'छावा' चित्रपट विभाजन करणारा असल्याच्या चर्चांबाबत ए.आर. रहमान यांनी काय म्हटलं?

    • Author, हारून रशीद
    • Role, बीबीसी एशियन नेटवर्क

बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांना अविस्मरणीय संगीत देणारे ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी गेल्या 'आठ वर्षांपासून बॉलिवूडमध्ये त्यांना काम मिळणं बंद झाल्याचं मान्य केलं' आहे.

बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ए.आर. रहमान यांनी आपल्या आजपर्यंतच्या संगीत प्रवासाबद्दल, बदलत चाललेल्या चित्रपटसृष्टीबद्दल, पुढील योजनांबद्दल आणि समाजातील सध्याच्या वातावरणाबद्दल मोकळेपणाने संवाद साधला.

नितेश तिवारी यांच्या आगामी 'रामायण' चित्रपटाला त्यांनी संगीत दिलं आहे. वेगळ्या धर्मातून येऊनही या चित्रपटाला संगीत दिल्याबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांनाही ए.आर. रहमान यांनी स्पष्ट उत्तरं दिली.

मागील वर्षी 'छावा' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यालाही ए.आर. रहमान यांनी संगीत दिलं होतं.

या चित्रपटावर काही इतिहासकारांनी वास्तवाचा विपर्यास केल्याचा आणि समाजात फूट पाडणारा असल्याचा आरोप केला होता. चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी महाराष्ट्रातील काही ठिकाणी हिंसाचारही झाला होता.

या मुलाखतीत ए.आर. रहमान यांनीही 'छावा' हा समाजात फूट पाडणारा, म्हणजेच 'विभाजन करणारा' चित्रपट होता, हे मान्य केलं.

या मुलाखतीत ए.आर. रहमान यांनी आपल्या सुरुवातीच्या संघर्षाबद्दल तसेच पाश्चात्य आणि भारतीय संगीत यांचा समतोल साधताना आलेल्या अडचणींबद्दल सविस्तरपणे सांगितलं आहे.

'परवानगी न घेता वापरलं 'रोजा'चं संगीत'

अ‍ॅनिमल या चित्रपटात 'रोजा' चित्रपटातील एक साऊंड ट्रॅक वाजवण्यात आला आहे, त्यामुळे नव्या पिढीला ए.आर. रहमान यांच्या संगीताची ओळख होते.

आता अ‍ॅनिमल चित्रपटात 'छोटी सी आशा' ऐकल्यावर लोक ते इन्स्टाग्राम, टिकटॉकवर मोठ्या प्रमाणात वापरत आहेत, ते सगळीकडे ट्रेंडही होत आहे. 33 वर्षांपूर्वी तयार केलेलं संगीत आज नव्या पिढीत पुन्हा जिवंत होत असल्याचं पाहून तुम्हाला कसं वाटतं?

या प्रश्नावर रहमान म्हणाले, "हे थोडं नॉस्टॅल्जिक आहे. त्यांनी मला आधी काहीच विचारलं नव्हतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की, ते हे संगीत वापरत आहेत. मूळ रेकॉर्ड उपलब्ध असतानाही आम्ही त्याचा एटमॉस मिक्स करण्याचा प्रयत्न केला आणि ते आजही खूप छान ऐकू येतं."

मात्र 33 वर्षांपूर्वी हा साउंडट्रॅक ज्या दिवशी रिलीज झाला, तो दिवस आजही त्यांना स्पष्टपणे आठवतो.

ते म्हणतात, "मला 'रोजा' करताना खूप निराशा आली होती. हे पूर्ण करून बाहेर पडून स्वतःचे अल्बम बनवू, असं माझ्या मनात होतं. मला चित्रपटसृष्टीत राहायचं नव्हतं, कारण माझं संपूर्ण बालपण तिथेच गेलं होतं."

"पण नशिबाने सगळं मला हवं तसं झालं. डॉल्बी आलं, मग डीटीएस आलं आणि आवाजाची गुणवत्ता खूप चांगली झाली."

ते म्हणाले, "मी थोडा निराशावादी होतो. पण नंतर सगळं बदललं. तंत्रज्ञान खूप वेगाने आलं. पाच वर्षांत डीटीएस डिजिटल आणि डॉल्बी आले. त्यामुळे मला यश आणि पुरस्कारही मिळाले. मग वाटलं, सोडण्याआधी थोडा अजून प्रयत्न करूया. दहा वर्षांनंतर ठरवलं की, आता सोडण्याची भाषा थांबवायची."

रोजाचं संगीत तयार करताना आलेल्या सुरुवातीच्या संघर्षाबद्दल ते म्हणाले की, "मी जेव्हा 16 ट्रॅकवर संगीत मिक्स करायला सुरुवात केली, तेव्हा इतर स्टुडिओमध्ये फक्त 3 ट्रॅक होते. मला वाटत होतं की, हे संगीत टिकेल आणि जसं आहे तसंच ऐकू येईल, त्याची गुणवत्ता कमी होणार नाही. म्हणून मला ते नीट जतन करायचं, नोंदवून ठेवायचं आणि आर्काइव्ह म्हणजेच संग्रहित करायचं होतं."

ते म्हणाले, "माझ्याकडे टेपसाठी पैसे नव्हते, म्हणून मला माझा सगळा बॅकग्राऊंड स्कोअर आणि जुनी गाणी मिटवावी लागली. माझ्याकडे गाणी आहेत, पण स्कोअर नाही. कारण चित्रपटांसाठी मला खूप कमी पैसे मिळायचे. जिंगलसाठी जे पैसे मिळतात, तेच मला सहा महिन्यांच्या चित्रपटाच्या कामासाठी मिळायचे. पण मला समजलं होतं की, मी प्रगती करत आहे."

'बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करण्याची धडपड'

'दिल से' या चित्रपटानंतरच ए.आर. रहमान यांना संपूर्ण भारतात ओळख मिळाली का?

ते म्हणाले, "मला वाटतं 'रंगीला'. राम गोपाल वर्मा, मणिरत्नम यांचे मित्र होते. एक दिवस ते आले आणि म्हणाले, मी एक चित्रपट करत आहे. त्यांचा शिवा हिट झाला होता. त्यांनी माझं संगीत त्यांना आवडतं असं सांगत माझ्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली."

"ते मणिरत्नमपेक्षा पूर्णपणे वेगळे होते. तीन चित्रपटांनंतरही मी बाहेरचाच होतो, पण माझं संगीत प्रत्येक घरात पोहोचलं. ते प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरापर्यंत गेलं.

आजही बहुतांश उत्तर भारतीयांच्या रक्तात ते आहे, कारण त्यात थोडं पंजाबी, हिंदी आणि पहाडी संगीत मिसळलेलं आहे."

बीबीसीने विचारलं, "हे मनोरंजक आहे की, तुम्ही स्वतःला 1999 पर्यंत बाहेरचा मानत होते, तरीही रोजा 1992 मध्ये आला होता आणि त्या नंतर तुम्ही 7 ते 8 वर्षे बॉम्बे, रंगीला, दिल से, तालसारखे देशातील मोठे साउंडट्रॅक तयार करत होतात. तरीही तुम्हाला त्या जागेशी जोडलेले आहात असं वाटलं नाही?"

रहमान म्हणाले, "मी हिंदी बोलत नव्हतो. तमिळ व्यक्तीसाठी हिंदी शिकणं कठीण आहे, कारण आमचं तमिळवर खूप प्रेम आहे. पण सुभाष घई म्हणाले की, मला तुझं संगीत आवडतं, पण तू जास्त काळ इथे राहावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून हिंदी शिक."

"मी म्हणालो ठीक आहे, मी हिंदी शिकेन आणि पुढे जाऊन उर्दूही शिकेन, जी 60-70 च्या दशकातील हिंदी संगीताची जननी आहे. मग मी अरबी शिकायला सुरुवात केली, जी उच्चारात उर्दूसारखी आहे. त्यानंतर मला नुसरतच्या गाण्यांमुळे आणि सुखविंदरच्या प्रभावामुळे, पंजाबीची आवड निर्माण झाली."

रहमान म्हणाले, "विचित्र गोष्ट अशी आहे की, मी कर्नाटक संगीत जास्त वापरलं नाही, कारण त्यावर आधीच खूप काम झालं होतं. कोणतीही धून वाजवली की असं वाटतं की ती आधीच ऐकलेली आहे."

"म्हणून मी हिंदुस्तानी राग निवडले, जसे देश, पीलू, दरबारी. हे राग तमिळ किंवा दक्षिण भारतीय संगीतात फार वापरले गेले नव्हते. त्यामुळेच उत्तर भारतीयांना हे जास्त आवडले. कर्नाटक संगीत मी वापरणार नाही, हा एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता."

''छावा' हा फूट पाडणारा चित्रपट'

बॉलिवूडसाठी संगीत तयार करताना ए.आर. रहमान यांनी अशा अनेक रचना दिल्या आहेत, ज्या नेहमीच लोकांच्या आवडीच्या म्हणजेच सदाबहार श्रेणीत येतात.

अलीकडे छावा नावाचा चित्रपट आला. त्याला ए.आर. रहमान यांनी संगीत दिलं आहे. या चित्रपटाच्या संगीताचं खूप कौतुक झालं.

तरीही, चित्रपट प्रदर्शित होताच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आणि महाराष्ट्रातील काही ठिकाणी हिंसाचारही झाला.

बीबीसी एशियन नेटवर्कच्या मुलाखतीत रहमान यांना विचारलं गेलं की, हा समाजात फूट पाडणारा म्हणजे विभाजन करणारा सिनेमा होता का? त्यावर ते म्हणाले, "हो, हा फूट पाडणारा सिनेमा आहे."

ते म्हणाले, "माझं मत आहे की, या चित्रपटाने विभाजनाचा फायदा घेतला आहे, पण मला वाटतं की, याचा उद्देश शौर्य दाखवणं हा आहे. मी दिग्दर्शकाला विचारलं की, या चित्रपटासाठी तुम्हाला माझी गरज का आहे? ते म्हणाले, यासाठी आम्हाला फक्त तुम्हीच हवे आहात."

रहमान म्हणाले, "मला वाटतं यात बरंच काही आहे आणि शेवटही पाहण्यासारखा आहे. पण नक्कीच मला वाटतं की लोक खूप जास्त समजूतदार आहेत. तुम्हाला वाटतं का, की लोक चित्रपटांमुळे प्रभावित होतील? लोकांमध्ये एक विवेक असतो, त्याला सत्य काय आणि फसवणूक काय हे माहीत असतं."

'रामायण'साठी संगीत देण्यात धार्मिक श्रद्धा अडथळा ठरली का?

दिग्दर्शक नितेश तिवारी यांचा रामायण हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाला ए.आर. रहमान यांनी संगीत दिलं आहे.

या चित्रपटाला संगीत देताना कधी तुमच्या धार्मिक श्रद्धेबाबत प्रश्न उभा राहिला का?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला.

या प्रश्नावर ते म्हणाले, "मी 'ब्राह्मण शाळेत' शिकलो आहे. तिथे दरवर्षी रामायण आणि महाभारत होत असत. त्यामुळे मला कथांचा आणि पात्रांच्या गुणांचा अभ्यास होता. मी प्रत्येक चांगल्या गोष्टीला महत्त्व देतो."

"ज्ञान म्हणजे जे आपण दररोज, कुठेही शिकू शकतो. आपण संकुचित वृत्ती आणि स्वार्थाच्या पुढे गेलं पाहिजे."

'क्रिएटिव्ह नाहीत, त्यांच्याकडे सत्ता आहे'

अनेक चित्रपट निर्माते आणि कलाकारांनी दावा केला आहे की, बॉलिवूडमध्ये तमिळ समुदायासोबत भेदभाव पाहायला मिळाले. पण 1990च्या दशकात ही स्थिती कशी होती?

या प्रश्नावर रहमान म्हणाले, "मला हे सगळं कळलंच नाही, किंवा कदाचित माझ्यापासून ते लपवलं गेलं असावं. मला असं कधी जाणवलं नाही."

ते म्हणाले, "गेल्या 8 वर्षांत कदाचित सत्ता बदलली आहे आणि जे क्रिएटिव्ह नाहीत, ते निर्णय घेत आहेत. कदाचित काही सांप्रदायिक गोष्टीही असतील, पण मला थेट कोणी काही सांगितलेलं नाही."

"काही गोष्टी कानांपर्यंत पोहोचल्या, जसं की तुम्हाला बूक केलं होतं, पण दुसऱ्या संगीत कंपनीने चित्रपटाला फंडिंग केलं आणि त्यांनी आपला संगीतकार आणला. मी म्हणालो ठीक आहे, मी विश्रांती घेईन, कुटुंबासोबत वेळ घालवेल."

"मी कामाच्या शोधात नाही. मला वाटतं की, काम माझ्याकडे यावं, मेहनत आणि प्रामाणिकपणाने मला गोष्टी मिळाव्यात. गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करणे अपशकुन आहे. जे माझं आहे, ते देव मला देईल."

पुढील योजना काय?

रहमान यांनी या मुलाखतीत त्यांच्या भविष्यातील योजनांबद्दलही सांगितलं. ते म्हणाले की, ते आपला आवाका वाढवण्यासाठी पाश्चात्य देशांतील कलाकारांसोबत सहकार्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.

ते म्हणाले, "मी व्हर्चुअल (आभासी) मेटा बँड सिक्रेट माउंटन तयार केला आहे. यात विविधता आहे. त्यात अमेरिकन, आयरिश, आफ्रिकन, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन आणि चिनी कॅरेक्टर आहेत. संपूर्ण जगाला एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे."

"पण गोष्ट अशी आहे की, जर मी भारतीय संगीत केलं नसतं, तर काय केलं असतं? माझं संगीत पूर्णपणे भारतीय नाही. ज्या पद्धतीने मी संगीत तयार करतो, ते पूर्णपणे भारतीय नाही."

रहमान यांनी हॉलिवूडमध्ये भारतीय संगीताशी संबंधित काम न करण्यामागचं कारणही सांगितलं. ते म्हणाले, "हॉलिवूडमध्ये भारतीय गोष्टींबाबत जे काही होतं, त्याला माझं प्राधान्य नाही.

कारण भारतीय संगीत तर मी करतच आहे. मी अधिक सखोल काम करू इच्छितो. बँडही याबाबत खूप उत्साही आहे, कारण आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि आमच्याकडे तक्रार करण्यासारखं काहीही नाही."

वेस्टर्न (पाश्चिमात्य) कलाकारांबरोबरच्या सहकार्याबद्दल ते म्हणाले, "वेस्टर्न कलाकारांनी भारतीय कलाकारांसोबत काम करणं ही खूप चांगली गोष्ट आहे. नव्या पिढीची खास बाब म्हणजे आमच्यासारखा त्यांच्यावर कोणताही दबाव नाही. ते कुणाचीही फारशी पर्वा करत नाहीत."

अलका याग्निकसोबत 'तुम साथ हो' आणि सुखविंदर सिंहसोबत 'रमता जोगी' या गाण्यांच्या कोलॅब्रेशनला (सहकार्य) ते आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम अनुभवांपैकी एक मानतात.

आशा भोसले यांच्यासोबत 'तन्हा-तन्हा यहाँ पे जीना' या गाण्याच्या कोलॅब्रेशनलाही ते अत्यंत उत्कृष्ट अनुभव असल्याचं सांगतात.

ते म्हणाले, "आशा भोसले या दिग्गज गायिका आहेत. त्यांनी वयाची नव्वदी ओलांडली आहे, तरीही त्या आज गात आहेत. अशा लिव्हिंग लिजेंडचं आपण सेलिब्रेशन का करू नये?

मी त्यांच्याकडे गेलो आणि म्हणालो की मला तुमच्यासोबत अजून एक गाणं करायचं आहे. त्यांनी लगेच 'का नाही?' असं म्हटलं. आम्ही ते गाणं तयार केलं असून ते या वर्षी येणार आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)