You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बीबीसीची भारतीय भाषांमध्ये मोठी झेप, दर आठवड्याला येतात 6 कोटी वाचक
ताज्या आकडेवारीनुसार बीबीसी न्यूजच्या भारतातील वाचकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. बीबीसी न्यूजच्या भारतीय भाषांची (मराठी, हिंदी, तामिळ, तेलुगू, गुजराती आणि पंजाबी) वाचक/प्रेक्षकसंख्या आता आठवड्याला 6 कोटी इतकी झाली आहे.
बीबीसी मराठीच्या वाचक आणि प्रेक्षकांची संख्या दर आठवड्याला आता 40 लाख झाली आहे. गेल्या एक वर्षात बीबीसी मराठीच्या वाचक आणि प्रेक्षकांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे.
डिजीटल माध्यमांमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत बीबीसीने 186 टक्क्यांनी वाढत मोठी झेप घेतलीये. बीबीसीच्या सगळ्या भाषा भारतात जवळपास 47 कोटी वाचकांपर्यंत पोहचतात. हा आकडा गेल्या वर्षाच्या तुलनेत 11 टक्क्यांनी वाढला आहे. म्हणजेच बीबीसी न्यूजचे सर्वाधिक ग्लोबल वाचक भारतात आहेत.
बीबीसी हिंदी भारतात वेगाने वाढणारी बीबीसीची सेवा आहे. बीबीसी हिंदीचे वाचक/प्रेक्षक गेल्या वर्षाच्या तुलनेत 175 टक्क्यांनी वाढलेत. बीबीसी हिंदी ऑनलाईन माध्यमातून दर आठवड्याला 1 कोटी 33 लाख वाचकांपर्यंत पोहचतं.
बीबीसीच्या भारतीय भाषांच्या प्रमुख रूपा झा याबद्दल बोलताना म्हणाल्या, "बीबीसीची भारतातली वाढ आणि आमच्या बातम्यांचा वाढता सकारात्मक प्रभाव पाहून मला खूप आनंद होतोय. भारतीय माध्यमक्षेत्रात सध्या खूप गोंगाट आणि गोंधळ आहे. त्यापार्श्वभूमीवर बीबीसीला वाचकांनी विश्वासाचं माध्यम म्हणून आपलंस केलंय. बीबीसीच्या भारतीय भाषांनी सलग दुसऱ्या वर्षी त्यांची आगेकुच चालू ठेवलेली आहे. सध्याच्या फेक न्यूज आणि चुकीच्या माहितीच्या जमान्यात वाचकांनी बीबीसीला सगळ्यांत विश्वासू आणि निष्पक्ष माध्यम म्हणून आपलंस केलंय हा आनंद अवर्णनीय आहे."
बीबीसी न्यूजच्या इंग्लिश चॅनेलच्या भारतीय प्रेक्षकांमध्येही वाढ झालेली आहे. आता जवळपास 1 कोटी भारतीय प्रेक्षक हे चॅनेल दर आठवड्याला पाहातात.
याविषयी बोलताना बीबीसीचे महासंचालक टोनी हॉल म्हणाले की, "येत्या दशकात यूके जगासोबत एक नवं नातं प्रस्थापित करेल ज्याचा पाया ग्लोबल ब्रिटन हे महत्त्वकांक्षी व्हीजन असेल. यात यश मिळवायचं असेल तर यूकेच्या सगळ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्थांना झटून काम करावं लागेल. याचाच अर्थ बीबीसी जागतिक पातळीवर जे करू शकतं, ते सगळं करण्याची तयारी आणि व्यवस्था ठेवावी लागेल. बीबीसी ब्रिटनचा सगळ्यात मजबूत, सर्वपरिचयाचा आणि विश्वासू ब्रँड आहे."
मार्च अखेरीस जेव्हा कोव्हिड-19 ची साथ सर्वदूर पसरली तेव्हा विश्वासू माहितीच्या स्रोतांची मागणी अधिकच वाढली. बीबीसी न्यूज या काळात कोणत्याही आंतरराष्ट्रीय माध्यमापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहचलं. या काळात आपल्या 42 भाषांव्दारे बीबीसी जवळपास 31 कोटी वाचक/प्रेक्षकांपर्यंत पोहचलं.
बीबीसीचं कंटेट सोशल मीडियावरही लोकप्रिय आहे. युट्यूबवर बीबीसीचे 4.7 कोटी प्रेक्षक आहेत, फेसबुकवर 4.3 कोटी वाचक/प्रेक्षक आहेत, ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर प्रत्येकी 60 लाख लोकांपर्यंत बीबीसी पोहोचतं.
बीबीसीचे सर्वाधिक वाचक/प्रेक्षक असलेले देश
भारत - 60,400,000
अमेरिका - 49,500,000
नायजेरिया - 37,200,000
केनिया - 14,000,000
बांगलादेश -11,900,000
अफगाणिस्तान - 11,400,000
इराण - 11,300,000
कॅनडा - 9,700,000
पाकिस्तान - 9,700,00
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)