राज्यातील महापालिकांचा निकाल काय सांगतो? 5 राजकीय विश्लेषक काय सांगतात?

महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून 29 पैकी 24 महापालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष हा सत्ताधारी पक्ष ठरला आहे.

ज्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं होतं, तिथेही महायुतीनं सत्ता स्थापन करण्यात यश मिळवलं आहे.

एकीकडे, ठाकरे बंधूंनी कडवी झुंज देत मुंबईमध्ये विरोधी आव्हान कायम ठेवलंय तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस मात्र राज्यभरात गळीतगात्र झाल्याचं पहायला मिळतंय.

काँग्रेसने वंचितला सोबत घेत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवली आहे तर दुसरीकडे मुस्लीम मतांना चांगल्या पद्धतीनं आपलंसं करत 'एमआयएम' हा पक्ष राज्यभरात 100 हून अधिक जागी विजयी झाल्याचं दिसतंय.

महायुतीत असणारे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या कामगिरीची तुलना करता एकनाथ शिंदे यांना ठाण्याचा गड राखत बरी कामगिरी करता आली आहे तर अजित पवार यांना मात्र हाराकीरीचं चिंतन करावं लागणार आहे.

एकूणातच, राज्यातील या महापालिकांचा निकाल काय सांगतो? त्यातले अंडरकरंट्स राज्याच्या पुढील राजकारणाची दिशा कशाप्रकारे दाखवत आहेत? या निकालाचे अन्वयार्थ काय आहेत, या साऱ्या प्रश्नांचा धांडोळा घेऊयात राज्यातील महत्त्वाच्या राजकीय विश्लेषकांच्या नजरेतून...

'मुंबईचा निकाल भाजपच्या अनैतिक ताकदीविरोधात लोकांचं उभं राहणं दाखवतो' - राजेंद्र साठे

ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे हे बीबीसी मराठीशी बोलताना या महापालिका निकालाचं विश्लेषण अनेक पातळ्यांवर करताना दिसले.

अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची ताकद कमी होणं, आणि एमआयएम या पक्षाला शंभरच्या वर जागा मिळणं, या गोष्टीकडे ते 'महाराष्ट्राचं राजकारण बदलणारी' एक महत्त्वाची घडामोड म्हणून ते पाहतात.

अजित पवार यांच्या कामगिरीचं विश्लेषण करताना ते सांगतात की, "पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांनी भाजपसमोर खूप मोठं आव्हान उभं केलेलं होतं. भाजपवर त्यांनी कधी नव्हे ते भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते. पण, त्यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे अजित दादांची ताकद खूपच खच्ची झालेली आहे."

"सातारा नगरपरिषदेनंतर आता सोलापूर महानगरपालिकेतही त्यांना फटका बसलेला आहे. सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी असं कुठेही त्यांची ताकद दिसत नाही. त्यामुळे त्यांची ताकद कमी होणं, ही एक मोठी गोष्ट आहे," असं ते सांगतात.

काँग्रेसच्या कामगिरीचं विश्लेषण करताना ते सांगतात की, लातूर आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेसने मिळवलेलं यश मोठं आहे.

याचं कारण ते असं सांगतात की, राज्यभरात काँग्रेसची दुर्बळ अवस्था असताना त्या पार्श्वभूमीवर हे यश लक्षणीय आहे.

लातूर-चंद्रपूरसारख्या ठिकाणी काँग्रेसचं नेटवर्क होतं, मतदार होते, त्यामुळे, ते जुळून आलं आणि त्याचा त्यांना फायदा झाला. काँग्रेसने यातून सकारात्मक धडा घेतला पाहिजे, असं ते सांगतात.

मुंबई महापालिकेच्या निकालाचं विश्लेषण करताना ते सांगतात की, भाजपने सगळ्यात मोठा प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेनेचं खच्चीकरण केलं आहे. एका बाजूला त्यांनी शिंदेसेनेला सोबत घेतलेलं आहे पण ती फार वाढणारही नाही, याचीही काळजी घेतलेली आहे.

ते सांगतात की, "मुंबईच्या निकालाची सुरूवात पाच वर्षांपूर्वी शिवसेना फोडली, तेव्हाच झालेली आहे. मुंबई जिंकण्यासाठी सेना फोडणं आवश्यक होतं. कारण, सेना फोडली नसती आणि ती एकसंध असती, तर काय झालं असतं, हे तुम्हाला या निकालातील आकड्यांवरूनही स्पष्टपणे दिसेल. सेना एकसंध असती तर सेनेनंच मुंबई जिंकली असती. फक्त मुंबईच नव्हे, तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण आणि कदाचित संभाजीनगरही जिंकता आलं असतं."

पण, मर्यादीत काळात ठाकरे बंधूंना एकत्र येत जेवढं करणं शक्य होतं, तेवढं त्यांनी केलं. त्यांनी मराठी अस्मितेच्या भावनेचा योग्य वापर करत कडवी झुंज दिली, असंही ते सांगतात.

या महापालिका निवडणुकीतून महाराष्ट्राचं यापुढचं राजकारण कसं असेल, याची झलकही दिसते, असं ते सांगतात.

ते म्हणाले की, "मुंबईचा निकाल हे दाखवून देतो की, भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या अनैतिक राजकारणाविरोधात उभी राहू पाहणारी जनता आहे. पुढच्या काळामध्ये भाजपने अनैतिक आणि फोडाफोडीचं राजकारण चालू ठेवलं तर त्यांना राज्यभर अशा पद्धतीचा विरोध नक्कीच सुरू होईल."

"पवारांचे अदाणींसोबतचे संबंध महाराष्ट्राला मान्य नाहीत, हे या निवडणुकीतून दिसलंय" - निखिल वागळे

बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी या निवडणुकीचं विविधांगी विश्लेषण केलं.

मुंबईच्या निकालाबाबत बोलताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे सोबत नसते तर भाजपला हा विजय मिळाला नसता. ज्या पद्धतीने मुंबई जिंकायची इच्छा भाजपची होती, ती त्या पद्धतीनं पूर्ण झालेली नाहीये, असंही निरिक्षण त्यांनी मांडलं.

ते म्हणाले की, "2022 साली साम-दाम-दंड-भेद वापरून शिवसेना जी फोडली, त्याच गोष्टीचा हा पूर्णविराम आहे. एकनाथ शिंदेंचा वापर जवळजवळ संपलेला आहे. आता भाजप त्यांचं पुढे काय करतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे."

राज ठाकरे यांच्या कामगिरीबाबत बोलताना ते म्हणाले की, "राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या जन्मापासून ते आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घ्यायला हवा. फक्त सहा नगरसेवक मुंबईत का निवडून आले? अनेक प्रभागांमध्ये मनसेची मतं उद्धव ठाकरेंना गेलेली आहेत. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मतं खरोखरच मनसेकडे आली आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला."

पुढे ते म्हणाले की, "राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची पुनर्बांधणी करणं गरजेचं आहे. त्यांनी आत्मपरिक्षण करायला हवं. आणि पंचताराकिंत सवयी सोडायला हव्यात. त्यांनी झडझडून कामाला लागायला हवं."

ते म्हणाले की, "पवार आणि अदाणींचे जे संबंध आहेत, त्यामुळे खूप चुकीचा मेसेज बाहेर जातोय. हे संबंध महाराष्ट्राला मान्य नाहीयेत. राहुल गांधी ते राज ठाकरे सगळे अदाणींवर टीका करत असताना पवार कुटुंबाने अदाणींसोबत संबंध ठेवणे, लोकांना आवडत नाहीये, हे महाराष्ट्रानं या निवडणुकीत दोन्ही पवारांना सांगितलेलं आहे. शरद पवारांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याची वेळ आली आहे, हाच संदेश पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या निकालातून दिलेला आहे."

काँग्रेसचं या यशाबद्दल अभिनंदन करायला पाहिजे, असंही ते म्हणाले.

ते म्हणाले की, "हर्षवर्धन सपकाळ प्रभावी असे मोठे नेते नव्हते, त्यांची नेमणूक राहुल गांधींनी केलेली होती. पण त्यांनी जे काय तळागाळात काम केलेलं आहे, त्याचे परिणाम दिसत आहेत.

काँग्रेस संघर्ष करायला उतरत असेल, तर आम्ही तुमच्यासोबत आहोत, हाच संदेश लोकांनी काँग्रेसला दिलेला आहे. लातूर, चंद्रपूर, भिवंडी, कोल्हापूर या निकालातून हेच दिसतंय."

एमआयएमच्या लक्षणीय कामगिरीबाबत बोलताना निखिल वागळे म्हणाले की, "एमआयएमच्या यशाची दखल घ्यायला हवी. मुस्लीम समाजाला पुन्हा एमआयएमविषयी विश्वास वाटत असेल, तर तो धोका आहे. कारण तो मुस्लिमांचा धर्मांद पक्ष आहे. अशा पक्षाला महाराष्ट्रात एवढं यश मिळणं हे धोकादायक आहे,"

'मुंबई वगळता विरोधकांकडे भाजपविरोधात नरेटीव्ह नव्हता' -परिमल माया सुधाकर

या महापालिका निवडणुकीचं विश्लेषण करताना प्राध्यापक परिमल माया सुधाकर सांगतात की, हा निकाल अपेक्षित असाच होता.

मुंबई महापालिका सोडता, राज्यभरात इतर ठिकाणी विरोधी पक्षांना मत का म्हणून द्यायचं, याचा कोणताच राज्यभर पसरेल आणि चालू शकेल, असा नरेटीव्ह विरोधकांना देता आला नाही, असं ते सांगतात.

बीबीसी मराठीशी बोलताना ते सांगतात की, "दुसऱ्या बाजूला, भाजपचं हे स्पष्ट नरेटीव्ह होतं की, विकास, स्थैर्य यासाठी मत द्या. शिवाय, स्थानिक नेत्यांनाही हे कळलं होतं की, आपल्याला टिकून रहायचं असेल तर भाजपसोबत जावं लागेल. त्यामुळे बुडणाऱ्या जहाजामध्ये का जायचं असा विचार करत बहुतांश सगळेच पक्षांतर करत तरणाऱ्या जहाजामध्ये गेलेले आहेत."

मुंबई महापिलेकच्या निकालावर भाष्य करताना ते म्हणाले की, "मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यामुळेच इतक्या जागा मिळू शकल्या आहेत. जर ठाकरे बंधू एकत्र आले नसते, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जागा आणखी कमी आल्या असत्या."

इथून पुढची पाच वर्षे जर हे दोन्ही नेते एकत्र राहिले आणि मराठी अस्मितेला त्यांनी आणखी बळकट करण्याचा प्रयत्न केला तर ही मराठीची मतपेढीही वाढेल. या आघाडीसाठी ही एक चांगली सुरूवात आहे, असं मी मानतो, असं ते सांगतात.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला मतदारांनी पुरेसा संदेश दिलेला आहे, असं ते सांगतात.

ते म्हणाले की, "शरद पवारांचा जो मतदार आहे, त्याला अजित पवारांसोबत जाणं फारसं काही रुचलेलं नाहीये. प्रशांत जगताप यांच्या उदाहरणावरून हेच दिसतं. विधानसभेला महायुतीतून लढलेल्या अजित पवारांसोबत उभा राहिलेला मतदार या निवडणुकीत मात्र त्यांच्या बाजूला उभा राहताना दिसला नाही. थोडक्यात, तुम्ही भाजपसोबत असाल, तर तुम्ही आम्हाला चालाल, पण विरोधात जाणार असाल, तर ते मात्र आम्हाला चालणार नाही. तिसरा जो धर्मनिरपेक्ष मतदार आहे, तो अजित पवारांवर विश्वास ठेवायला तयार नाहीये."

काँग्रेसच्या कामगिरीचं विश्लेषण करताना ते म्हणाले की, काँग्रेसला या निवडणुकीत जे काही मर्यादीत यश मिळालेलं आहे, मग ते लातूर असो, चंद्रपूर असो, वा कोल्हापूर असो, ते स्थानिक पातळीवरील नेत्यांच्या प्रयत्नातून मिळालेलं आहे.

पुढे ते म्हणाले की, "राज्य पातळीवरील नेते आणि स्थानिक पातळीवरील नेते ही जी दरी आहे, ती काँग्रेसपुढची सर्वांत मोठी समस्या आहे. काँग्रेस हा एकमेव असा पक्ष आहे की ज्याला वर्तमानपत्रात साधी एक जाहिरातही देता आलेली नाहीये. काँग्रेसचं नेतृत्व अजूनही संभ्रमात आहे. काँग्रेसला अजूनही वाटतं की, तो राज्य पातळीवरील सर्वांत मोठा विरोधी पक्ष आहे. पण त्यांचं स्थान या निवडणुकीतून दिसून आलं आहे."

"दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येण्याचा फायदा भाजपलाच' - शितल पवार

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इलेक्टिव्ह मेरिट फार महत्त्वाचं ठरतं, असं 'सकाळ' वृत्तपत्राच्या पुणे आवृत्तीच्या संपादक शितल पवार सांगतात.

बीबीसी मराठीसोबत बोलताना त्यांनी खासकरून पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या निवडणुकीचं विश्लेषण केलं.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील निकालाबाबत विश्लेषण करताना त्या सांगतात की, "मागील निवडणुकीत (2017) भाजपकडे दोन्ही महानगरपालिकांमध्ये सत्ता होती. त्यांचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक होते. त्या बळावर आधीपासून भाजप आघाडीवर होता. शेवटच्या टप्प्यात भाजपनं पुणे शहरात आरोप प्रत्यारोपांना बगल दिली आणि त्यांचं सगळं नरेटिव्ह विकासाकडे शिफ्ट केलं होतं. त्यामुळे पुणे शहराचे निकाल मला अजिबात आश्चर्याचे वाटत नाहीत."

पुढे त्या सांगतात की, "लोकसभा किंवा विधानसभेला हिंदुत्वासारखं 'ब्रॉड कार्पेट नरेटिव्ह' आणलं जातं आणि त्याचा परिणाम होताना आपण बघतो. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत असं होतं नाही. या निवडणुकांमध्ये स्थानिक उमेदवारांच्या ताकदीवर खूप काही अवलंबून असतं. या ताकदीत स्थानिक वोटबँक, आर्थिक क्षमता या सर्व गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. भाजपनं जिंकण्यासाठी जे जे करावं लागतं ते केलं आणि आज विजयाचं पारडं त्यांच्याकडे आहे."

निकालाने दोन्ही राष्ट्रवादींना काय दिशा मिळेल, या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, "दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येणं हा चकवा होता. याचा सगळा राजकीय फायदा हा भाजपला झाला. कारण विरोधाचा आवाज कमी झाला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील, न येतील याबाबत अजित पवार प्रचाराच्या शेवटच्या दिवशी बोलले आणि यावर काहीही विचार झालेला नाही असं सांगितलं. या निवडणुकीत त्यांनी कितीतरी प्रवेश शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून करून घेतले."

पुढे त्या सांगतात की, "शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या एकमेव विद्यमान आमदारांच्या कुटुंबातून दोनपेक्षा अधिक उमेदवार भाजपच्या तिकिटावर लढले. त्यांच्या मतदारसंघात एकही उमेदवार राष्ट्रवादीच्या चिन्हावर नाहीये. अशी परिस्थिती असताना अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादींच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. सत्तेत असल्याने अजित पवार त्यांची दिशा ठरवतील."

मुंबईत भाजपला अपेक्षित होतं, तितकं यश मिळालेलं नाही - कुमार केतकर

ज्येष्ठ पत्रकार आणि काँग्रेसचे माजी खासदार कुमार केतकर यांनी या निवडणुकीचं विश्लेषण करताना म्हटलंय की, "भाजप या निवडणुकीत सत्तेत येणार, हे सांगायला कुठल्याही ज्योतिषाची अथवा एआयची गरज नव्हती. हे उघड होतंच. ते सत्तेत येणार, अशीच नेपथ्य रचना त्यांनी आताच नव्हे तर गेल्या काही वर्षांपासून राजकारणाची केलेली होती."

पुढे ते म्हणाले की, "ही निवडणूक जवळजवळ नऊ वर्षांनी झाली आहे. हे अयोग्य, अनैतिक आणि असंवैधानिकही आहे. नऊ वर्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पोस्टपॉन व्हावी, हेच गैर आहे. गेली नऊ वर्षे निवडून न येताही त्यांनी सत्ता राबवली आहेच. एवढी नेपथ्यरचना करूनही भाजपला शतप्रतिशत सत्ता मिळालेली नाही. जे यश मिळालं आहे ते युतीमुळे मिळालेलं आहे."

भाजपच्या राज्यभरातील एकूण विजयाबद्दल बोलताना ते म्हणाले की, "जवळपास ऐंशी टक्के मीडिया मार्केट भाजप आणि शिंदेसेनेकडे होतं. यासाठी किती पैसे खर्च केलेले असतील, याची कल्पना करा. जवळपास दोन महिने वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्यांवर प्रचंड पैसे खर्च केलेले आहेत."

पुढे ते म्हणाले की, "इतक्या प्रमाणात बिनविरोध उमेदवार तेही भाजपकडूनच निवडून येणं, असं यापूर्वी कधीच झालेलं नाहीये. हे केवळ पैशांच्याच जोरावर निवडून येतात, हे जाहीर आहे."

मात्र, मुंबईत त्यांना अपेक्षित होतं, तितकं यश मिळालेलं नाही, असंही ते म्हणाले.

ते म्हणाले की, भाजपला मुंबईत स्वत:चं बहुमत अपेक्षित होतं. आर्थिक नाड्या असलेलं, मेट्रोपॉलिटन शहर असलेल्या मुंबईवर सत्ता हवी होती म्हणूनच त्यांनी शिवसेना फोडली."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)