दात कसे घासावेत? दात घासण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती? वाचा तज्ज्ञ काय सांगतात

    • Author, बीबीसी फ्युचर

दात हा आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचा मात्र एरवी दुर्लक्षिला जाणारा अवयव आहे.

विशेषकरून जोपर्यंत दातांच्या समस्या उद्भवत नाहीत तोपर्यंत दातांकडे फारसं लक्षच दिलं जात नाही.

मात्र, दातांचा आपल्या एकूणच आरोग्याशी थेट संबंध असतो. त्यामुळे दातांची चांगली काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं.

त्यासाठी योग्य पद्धतीनं दात घासणं अतिशय आवश्यक असतं. दात घासण्याची योग्य पद्धत, चांगले टूथब्रश, टूथपेस्ट या गोष्टींविषयी या लेखात जाणून घेऊया.

दात जर योग्यप्रकारे घासले तर दातांचे गंभीर आजार होण्याची शक्यता कमी होते. तसंच त्यामुळे दात आणि हिरड्यांचं आरोग्यदेखील उत्तम राहतं. मात्र आपल्यापैकी बहुतांश जण दात चुकीच्या पद्धतीनं घासतात. दात योग्यप्रकारे कसे घासायचे ते तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

आपल्यापैकी बहुतांश जण बाथरुममधील आरशात पाहण्याइतकं उंच असण्याच्या देखील आधीपासून दात घासत आहोत. मात्र आपण दात खूपच चुकीच्या पद्धतीनं घासत असतो.

स्वीडनमध्ये यासंदर्भात एक अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात आढळलं की, 100 पैकी फक्त 10 जणच योग्य किंवा सर्वोत्तम पद्धतीनं दात घासत आहेत.

युकेमध्ये 2,000 जणांचा दात घासण्यासंदर्भात अभ्यास करण्यात आला. बुपा या ब्रिटिश विमा कंपनीला आढळलं की, या अभ्यासात सहभागी झालेल्या जवळपास निम्म्या लोकांना योग्य प्रकारे दात कसे घासायचे हे माहित नव्हते.

"एखाद्याला डेंटिस्ट किंवा दंतवैद्याकडून योग्य प्रकारे दात घासण्याच्या औपचारिक स्वरूपाच्या सूचना मिळाल्याशिवाय त्या व्यक्तीकडून चुकीच्याच पद्धतीनं दात घासले जात असण्याची शक्यता आहे. माझ्या अनुभवानुसार, कोणत्याही देशात असे लोक बहुसंख्येनं असतील," असं जोसेफाइन हिर्शफेल्ड म्हणतात. त्या युकेतील बर्मिंगहॅम विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक आणि रिस्टोरेटिव्ह डेंटिस्ट्रीच्या तज्ज्ञ आहेत.

किंबहुना दात कसे घासावेत याबाबत असलेल्या आणि गोंधळात टाकणाऱ्या विविध स्वरुपाच्या माहितीमुळे ही आश्चर्याची बाब नाही. एका अभ्यासात, दात घासण्याबाबत किमान 66 वेगवेगळे, काहीवेळा परस्परविरोधी, तज्ज्ञांचे सल्ले आढळले.

"मला वाटतं की, हे ग्राहकांना खूपच गोंधळात टाकणारं आहे," असं नायगेल कार्टर म्हणतात. ते युकेतील ओरल हेल्थ फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

दात घासण्याविषयी आधीच असलेल्या गोंधळात दातांसाठी विस्तृत श्रेणीतील उत्पादनांमुळे आणखी भर पडली आहे. यात जीभ स्वच्छ करण्याच्या उत्पादनापासून ते इंटरडेंटल वॉटरजेस्ट्सपर्यंतची विविध उत्पादनं आहेत.

आपल्यातील बहुतांश जण दात घासताना कुठे चुकतात आणि आपण दिनचर्येत कशाप्रकारे बदल केला पाहिजे, जेणेकरून आपण दात योग्यप्रकारे, प्रभावीपणे घासू शकू?

दात घासण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती?

"अनेक रुग्णांना हे समजतं की, दात स्वच्छ करण्यासाठी दातात राहिलेले अन्नकण काढले पाहिजेत. मात्र ही बाब फक्त अंशत: खरी आहे. दातांमधील जिवाणू काढणं ही कितीतरी अधिक महत्त्वाची गोष्ट आहे," असं हिर्शफेल्ड सांगतात.

प्रत्येकाच्याच तोंडात या जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीवांची वाढ होते. ते एक जाड आणि चिकट बायोफिल्म तयार करतात. त्याला सामान्यत: डेंटल प्लेक म्हणजे दातांवरील हानिकारक थर म्हटलं जातं. ते जवळपास 700 विविध प्रकारच्या जिवाणूंपासून बनलेलं असतं.

मानवी शरीरात आतड्यांनंतर, सर्वाधिक जैवविविधता तोंडात आढळते. यात बुरशी आणि विषाणूंचाही समावेश असतो.

"दातांना आणि त्याचबरोबर मऊ ऊतींना चिकटलेल्या चिकट थरामध्ये हे सूक्ष्मजीव राहतात. हा चिकट पापुद्रा किंवा फिल्म सहजपणे धुतली जात नाही. ती खरोखरंच हातानं व्यवस्थित स्वच्छ करावी लागते," असं हिर्शफेल्ड म्हणतात.

दातांना चिकटलेला हा पापुद्रा किंवा फिल्म काढण्यासाठीचं सर्वात महत्त्वाचं ठिकाण दात नसतात, तर ते असं हिरड्यांची पट्टी. हिरड्यांच्या ऊतीमध्ये शिरण्यास आणि तिथे जळजळ निर्माण करण्यास आणि शेवटी पेरिओडोन्टायटीसची समस्या निर्माण करण्यास हे सूक्ष्मजीव सर्वात सक्षम असतात.

खरं तर, "दात घासणं" हा चुकीचा शब्दप्रयोग आहे.

"दातांऐवजी तुमच्या हिरड्या घासण्याबद्दल विचार करा. असं केल्यास तुमचे दात आपोआपच घासले जातील," असं हिर्शफेल्ड म्हणतात.

मग हे करण्याची सर्वोत्तम पद्धत कोणती?

बास तंत्र -

सुधारित बास तंत्रात दात घासण्याचा टूथब्रश दाताच्या पृष्ठभागावर 45 अंशाच्या कोनात ठेवला जातो. (खालच्या जबड्यासाठी खाली झुकलेला आणि वरच्या जबड्यासाठी वरच्या बाजूला, जणूकाही तुम्ही हिरड्यांच्या खाली असलेल्या ब्रिसल्सला धार लावण्याचा प्रयत्न करत आहात)

त्यानंतर तुम्ही हिरड्यांवर ब्रशची छोटी आणि कंपनासारखी मागेपुढे हालचाल करता.

स्टिलमन तंत्र -

मग मी सुधारित स्टिलमन तंत्र वापरू पाहतो - सुधारित बास तंत्राप्रमाणेच हे केलं जातं. त्याव्यतिरिक्त यात हिरड्यांपासून दूर अधूनमधून ब्रशची सुखकारक मोठी हालचाल केली जाते.

मग माझ्या लक्षात आलं की उत्साहाच्या भरात मी खूप जास्त दाब देतो आहे.

दातांवर ब्रशनं दिलेला दाब 150-400 ग्रॅमपेक्षा अधिक नसावा, असं हिर्शफेल्ड म्हणतात.

अर्थात योग्य दाब म्हणजे किती, हा अजूनही वादाचा विषय आहे. जास्त जोरानं किंवा दाब देऊन दात घासल्यानं, विशेषकरून कडक ब्रशनं दात घासल्यावर हिरड्यांना दुखापत होऊ शकते. जोरजोरात दात घासल्यानं मऊ ऊतींची झीज होते किंवा त्यात फटी निर्माण होतात.

यातून जीवाणूंना त्या ऊतींच्या रक्तप्रवाहात प्रवेश करण्याची संधी मिळते. ब्रशवर धातूचं आवरण किंवा जाळी लावल्यामुळे दातांमध्ये लहान खाचा किंवा खोबण तयार होऊ शकतात. कालांतरानं त्यात लक्षणीय झीज होत जाते.

जे लोक इलेक्ट्रिक ब्रशचा वापर करतात त्यांच्या तुलनेत जे लोक हातानं दात घासतात ते ब्रशवर अधिक दाब देतात. अनेक इलेक्ट्रिक ब्रशमध्ये दातांवरील दाब जेव्हा खूपच जास्त होतो त्याबद्दलची चेतावणी देण्यासाठी सेन्सर असतात.

फोन्स तंत्र-

काही दिवसांपासून मी, लहान मुलं आणि हात, बोटांचा वापर करण्याची कमी क्षमता असलेल्या लोकांसाठी असलेल्या दात घासण्याच्या वेगवेगळ्या पद्धती किंवा तंत्रांचा वापर करतो आहे. फोन्स पद्धतीमध्ये दात घासण्याचा ब्रश 90 अंशावर धरला जातो आणि दातांवर वर्तुळाकार हालचाली केल्या जातात, तसंच हिरड्या स्वच्छ केल्या जातात.

दात किती वेळ घासले पाहिजेत?

अमेरिकन डेंटल असोसिएशन, नॅशनल हेल्थ सिस्टम, इंडियन डेंटल असोसिएशन, ऑस्ट्रेलियन डेंटल असोसिएशन आणि इतर असंख्य राष्ट्रीय आरोग्य संघटना, दिवसातून दोनवेळा आणि प्रत्येकवेळेस किमान दोन मिनिटं ब्रशनं दात घासण्याची शिफारस करतात.

यातील अडचण अशी आहे की, आपल्यापैकी बहुतांश जणांना दोन मिनिटे म्हणजे किती वेळ याचा योग्य अंदाज बांधता येत नाही. जवळपास फक्त 25 टक्के जण पुरेसा वेळ, योग्य दाबानं आणि योग्य हालचाली करत त्यांचे दात घासतात.

सुदैवानं, यासंदर्भात काही सोपे उपाय आहेत. उदाहरणार्थ, तुमच्या फोनवरील ॲपचा किंवा टायमर असलेल्या इलेक्ट्रिक टूथब्रशचा वापर करणं.

"यात महत्त्वाची बाब म्हणजे सर्व दात आणि प्रत्येक दाताचा संपूर्ण पृष्ठभाग स्वच्छ केला जातो आहे की नाही. तसंच दातांमधील अडचणीच्या जागा, जिथपर्यंत पोहोचणं कठीण असतं आणि ज्या स्वच्छ करण्यास दोन मिनिटांहून अधिक वेळ सहजपणे लागू शकतो त्या स्वच्छ करणंही महत्त्वाचं ठरतं." असं जोसेफाइन हिर्शफेल्ड म्हणतात.

असं मानलं जातं की दातांच्या आणि हिरड्यांचा सर्व पृष्ठभागावर फिरण्यासाठी टूथब्रशला

जवळपास दोन मिनिटांचा कालावधी लागतो. ज्या लोकांना हिरड्यांचा आजार किंवा इतर तोंडाच्या आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांना हिरड्यांवरील बायोफिल्म पूर्णपणे निघाली आहे याची खातरजमा करण्यासाठी अधिक वेळ लागू शकतो.

"खरं तर, दात घासण्याचा योग्य कालावधी हा प्रत्येकाच्या वैयक्तिक स्थितीवर अवलंबून असतो. त्यांची काही निश्चित अशी व्याख्या नाही आणि तो तसा ठरवलादेखील जाऊ शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्तीच्या दातांची आणि तोंडाची स्थिती वेगवेगळी असते."

तुम्ही दिवसातून कितीवेळा दात घासले पाहिजेत?

अमेरिका, युके आणि ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये दिवसातून दोनवेळा, योग्य वेळेवर आणि योग्य तंत्राचा काटेकोर वापर करून दात घासण्याचा सल्ला दिला जातो.

मात्र, इंडियन डेंटल असोसिएशन सल्ला देतं की दिवसातून तीन वेळा (दुपारच्या जेवणानंतर घासलेल्या दातांसह) दात घासणं फायद्याचं ठरू शकतं.

दाताच्या किंवा तोंडाच्या आरोग्याच्या मोठ्या समस्या नसलेल्या बहुतांश लोकांच्या बाबतीत या मार्गदर्शक तत्वांपेक्षा अधिक काही करण्याचा किंवा त्याचा अतिरेक करण्याचा कोणताही फायदा नसतो.

दात केव्हा घासले पाहिजेत, जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर?

नाश्त्यापूर्वी दात घासणं चांगलं की नाश्त्यानंतर? टूथपेस्ट उत्पादकांपासून ते डेन्टल हॉस्पिटलपर्यंत, अनेकजण सल्ला देतात की नाश्त्यानंतर दात घासण्यापेक्षा नाश्त्यापर्वी दात घासणं चांगलं. मात्र अजूनही हा वादाचा मुद्दा आहे.

नाश्त्यापूर्वी दात घासलेलं चांगलं की नंतर दात घासलेलं चांगलं, ही गोष्ट तुम्ही काय खाता आणि कधी खाता यावर अवलंबून आहे.

अर्थात, नाश्त्यानंतर दात घासल्याचा एक मुख्य तोटा म्हणजे नाश्ता करणं आणि दात घासणं यात तुम्हाला चांगलं अंतर राखावं लागतं. अमेरिकन डेंटल असोसिएशन या दोन्हीमध्ये 60 मिनिटांचं अंतर ठेवण्याचा सल्ला देतं.

त्यामागचं कारण असं की अन्नपदार्थांमधील अॅसिड आणि सूक्ष्मजंतूंकडून कार्बोहायड्रेट्सच्या पचनामधील उप-उत्पादनांमुळे दात तात्पुरते असुरक्षित होतात.

"अन्नपदार्थातील अॅसिड दातांच्या एनॅमल थरावर हल्ला करतात आणि काही काळासाठी ते मऊ करतात," असं हिर्शफेल्ड म्हणतात.

यामुळे एनॅमलमधील कॅल्शियम आणि फॉस्फेटसारखे काही महत्त्वाचे घटक बाहेर पडतात. अर्थात काही तासांनी लाळेतील खनिजं त्यांची जागा घेतात.

नाश्त्याच्या किंवा नाश्त्यानंतर दात घासण्याच्या प्रश्नापेक्षाही जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे संध्याकाळी दात घासणं. त्यामागचं उत्तर अतिशय सोपं आहे. दात घासणं ही झोपण्यापूर्वी करण्याची शेवटची क्रिया असली पाहिजे.

"तुमची लाळ ही तुमचं नैसर्गिक संरक्षणात्मक यंत्रणा आहे," असं कार्टर म्हणतात. लाळ आपल्या दातांवरील जिवाणूंची वाढ आणि दात किडण्यास प्रतिबंध करते. लाळेचा प्रवाह रात्रभरातून कमी होतो. त्यामुळेच झोपण्यापूर्वी दातावर जमलेला सर्व हानिकारक थर साफ करणं खूप महत्त्वाचं असतं.

दात घासण्यासाठी कोणत्या प्रकारचा टूथब्रश वापरला पाहिजे?

मध्यम आकाराचे ब्रिसल्स असलेला ब्रश प्रौढांसाठी सर्वोत्तम असतो. तसंच ज्या टूथपेस्टमध्ये छोटे खडबडीत कण नसतात ती उत्तम असते. छोटे ब्रश हेड देखील चांगले असतात. त्यामुळे प्रत्येक दाताभोवती अधिक चांगल्या पद्धतीनं ब्रश फिरवता येतो, असं हिर्शफेल्ड म्हणतात. तसंच जीर्ण झालेल्या ब्रशचे ब्रिसल्स अधिक खराब होण्यापूर्वी तो बदलणं आवश्यक असतं.

पारंपारिक टूथब्रश किंवा झाडाच्या फांदीपासून बनवलेले दातून किंवा मिस्वाक यांचा आफ्रिका, मध्य पूर्व आणि दक्षिण आशियात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

दातावरील हानिकारक थर काढण्यास आणि दात किडणं, दातातील पोकळी रोखण्यास देखील ते अत्यंत प्रभावी असतात. मात्र ते जर योग्यप्रकारे वापरले गेले नाहीत तर त्यामुळे हिरड्यांवर घर्षण होण्याचा किंवा हिरड्या घासल्या जाण्याचा अधिक धोका असतो.

हातानं वापरायच्या टूथब्रशपेक्षा इलेक्ट्रिक टूथब्रश अधिक महागडे असले तरी दातांवरील हानिकारक थर काढून टाकण्यासाठी ते अधिक प्रभावी असतात.

यामागचं एक कारण म्हणजे इलेक्ट्रिक टूथब्रशची हालचाल ऑटोमॅटिक असते आणि ती हाताच्या कौशल्यांवर कमी अवलंबून असते. मात्र यातील आणखी एक घटक म्हणजे ब्रशच्या डोक्याचा आकार. अनेक इलेक्ट्रिक टूथब्रशमध्ये प्रेशर सेन्सर्स असतात. एनॅमल खराब होईल असा अधिकचा दाब युजरकडून दातांवर पडल्यावर त्यातून सिग्नल मिळतो.

कोणत्या प्रकारची टूथपेस्ट सर्वोत्तम असते?

टूथपेस्ट पॅकेटच्या मागील बाजूस त्यात असलेल्या घटकांची लांबलचक यादी दिलेली असते. त्यातील एका घटकाकडं लक्ष देणं आवश्यक असतं. तो घटक म्हणजे फ्लोराईड. दातांचं एनमॅल ही मानवी शरीरातील सर्वात कठीण ऊती असूनही आणि निसर्गात आढळणाऱ्या सर्वात कठीण ऊतींपैकी एक असूनही, ते अॅसिडमध्ये सहजपणे विरघळतं. फ्लोराईडमुळे एनॅमलला फ्लोरापेटाइट होण्यास मदत होते. ते अॅसिडला अधिक प्रतिरोधक असतं. दात घासून झाल्यावर टूथपेस्ट थुंकावी, मात्र ते धुणं टाळल्यास फ्लोराईड दातांभोवती अधिक काळ टिकून राहतं. जेणेकरून दातांना अतिरिक्त संरक्षण मिळतं.

"टूथपेस्टमध्ये फ्लोराईडचा वापर सुरू झाल्यापासून, जिथे फ्लोराईड असलेली टूथपेस्ट वापरली जाते तिथे सर्वत्र दात किडण्याचं किंवा दातांमध्ये पोकळी निर्माण होण्याचं प्रमाण कमी झालं आहे," असं हिर्शफेल्ड म्हणतात.

मात्र टूथपेस्टमधील काही फॅशनेबल घटक सांभाळून वापरले पाहिजेत. चारकोल टूथपेस्टचे अँटीबँक्टेरीयल, अँटीफंगल आणि अँटीव्हायरल गुणधर्माचे दावे सिद्ध करता येत नाहीत. चारकोल किंवा कोळशामुळे दात पांढरेशुभ्र होतात, याचे फारसे पुरावे नाहीत. तसंच त्यामुळे दात झिजण्याचा आणि इतर समस्यांचा धोका वाढतो.

बेकिंग सोडा नसलेल्या टूथपेस्टपेक्षा, ज्या टूथपेस्टमध्ये बेकिंग सोडा किंवा खायचा सोडा (सोडियम बायकार्बोनेटचे छोटे स्फटिक) असतो, ते दातांवरील हानिकारक थर अधिक चांगल्या प्रकारे काढून टाकतात. तसंच ते हिरड्यांना आलेली सूज आणि त्यातून होणारा रक्तस्त्रावदेखील थोड्या प्रमाणात कमी करू शकतात.

इन्फ्लेमेशनचा दातांना होणारा बँक्टेरियल संसर्ग (पेरिओडोन्टल डीसीज) आणि संज्ञात्मक कमजोरीशी संबंध असतो. दात चांगले घासण्याच्या सवयीमुळे तोंडाचं आरोग्य चांगलं राहतं आणि त्यामुळे दातांवर वाढणारा हानिकारक थर कमी होतो आणि हिरड्यांना आलेली सूज कमी होते - बेई वू

तोंडाची स्वच्छता आणि एकूण आरोग्य यांच्यातील संबंध

चांगले दात घासल्यामुळे फक्त तोंडाची दुर्गंधी, पिवळे दात आणि दात किडणं यांचा धोका कमी होत नाही तर तो टाइप 2 मधुमेह, ह्रदयविकार आणि संज्ञात्मक घसरण यासारख्या आजारांचा धोकादेखील कमी करण्याचा प्रभावी मार्ग म्हणून पुढे येतो आहे.

"यासंदर्भातील वाढत्या पुराव्यांवरून असं दिसतं की इन्फ्लेमेशनचा दातांना होणारा बँक्टेरियल संसर्ग (पेरिओडोन्टल डीसीज) आणि संज्ञात्मक कमजोरीशी संबंध असतो," असं बेई वू म्हणतात. ते न्यूयॉर्क विद्यापीठाच्या रोरी मेयेर्स कॉलेज ऑफ नर्सिंगमधील ग्लोबल हेल्थचे डीन्स प्रोफेसर आहेत.

या सर्व गोष्टींचा विचार करता, टूथब्रश, इंटरडेंटल उपकरणं, फ्लॉस आणि नवीन बाथरुम टायमर या गोष्टींचा माझा वाढता संग्रह, आता तितकासा जास्त वाटत नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)