रशियाची प्रसारमाध्यमं पुतिनला देशाचे तारणहार म्हणून का दाखवत आहेत?

    • Author, एड रॉबिन्सन
    • Role, बीबीसी मॉनिटरिंग

रशियाच्या प्रसारमाध्यमांमध्ये गेली अनेक वर्षं राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं वर्णन 'दबंग नेता' म्हणून केलं जातं. रशियाला पाश्चिमात्य देशांच्या आक्रमणापासून ते वाचवतात. मात्र आता रशियाच्या प्रसारमाध्यमांचं धोरण बदलल्याचं जाणवत आहे. कारण आता पुतिन हे रशियाचे मसीहा आहेत असा पवित्रा रशियन प्रसारमाध्यमांनी घेतला आहे.

रशियात यावर्षी मार्च महिन्यात राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुका आहेत. अशा वातावरणात सरकारी टेलिव्हिजन चॅनल त्यांच्या वृत्तांकनाला धार्मिक मुलामा देत पुतिन यांची प्रतिमा मसीहा अर्थात तारणहार म्हणून नागरिकांसमोर निर्माण करत आहेत. असा मसीहा ज्यानं रशियाला परकीय शक्तींपासून थोपवलं आहे आणि देशाला प्रगतीपथावर नेलं आहे.

या मोहिमेचाच भाग म्हणून रशियातल्या सगळ्यांत मोठ्या सरकारी चॅनल असलेल्या 'रोसिया 1' वर डॉक्युमेंटरी दाखवण्यात येत आहे. रशियाच्या उत्तरेला असलेल्या झील लादोगाजवळच्या एका बेटावर वलाम नावाचा मठ डॉक्युमेंटरीचा मुख्य विषय आहे. पुतिन यांचं अत्यंत आवडतं ठिकाण म्हणून या जागेचा उल्लेख केला जातो.

अनेक वर्षं बंद राहिल्यानं आणि काहीही देखभाल झाली नसल्यानं हा मठ सोव्हियत सरकारच्या काळात उद्ध्वस्त धर्मशाळेसारखा झाला होता. डॉक्युमेंटरीनुसार सोव्हियत संघाच्या विघटनानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या पुढाकारानं या मठाचा जीर्णोद्धार करण्यात आला.

वलाम म्हणजे रशियाचं प्रतीक असल्याचं डॉक्युमेंटरीमध्ये वारंवार सांगण्यात येतं.

1917 मध्ये झालेल्या ऑक्टोबर क्रांतीनंतर या मठाची दुरवस्था झाली होती. मात्र पुतिन यांच्या प्रयत्नांमुळे या मठाचा जीर्णोद्धार करण्यात आला. रशियाच्या प्रगतीचं हे द्योतक असल्याचं मानलं जातं.

डॉक्युमेंटरीमधील एका दृश्यात पुतिन या मठाला भेट देताना दिसतात. त्यावेळी व्हॉइसओव्हर सुरू होतो. "ज्यावेळी महान रशियाचं विघटन करण्यात आलं, त्यावेळी वलाम नामशेष झालं. मात्र वलामची पुनर्उभारणी करण्यात आली आणि रशियाचं पुनरुत्थान झालं."

पुनर्जन्म

या बेटांवर राष्ट्राध्यक्षांच्या दौऱ्याकडे दैवी घटना म्हणून पाहिलं जातं. संगीताच्या जोडीने आवाज ऐकू येतो. "इथे एक नाव येऊन थांबली आणि पुतिन यांचं दर्शन झालं."

मठाचे प्रमुख बिशप पैन्क्रांती यांनी पुतिन यांच्या वलाम भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. आयुष्याच्या संध्याकाळी निवृत्तीपश्चात आयुष्य जगणाऱ्या एका महिलेसाठी राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची वलाम भेट अनोखी होती. पुतिन यांची भेट स्वप्न नव्हे तर सत्य होतं. जंगलाच्या मधोमध असलेल्या या पवित्र स्थानाचं स्थानमहात्म्य वाढेल, असं नूतनीकरण करण्यात येईल, अशी घोषणा पुतिन यांनी केली.

उद्ध्वस्त झालेल्या या मठाचं रूपडं पालटून पवित्र धर्मस्थळ म्हणून कसं विकसित करण्यात आलं, यावर डॉक्युमेंटरीत वारंवार भर देण्यात आला आहे. नव्वदीच्या दशकात रशियात असलेला तणाव दूर करून राष्ट्रसन्मान जोपासण्यात या मठाची भूमिका निर्णायक असल्याचं डॉक्युमेंटरीत दाखवण्यात आलं आहे.

पुतिन यांच्या कार्यकाळात सोव्हियत संघाचं नास्तिकतेकडून श्रद्धेय, असं परिवर्तन झालं ही गोष्ट डॉक्युमेंटरीत वारंवार नमूद करण्यात आली आहे. सोव्हियतच्या विघटनापूर्वी रशिया एक शक्तिशाली देश होता, असं मानणाऱ्यांचा एक गट होता.

रशियन क्रांतीनंतर अस्तित्वात असलेल्या धार्मिक परंपरांचा सन्मान करणाऱ्या लोकांचा एक गट होता. या दोन्ही गटांमध्ये समन्वय घडवून आणण्याचं काम पुतिन यांनी केलं.

या डॉक्युमेंटरीत पुतिन या मठाची महती सांगताना दिसतात. "रशियासाठीच्या अत्यंत वाईट अशा कालखंडातही या मठामुळे सलोखा प्रस्थापित होऊ शकला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हियत सेनेने या मठात काम करणाऱ्या पुजाऱ्यांना मठ सोडण्यापूर्वी पवित्र गोष्टी त्यांच्याबरोबर नेण्याची अनुमती दिली होती," असं पुतिन आवर्जून सांगतात.

"साम्यवाद आणि ख्रिश्चन धर्मांत यांच्यात खूप साम्य आहे. बोल्शेव्हिक क्रांतीचे नेते व्लादिमीर लेनिन यांची तुलना ते ख्रिश्चन धर्मातल्या चर्चच्या पवित्र अवशेषांची करतात."

पाचवा स्तंभ

याच विषयाशी निगडीत आणखी एक डॉक्युमेंटरी सरकारी टेलीव्हिजन चॅनेलवर दाखवण्यात आली. या डॉक्युमेंटरीतही पुतिन यांचं वर्णन रशियाचे तारणहार म्हणून करण्यात आलं होतं.

सोव्हियतच्या विघटनापूर्वी रशिया एक शक्तिशाली देश होता असं मानणाऱ्यांचा एक गट होता. रशियन क्रांतीनंतर अस्तित्वात असलेल्या धार्मिक परंपराचा सन्मान करणाऱ्या लोकांचा एक गट होता. दोन्ही गटांच्या समन्वयात पुतिन निर्णायक ठरले, असं याही डॉक्युमेंटरीत दाखवण्यात आलं आहे.

रशियात नवीन वर्षाच्या सुट्ट्यांदरम्यान सरकारी टेलीव्हिजन चॅनेल रोसिया 24 वर ज्येष्ठ नेते अलेक्झांडर प्रोखानोव्ह यांनी तयार केलेल्या पाच भागांच्या एका कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात आलं.

"रशियातल्या सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचं अधिष्ठान सत्ताकेंद्र राहिलं आहे. सत्ताकेंद्रानं अनेक ऐतिहासिक संकटांचा सामना केला आहे. मात्र प्रत्येक वेळी दैवी हस्तक्षेपाने रशियाला जीवनदान मिळालं आहे' असा तर्क डॉक्युमेंटरीत मांडण्यात आला आहे.

प्रोखानोव्ह यांच्या म्हणण्यानुसार, "ऑक्टोबर क्रांतीनंतर चमत्काराचं केंद्र जोसेफ स्टॅलिन होते. त्यांनी ताकदवान रशियाची उभारणी केली. हा मुद्दा रेटत स्टॅलिन यांच्याकडून झालेल्या मानवाधिकारांच्या पायमल्ली मुद्याला बाजूला सारण्यात आलं. यानंतर सोव्हियत संघाचं विघटन झालं. विघटनानंतर व्लादिमीर पुतिन देशाचे तारणहार ठरले. पुतिन यांचा कार्यकाळ रशियासाठी सुवर्णकाळ ठरला."

राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक

18 मार्चला रशियात राष्ट्रपती पदासाठी निवडणुका होत आहेत. पुतिन चौथ्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून यावेत, यासाठी डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून क्रेमलिनचे शिस्तबद्ध प्रयत्न सुरू आहेत.

वलामवर डॉक्युमेंटरीची निर्मिती करणाऱ्या मान्यवर पत्रकाराची पुतिन यांच्या प्रवक्तेपदी नियुक्ती होणं, हा निव्वळ योगायोग नक्कीच नाही.

गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तसंच जीवनमान खालावल्यामुळे निर्माण झालेली असंतुष्टता असतानाही रशियाची जनता देशाच्या पुनर्उभारणीच्या भावनिक मुद्यावर एकवटली आहे.

याव्यतिरिक्त सरकारी सर्वेक्षणानुसार पुतिन पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून येतील, असं 80 टक्के नागरिकांना वाटतं.

मात्र सरकारला अद्याप विजयाची खात्री नाही. निवडणुकीत पुतिन यांच्याविरोधात उभे असलेले अलेक्सी नेवलेन्यी यांना एका खटल्यात अपराधी ठरवून निवडणूक लढवण्यापासून रोखलं आहे. अनेकजणांनी हे प्रकरण म्हणजे राजकीय कुभांड असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)