशील माहीत असतात."

"त्याचप्रमाणे, प्रायव्हेट ब्राउझिंग मोडचा वापर करून बेकायदेशीर गोष्टींचा शोध घेणंदेखील रेकॉर्ड केलं जातं. जेव्हा आवश्यकता असते, तेव्हा सरकारी यंत्रणा ती माहिती जाणून घेऊ शकतात."

"तुमचा कॉम्प्युटर किंवा उपकरण इंटरनेटला जोडण्यासाठी, तुम्हाला राउटरचा वापर करावा लागतो. राउटरच्या माध्यमातून तुम्ही पाहत असलेल्या सर्व वेबसाईटवर लक्ष ठेवलं जाऊ शकतं. अगदी तुम्ही जरी प्रायव्हेट ब्राउझिंगचा वापर केला, तरीदेखील तुम्ही ते रोखू शकत नाही," असं ते पुढे म्हणतात.

त्याचप्रमाणे, मुरलीकृष्णन नमूद करतात की प्रायव्हेट ब्राउझिंगचा वापर करून तुम्ही जेव्हा काही डाउनलोड करता, मग तो व्हीडिओ असो की कागदपत्रं असोत, ते आपोआप डीलीट होत नाही.

"ते तुमच्या कॉम्प्युटर किंवा उपकरणावर साठवलं जातं. ते तुम्हालाच हटवावं लागतं. नाहीतर, तुम्ही प्रायव्हेट ब्राउझिंग सेशन बंद केल्यानंतरच डाउनलोडचे तपशील आपोआप हटवले जातील," असं ते पुढे म्हणतात.

'इनकॉग्निटो म्हणजे संरक्षण कवच नाही'

"अर्थातच, इनकॉग्निटो मोड म्हणजे काही सायबर कवच नाही. मात्र अनेकजणांना तसंच वाटतं," असं एका अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे.

"इंटरनेटचा वापर करणाऱ्या अनेक युजर्सचा 'प्रायव्हेट ब्राउझिंग' या शब्दाबाबत गैरसमज आहे. अनेकजणांना चुकून असं वाटतं की ते या सुविधेचा वापर एनक्रिप्टेड ईमेल पाठवण्यासाठी, त्यांची ओळख लपवण्यासाठी किंवा फिशिंग वेबसाईटवर जाण्यासाठी करू शकतात. कारण त्यांना असं वाटत होतं की 'इनकॉग्निटो सुरक्षित आहे,'" असं अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या एका अभ्यासात म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे, आणखी एका अभ्यासात म्हटलं आहे की "इंटरनेटचा वापर करणाऱ्या अनेक युजर्सना हे माहित नसतं की त्यांनी अगदी 'इनकॉग्निटो मोड' वापर केल्यानंतरही, ते इंटरनेटवर काय करत आहेत, यावर त्यांचा इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, ते ज्या कंपनीसाठी काम करतात ती कंपनी किंवा सरकार लक्ष ठेवू शकतं."

या सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्यांपैकी 27 टक्के लोकांचा समज होता की प्रायव्हेट ब्राउझिंगमुळे व्हायरस आणि मालवेअरपासून संरक्षण मिळतं.

मुरलीकृष्णन आवर्जून सांगतात की प्रायव्हेट ब्राउझिंगमुळे ऑनलाइन स्कॅमपासून तुमचं संरक्षण होणार नाही.

"तुम्ही नेहमीच्या ब्राउझरचा वापर करून एखाद्या फसवणूक करणाऱ्या लिंकवर क्लिक केल्यावर जो परिणाम होईल, तोच परिणाम प्रायव्हेट ब्राउझिंगचा वापर केल्यावरदेखील होईल," असं ते म्हणतात.

"प्रायव्हेट ब्राउझिंग तुमचा ऑनलाइन देखरेखीपासूनदेखील बचाव करत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर, तुम्ही एखाद्या नव्या 'ब्राउझिंग सेशन'चा वापर करत आहात. एकदा का तुम्ही ते पूर्णपणे बंद केलं, की तुम्ही त्यावर काय पाहिलं याची माहिती त्या उपकरणावर राहणार नाही."

"उदाहरणार्थ, तुम्ही आणि तुमची पत्नी एकच उपकरण किंवा कॉम्प्युटर वापरता. तुम्ही तुमच्या पत्नीसाठी एखादी भेटवस्तू शोधत आहात. मात्र तुम्हाला ते तुमच्या पत्नीला कळू द्यायचं नाही. तुम्हाला तुमच्या पत्नीला सरप्राईज भेट द्यायची आहे. मग अशावेळी हे प्रायव्हेट ब्राउझिंग तुमच्या उपयोगाचं ठरेल," असं ते म्हणतात.

याव्यतिरिक्त,

  • जर तुम्हाला तुम्ही इंटरनेटवर केलेल्या सर्चच्या (एका सेशनमध्ये) आधारावर येणाऱ्या वैयक्तिक स्वरूपाच्या जाहिराती नको असतील.
  • जर तुम्हाला कुकीज/कॅशे डेटा नको असेल.
  • जर तुम्हाला एकाचवेळी दोन जीमेल अकाउंटमध्ये लॉग इन करायचं असेल ( किंवा लॉग इनची आवश्यकता असलेल्या इतर वेबसाईट्स).

तर मुरलीकृष्णन म्हणतात की मग प्रायव्हेट ब्राउझिंग तुमच्या उपयोगाचं ठरेल.

"अलीकडच्या काळात, अनेकजण प्रायव्हेट ब्राउझिंगला पर्याय म्हणून व्हीपीएनचा वापर करत आहेत. मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्या त्यांच्या रोजच्या कामकाजासाठी योग्य सुरक्षेसह त्याचा वापर करतात. मात्र जेव्हा लोक स्वतंत्रपणे व्हीपीएनचा वापर करतात तेव्हा त्यात काही धोके असतात. त्यामुळे सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे," असं ते म्हणतात.

"त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही इनकॉग्निटो विंडो उघडाल, तेव्हा लक्षात ठेवा की इंटरनेटवर पूर्णपणे गोपनीय असं काहीही नाही. यासंदर्भात जागरूक, सतर्क राहणं हे आपली जबाबदारी आहे," असं ते म्हणतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.