तोंडाला दुर्गंधी का येते आणि ती कशी दूर करावी?

तोंडाचा वास येणं, तोंडातून दुर्गंध येण्याची समस्या अनेकांना असते. आपल्या तोंडातून दुर्गंधी येत असेल अशी शंका वारंवार येत असल्यामुळे त्या व्यक्तीचा आत्मविश्वास देखील कमी होतो.

आपल्या तोंडातून जर दुर्गंधी येत असेल किंवा आपल्याला तसे वाटत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता कामा नये कारण मौखिक आरोग्य चांगले नसेल तर आपली पचनसंस्थादेखील बिघडू शकतो असे तज्ज्ञ वारंवार सांगताना दिसतात.

पण काळजी करू नका, कारण ही समस्या वेळेत लक्ष दिलं, तर सहज सुटू शकते.

योग्य स्वच्छता, थोडी माहिती आणि काही सवयी बदलल्या, तर श्वास कायम ताजा राहू शकतो.

तोंडाला दुर्गंधी येते म्हणून तुम्ही लोकांशी बोलायला किंवा त्यांच्या जवळ जायला टाळता का? चिंता करू नका, ही एक सामान्य समस्या आहे आणि यावर उपायही आहेत.

तोंडाला येणारी दुर्गंधी ही फक्त एक छोटीशी शारीरिक अडचण नाही, ती आत्मविश्वासावर देखील परिणाम करणारी गोष्ट आहे.

दात स्वच्छ ठेवणं म्हणजे दात, हिरड्यांमधील जागा, जिभेच्या खाचांमध्ये आणि दातांच्या मुळांमध्ये लपलेल्या जीवाणूंविरुद्ध चालणारी, कधीही न संपणारी लढाईच आहे.

आपण हे जंतूंचं थर वेळेवर काढून टाकले नाही, तर ते तोंडातच जमतात आणि मग हिरड्यांचे गंभीर आजार होऊ शकतात.

पण आपण नियमितपणे आणि योग्य पद्धतीनं ब्रश केला, तर जंतू जमा होणार नाही. त्यामुळे हिरड्यांचे आजार होण्यापासूनही बचाव होतो आणि आपला श्वासही ताजा राहतो.

तोंडाला वास किंवा दुर्गंधी येण्याचं कारण काय असतं?

दात व्यवस्थित घासतो, तरी का वास येतो? असा प्रश्न मनात येणं स्वाभाविक आहे. कारण केवळ ब्रश करणं पुरेसं नाही. त्याची पद्धत, वेळ आणि तोंडातील उर्वरित स्वच्छता यांचाही विचार करणं तितकंच गरजेचं आहे.

तोंडाला वास येण्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे हिरड्यांमध्ये होणारी सूज आणि कमजोरपणा. याला वैद्यकीय भाषेत 'पेरिओडॉन्टायटिस' म्हणतात. ही समस्या अनेक वेळा आपल्याला कळतही नाही, पण ते दुर्गंधीचं मुख्य कारण असतं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे, युनायटेड किंगडममधील (यूके) सुमारे 50 टक्के प्रौढांना हिरड्यांचा हा त्रास होतो.

डेंटिस्ट डॉ. प्रवीण शर्मा म्हणतात, "तोंडाला वास येणं हे बहुतांश वेळा तोंडातल्या समस्यांमुळेच होतं. अशा प्रकारची दुर्गंधी सुमारे 90 टक्के लोकांमध्ये दिसते."

डॉ. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, उरलेल्या 10 टक्के लोकांच्या तोंडाला दुर्गंधी ही शरीरातल्या काही आजारांमुळे येते, जसं की पचनाचा त्रास, मधुमेह वगैरे.

डॉ. शर्मा पुढे सांगतात, "ज्यांचा मधुमेह नियंत्रणात नाही किंवा ज्यांना पचनाचा त्रास आहे, अशा लोकांच्या तोंडालाही वास किंवा दुर्गंधी येऊ शकते. शिवाय, खूप कमी कार्बोहायड्रेट खाणाऱ्या लोकांच्या श्वासाला तीव्र दुर्गंधी येते आणि त्यामुळे हॅलिटोसिस होऊ शकतो."

श्वास ताजा ठेवण्यासाठी 6 सोपे उपाय

समस्येच्या मुळाशी जा

जर तुम्ही दात आणि हिरड्यांमधल्या जंतूंना स्वच्छ केलं नाही, तर ते सूक्ष्म जखमा निर्माण करतात आणि नंतर हिरड्यांमधून रक्तस्राव होऊ लागतो. पण चांगली गोष्ट अशी की, हिरड्यांना होणारा सुरुवातीचा त्रास (हिरड्यांची सूज) योग्य वेळी लक्ष दिलं तर बरा होऊ शकतो.

ब्रश करताना तुमच्या हिरड्या लालसर, सुजलेल्या आहेत का किंवा त्यातून रक्त येतंय का हे जरूर तपासा. पण लगेच घाबरून जाऊ नका, वेळेत काळजी घेतली, तर अजूनही त्यातून बरं होण्याची संधी आहे.

जिथून रक्त येतं किंवा जिथे दुखतं, ती जागा ब्रश करताना टाळावासं वाटणं अगदी नैसर्गिक आहे. पण योग्य पद्धतीनं ब्रश (ब्रशिंग टेक्निक) करणं शिकलं की, हे दुखणं आणि संवेदनशीलता हळूहळू कमी होते.

सावधपणे आणि जाणीवपूर्वक ब्रश करा

बहुतांश लोक जे उजव्या हातानं ब्रश करतात, ते नकळत डावीकडचे दात जरा जास्त वेळ ब्रश करतात. आणि जे डाव्या हाताने करतात, ते उजवीकडचे. त्यामुळे दुसऱ्या बाजूकडे कमी लक्ष दिलं जातं आणि तिथे जंतुसंक्रमण किंवा सूज होण्याची शक्यता जास्त असते.

आपण कोणता हात वापरत आहोत, याची जाणीव ठेवा आणि दोन्ही बाजूने समान पद्धतीने आणि काळजीपूर्वक ब्रश करण्याचा प्रयत्न करा.

ब्रश करण्याची योग्य पद्धत शिकून घ्या

दात घासताना एक ठराविक पद्धत ठेवा आणि घाई करू नका. लक्षात ठेवा प्रत्येक दाताला तीन बाजू असतात- बाहेरची, चावायची आणि आतली. या सगळ्या बाजू नीट स्वच्छ करणं गरजेचं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण दात घासायला किमान दोन मिनिटंच हवी असतात.

बऱ्याच लोकांना दात घासताना ब्रश दातांवर सरळ 90 अंशात ठेवून पुढे-पाठीमागे करून घासायची सवय असते. परंतु, ही पद्धत चुकीची आहे. त्यामुळे हिरड्या खराब होऊ शकतात. लक्षात ठेवा, दात घासताना योग्य पद्धत वापरणं सगळ्यात महत्त्वाचं आहे.

तुम्ही साधा ब्रश वापरत असाल किंवा इलेक्ट्रिक ब्रश, दोन्हींत एक गोष्ट लक्षात ठेवा, ब्रश करताना हलक्याशा गोलाकार हालचाली करण्याचा प्रयत्न करा.

ब्रश करताना तो दातांवर थोडा तिरका (45 अंश कोनात) धरावा आणि हळूवारपणे घासावा. खालचे दात घासताना ब्रश वरच्या बाजूला आणि वरचे दात घासताना खालीच्या बाजूला फिरवा म्हणजे ब्रशचे ब्रिस्टल्स (केस) हिरड्यांच्या रेषेकडे जाऊन नीट साफ होतील. अशाने हिरड्यांखालचे जंतूही निघण्यास मदत होते.

योग्य वेळी ब्रश करा

आपल्यापैकी अनेकांना जेवणानंतर लगेच दात घासणं योग्य आहे असं शिकवलं गेलं आहे. पण थोडा विचार करा, अन्नात असलेल्या आम्लांमुळे (अ‍ॅसिड) दातांवरचे सुरक्षात्मक थर (मिनरल थर) आणि त्याखालचं दातांचे मऊ भाग (डेंटिन) थोडं नरम होतात. त्यामुळे जेवणानंतर लगेच दात घासल्यास दातांचं (इनॅमल) नुकसान होऊ शकतं.

त्याऐवजी, तुम्ही जेवणाआधी दात घासा आणि नंतर फक्त तोंड पाण्यानं स्वच्छ धुवा. किंवा हवं असेल, तर जेवणानंतर अर्धा तास थांबा आणि मग ब्रश करा. या वेळेत तुमच्या लाळेतले घटक अन्नातल्या आम्लाचा (अ‍ॅसिडचा) परिणाम कमी करतात.

दिवसातून दोन वेळा, प्रत्येकी दोन मिनिटं दात घासणं हे आदर्श मानलं जातं. पण काही लोकांसाठी दिवसातून एकदाच, पण योग्य पद्धतीनं घासणंही पुरेसं ठरू शकतं.

झोपल्यावर लाळ कमी प्रमाणात तयार होते, त्यामुळे रात्रीच्या वेळी जंतूंना दातांचं जास्त नुकसान करण्याची संधी मिळते. म्हणून, जर दिवसातून एकदाच नीट दात घासणार असाल, तर ते काम रात्री झोपण्याआधी करणं सर्वात योग्य ठरू शकतं.

दात घासण्याची सवय रोजच्या सवयींशी जोडून पाहा. उदाहरणार्थ: 'मी झोपेतून उठतो, आणि दात घासतो', 'झोपायला जाण्यापूर्वी, दात घासतो.' अशा सवयी केल्यामुळे दररोज नियमितपणे दात घासण्याची चांगली सवय लागते.

योग्य साधनं निवडा

मध्यम कडक ब्रिसल्स असलेला टूथब्रश वापरा. तसेच, ब्रिसल्स किंवा रबराचे छोटे इंटरडेंटल ब्रश (दातांच्या मधल्या जागा स्वच्छ करणारे ब्रश) वापरण्याची सवय लावा. यामुळे दात आणि हिरड्यांमधल्या जंतूंची सफाई होण्यास मदत होते.

तुम्ही कोणतीही टूथपेस्ट घेतली तरी चालेल, पण त्यामध्ये 'फ्लोराइड' असल्याची खात्री करा. कारण फ्लोराइड दातांची बाहेरचा संरक्षणात्मक थर (मिन) मजबूत करतं आणि दातांना कीड लागण्यापासून वाचवतं.

जर तुम्हाला हिरड्यांच्या आजाराची किंवा त्रासाची सुरुवातीची लक्षणं जाणवत असतील, तर माउथवॉश (तोंड धुण्यासाठीचं द्रव) वापरणं फायदेशीर ठरू शकतं. कारण तो तोंडातील प्लाक आणि जंतूंची वाढ कमी करायला मदत करतं.

गंभीर हिरड्यांच्या आजारांची लक्षणं ओळखा

जर हिरड्यांचा आजार (पेरिओडॉन्टायटिस) वाढत गेला, तर दातांमध्ये अंतर दिसायला लागतं आणि दातांना पकडून ठेवणारं हाड कमजोर होऊ लागल्यामुळे दात सैल होऊ शकतात किंवा हलू शकतात.

हा त्रास वेळेत थांबवला नाही, तर हाडं इतकं कमजोर होऊ शकतात की शेवटी दात पडूही शकतात. तोंडाला सतत दुर्गंधी येणं हे सुद्धा याचं एक लक्षण असू शकतं. जर अशा लक्षणांची जाणीव झाली, तर लगेचच डेंटिस्टकडे जा.

शेवटी, श्वास ताजा ठेवण्यासाठी काही झटपट आणि सोपे उपाय

पुरेसं पाणी प्या, कारण तोंड कोरडं राहिलं तर जंतू वाढू शकतात.

जीभ स्वच्छ करणाऱ्या स्क्रॅपरने जीभ रोज स्वच्छ करा. यामुळे अन्नाचे कण, जंतू आणि मृत पेशी निघून जातात आणि हे सगळं तोंडाला दुर्गंधी येण्याचं कारण ठरू शकतं.

तुमचा श्वास ताजा आहे की, नाही याची खात्री नसेल, तर हे काम एखाद्या जवळच्या मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला विचारून तपासा. पण लक्षात ठेवा, कुणाला विचारायचं हे नीट विचारपूर्वक ठरवा!

आपलं हास्य किती सुंदर आहे! ते लपवू नका, फक्त थोडी काळजी, थोडं स्वच्छतेचं भान आणि आपला आत्मविश्वास पुन्हा खुलून येईल.

(हा लेख बीबीसी टर्किशच्या वेबसाईटहून घेण्यात आला आहे. बीबीसी टर्किश सेवेनी ही माहिती 'बीबीसी'च्या व्हॉट्सअप डॉक्स पॉडकास्टच्या 29 एप्रिल 2025 च्या भागातून घेतलेली आहे. )

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.