ठाकरेंच्या ऐतिहासिक एकजुटीनंतरही मुंबई महापालिकेमध्ये सत्ता का नाही आली?

महाराष्ट्रातील महापालिकांच्या निवडणुकीच्या निकालामध्ये फक्त राज्याचंच नव्हे, तर संपूर्ण देशाचं सर्वाधिक लक्ष मुंबई महापालिकेवर होतं.

गेल्या 25 वर्षांपासून 'शिवसेने'च्या हातात असलेली मुंबई महापालिका पुन्हा ठाकरेंच्या हातात जाणार की प्रतिष्ठेची लढाई ठरलेली ही महापालिका भाजप आपल्याकडे खेचून घेणार, असा हा अटीतटीचा सामना होता.

अगदी गेल्या वर्षभरापासूनच या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं होतं. मग ते शालेय शिक्षणातील हिंदी सक्तीला विरोध असो, मराठी भाषेचा मुद्दा असो वा त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी टप्प्याटप्प्याने मनोमिलन करणं असो.

'शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची?' या प्रश्नाचंही पुन्हा नव्याने उत्तर शोधणारी ही निवडणूक ठरणार होती.

पण, ठाकरेंच्या ऐतिहासिक एकजुटीनंतरही बीएमसीमध्ये सत्ता का नाही आली? हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.

ही मुंबई कोणाची?

मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी ही निवडणूक पार पडली.

एकीकडे, गेल्या 25 वर्षांपासून 'ठाकरेंच्या ताब्यात असलेली मुंबई मराठी माणसाचीच राहिल,' हे भाषिक नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न ठाकरे बंधूंच्या युतीनं केला, तर दुसऱ्या बाजूला मुंबईचा महापौर 'हा मुस्लीम होणार नाही,' या धार्मिक नरेटीव्हवर भाजप-शिंदेसेनेची युती प्रचार करताना दिसली.

मात्र, मुंबईत भाजपा-शिंदे सेना युतीने मोठी आघाडी घेतली असून ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे,

  • पक्ष – विजयी उमेदवारांची संख्या
  • भाजप – 89
  • शिवसेना (शिंदे गट) – 29
  • शिवसेना (उबाठा) – 65
  • मनसे – 6
  • काँग्रेस – 24
  • राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) -1
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 3
  • एएमआयएम – 8
  • समाजवादी पक्ष – 2

एकूण - 227

'ठाकरेंनी अपेक्षेपेक्षा जास्त कडवी लढत दिली'

मुंबई महापालिकेची ही निवडणूक भाषिक विरुद्ध धार्मिक अशा मुद्द्यांभोवती फिरत राहिली.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तेही शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला विरोध करण्याच्या पार्श्वभूमीवर. त्यांनी युती जाहीर करताना मुंबईचा महापौर हा मराठी असेल असं जाहीर करून हा वाद भाषिक प्रश्नाकडे नेला.

भाषिक मैदानावरून ही निवडणूक धार्मिक आणि विकास या मुद्द्यांवर आणण्याचा पुरेपूर प्रयत्न भाजपने केला.

भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं 'मुंबईच्या महापौरपदी कोणी 'खान' बसणार नाही' अशा आशयाचं वक्तव्य या प्रयत्नांची नांदी म्हणता येईल.

या साऱ्या निकालाबाबत विश्लेषण करताना हेमंत देसाई सांगतात, "भारतीय जनता पक्षाचं यश मोठं आहे, यात शंका नाही. पण उद्धव ठाकरेंची शिवसेना संपेलच, हा जो दावा महायुतीकडून करण्यात येत होता, तसंही घडलेलं नाही. याचा अर्थ 'ठाकरे ब्रँड'ला ते धक्का लावू शकलेले नाहीत."

ठाकरेंसाठी ही अटीतटीची अथवा अस्तित्वाचीच लढाई आहे, असाच सूर दिसत होता. अर्थात, ही गोष्ट अनेक अर्थांनी खरीही होती.

मराठीबहुल भागात ठाकरेंचं वर्चस्व

2017 च्या महापालिका निवडणुकीनंतर एकूणच राज्याच्या राजकारणात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. नुसतं वाहून गेलं नाहीये, तर पाण्याचे प्रवाहचं दुभंगलेत, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

शिवसेनेचे दोन भाग होणं आणि मुंबईतील बरेचसे नगरसेवक एकनाथ शिंदेंकडे जाणं, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही अस्तित्वाचीच लढाई होती.

हेमंत देसाई सांगतात, "मराठीचा, बाळासाहेब ठाकरेंचा वा अस्मितेचा जो ब्रँड आहे, तो शिंदेसेनेकडे लोक ट्रान्सफर करायला तयार नाहीयेत. तो ठाकरेंकडेच आहे, हे यातून अधोरेखित झालंय."

पण या निवडणुकीमध्ये मराठी अस्मितेबाबतच्या भावनेचा वापर ठाकरे बंधूंनी कसा केला, याबाबत राजेंद्र साठे सांगतात, "ठाकरे बंधू एकत्र आल्यावर काहीतरी मोठं घडेल, अशी अपेक्षा निर्माण झाली, पण मर्यादीत कालावधीत फार काही वेगळं आणि चमत्कारीक घडत नसतं. कारण, भाजपने गेल्या काही काळामध्ये ठाकरेसेना इतक्या प्रमाणात दुर्बळ केलेली आहे की, खाली संघटनाच उरलेली नाहीये."

"त्यामुळे, ठाकरेंना भावनेच्या जोरावर निवडणूक लढवणंच आवश्यक होतं. ते त्यांनी केलं. मर्यादीत काळात त्यांना जेवढं शक्य होतं, तेवढं त्यांनी केलं."

पुढे ते सांगतात, "त्यांनी मराठी अस्मितेच्या भावनेचा योग्य वापर केला, असं म्हणता येईल. कारण, यापेक्षा खूप कमी यश त्यांना मिळालं असतं, त्यामुळे सध्या मिळालेलं यश काही कमी नाहीये. मराठी माणूस पिचला जातोय आणि भाजपकडून त्याला बळ दिलं जातंय, अशी भावना निर्माण करण्यात त्यांना निर्वावादपणे यश आलंय."

मुंबईतील मराठीबहुल भागातील मतदान ठाकरे बंधूंच्या बाजूनेच झालंय, हे आकडेवारीवरून दिसतंय, असं बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे सांगतात.

पुढे ते सांगतात, "पण, ठाकरे बंधू एकत्र येऊनही ते सत्ता आणू शकलेले नाहीत. पण त्यांची कामगिरी तुलनेने बरी आहे. त्यामुळे, त्यांच्यासाठी आता पुढची आव्हानं ही जास्त असतील."

ठाकरे बंधूंचं इमोशनल अपील कमी पडलं का?

ठाकरे बंधूंनी मराठी भाषेच्या मुद्द्यावरून भाषिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला. सोबतीला 'ठाकरे ब्रँड' टिकवण्याचा मुद्दाही टेकू म्हणून होता.

पण, हे इमोशनल अपील महापालिकेवर निर्वावद सत्ता आणण्यासाठी पुरेसं ठरलेलं दिसत नाहीये.

दोन्ही ठाकरे बंधूंच्या कामगिरीचं विश्लेषण करताना अभय देशपांडे सांगतात, "उद्धव ठाकरेंनी कडवी लढत दिली आहे. पण मनसेचा परफॉर्मन्स त्या तुलनेत राहिलेला नाहीये. उद्धव ठाकरेंना मराठी मतांना एकत्र करत अतिरिक्त मतं मिळवणं शक्य झालं. पण ते राज ठाकरेंना जमलेलं नाहीये, त्यामुळे, त्यांचे आकडे कमी दिसत आहेत."

पुढे ते सांगतात, "मुंबई जिंकण्यासाठी केवळ मराठी मते पुरेसी नाहीत, हेही यातून अधोरेखित होताना दिसतंय. कारण, यावेळेस ठाकरे बंधू एकत्र असतानाही शिंदेंबरोबर काही नगरसेवकही गेले आणि त्यामुळे मतदारही थोडे शिफ्ट झाले. त्याचा फायदा त्यांनाही झाला आणि भाजपलाही झाला."

"शिंदे गटाने तशा कमी म्हणजेच 90 जागा लढवल्या होत्या. 69 ठिकाणी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशी थेट लढत होती. यातील बहुतांश ठिकाणी मतदार ठाकरेंच्याच बाजूने राहिल्याचं दिसतंय. मागील तीन वर्षांत जे राजकारण झालंय, त्याची सहानुभूती उद्धव ठाकरेंच्या बाजूने होती, त्याचा फायदा त्यांना मिळालेला आहे, असं दिसतंय. ठाकरे हे नाव मुंबईतून अजून पुसलं गेलेलं नाहीये, हेदेखील यानिमित्ताने दिसलं. "

हाच मुद्द्याची एक वेगळी बाजू राजेंद्र साठे मांडतात.

ते सांगतात, "गेल्या 5 वर्षांमध्ये भाजपने मुंबईमध्ये सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेचं खच्चीकरण केलं. एका बाजूला त्यांनी शिंदेसेनेला सोबत घेतलेलं आहे पण ती फार वाढणारही नाही, याचीही काळजी घेतलेली आहे. शिंदेसेनेचे आकडे हे ठाकरेसेनेपेक्षा खूप कमी आहेत."

"भविष्यात जेव्हा गरज नसेल तेव्हा एकनाथ शिंदेंना दूर करता येईल, अशी ही तजवीज भाजपने केलेली आहे," असं ते सांगतात.

'काँग्रेस-वंचित' वेगळं लढण्याचा फटका बसला का?

या निवडणुकीत घडलेली आणखी एक विलक्षण म्हणता येईल अशी गोष्ट म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोन पक्षांची झालेली युती!

याआधी दोन विधानसभांच्या निवडणुकीवेळी फिस्कटलेल्या युतीच्या चर्चा या महापालिका निवडणुकीत मात्र यशस्वी होताना दिसल्या.

मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र लढली आणि त्यांना दलित-मुस्लीम मतांना आपल्यामागे खेचण्यात मर्यादीत का होईना, पण यश मिळालं, असं म्हणता येईल.

याबाबत हेमंत देसाई सांगतात, "गेल्या महापालिका निवडणुकीवेळी काँग्रेसला 31 जागा होत्या आणि आता 15 दिसत आहेत. म्हणजे काँग्रेस कुठेही चर्चेत आणि फारशी मैदानात नसतानाही त्यांना इतक्या जागा मिळणं, हेही काही कमी नाहीये. याचा अर्थ दलित आणि मुस्लिमांमध्ये काँग्रेसला पाठिंबा आहे."

"मुस्लिमांची मते ठाकरेंना मिळाली आहेत. पण ती मनसेकडे गेलेली दिसत नाहीयेत. ही जी न मिळालेली मुस्लीम मते आहेत ती कदाचित काँग्रेस-वंचित युतीकडे गेलेली असावीत," असंही ते नमूद करतात.

भाजपला हे यश का मिळालं?

खरं तर या निवडणुकीचं मैदान ठाकरे बंधूंनीच तयार केलं होतं. मग तो हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करण्याचा असो, ठाकरे ब्रँडचा असो वा मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा असो.

या मैदानावर भाजप-शिंदेसेना युती येऊन खेळताना दिसत होती.

प्रत्युत्तर म्हणून कधी मुंबईचा महापौर 'हिंदू मराठीच होईल' असं म्हणणं असो वा 'महापौर खान होणार नाही,' असं विधान असो, प्रचाराचं मैदान निर्विवादपणे ठाकरे बंधूंनी सेट केलेलं होतं, असं म्हणता येईल.

मात्र, तरीही भाजपला हे यश का मिळालं?

याबाबत राजेंद्र साठे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, "मुंबईच्या निकालाचं विश्लेषण प्रचारातील तत्कालिक मुद्द्यांवर करता येणार नाही. मुंबईच्या निकालाची सुरुवात 5 वर्षांपूर्वी शिवसेना फोडली, तेव्हाच झालेली आहे. मुंबई जिंकण्यासाठी सेना फोडणं आवश्यक होतं. कारण, सेना फोडली नसती आणि ती एकसंध असती, तर काय झालं असतं, हे तुम्हाला या निकालातील आकड्यांवरूनही स्पष्टपणे दिसेल."

"सेना एकसंध असती, तर सेनेनंच मुंबई जिंकली असती. फक्त मुंबईच नव्हे, तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि कदाचित संभाजीनगरही जिंकता आलं असतं," असंही ते नमूद करतात.

जिंकलेल्या उमेदवारांचं ठाकरे बंधूंकडून कौतुक

शिवसेना आण मनसेच्या विजयी नगरसेवकांचे ठाकरे बंधुंनी कौतुक केलं. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हटलं की, "यावेळची निवडणूक ही सोपी नव्हती. अचाट धनशक्ती, सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्ती अशी लढाई होती. पण अशा लढाईत सुद्धा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम झुंज दिली. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे."

मनसेला यावेळेस अपेक्षित यश मिळालं नसलं तरी आपले जे नगसेवक निवडून आलेत ते तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील. आणि मराठी माणसाच्या विरोधात काही होत आहे असं दिसलं तर त्या सत्ताधाऱ्यांना जेरीस आणतील हे नक्की.

आपल्या मराठी माणसाच्या पाठीशी आपल्याला ठाम उभं रहायचं आहे. निवडणुका येतील जातील पण आपला श्वास हा मराठी आहे हे विसरायचं नाही. पुन्हा कामाला लागूया. नव्याने आपला पक्ष आणि संघटना उभारूया, असंही ठाकरे म्हणाले.

दरम्यान, शिवसेना उबाठा गटाचे शिवसेना भवन आणि राज ठाकरे यांचे शिवतीर्थ आणि अनेक घडामोडींचे केंद्रस्थान असलेल्या दादर 192 मुंबई महानगरपालिका प्रभागामध्ये ठाकरे यांचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांनी महायुतीचे उमेदवार प्रीती पटणकर यांचा पराभव करत 1 हजार 425 मतांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे महापालिकेत ठाकरे यांची सत्ता आली नसली तरी यशवंत किल्लेदार यांच्या विजयाची चर्चा आहे.

यशवंत किल्लेदार हे दादर-माहीम परिसरातील मनसेचे विभाग अध्यक्ष असून राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे.

निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी किल्लेदार यांना फोन करून त्यांचे कौतुक केले तर शिवतीर्थच्या अंगणात राज ठाकरे यांच्या उपस्थितीत या विजयाचा जल्लोष करण्यात आला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)