घनदाट जंगलातील डोंगरावर 25 वर्षांपासून एकटं राहणारं कुटुंब, त्यांना शहरात आणण्याचे सर्व प्रयत्न अपयशी

    • Author, गरिकिपाटि उमाकांत
    • Role, बीबीसीसाठी

तेलंगणातील भद्राद्री कोतागुडेम जिल्ह्यातील अश्वरावुपेटा सर्कलमध्ये एका उंच डोंगरावरील घनदाट जंगलात, गेल्या 25 वर्षांपासून एक आदिवासी कुटुंब एकटंच राहतं आहे.

या कुटुंबात फक्त तीन सदस्य आहेत. एक दाम्पत्य आणि त्यांचा मुलगा.

डोंगरावर असलेल्या या जंगलातून जवळपास 3 किलोमीटर पायी चालल्यानंतरच तिथे मानवी वास्तव्यांची चिन्हं दिसतात.

आजच्या काळात फोन आणि वीज यासारख्या सुविधा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. मात्र, अशा सुविधा इथे नाहीत. मात्र असं असूनही हे कुटुंब इथे राहतं आहे.

शेवटी हे तिघेजण तिथेच का राहत आहेत? त्यांचं दैनंदिन आयुष्य कसं आहे? आणि 25 वर्षांपासून जंगलातच राहणाऱ्या या कुटुंबाबद्दल अधिकारी काय म्हणतात?

तेलंगणामधील अश्वरावुपेटा सर्कल आणि आंध्र प्रदेशमधील बुट्टायगुडेम सर्कलच्या सीमेवर आदिवासींची पूजनीय देवी गुब्बाला मंगम्माचं मंदिर आहे.

या मंदिराच्या पुढे असलेले डोंगर आणि घनदाट जंगलांचा संपूर्ण परिसर तेलंगणाच्या कंथलम वनक्षेत्रात येतो.

गुब्बाला मंगम्मा मंदिरात संध्याकाळी 6 वाजेनंतर लोकांची वर्दळ थांबते.

मंदिरापासून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर वरच्या बाजूला डोंगरावर घनदाट जंगलात आधी 40 आदिवासी कुटुंबं राहायचे. या गावाला गोगुलापुडी म्हटलं जायचं.

1990 पासूनच अधिकारी या कुटुंबांना तिथून हटवण्यासाठी प्रयत्न करत होते. असं करण्यामागचा त्यांचा युक्तिवाद होता की, इथे पायाभूत सुविधा पुरवल्या जाऊ शकत नाहीत.

अर्थात, सुरुवातीला तिथल्या लोकांनी डोंगरावरून खाली येण्यास आणि जंगलाबाहेर येणाऱ्या नकार दिला होता. मात्र, खाली येण्यासाठी त्यांचं मन वळवण्यासाठी आयटीडीएच्या अधिकाऱ्यांनी वारंवार प्रयत्न केले होते.

अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की, या लोकांनी किमान त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खाली आलं पाहिजे. त्यांचं म्हणणं होतं की, जंगलात वीज, पिण्याचं स्वच्छ पाणी आणि मुलांसाठी शिक्षण यासारख्या पायाभूत सुविधा पुरवल्या जाऊ शकत नाहीत.

हे कुटुंब 2000 मध्ये कवादिगुंडला पंचायत क्षेत्रातील कोथकन्नई गुडेम परिसरात डोंगराच्या पायथ्याशी बांधण्यात आलेल्या पुनर्वसन वसाहतीत राहायला आले.

डोंगराच्या पायथ्याशी वसवण्यात आलेल्या या वस्तीचं नाव गोगुलापुडी असं ठेवण्यात आलं. हे आदिवासी लोक डोंगरावरील जंगलात राहत असलेल्या जागेचं जे नाव होतं, तेच नाव या वस्तीला देण्यात आलं.

त्या 40 कुटुंबांपैकी 39 कुटुंब डोंगरावरून खाली आली. मात्र गुरुगुंटला रेड्डैया यांनी खाली येण्यास नकार दिला. त्यांची पत्नी लक्ष्मी आणि मुलगा गंगिरेड्डी त्यांच्याबरोबर वरच राहत आहेत.

25 वर्षांपासून जंगलात एकटं राहणारं कुटुंब

अधिकाऱ्यांना वाटत होतं की, काळ जाईल तसं रेड्डैया यांचं मत बदलेल.

त्यांना वाटत होतं की, ते (रेड्डैया) त्यांच्या नातेवाईकांना आणि शेजाऱ्यांना मिळत असलेल्या सुविधा पाहून आणि त्यांचा विकास पाहून खाली राहण्यास येतील. मात्र वर्षांमागून वर्षे गेली, अजूनही ते डोंगरावरच राहत आहेत.

रेड्डैया यांच्या पत्नी लक्ष्मी म्हणतात की, त्यांचे पती जिथे राहतील, तिथेच त्यादेखील राहतील. त्यांचा मुलगा गंगिरेड्डी यांचं म्हणणं आहे की, ते त्यांच्या आई-वडिलांसोबतच राहतील.

या कुटुंबाशी बोलण्यासाठी बीबीसीची टीम डोंगरावर गेली. तिथे त्यांनी रेड्डैया यांची पत्नी लक्ष्मी आणि त्यांचा मुलगा गंगिरेड्डी यांच्याशी संवाद साधला.

आम्ही जेव्हा त्यांच्याकडून हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, विजेशिवाय जंगलात ते कसं जगतात. त्यावर लक्ष्मी म्हणाल्या, "दिवसा सूर्य असतो. तर रात्री चंद्र आणि चांदण्या. हिवाळ्यात अंधार पडला की, आम्ही शेकोटी पेटवतो. इथे सर्व प्रकारचं वाळलेलं गवत उपलब्ध आहे."

त्या म्हणाल्या, "मला दिवसा आणि रात्री, वेळेचा अंदाज तर येतो. मात्र मला हे माहीत नाही की, आज कोणता दिवस आहे. मी तुम्हाला हेदेखील सांगू शकत नाही की आता किती वाजले आहेत."

बीबीसीच्या टीमनं त्यांना विचारलं की, या घनदाट जंगलात त्यांना भीती वाटत नाही का?

यावर लक्ष्मी आणि गंगिरेड्डी म्हणाले, "कसलीही भीती नाही. कसलीही चिंता नाही. आम्ही शेकोटी पेटवतो. ती सकाळपर्यंत जळत राहते. कोणताही प्राणी काहीही करत नाही. ते इथेच राहतात. आम्हीदेखील इथेच राहू. सापदेखील काही करत नाहीत. आम्हाला या सर्व गोष्टींची सवय आहे."

त्यांनी सांगितलं की, ते इथे तांदूळ, ज्वारी आणि बाजरीबरोबरच भाजीपाला देखील पिकवतात.

लक्ष्मी म्हणाल्या, "आम्ही फक्त खाण्यासाठी धान्याची लागवड करतो. आम्ही आमच्या गरजेनुरुप लागवड करतो. आम्हाला जवळच्या नदीतून पाणी उपलब्ध होतं. त्यात उन्हाळ्यातदेखील पाणी असतं आणि पावसाळ्यात तर ती पाण्यानं काठोकाठ भरलेली असते."

'आजारांबद्दल माहीत नाही'

लक्ष्मी म्हणाल्या की, त्यांना एकूण 9 मुलं झाली होती. त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला. आता फक्त 2 जण जिवंत आहेत. त्या म्हणाल्या की, त्या दोघांपैकी एक मुलगा आहे आणि एक मुलगी.

त्यांनी सांगितलं की, त्यांनी मुलीचं लग्न केलं आहे आणि ती डोंगराच्या पायथ्याशी राहते.

तर, आजारी पडल्यावर काय करता, असं विचारल्यावर गंगिरेड्डी म्हणाले, "आम्हाला ताप-आजार काहीही माहीत नाही. जर शरीर बरं नाही असं वाटलं, तर आम्ही देशी औषधं घेतो."

जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, ही औषधं कुठून मिळतात. त्यावर गंगिरेड्डी म्हणाले, "झाडांपासूनच मिळतात. फळं आणि पानं तोडून खातो, काहीही होत नाही."

अर्थात लक्ष्मी म्हणतात की, अलीकडे त्यांना नीट दिसत नाही. त्या काठीच्या साहाय्यानं चालतात.

त्या म्हणतात, "अर्थात, हा काही मुद्दा नाही."

कुटुंबाकडे आहेत 5 झोपड्या

या कुटुंबाकडे या जंगलात 5 झोपड्या आहेत.

लक्ष्मी म्हणाल्या की, तीन जणांना राहण्यासाठी स्वतंत्र प्रत्येकी एक-एक झोपडी आहे. याशिवाय कोंबड्या आणि कुत्र्यांसाठी एक झोपडी आहे. तर लाकडं-सरपणाचा पावसापासून बचाव करण्यासाठी एक स्वतंत्र झोपडी बनवली आहे.

अशाप्रकारे एकूण 5 झोपड्या बनवल्या आहेत.

त्यांना विचारण्यात आलं की, पाऊस पडल्यावर घरात पाणी गळत नाही का. त्यावर गंगिरेड्डी म्हणाले, "नाही. झोपडीवर हे बॅनर टाकतो."

ते म्हणाले की, मंदिराच्या जवळ सणाच्या वेळी लावले जाणारे फ्लेक्स बॅनर आणून ते झोपडीवर टाकतात.

लक्ष्मी म्हणतात, "गंगिरेड्डी शिकलेला नाही. त्याचं लग्नदेखील झालेलं नाही. आम्ही डोंगराच्या खाली राहायला गेलो नाही. त्यामुळे त्याचं शिक्षण झालेलं नाही. त्याला लग्नदेखील करायचं नाही. तो आमच्यासोबतच राहतो."

यासंदर्भात गंगिरेड्डी म्हणाले, "जर मुलगी डोंगरावर राहण्यास आली तर लग्न करेन. मी डोंगराच्या खाली उतरणार नाही."

'कधीही मंदिराच्या पुढे गेले नाहीत'

डोंगराच्या खालच्या भागातील वनक्षेत्रात असलेल्या गुब्बाला मंगम्मा मंदिरापर्यंत रेड्डैया आणि त्यांचा मुलगा गंगिरेड्डी येत-जात असतात.

गंगिरेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं की, ते त्यांच्या आयुष्यात त्या मंदिराच्या पुढे कधीही गेलेले नाहीत.

ते म्हणाले, "मंदिरापर्यंतच जातो, त्याच्या पुढे खाली उतरत नाहीत. कोणत्याही कामासाठी आम्ही खाली उतरत नाही."

कावडिगुंडला ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या आदिवासी पुनर्वसन वसाहतीचे पंचायत सचिव मोतीलाल यांनी बीबीसीला सांगितलं की, सरकारनं त्यांना आधार कार्ड आणि रेशन कार्ड देण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनी ते घेण्यास नकार दिला.

गंगिरेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं, "त्या कार्डांसाठी फोटोची आवश्यकता असते. त्यामुळे आम्हाला डोंगराच्या खाली येण्यास सांगण्यात आलं होतं. आम्ही खाली उतरत नाहीत. आम्हाला ते कार्ड नको आहे. त्यामुळे वडील आणि मी ते घेतलं नाही."

'लक्ष्मी यांच्याकडे आधार आणि रेशन कार्ड'

तर लक्ष्मी सांगतात की, त्या त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी खाली जातात.

त्या म्हणाल्या, "मी डोंगराच्या खाली उतरून मुलीकडे जात असते. मी तर गोगुलपुडी वसाहतीमध्ये जाऊन आमच्या नातेवाईकांनाही भेटते. मी जेव्हा फोटो काढला, तेव्हा त्याच वसाहतीच्या पत्त्यावर मला आधार आणि रेशन कार्ड देण्यात आलं."

"कधी-कधी मी डोंगरावरून खाली उतरून रेशनदेखील घेऊन येते. मात्र माझा मुलगा आणि माझे पती, हे दोघे कुठेही जात नाहीत. ते त्या मंदिराच्या पुढे जात नाहीत. मी मात्र येत-जात असते."

त्यांना विचारण्यात आलं की, डोंगराच्या खाली गुब्बाला मंगम्मा मंदिरापासून 5 किलोमीटर अंतरावर बांधण्यात आलेल्या वसाहतीमध्ये तुमचं कुटुंब का गेलं नाही.

त्यावर लक्ष्मी म्हणाल्या, "माझ्या पतीची तिथे जायची इच्छा नव्हती. मीदेखील त्यांना जाण्यास सांगितलं. मात्र ते तयार होत नाहीत. जर ते तयार झाले असते, तर आम्ही खाली गेलो असतो. आमच्या मुलाचीदेखील इच्छा नाही. त्यामुळे आम्ही इथेच राहत आहोत."

लक्ष्मी यांनी सांगितलं की, त्यांच्या पतीचं म्हणणं आहे की, त्यांचा जन्म याच जंगलात झाला आहे. ते इथेच मरतील, खाली उतरणार नाहीत.

बीबीसीची टीम जेव्हा जंगलातील त्या घराजवळ पोहोचली. तेव्हा रेड्डैया न भेटताच तिथून निघून गेले.

याबद्दल विचारल्यावर लक्ष्मी म्हणाल्या की, आयुष्यात कधीही डोंगराखाली न उतरलेल्या त्यांच्या पतीला आता अशी भीती वाटते आहे की, एखादा अधिकारी येईल आणि त्यांना डोंगराखाली उतरवेल.

लक्ष्मी म्हणतात की, याच भीतीमुळे रेड्डैया दिवसभर घरी येत नाहीत. ते संध्याकाळ झाल्यानंतरच घरी येतात.

गेल्या 25 वर्षांपासून हे कुटुंब जंगलात एकटं राहतं आहे. ही गोष्ट अलीकडेच समोर आली आहे.

त्यानंतर प्रशासनाबरोबरच एक-दोन मीडिया चॅनलदेखील गेल्या काही दिवसांपासून त्या वनक्षेत्रात येऊ लागले आहेत.

लक्ष्मी म्हणतात, "लोक येत आहेत ना. लोकांना पाहून ते घाबरून पळून गेले. आता रात्री परत येतील. त्यांना भीती वाटते की, खाली घेऊन जाऊन त्यांना काही केलं तर... आता जर त्यांनी जंगलात कोणाला पाहिलं तर भीतीपोटी दगड मारतात."

'कमीत कमी टीनचं शेड टाकून द्या'

गोगुलपुडीच्या तरुणांचं म्हणणं आहे की, रेड्डैया यांना जबरदस्तीनं खाली आणल्यावर देखील ते शांततेनं राहू शकणार नाहीत. त्यामुळेच, त्यांच्या घरावरच सौरऊर्जेची व्यवस्था करण्यात यावी आणि घराच्या चारी बाजूंना कुंपण घालण्यात यावं, हेच चांगलं होईल.

गोगुलपुडीचे तरुण मंगिरेड्डी बीबीसीला म्हणाले, "आम्ही वाडवडिलांच्या काळापासूनच या जंगलात राहत आलो आहोत. 2000 मध्ये आयटीडीएचे लोक आम्हाला खाली घेऊन गेले होते."

"रेड्डैया यांना कितीही समजवा, आता जर त्यांना जबरदस्तीनं खाली नेण्यात आलं, तरीदेखील ते तिथे शांततेनं राहू शकणार नाहीत. सरकारनं जर इथेच त्यांना काही सुविधा पुरवली, सौर्जऊर्जा बसवून दिली आणि झोपडीच्या सर्व बाजूंनी कुंपण घालून दिलं, तर त्यामुळे सुरक्षा मिळेल."

गोगुलपुडीचे रहिवासी गुरुगुंटला बाबूरेड्डी यांचं म्हणणं आहे की, ते जेव्हा 7 वर्षांचे होते, तेव्हा या जंगलातून खाली उतरले, शिक्षण घेतलं आणि पदवी मिळवली. त्यांचं म्हणणं आहे की, रेड्डैया यांचं कुटुंबदेखील जर खाली आलं, तर चांगलं होईल.

गोगुलपुडी हॅबिटेशनअंतर्गत येणाऱ्या कावडिगुंडला ग्रामपंचायतीचे सरपंच लक्ष्मणराव आणि सचिव मोतीलाल यांनी बीबीसीला सांगितलं की, ते रेड्डैया यांच्या कुटुंबाला खाली आणण्यासाठी त्यांच्या परीनं प्रयत्न करत आहेत.

ते म्हणाले, "आम्ही त्यांना सर्वप्रकारची सुविधा पुरवण्यास तयार आहोत. मात्र ते ती घेण्याच्या स्थितीत नाहीत. विशेषकरून रेड्डैया आणि त्यांचा मुलगा लोकांमध्ये येण्यास कचरतात. आम्ही जेव्हा येतो, तेव्हा ते जंगलात निघून जातात आणि लपून राहतात. तरीदेखील आम्ही आमचे प्रयत्न सुरू ठेवू."

'त्यांना जंगलात राहण्याचा अधिकार आहे'

अधिकारी सांगतात की, त्यांना या गोष्टीची माहिती आहे की, कोंडारेड्डी या आदिवासी जमातीशी संबंधित रेड्डैया यांचं कुटुंब जंगलात एकटं राहतं.

भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्याच्या वन विभागाचे अधिकारी किष्टा गौड बीबीसीला म्हणाले, "त्यांच्या इच्छेशिवाय त्यांना जंगलातून खाली आणलं जाऊ शकत नाही."

ते असंही म्हणाले की, तिथे किमान सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आयटीडीएची आहे.

या मुद्द्याबाबत बोलण्यासाठी बीबीसीनं आयटीडीएचे (इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट एजन्सी) पीओ (प्रोजेक्ट ऑफिसर) राहुल यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

पूर्वी या परिसरातील पुनर्वसन कामांमध्ये भाग घेतलेल्या आणि सध्या आयटीडीए भद्राचलममध्ये ट्रायबल म्युझियमचे इंचार्ज वीरास्वामी बीबीसीशी बोलले

वीरास्वामी म्हणाले, "आमच्या जिल्ह्यातील जंगलांमध्ये काही ठिकाणी विखुरलेली घरं नक्की आहेत. मात्र तिथे लोक नजरेच्या टप्प्यात दिसतात. सर्वसाधारणपणे किमान 15-20 कुटुंब एकत्र राहतात."

"मात्र इथे फक्त रेड्डैया यांचं कुटुंब एकटं राहतं. आम्ही अनेकवेळा प्रयत्न केले. मात्र त्यात यश आलं नाही. तसंही त्यांना जबरदस्तीनं खाली आणू शकत नाही. तिथे टीनचं शेड टाकून देणं शक्य आहे का, हे मात्र नक्कीच पाहावं लागेल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)