ए. आर. रहमान: 'मला बॉलीवुडमध्ये काम मिळू नये म्हणू काही लोक प्रयत्न करत आहेत'

आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीतकार आणि ऑस्कर विजेते ए. आर. रहमान यांनी बॉलिवूडमध्ये गटबाजी असल्याचा आरोप केल्यानंतर आता याचविषयी एक ट्विट केले आहे. रेहमान यांच्या ट्विटनंतर बॉलिवूड सिनेसृष्टीवर होणाऱ्या आरोपांची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झालीय.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूड सिनेसृष्टीत घराणेशाही, गटबाजी असल्याचा आरोप केला जातोय. कंगना रनौत, प्रकाश राज, विवेक ओबेरॉय, शेखर कपूर, ऊर्मिला मांतोडकर अशा अनेक कलाकारांनीही बॉलिवूडच्या घराणेशाहीवर भाष्य केले.

जगभरात आपल्या संगीताने चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या ए. आर. रेहमान यांच्यासारख्या संगीतकाराने बॉलिवूडमध्ये गटबाजी असल्याचा आरोप केल्याने या वादाकडे आता आणखी गांभीर्याने पाहिलं जातंय.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा दिल बेचारा हा सिनेमा नुकताच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालाय. या सिनेमाला ए. आर. रहमान यांनी संगीत दिलंय.

रहमान यांनी नेमके काय ट्विट केले?

बॉलिवूडमधल्या एका टोळीने माझ्याविरोधात गैरसमज पसरवल्याचा आरोप रहमान यांनी मुलाखतीत केला आहे. त्यामुळे चांगले सिनेमे आपल्याला मिळाले नसल्याचंही ते म्हणालेत.

शेखर कपूर यांनी या मुलाखतीबाबत ट्विट केले आहे. ए. आर. रहमान तुमच्याकडे बॉलिवूडच्या तुलनेत तुम्ही जास्त टॅलेंटेड आहात. तुम्ही ऑस्कर विजेते आहात हे बॉलिवूडला पचवता येत नाही. तुमची प्रतिभा बॉलीवुडला झेपण्यासारखी नाही असं देखील शेखर कपूर म्हणाले.

या ट्विटला रिट्विट करत ए. आर. रहमान यांनी म्हटलं, 'गेलेला पैसा परत मिळू शकतो. गेलेली प्रसिद्धी परत मिळू शकते. पण वाया गेलेली ऐन मोक्याची वेळ पुन्हा मिळत नाही. आपण आता पुढे जाऊया. आपल्याकडे करण्यासारखे बरेच काही आहे.'

मुलाखतीमध्ये रहमान काय म्हणाले होते?

एका रेडिओ चॅनेलला ए. आर. रहमान यांनी नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ए. आर. रहमान यांना बॉलिवूडवर होणाऱ्या आरोपाविषयी विचारले असते त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला.

रहमान यांनी सांगितले, "बॉलिवूडमध्ये एक टोळी माझ्या विरोधात अफवा पसरवत आहे. मी चांगले सिनेमे कधीही नाकारले नाहीत. जेव्हा मुकेश छाब्रा माझ्याकडे आले तेव्हा मी त्यांना दोन दिवसात गाणी तयार करुन दिली."

मुकेश छाब्रा हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर आहेत. सुशांतचा शेवटचा सिनेमा 'दिल बेचारा' याचे दिग्दर्शन छाब्रा यांनी केले आहे. या चित्रपटाला ए. आर. रहमान यांनी संगीत दिलं आहे.

"मुकेश छाब्रा यांनी मला सांगितले की त्यांना माझ्याकडे येऊ नका असं काही लोकांनी सांगितलं होतं. तेव्हा माझ्या लक्षात आले की मला चांगले सिनेमे का मिळत नाहीयेत," असंही रेहमान म्हणाले.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)