कान कसे साफ करायचे? आपल्या कानात मळ का तयार होतो?

    • Author, जेसन जी. गोल्डमन
    • Role, बीबीसी फ्युचर

आपल्या कानांमध्ये निर्माण होणारा मळ (किंबहुना, मेण) ही एक विचित्र गोष्ट आहे. हा मळ जंतू मारण्यासाठी तिथे असतो का? तो मुळात कशापासून तयार होतो?

व्हेल मासे कधीही त्यांचे कान साफ करत नाहीत. वर्षानुवर्षं त्यांच्या कानात मळ साठत राहतो, त्यातून त्यांचा एक जीवनेतिहास निर्माण होतो: चरबीयुक्त आम्लं, अल्कोहोल आणि कोलेस्टेरॉल यांच्याद्वारे या इतिहासाचं कथन सांगितलं जातं. आपल्यासह अनेक सस्तन प्राण्यांच्या कानांमध्ये मेणासारखा एक पदार्थ निर्माण होतो.

आपल्यापैकी बहुतांश माणसं कानात साठलेला हा मेणकट पदार्थ वेळोवेळी काढूनही टाकत असतात (याबद्दल पुढे अधिक चर्चा करू). या पदार्थामागे एक वेगळे विलक्षण विज्ञान आहे.

या पदार्थाला सेरुमेन (cerumen) असं विशेषनाम आहे आणि कर्णनलिकेतील सर्वांत बाहेरच्या भागातच त्याची निर्मिती होते. एक ते दोन हजार वसाग्रंथी (अशाच ग्रंथी आपल्या डोक्यावर असतात, त्यामुळे केस तेलकट राहतात) आणि सुधारित स्वेदग्रंथी यांच्या मिश्रणातून हा मळ तयार होतो. यात थोडे केस, मृत त्वचा, आणि इतर शारीरिक गाळ यांची भर घातली गेली की कानातील मळ तयार होतो.

याचं मुख्य कार्य वंगणासारखं असावं असं बराच काळ मानलं जात होतं (त्यामुळेच सुरुवातीला लिप-बाम याच पदार्थापासून बनवले जात असत). शिवाय, किडे आपल्या डोक्याच्या आतल्या भागांमध्ये जाऊ नयेत, यासाठी हा मळ प्रतिबंधात्मक कार्य करतो, असंही मानलं जात होतं. पण कानातील मळ प्रतिजैविक कार्यही करत असावा, असा अंदाज काहींनी वर्तवला आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थमधील (एनआयएच) टू-ज्यी चाय व टोबी सी चाय यांनी 1980 साली एका उपकरणाद्वारे 12 लोकांच्या कानातील मळ गोळा केला. या उपकरणाला त्यांनी "निर्जंतुक कर्णमल आकडा" असं संबोधलं होतं आणि अल्कोहलच्या द्रावामध्ये ते सगळं मिसळलं. मग त्यांनी काही जीवाणू त्या मिश्रणात सोडले.

कानातील मळाने वेगवेगळ्या प्रकारचे सुमारे 99 टक्के जीवाणू मारून टाकले. यात H. influenzae (याचा इन्फ्लुएन्झाशी काही संबंध नाही, हा वेगळ्या प्रकारचा संसर्ग आहे), आणि के-12 म्हणून ओळखला जाणारा E. Coli या जीवाणूचा विशिष्ट प्रकार, यांचाही समावेश होता. E. Coliचे इतर प्रकार आणि Streptococcus व Staphylococuus हे जीवाणू कानातील मळाला अधिक प्रतिकार करू शकत होते; त्यांचा मृत्युदर 30 ते 80 टक्के या दरम्यान होता. तरीही, संकलित कानातील मळाचा चाचणीमधील सर्व 10 प्रकारच्या जीवाणूंवर विनाशकारी परिणाम झाला.

2011 साली जर्मनीत झालेल्या एका अभ्यासातही असाच परिणाम दिसून आला. त्या प्रयोगात कानाच्या मळातील 10 पेप्टाइड सापडले, ते जीवाणू व बुरशी यांच्या वाढीला प्रतिबंध करण्याची क्षमता राखून होते. कानाच्या मळावर आधारलेली बचावयंत्रणा प्रभावहीन झाली की, कर्णनलिकेतील बाहेरच्या भागात संसर्ग होतो, असं प्रतिपादन संशोधकांनी केलं.

परंतु, कॅनरी आयलँड्समधील ला लगुना विद्यापीठाने 2000 साली केलेल्या अभ्यासानुसार याच्या विरोधी निष्कर्ष निघाले. Staph या जीवाणूच्या एका प्रकारावर कानातील मळाचा काहीच परिणाम झाला नाही आणि बहुतांश वेळा कानातील मळ जीवाणूंच्या वाढीला चालनाच देत असल्याचं दिसून आलं- यामध्ये E. coli या जीवाणूचाही समावेश होता.

या जीवाणूतून मिळणाऱ्या प्रचंड पोषक द्रवामुळे हे घडत असावं, असा अंदाज वर्तवण्यात आला. कानातील मळ सूक्ष्मजीवांना मारतो, यावर साशंकता व्यक्त करणारा हा केवळ एक अभ्यास नाही.

या व इतर अभ्यासांमधून समोर आलेल्या पूर्णतः भिन्न निष्कर्षांवर एक गोष्ट प्रकाश टाकू शकते. 1980 व 2011 साली झालेल्या अभ्यासांमध्ये कोरडा कर्णमळ असलेल्या लोकांच्या कानातून नमुने घेण्यात आले, तर 2000 साली झालेल्या अभ्यासात ओलसर मळावर लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं.

कानातील मळ जीवाणूविरोधी आहे ही लोकसमजूत सदर भिन्नत्वामुळे अधोरेखित होते का, हे यावरून अजिबातच स्पष्ट होत नाही, पण हे गृहितक गोंधळात टाकणारं आहे, कारण हे दोन प्रकारचे नमुने मूलतः सारख्या घटकांपासून बनलेले असतात. पण त्यांचे घटक सारखे असले तरी हे पदार्थ दोन भिन्न प्रकारचे असतात, हे मला पहिल्यांदा कळलं तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला होता. तुम्ही तुमच्या कोणा मित्रमैत्रिणीच्या कानात गुपचूप पाहिलंत तर तुम्हालाही आश्चर्यच वाटेल. तर, आता आधीच खुलासा करून टाकतो: माझ्या कानातला मळ ओलसर आहे.

तुमच्या कानातला मळ कोरडा असेल की ओलसर हे जनुकीय पातळीवर निर्धारित होत असतं, आणि हे सगळंच शेवटी एका जनुकातल्या एका अक्षरावर ठरतं. या जनुकाला ABCC11 असं म्हणतात आणि यात G ऐवजी A असेल तर तुमच्या कानातील मळ कोरडा असतो (या दोन भिन्न प्रकारच्या कर्णमळांचा वासही वेगळा येतो). मेन्डेली वारशाचं हे एक दुर्मीळ उदाहरण आहे. ओलसर कर्णमळ प्रामुख्याने आढळतो.

हा आकृतिबंध इतका निर्धारणक्षम आहे की, प्राचीन मानवी स्थलांतरांच्या आकृतिबंधांचा मागोवा त्यातून घेता येतो. कॉकेशियन किंवा आफ्रिकी वंशाच्या लोकांच्या कानातील मळ ओलसर असण्याची जास्त शक्यता असते, तर पूर्व आशियाई लोकांच्या कानातील मळ कोरडा असण्याची शक्यता जास्त असते. पॅसिफिक बेटं, मध्य आशिया व आग्नेय आशिया, आणि देशी अमेरिकी व इनुट या लोकांमध्ये कानाचा मळ ओला वा कोरडा असण्याचं प्रमाण अधिक समतोल दिसतं.

पण आपल्यापैकी बहुतेकांना कानातील मळ काढायचा कसा, याची चिंता लागून राहिलेली असते. किमान इसवीसनाच्या पहिल्या शतकापासून मानवतेला ही चिंता सतावताना दिसते. 'दे मेडिसिना' या पुस्तकामध्ये रोमन ऑलस कॉर्नेलिअस सेल्सस याने कानात साठलेला मळ काढायचे काही उपाय सुचवले आहेत.

"खपली (बहुधा कोरड्या मळाला उद्देशून ते बोलत असावेत) काढायची असेल तर गरम तेल कानात ओतावं किंवा हिरवा गंज मधात किंवा लीकच्या रसात मिसळावा किंवा थोडा सोडा मधात मिसळावा आणि कानात ओतावा." आउच! एकदा का मळ सुटा झाला की पाण्याने तो बाहेर काढता येईल. पण "आत मेण (इथे बहुधा ते कोरड्या मळाला उद्देशून बोलत असावेत) असेल, तर थोडासा सोडा असलेलं व्हिनेगार कानात ओतावं, मग मेण थोडं मऊ झाल्यावर कान धुवून घ्यावेत," असं सेल्सस सुचवतो.

"व्हिनेगार व लॉरेलचं तेल यांच्यात मिसळलेलं कॅस्टोरियम आणि कच्च्या मुळ्याच्या कंदाच्या रसात किंवा काकडीच्या रसात चुरलेल्या गुलाबाची पानं मिसळून हे रसायन कानात पिचकारीने मारावं. कच्च्या द्राक्षांचा रस गुलाबाच्या तेलामध्ये मिसळून कानात टाकला तर बहिरेपणावर बऱ्यापैकी उपाय होऊ शकेल," असंही ते सुचवतात.

हे सगळं अचाट वाटत असलं, तरी आजही डॉक्टर बदामाचं तेल किंवा ऑलिव्ह तेल वापरून कानातला मळ मऊ करून घेतात आणि मग काढायचा प्रयत्न करतात.

काही लोकांना खरोखरच कानाच्या मळाशी संबंधित अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यात डॉक्टरांना हस्तक्षेप करावा लागतो, हे सत्य आहे. 2004 सालच्या एका विश्लेषणानुसार, दर वर्षी युनायटेड किंगडममधील सुमारे 23 लाख लोक अशा समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातात, आणि वर्षाकाठी सुमारे 40 लाख कानांवर उपचार केले जातात.

वृद्ध व्यक्ती, मुलं आणि अध्ययनविषयक अडचणी येणाऱ्या लोकांना कानातील मळासंबंधीच्या समस्यांना अधिक सामोरं जावं लागतं. यातून बहिरेपणा येऊ शकतोच, शिवाय, समाजापासून तुटलेपणा येणं आणि अंधुक भ्रमिष्टपणा येणं, असेही परिणाम दिसतात. "कर्णमळाशी संबंधित समस्याग्रस्त रुग्णांपैकी काहींच्या कानाच्या पडद्यांना छिद्र आढळतं." पण सेरुमेन हा पदार्थ स्वतःहून असं छिद्र पाडू शकत नाही, त्यामुळे संबंधित लोकांनी स्वतःच मळ काढण्याच्या प्रयत्नात अशी छिद्रं पाडलेली असण्याची शक्यता जास्त असते.

कापसाचे बोळे वापरण्यातील धोके खूप जास्त असतात, त्यामुळे कुशल डॉक्टरसुद्धा बहुतांशाने मळ मऊ करणाऱ्या पदार्थांवर अवलंबून राहतात, आणि मग मळ बाहेर काढतात. पण कानातील मळ मऊ करणारा सर्वांत प्रभावी पदार्थ कोणता, किंवा मुळात अशा रितीने मळ काढणं कितपत योग्य आहे, याबद्दल वैद्यकीय क्षेत्रात एकमत नाही.

युनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटू मेडिकल स्कूलमधील संशोधक अंजली वैद्य आणि डायना जे. मॅडलोन-के यांनी 2012 साली असा निष्कर्ष काढला की, कानातील मळ मऊ करणारे घटक, मग मळ काढणं किंवा हाताने मळ काढण्याच्या इतर पद्धती, हे सगळंच व्यवहार्य आहे, पण यातील कोणतीच एक पद्धत इतरांहून अधिक चांगली, अधिक सुरक्षित किंवा अधिक परिणामकारक सिद्ध झालेली नाही.

पण या प्रक्रिया व्यावसायिक तज्ज्ञांच्या अखत्यारितल्या आहेत. कापूस लावलेल्या काड्या कानात खुपसणं कितीही धोकादायक असलं, तरी काही लोक तसं करतच राहतात. अशा प्रकारे मळ काढायचा प्रयत्न करू नये, असं डॉक्टरदेखील सांगतात.

जोर लावून अशा काडीने कानात घासलं, तर कानाच्या पडद्याला छिद्रं पडण्याचा धोका असतो आणि मळही जास्त आत जाऊ शकतो. काही वेळा काडीला लावलेला कापूस आत पडू शकतो, आणि कर्णनलिकेतच अडकू शकतो. यातून एकच धडा घेता येईल: कापूस लावलेल्या काड्या म्हणजेच इअर-बड वापरत जाऊ नका (किंवा किमान त्या काड्या कर्णनलिकेपासून सुरक्षित अंतरावर ठेवत जा).

'इअर कॅँडलिंग' नावाची एक उपचारपद्धतीही वापरली जाते, तिच्या नादाला तर कधीही लागू नये. या पद्धतीमध्ये मधाच्या पोळ्यातील मध किंवा पॅराफिन यांनी तयार केलेल्या पोकळ मेणबत्त्या कानाजवळ धरून पेटवल्या जातात. रिकाम्या मेणबत्तीमधील उष्णतेमुळे कानातील मळ नलिकेतून बाहेर येईल, आणि मग तो सहज काढता येईल, अशी यामागची कल्पना आहे.

हे तुम्हाला मूर्खपणाचं वाटत असेल, तर तुम्हाला वाटतंय ते योग्य आहे. अशा पद्धतीने मळ बाहेर येतो, असं म्हणायला कोणताही आधार नाही. उलट, पेटत्या मेणबत्तीचं मेण कानांच्या पडद्यावर पडून प्रचंड वेदना होण्याची शक्यता असते, याचे मात्र अनेक पुरावे सापडतात. त्यामुळे असलं काही करणं टाळावंच. तेवढे सावध राहा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)