रोज सकाळी नाश्ता केल्याने वजन जास्त वाढतं का?

घरून निघताना काहीतरी खाऊन निघावं, असं आई आवर्जून सांगत असते. म्हणून सकाळी सकाळी पोटभर जेवण नसलं तरी थोडे पोहे, उपमा किंवा तत्सम नाश्ता करूनच आपण बाहेर पडतो.

अशा सकाळच्या नाश्त्याचे अनेक फायदे असतातच, असं मानलं जातं. तज्ज्ञांच्या मते सकाळच्या नाश्त्यात कॅल्शियम आणि फायबर या घटकांचं अधिक प्रमाण असतं. नाश्ता केल्यानं एकाग्रता वाढण्यास मदत होते. मुलांना खासकरून सकाळच्या नाश्त्याचा भरपूर फायदा होतो.

नाश्त्यामधून तुम्हाला उर्जा आणि आवश्यक पोषकतत्त्वं मिळतात. तसंच तुम्हाला सारखं खाण्याची गरज भासत नाही. आतापर्यंतच्या अनेक संशोधनांमधून असंच दिसून आलंय की सकाळी नाश्ता केल्यानं तुम्ही ठणठणीत राहता.

पण वजन कमी करायचं असेल तर नाश्ता फायद्याचा ठरतो का?

एका ताज्या संशोधनानुसार या प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे.

आपण जेव्हा पोटभर नाश्ता करतो तेव्हा साधारण 260 कॅलरीज सेवन करतो. त्यामुळे नियमितपणे सकाळी नाश्ता करणाऱ्या लोकांचं वजन हे नाश्ता न करणाऱ्या लोकांपेक्षा अर्धा किलोनं अधिक वाढतं, असं ऑस्ट्रेलियातल्यात करण्यात आलेल्या या नव्या संशोधनातून दिसून आलं आहे.

सकाळचा नाश्ता आणि वजन वाढ याविषयी इथे 13 वेगवेगळ्या चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये सकाळचा नाश्ता नाही केला तर वजन कमी ठेवण्यात फायदा होतो, असं मेलबर्नमधल्या मोनाश विद्यापीठातल्या संशोधकांचा दावा आहे.

सकाळी नाश्ता नाही केला तर दिवसभरात घेतल्या जाणाऱ्या एकूण कॅलरीच प्रमाण कमी केलं जाऊ शकतं. तसंच दुपारी कमी भूक लागते, असं या संशोधकांनी दावा केला आहे.

पण या संशोधनाच्या काही मर्यादा आहेत. वयस्कर लोकांनी वजन घटवण्यासाठी हा सल्ला पाळण्याआधी काळजी घ्यायला हवी, कारण त्याचा त्यांच्यावर विपरित परिणाम होऊ शकतो, असंही या संशोधकांनी स्पष्ट केलं आहे.

पौष्टिक नाश्ता कसा असतो?

ऊर्जेसाठी गव्हापासून बनलेली ब्रेड आणि मोड आलेले कडधान्य, प्रोटीनसाठी ब्रेड-ऑम्लेट, फळं, सुका मेवा, दही खाऊ शकता. हलकं-फुलकं खायचं असेल तर फळं, केळ, पालक, ब्रेड खाऊ शकता.

या संशोधनात भाग घेणाऱ्या लोकांच्या खाण्यापिण्यावर साधारण 2 ते 16 आठवडे लक्ष ठेवण्यात आलं होतं. नाश्ता करणारे आणि न करणारे यांनी सेवन केलेल्या कॅलरीजचं अंतर फारच कमी होतं.

ठोस निष्कर्ष काढण्यासाठी अजून काळ संशोधन करावं लागेल, असं संशोधकांचं मत आहे.

सकाळी कमी नाश्ता करावा का?

आपण सकाळी कमी कॅलरीज सेवन करायला पाहिजे, असं किंग्ज कॉलेज लंडनचे आहारतज्ज्ञ प्रा. केव्हिन वेलन सांगतात.

"या संशोधनाचा निष्कर्श असा नाहीये की सकाळी नाश्ता करणं चुकीचं आहे," ते सांगतात. "सकाळी दूध प्यायल्याने किंवा जेवण केल्याने आपल्याला पोषक तत्त्वे म्हणजे कॅल्शियम आणि फायबर मिळतात."

पण या संशोधनात याबद्दल वाच्यता होत नाही. "सकाळच्या नाश्त्याने वजन वाढतं, असं या संशोधनाचा निष्कर्ष मुळीच नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)