या देशात सव्वा लाखांहून अधिक घरांमधील कॅमेरे हॅक, व्हीडिओंचा गैरवापर; नेमकं काय घडलं?

    • Author, गॅविन बटलर

घरात आणि ऑफिसमध्ये लावण्यात आलेले 1 लाख 30 हजारांहून जास्त व्हीडिओ कॅमेरे हॅक केले, त्यातलं फुटेज वापरून ते एका परदेशी वेबसाईटला लैंगिक शोषणासंबंधीचा कन्टेन्ट बनवण्यासाठी विकले.

हा प्रकार घडला आहे दक्षिण कोरियामध्ये.

या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटकही करण्यात आली आहे.

पोलिसांनी रविवारी (30 नोव्हेंबर) या आरोपींच्या अटकेची माहिती दिली. इंटरनेट प्रोटोकॉल (आयपी) कॅमेऱ्यांमध्ये सोपा पासवर्ड ठेवण्यासारख्या गोष्टींचा फायदा घेत आरोपींनी हे काम केल्याचं पोलिसांनी म्हटलं.

आयपी कॅमेरा हा सीसीटीव्हीचा एक स्वस्त पर्याय आहे. याला घरगुती वापरासाठीचा कॅमेराही म्हटलं जात. हा कॅमेरा घरातल्या इंटरनेट नेटवर्कसोबत कनेक्ट केला जातो. लहान मुलं तसंच पाळीव जनावरांच्या सुरक्षेसाठी तो लावण्यात येतो.

हॅक केलेल्या कॅमेऱ्यांमध्ये घरं, कराओके रुम्स, पिलाटेज स्टुडिओ तसंच एका स्त्री रोगतज्ज्ञाच्या क्लिनिकचा समावेश आहे.

दक्षिण कोरियातील राष्ट्रीय पोलिस एजन्सीने दिलेल्या निवेदनानुसार चारही संशयित हे स्वतंत्रपणे काम करत होते. त्यांनी एकत्रितपणे हे कारस्थान केलं नाही.

फुटेज पाहणारेही तिघेजण अटकेत

संशयितांपैकी एकावर 63 हजार कॅमेरे हॅक करण्याचा आणि लैंगिक शोषणाचे 545 व्हीडिओ बनवल्याचा आरोप आहे. हे व्हीडिओ त्याने 35 मिलियन वॉन (12,235 डॉलर) किमतीच्या व्हर्चुअल मालमत्तेच्या बदल्यात विकले होते.

दुसऱ्या एका संशयिताने 70 हजार कॅमेरे हॅक केले आणि 648 व्हीडिओ बनवले होते. त्याने हे व्हीडिओ 18 मिलियन वॉन किमतीला विकले.

एका वेबसाइटवर गेल्या वर्षी पोस्ट केलेल्या लैंगिक शोषणाच्या व्हीडिओपैकी 62% व्हीडिओ या दोन संशयितांनीच बनवले होते. ही वेबसाइट अवैध पद्धतीने कॅमेरा हॅकिंगचं फुटेज प्रसिद्ध करायची.

पोलिसांनी ती वेबसाइट ब्लॉक केली असून बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या वेबसाइटच्या संचालकांची चौकशी करण्यासाठी परदेशी एजन्सीची मदत घेण्यात येत आहे.

या वेबसाइटच्या माध्यमातून लैंगिक शोषणाचे व्हीडिओ खरेदी केल्याच्या आणि पाहिल्याच्या संशयावरून तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रीय पोलिस एजन्सीचे सायबर तपास प्रमुख पार्क वू-ह्यून यांनी म्हटलं की, "आयपी कॅमेरा हॅकिंग आणि अवैध चित्रीकरणामुळे पीडितांना प्रचंड त्रास झाला आहे आणि म्हणूनच हा अपराध गंभीर आहे. आम्ही कठोर चौकशी करून या प्रकरणाचा मुळापासूनच बंदोबस्त करू."

"अवैध पद्धतीने चित्रित केलेले व्हीडिओ पाहणं आणि रेकॉर्डमध्ये ठेवणं हा गंभीर अपराध आहे. त्यासाठी आम्हाला सक्रियपणे त्याचा तपास करायला हवा."

अधिकाऱ्यांनी 58 ठिकाणी व्यक्तिगत भेटी देऊन पीडितांना या घटनेची माहिती दिली. त्याचबरोबर पासवर्ड बदलण्याबद्दल सांगितलं.

या पीडितांचे व्हीडिओ हटविणे आणि ब्लॉक करणं यासाठीही अधिकारी मदत करत आहेत. त्याचबरोबर पीडितांची ओळख गुप्त ठेवण्यासाठीही प्रयत्न करत आहेत.

राष्ट्रीय पोलिस एजन्सीने आपल्या निवेदनात म्हटलं की, "सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ज्या यूजर्सने आपल्या घरात किंवा व्यावसायिक परिसरात आयपी कॅमेरे लावले आहेत, त्यांनी सतर्क राहायला हवं. आपला पासवर्ड नियमितपणे बदलत राहायला हवा. हे अतिशय महत्त्वाचं आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)