You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
निजामाचे गोडवे गाण्यासाठी इतिहासाचं होणार पुनर्लेखन!
- Author, फैजल मोहम्मद अली
- Role, बीबीसी प्रतिनिधी, हैदराबाद
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव गेले काही दिवस निजामाची तोंड भरभरून स्तुती करताना दिसत आहेत. निजाम आपला राजा असल्याचं ते सांगत आहेत. निजामशाहीबद्दलचे प्रचलित गैरसमज दूर करण्यासाठी इतिहासाचं पुनर्लेखन करायला हवं, असंही ते सांगतात.
भारताला स्वातंत्र्य मिळताच ब्रिटिशांचं राज्य संपुष्टात आलं. त्यावेळी देशभरात अनेक संस्थांनं होती. यापैकीच एक असलेल्या हैदराबादनं स्वतंत्र भारतात विलीनीकरणासाठी नकार दिला.
नवनिर्मित भारताशी या संस्थानानं वैर पत्करलं आणि त्यातून संघर्ष निर्माण झाला. रझाकारांद्वारे झालेल्या हिंसाचारामुळे निजाम हे भारतातल्या वादग्रस्त व्यक्तिमत्वांपैकी एक बनलं.
निजामाबद्दल बोलताना तेलंगणाचे मुख्यमंत्री मात्र गौरवौद्गार काढतात. इंजिनियर आर्थर कॉटन यांचा संदर्भ देत केसीआर विधानसभेत म्हणाले, "कॉटन इंग्लंडचे नागरिक होते. इंग्रजांनीच आपल्याला गुलामगिरीत ढकललं होतं. परंतु आजही आंध्र प्रदेशमध्ये कॉटन आदरणीय आहेत, कारण त्यांनी उभारलेलं धरण."
निजामाचं योगदान
गोदावरी नदीवर धरणाची निर्मिती करण्यात इंजिनियर आर्थर यांची भूमिका या प्रदेशाच्या विकासासाठी निर्णायक ठरली होती. याच धरणामुळे इथल्या परिसरातील शेतीला संजीवनी मिळाली आणि दुष्काळाचा प्रश्न सुटला. उपासमारीचा प्रश्नही त्यामुळेच मार्गी लागला.
मुख्यमंत्री म्हणतात,"निजाम आमचे राजे होते. आपल्या इतिहासाचा ते अविभाज्य घटक आहेत. निजामांनीच निजाम सागरची निर्मिती केली होती. ही गोष्ट आपल्याला कबूल करायला हवी."
निजामाने उभारलेल्या एका रुग्णालयाचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्री म्हणाले, "अनेकांना या रुग्णालयाची माहिती नाही. म्हणूनच आम्ही इतिहास पुन्हा लिहू आणि तेलंगणाच्या लोकांसमोर ठेऊ."
1923 मध्ये गोदावरीची उपनदी असणाऱ्या मंजीरा नदीवर निजाम मीर उसमान अली यांनी प्रचंड धरण बांधलं. या धरणातून मिळणाऱ्या पाण्याच्या बळावर हजारो एकरावर शेती फुलली.
निजामाच्या स्तुतीकरता मुख्यमंत्र्यांना विधानसभेचं व्यासपीठ पुरेसं ठरलं नाही म्हणून ते हल्ली जाहीर कार्यक्रमांमध्येही निजामाचीच स्तुती करताना दिसतात.
एका कार्यक्रमात त्यांनी उल्लेख केला होता की, "मी शेवटचा निजाम मीर उसमान अली खान यांच्या कबरीला भेट दिली. त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी गेलो तर लोक माझ्याविरुद्ध बोलले. लोक माझ्याविरुद्ध बोलले तरी चालेल. तेलंगणाचा स्वतःचा इतिहासच नाही. आहे तो रजाकारांचा आहे. निजाम माझा राजा आहे आणि हा माझा इतिहास आहे."
राजेशाही व्यवस्था
चंद्रशेखर राव यांची वक्तव्यं फक्त राजकारणासाठी असल्याचं असल्याचं तेलंगणा काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष भट्टी विक्रमकारका सांगतात. "सध्याच्या मुख्यमंत्र्यांना असं वाटतं की, निजाम मुस्लिमांचा आदर्श आहे. पण ते विसरतात आहे की, ती राजेशाही व्यवस्था होती ज्यात सामान्य माणसासा सहभाग नव्हता."
काँग्रेसचं म्हणणं आहे की, केसीआर मुस्लिमांसाठी काहीच करू न शकल्याने निजामांची स्तुती करून मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
केसीआर यांचं निजामप्रेम जातीयवादी शक्तींना उत्तेजन देईल, असंही काँग्रेसचं म्हणणं आहे.
सत्तेत कायम राहण्याची अपेक्षा
भाजप नेते सुधाकर शर्मा सांगतात, "निजामाची स्तुती करताना केसीआर विसरतात की, रझाकारांनी अनेक लोकांची कत्तल केली आहे. निजाम मीर उस्मान अली यांचा भारतात सामील होण्याचा इरादा नव्हता. त्यामुळे तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांना पोलीस कारवाई करावी लागली तेव्हा कुठे हैदराबाद भारतात विलीन झाला."
सुधाकर शर्मा म्हणतात, "भाजप मुख्यमंत्र्याच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो."
काही जाणकारांचं म्हणणं आहे की, तेलंगणाचे मुख्यमंत्री आपल्या या निजामाबद्दलच्या वक्तव्यांतून मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसची विरोधाची धार कमी करत आहे आणि त्यांची मुस्लीम मतं हडपण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्याचबरोबर असंही विश्लेषण ऐकायला मिळलं की, यातून बळ मिळेल. पण या प्रदेशात भाजप इतका सक्षम पक्ष नाही, त्यामुळे मोठा फायदा तेलंगणा राष्ट्र समिती म्हणजे चंद्रशेखर राव यांच्या पक्षाला होईल आणि त्यामुळे पुढे सत्तेत राहण्याची त्यांनाच संधी मिळेल.
हैद्राबादचे शेवटचे निजाम कोण?
ब्रिटिशांनी भारत सोडला तेव्हा 562 संस्थांनांपैकी केवळ तीन संस्थानं सोडून इतरांनी स्वतंत्र भारतात विलीन होण्याचा निर्णय घेतला.
काश्मीर, जुनागढ आणि हैदराबाद ही तीन संस्थानं होती. त्यावेळी लोकसंख्या आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीनं हैद्राबाद भारताच्या दृष्टीने सगळ्यात मोठं संस्थान होतं. या संस्थानाच्या ताब्यातल्या भूमीचं क्षेत्रफळ 82698 चौ. फुट होतं. हे क्षेत्र इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या एकूण क्षेत्रफळापेक्षाही जास्त होतं.
निजामानं जिन्नांना संदेश पाठवून भारताविरुद्ध लढाईत ते हैद्राबादची साथ देतील का असा प्रश्न विचारला होता. यावरून निजाम विलीनीकरणाच्या किती विरोधात आहे हे लक्षात येतं.
सरतेशेवटी हैदराबाद संस्थान भारतात विलीन करून घेण्यासाठी भारतीय लष्कराला कारवाई करावी लागली. त्या कारवाईला ऑपरेशन पोलो असं नाव दिलं गेलं. कारण तेव्हा जगात सगळ्यांत जास्त 17 पोलो मैदानं हैदराबादमध्ये होते. पाच दिवसांपेक्षा अधिक काळ सुरू राहिलेल्या कारवाईत 1373 रजाकार मारले गेले. हैदराबाद राज्याचे 807 जवान मारले गेले.
भारतीय लष्करानं 66 जवान गमावले आणि 97 जवान जखमी झाले. भारतीय लष्कराची कारवाई सुरू होण्याच्या दोन दिवसांआधी पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना यांचं निधन झालं होतं.
6 एप्रिल 1886 साली जन्म झालेल्या मीर उस्मान अली खान यांनी हैदराबादवर 1911 ते 1948 पर्यंत राज्य केलं. त्यांचं 24 फेब्रुवारी 1967 रोजी निधन झालं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)