तोंडाला घाण वास येतोय? आधी 'हे' 4 गैरसमज दूर करा

    • Author, क्लॉडिया हेमंड
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अनेक वर्षांपूर्वी मी जेव्हा रेडियोसाठी काम सुरू केलं तेव्हा एके दिवशी मला माझ्या सहकाऱ्याने एक असाईनमेंट दिली होती. तोडांच्या दुर्गंधीवर उपचार करणाऱ्या एका क्लीनिकमध्ये मला जायचं होतं. माझ्याही तोंडाला घाण वास येतो का हे पाहायचं आणि तिथल्या डॉक्टरचा इंटरव्ह्यू करायचा.

तिकडे जाताना रस्ताभर मी विचार करत होते ही खरीखुरी असाईनमेंट आहे की माझे सहकारी आडून आडून मला काही सांगू पाहात होते?

सुदैवाने माझ्या तोंडाचा घाणेरडा वास वगैरे येत नव्हता, पण तोंडाला दुर्गंधी येणं ही अतिशय सामान्य समस्या आहे. दुर्दैवाने त्याभोवती गैरसमज भरपूर आहेत, त्यामुळे त्यावर वेळेवर उपचार करता येत नाहीत.

तुमच्याही तोंडाला दुर्गंधी येत असेल तर आधी हे गैरसमज दूर करा.

1. तुम्ही तुमच्या ओंजळीत श्वास सोडला तर तुमचं तुम्हालाच कळतं की तुमच्या तोंडाचा वास येतोय की नाही

तुमच्या तोंडाचा वास येतो आहे की नाही हे या पद्धतीने ओळखण्यात एक समस्या अशी आहे की तुम्ही ओंजळीत सोडलेला उच्छवास तुम्ही एरवी बोलताना जो उच्छवास सोडता त्यासारखा नसतो.

एरव्ही बोलताना ज्या वेगात श्वासाद्वारे हवा बाहेर फेकली जाते तशी ओंजळीत सोडलेल्या उच्छावासात सोडली जात नाही.

त्यामुळे तुम्ही ओंजळीत उच्छवास सोडून आपल्या तोंडाचा वास येतोय की नाही हे जाणण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला नक्की कळणार नाही, कारण तुमच्या जीभेच्या मागच्या भागात जे वायू तयार होतात ते यावेळी बाहेर पडत नाहीत.

तुमच्या जीभेच्या मागच्या भागात तयार होणारे वायूच तुमच्या तोंडाच्या दुर्गंधीला कारणीभूत असतात.

तुमच्या तोंडाची दुर्गंधी येतेय की नाही हे ओळखण्याचे डॉक्टरांकडे काही मार्ग आहेत.

एक म्हणजे डॉक्टरच्या नाकापासून पाच सेमी अंतरावर पेशंटला श्वास सोडायला सांगायचा. दुसरं म्हणजे पेशंटच्या जीभेवरच्या थर खरवडून त्याचं परीक्षण करायचं, तिसरं दाताच्या मागे फ्लॉस घासून त्याचं परीक्षण करायचं आणि चौथं म्हणजे पेशंटची पेट्री डिशमध्ये काढून पाच मिनिटं 37 अंश सेल्सियस तापमान असलेल्या इन्क्युबेटरमध्ये ठेवायची आणि मग तिचं परीक्षण करायचं.

तोंडाची दुर्गंधी येण्याच्या आजाराता हेलिटोसीस असं म्हणतात. अनेकांचा वाटतं की आपल्या तोंडाचा घाण वास येतो पण प्रत्येक वेळी तसं असेलच असं नाही.

लोकसंख्येच्या साधारण किती टक्के लोकांना हेलिटोसिसचा त्रास आहे हे सांगणं अवघड आहे. पण साधारण 22 ते 50 टक्के लोक समस्येमुळे त्रस्त आहेत.

2. जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर तुम्हाला काहीतरी आजार आहे

बहुतांश वेळा तोंडाला येणारी दुर्गंधी ही तोंडात तयार होणाऱ्या सल्फर आणि इतर वायूंमुळे येत असते. हायड्रोजन सल्फाईड आपल्या तोंडात तयार होतं आणि त्याचा वास सडक्या अंड्यासारखा येतो.

दुसरा एक वायू म्हणजे इथिल मार्सप्टन. याचा वास सडक्या कोबीसारखा येतो. अनेकदा लोकांच्या लघवीलाही उग्र वास येतो त्याच कारण हाच वायू असतो.

हे वायू किंवा इतर बॅक्टेरिया आपण काही खाल्ल्यानंतर जीभेच्या मागच्या बाजूला साठतात. त्यामुळे दुर्गंधी येते.

पण ही दुर्गंधी तात्पुरती असते. कदाचित तुम्ही कांदा-लसूण खाल्ला असेल, सिगरेट प्यायली असेल.

अनेकदा तुमच्या तोंडाला येणाऱ्या वासाचं कारण दातांच्या समस्याही असू शकतात. कदाचित तुमच्या हिरड्यांना सूज आलेली असू शकते, त्यांना इन्फेक्शन झालेलं असू शकतं किंवा तुमच्या जीभेवर थर जमलेला असू शकतो.

अनेकांचा असा गैरसमज असतो की तुमच्या तोडांची खूप दुर्गंधी येत असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळा, गंभीर आजार झालेला आहे.

कान-नाक-घसा, किडनी, फुफ्फुसं, आतडी अशा ठिकाणी काहीतरी बिघडलंय आणि म्हणून तुमच्या तोंडाचा वास येतोय.

पण हे लक्षात घ्यायला हवं की जर या अवयवांचा कुठला गंभीर आजार असेल तर फक्त तोंडाचा वास येणं हे एकमेव लक्षण असणार नाही.

3. माऊथवॉश वापरल्याने तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते

लोकांना वाटलं की आपल्या तोंडाचा वास येतोय तर ते माऊशवॉश वापरतात. त्यात अनेक फ्लेवर असतात पण लोकांची पसंती पुदिना किंवा लवंग फ्लेवरला असते.

माऊथवॉश तुमच्या तोंडाला येणारी दुर्गंधी काही काळासाठी झाकतात.

अनेक माऊथवॉश अँटीसेप्टीक असतात ज्यामुळे तोंडातले बॅक्टेरिया मरतात. हेच बॅक्टेरिया तोंडाला येणाऱ्या वासासाठी कारणीभूत असतात.

पण माऊशवॉश सतत वापरावा का याबद्दल तज्ज्ञांमध्ये वाद आहेत. कारण माऊथवॉशमध्ये अल्प प्रमाणात अल्कोहोल असतं.

अल्कोहोल तुमच्या शरीराला डिहायड्रेट करतं म्हणजेच शरीरातलं पाणी कमी करतं. तुमच्या शरीरातलं पाणी कमी झालं की तुमच्या तोंडाचा अधिकच वास येतो.

दुसरा पर्याय असा असू शकतो ती जीभ स्वच्छ करणारे टंग क्लीनर वापरून तुम्ही जीभेवर साठलेला थर स्वच्छ करू शकता. पण युकेतल्या कोच्रेन रिव्ह्यू या शास्त्रीय मासिकात या पद्धतीबद्दलचं सर्वेक्षण प्रसिद्ध झालं आहे आणि त्यानुसार याचे परिणाम दीर्घकाळ टिकत नाहीत.

यात तुमच्या जीभेला इजा होण्याचाही धोका असतो. त्यामुळे तुम्ही टंग क्लीनरने जीभ स्वच्छ करताना काळजी घेतली पाहिजे आणि जर तुम्ही त्यासाठी टूथब्रश वापरत असाल तर तो मऊ असेल याची काळजी घ्या.

4. तोंडातले बॅक्टेरिया वाईट असतात

हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. प्रत्येक माणसाच्या तोंडात 100-200 प्रकारच्या बॅक्टेरियाचे हजारो गट असतात.

मानवी शरीरात लाखो वर्षांपासून वास करत असलेल्या या बॅक्टेरियांनी माणसाच्या आयुष्यात आणि आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे तोंडातून सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया काढून टाकले तर त्याचे फायदे होण्यापेक्षा तोटा होण्याचाच धोका जास्त आहे.

शास्त्रज्ञ सध्या काही ठरविक प्रकारचे बॅक्टेरिया नष्ट करून इतर महत्त्वाचे बॅक्टेरिया तोंडातच कसे राहतील यावर संशोधन करत आहेत.

याच्या फेज 1 आणि फेज 2 च्या चाचण्यांमध्ये दाताला कीड लावणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करण्यात यश आलेलं आहे. पण आता दवाखान्यात टेस्ट करण्यापेक्षा लोकांना घरी नेऊन वापरता येतील अशी उत्पादनं बनवण्यावर शास्त्रज्ञांचा भर आहे.

तुम्ही दिवसातून दोनदा दात काळजीपूर्वक घासा, भरपूर पाणी प्या, सिगरेट पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, चौरस आहार घ्या, सतत तोंडाला दुर्गंधी येत असेल तर डेंटिस्टला भेटा. तुम्हाला कदाचित हिरड्यांचा आजार असू शकतो, असा सल्ला डॉक्टर देतात.

दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याने तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर होण्यात मदत होते, तसंच डिहायड्रेशनही होत नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, आणि वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)