You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
New Year Resolution 2024 : नवीन वर्षाचे संकल्प सिद्धीस नेण्यासाठी 'या' 5 गोष्टी लक्षात ठेवा
नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. अनेकांच्या नववर्षाच्या संकल्पांची यादीही तयार झाली असेल.
व्यायाम करायचा, पैशांची गुंतवणूक, एखादा नवीन छंद जोपासायचा किंवा आपली एखादी वाईट सवय कायमची सोडायची...अशी कोणतीही गोष्ट यावर्षी करायचीच म्हणून ठरवलं जातं.
पण बऱ्याचदा हे संकल्प पूर्ण होत नाहीत आणि वर्षाअखेरीस केवळ विनोदाचे विषय बनतात. या विनोदांमध्ये तथ्यही असतं. हे आम्ही नाही म्हणत, तर आकडेवारीवरून सिद्ध होतंय.
केवळ 8 टक्के लोक त्यांचे नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण करण्यात यशस्वी ठरतात. 2019 मध्ये स्क्रँटन विद्यापीठाच्या अभ्यासातून हा निष्कर्ष समोर आला आहे. 'स्टॅटिस्टिक ब्रेन'नं या सर्व निष्कर्षांचं एकत्रीकरण केलं आहे.
आपला संकल्प निष्ठेनं पूर्ण करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये आपला समावेश व्हावा, असं तुम्हाला वाटत असेल तर पाच साध्या-सोप्या गोष्टी लक्षात ठेवा.
1. छोटी सुरुवात
वास्तववादी उद्दिष्ट समोर ठेवून प्रयत्न केले तर यश मिळण्याची शक्यता नेहमी वाढते. आपण बऱ्याचदा स्वतःकडून खूप मोठमोठ्या अपेक्षा ठेवतो.
"नवीन वर्षात आपला एकदम कायापालट होणार आहे आणि आपण सगळं काही करू शकतो अशा भ्रमात राहून संकल्प केले जातात," असं निरीक्षण मनोचिकित्सक राचेल विनस्टेन यांनी नोंदवलं. याउलट छोटी, छोटी उद्दिष्टं समोर ठेवून पूर्ण केली तर तुमचा उत्साह वाढतो.
उदाहरणार्थ- यावर्षी मी मॅरेथॉन धावेन असा संकल्प करण्यापेक्षा शूज खरेदी करुन रोज थोडं थोडं अंतर धावायला सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला स्वयंपाक करायला आवडत असेल, तर सुरुवातीला तुम्ही स्वयंपाकघरात मोठ्यांना मदत करा.
नंतर हळूहळू आपलं पाककौशल्य वाढवण्यासाठी आठवड्यातून एकदा पूर्ण जेवण बनवा. छोटं लक्ष्य समोर ठेवून दीर्घकालीन फायदे मिळवणं हीच तर संकल्प करण्यामागची भूमिका असते.
2. स्पष्टता असू द्या
आपण आपली उद्दिष्टं तर ठरवतो, पण त्याची अंमलबजावणी कशी करायची याचा मात्र विचार करत नाही. संकल्प पूर्ण कसा करायचा, याचा तपशीलवार विचार करणं महत्त्वाचं असतं.
"मी यावर्षी नियमितपणे जीमला जाईन असं म्हणण्यापेक्षा मी मंगळवारी दुपारी आणि शनिवारी सकाळी जीमला जाईन," असं ठरवणं जास्त योग्य असल्याचं मत ऑक्सफर्ड विद्यापीठातील प्राध्यापक नील लेव्ही यांनी व्यक्त केलं.
3. इतरांनाही सामावून घ्या
आपल्या उद्दिष्टांमध्ये इतरांना सामावून घेतलं तर संकल्प सिद्धीसाठी प्रेरणा मिळते. आपल्या मित्रासोबत न चुकता वर्गात उपस्थित राहण्याचा संकल्प केला तर एकाला दोघं मिळून ठरवलेली गोष्ट तडीस नेता येते. संकल्प सिद्धीमध्ये सामाजिक बांधिलकीचा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो.
"आपल्या संकल्पाशी इतरही लोक जोडले आहेत, याचा विचार केला तर आपण अधिक जबाबदारीनं ठरवलेली गोष्ट पार पाडतो," असं मत वॉर्विक विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. जॉन मायकल यांनी म्हटलं. त्यामुळंच तुम्ही ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्यासाठी इतरांनाही त्यामध्ये सहभागी करून घ्या, असं ते सांगतात.
4. अपयशावर मात करा
जेव्हा एखादी गोष्ट करणं अवघड जात असेल तर थोडंसं थांबा, तुमच्या उद्दिष्टांचं नव्यानं मूल्यमापन करा. आपल्याला नेमके काय अडथळे आले? त्यावर मात करण्यासाठी कोणता मार्ग अधिक परिणामकारक ठरेल?
कितीही अवघड असला तरी आपल्या संकल्पांवर ठाम रहायचं असेल तर तुमची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी नवनवीन पर्यायांचा अवलंब करा. अगदी छोटंसं यशही मस्त सेलिब्रेट करायला शिका.
'केवळ आरोग्यदायक खाणंच खाईन,' असा जर तुमचा संकल्प असेल तर तुम्ही आहारातून कार्बोहायड्रेट्स कमी करण्यापासून सुरुवात करु शकता. मग तुम्हाला ब्रेड किंवा व्हाईट पास्ता आहारातून बाद करावा लागेल. अशारीतीने टप्प्याटप्प्यानं आहारात बदल करता येतील.
5. दीर्घकालीन उद्दिष्टांशी संकल्पांची सांगड घाला
"अतिमहत्त्वाकांक्षी आणि संदिग्ध संकल्प करण्यापेक्षा भविष्यातली आपली उद्दिष्टं काय आहेत याचा विचार करून नवीन वर्षाचे संकल्प करावेत," असं वर्तन मनोचिकित्सक डॉ. अॅन स्विनबोर्न यांनी सांगितलं.
म्हणजे तुम्हाला खेळात काही रस नसेल तर मी उत्तम धावपटू बनून दाखवेन असा संकल्प करण्यात काहीच अर्थ नाही. "अशावेळी केवळ इच्छाशक्तीवर विसंबून काहीच होत नाही," असंही स्विनबोर्न म्हणतात. त्यामुळेच तुमच्या आवडीनिवडी आणि करीअरचा विचार करुन संकल्प करणं केव्हाही चांगलं!
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)