मुंबई महापौर निवडीआधी हालचालींना वेग, शिंदेंच्या नगरसेवकांच्या हॉटेल मुक्कामामुळे चर्चेला उधाण

    • Author, संदीप राय
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाल्यानंतर देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बीएमसीच्या महापौर पदावरून चर्चा रंगली आहे.

या निवडणुकीत महायुतीला निर्णायक यश मिळाल्यानंतर अवघ्या एका दिवसातच महापौर पदावरून भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तणाव निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

बीएमसी निवडणुकांमध्ये भाजप 89 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. त्यांचा मित्रपक्ष शिंदेसेनेला 29 जागा मिळाल्या आहेत.

227 जागांच्या बीएमसीत भाजप-शिंदेसेना युतीला एकूण 118 जागा मिळाल्या आहेत. मात्र, स्पष्ट बहुमत असूनही मुंबईच्या महापौर पदावर सहमती होणे सोपे दिसत नाही.

ठाकरेंची शिवसेना हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्यांना 65 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसचे 24 नगरसेवक निवडून आले आहेत.

शनिवारी (17 जानेवारी) एकनाथ शिंदे यांनी सेनेचे 29 नवनिर्वाचित नगरसेवक मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले.

माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रतिस्पर्धी पक्षांकडून कथित फोडाफोडीच्या प्रयत्नांपासून बचाव म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे पक्षनेत्यांचे म्हणणे आहे.

शनिवारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या मंत्रिमंडळ बैठकीला शिंदे अनुपस्थित राहिल्याने भाजप आणि शिंदेसेनेतील तणाव बघायला मिळाला.

याआधीही शिंदे यांनी अनेक वेळा मंत्रिमंडळ बैठकींना गैरहजर राहत फडणवीस सरकारच्या निर्णयांबाबत अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली आहे.

अडीच दशकांची शिवसेनेची सत्ता संपुष्टात

बीएमसीवर ठाकरे कुटुंबाचा 2 दशकांहून अधिक काळ प्रभाव राहिला होता. मात्र 2017 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आणि ठाकरे कुटुंबाची पकड सैल झाली.

या निवडणुकीत ठाकरेसेना आणि राज ठाकरे यांच्या मनसेमध्ये युती होती. मनसेला 6 जागा मिळाल्या.

शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ठाकरेसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. विधानसभा निवडणुकांमध्ये हे पक्ष एकत्र होते.

भाजप-शिंदेसेना युतीसमोर उभ्या असलेल्या विरोधी पक्षांच्या एकत्रित जागा 106 आहेत. बहुमतापेक्षा ही संख्या पाचने कमी आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांना मोठा फटका बसला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत. असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम पक्षाचे 8 नगरसेवक निवडून आले आहेत.

निकालानंतर ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं, "एकनाथ शिंदे शिवसेनेचा 'जयचंद' झाले नसते, तर मुंबईत भाजपचा महापौर कधीच झाला नसता."

यानंतर पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, "सगळ्यात मोठी लढाई मुंबईत होती. मुंबईत भाजप जिंकली असे मानायचे कारण नाही. लढत चुरशीची होती. मनसेला कमी जागा मिळाल्या. त्यांना साधारण 15 जागा मिळायला हव्या होत्या. आम्ही 10 ते 15 जागा अगदी कमी फरकाने हरलो. मात्र बीएमसीत विरोधकांची ताकद सत्ताधाऱ्यांइतकीच आहे. आमचे 105 नगरसेवक आहेत. ते मुंबई विकू देणार नाहीत. आम्ही ठामपणे उभे आहोत."

या निकालांवर उद्धव ठाकरे म्हणाले की, 25 वर्षांनंतर महापौरपद मिळाले नाही, तरी जनतेचा विश्वास कायम असल्याचे सिद्ध झाले आहे.

ते म्हणाले, "गेल्या 25 वर्षांत आम्ही जे काम केले, विशेषतः कोविड काळात, त्यावरून मुंबईतील मतदार आमच्यासोबत राहतील अशी अपेक्षा होती आणि ते आमच्यासोबत राहिले. आम्हाला आणखी जागा मिळतील अशी अपेक्षा होती."

मात्र सत्ताधाऱ्यांच्या स्पष्ट विजयानंतरही बीएमसीच्या महापौर निवडीला अजून वेळ आहे.

इंडियन एक्सप्रेसने मुख्यमंत्री कार्यालयातील सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 17 ते 24 जानेवारीदरम्यान 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'साठी दावोसला जाणार आहेत.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, "फडणवीस तेथून परतल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत औपचारिक बैठक होईल." तसेच "बीएमसी महापौरपदासाठी लॉटरीद्वारे आरक्षण ठरवण्याची प्रक्रिया तोपर्यंत पूर्ण होईल. त्याआधी महापौरपदावर चर्चा करणे निरर्थक आहे."

शिंदे काय मागणी करत आहेत?

काही विश्लेषकांच्या मते, या घडामोडींमधून शिवसेनेची राजकीय गरज अधोरेखित करण्याचा आणि महापौरपदावर तडजोड न करण्याचा इशारा दिला जात आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवण्यामागे हेच कारण असू शकते.

मात्र शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक अमोल घोळे म्हणाले, "कोणालाही जबरदस्तीने तिथे ठेवलेले नाही. पुढील रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आम्हाला बोलावले आहे. शिवसेना प्रमुख शिंदे साहेब सर्व नगरसेवकांना मार्गदर्शन करतील. अनेक जण पहिल्यांदाच नगरसेवक झाले आहेत. त्यामुळे 2 दिवसांचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सध्या 29 नगरसेवक उपस्थित आहेत."

ते म्हणाले की, महापौरपद भाजपसोबत चर्चा करून ठरवले जाईल आणि त्यांच्या पक्षाने महापौरपदाची कोणतीही मागणी केलेली नाही.

महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी बीबीसीला सांगितले, "मुंबईत शिंदे यांच्या पक्षाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यामुळे बार्गेनिंगच्या माध्यमातून शिंदे सत्तेत सन्मानजनक वाटा मिळवू इच्छित आहेत."

सध्या महापौर निवडीची प्रक्रिया सुरू होण्यासाठी वेळ लागणार असल्याने पुढील काळात अनेक चढउतार दिसू शकतात. महापौरपद रोटेशन पद्धतीने सर्वसाधारण, अनुसूचित जाती, ओबीसी आणि महिलांसाठी राखीव असते.

राज्याचा नगरविकास विभाग लॉटरी पद्धतीने आरक्षण ठरवतो. ही औपचारिक प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

चोरमारे म्हणतात, "महापौरपदाचे आरक्षण निवडणुकीपूर्वी जाहीर व्हायला हवे होते, पण तसे झाले नाही. त्यामुळे कोणत्या महापालिकेत कोणत्या वर्गाचा महापौर असेल हे अजून ठरलेले नाही. पुरुष, महिला, ओबीसी, अनुसूचित जाती यानुसार रोटेशन ठरायचे आहे. शिंदे यांच्याकडे असलेला नगरविकास विभाग हे आरक्षण काढतो. 22 जानेवारीला आरक्षण ठरण्याची शक्यता आहे. त्यानंतर नावावर चर्चा होऊ शकते."

शिंदे 2.5 वर्षांसाठी महापौरपद मागत आहेत का?

बीएमसी महापौरपदावरून सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम म्हणाले, "मुंबईचा महापौर महायुतीचाच असेल. महापौर हिंदू आणि मराठी असेल. हा महापौर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवणारा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारा असेल."

शिंदेसेनेने 2.5 वर्षांसाठी महापौरपद मागितल्याच्या चर्चांवर साटम म्हणाले, "अशी कोणतीही चर्चा झालेली नाही. देवेंद्रजी आणि एकनाथजी यांच्यात चांगला समन्वय आहे. ते बसून चर्चा करतील आणि महापौर महायुतीचाच असेल. महापौर कोण असेल किंवा किती वर्षांसाठी असेल हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे म्हणजे बीएमसी भ्रष्टाचारमुक्त करणे आणि मुंबईचा विकास."

विजय चोरमारे म्हणतात, "मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र निवडणूक लढली. दोघांनाही बहुमत मिळाले आहे. भाजपचा महापौर होईल यात शंका नाही. कारण त्यांच्याकडे जास्त जागा आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या पाठिंब्याशिवाय महापौर निवडून येऊ शकत नाही."

"अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे 2.5 वर्षे महापौरपद शिवसेनेकडे असावे यासाठी बार्गेनिंग करत आहेत. भाजप याला मान्यता देणार नाही. मात्र शिंदे स्थायी समिती अध्यक्षपदाची मागणी करू शकतात," असंही ते नमूद करतात.

दुसरीकडे पुण्यात पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं की, नगरसेवकांची पळवापळवी होईल म्हणून एकनाथ शिंदेंनी त्यांच्या नगरसेवकांना खासगी हॉटेलवर ठेवलं आहे का?

त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले, "आता कुठेही पळवापळवी नाहीये. आता सगळं शांतपणे आहे. आम्ही एकत्रितपणे सर्व निर्णय करणार आहोत. त्यामुळे पळवापळवीची आवश्यकता नाहीये. आम्ही जसं इथं आल्यावर सर्वांना बोलावलं तसं त्यांनीही सर्वांना बोलावलं असेल. हॉटेलमध्ये रहायला कुणीही जात नाही. त्याची काळजी करू नका."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)