प्रेमाच्या जाळ्यात ओढणारी इस्राईलची महिला गुप्तहेर

    • Author, मानसी दाश
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

इस्राईलची गुप्तहेर संस्था 'मोसाद'च्या त्या गुप्त मोहिमेनं साऱ्या जगाला थक्क केलं होतं. महिला गुप्तहेराच्या मदतीनं राबवलेली ही मोहीम नेमकी होती तरी काय?

1986मध्ये जगभरातल्या वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी छापून आली होती. ही बातमी होती इस्राईलच्या अण्विक कार्यक्रमाची. खरंतर इस्राईलचा अण्विक कार्यक्रम अतिशय गोपनीय होता.

तसं असतानाही ही बातमी फुटली होती. इस्राईलसाठी हे धक्कादायक होतं. इस्राईलकडे इतर कोणत्याही देशांपेक्षा जास्त अण्विक हत्यार आहेत, असं या बातमीत म्हटलं होतं.

आणि ही बातमी पुरवणारा व्यक्ती होता मोर्डेखाई वनुनू. एक इस्राईली नागरिक.

वनुनू यांना पकडण्यासाठी इस्राईलने आखलेली हीच ती योजना होय. या योजनेतील मुख्य भूमिका होती एका महिला गुप्तहेराची. तिचं नाव होतं सिंडी.

वनुनू यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचं आणि लंडनहून बाहेर इतर कुठल्या तरी देशात घेऊन जायचं, अशी योजना आखण्यात आली.

वनुनू यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यांच्यावर इस्राईलमध्ये खटला चालवण्यात आला. आजही वनुनू तुरुंगात आहेत आणि सुटकेच्या आशेवर जगत आहेत.

सिंडीनं वनुनू यांना कसं प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि इस्राईलनं ही मोहीम कशी पूर्ण केली, याची ही कथा.

तंत्रज्ञ ते व्हिसलब्लोअर

इस्राईलच्या बिरशेवाजवळील नेगेवे वाळवंटात असलेल्या डिमोना अणू प्रकल्पात 1976 ते 1985 दरम्यान वनुनू हे तंत्रज्ञ म्हणून काम करत होते. तिथं ते अणूबाँबसाठी लागणारं प्लूटोनिअम बनवायचं काम करत होते.

'न्यूक्लिअर विपन्स अँड नॉनप्रोलिफिरेशनः अ रेफरेंस हँडबूक' या पुस्तकानुसार, त्यांनी 'बेन गुरिऑन युनिवर्सिटी'तून तत्वज्ञानाचा अभ्यास केला होता. त्यावेळी वनुनू यांचं वय 30च्या जवळपास होतं.

त्यानंतर ते पॅलेस्टीनच्या नागरिकांबद्दल संवेदना ठेवणाऱ्या गटांच्या संपर्कात आले, त्यातूनचं ते सुरक्षारक्षकांच्या रडारवर आले.

त्यांना 1985मध्ये नोकरीतून काढून टाकण्यात आलं.

नोकरी सोडण्याआधी त्यांनी डिमोना अण्विक प्रकल्प, हायड्रोजन आणि न्युट्रॉन बाँबची जवळपास 60 फोटो गोपनीयपणे घेतली होती. देश सोडताना त्यांनी हे फोटो आणि त्यांच्या निगेटिव्ह सोबत घेतले होते.

ते आधी ऑस्ट्रेलियात पोहचले आणि तिथं त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

त्यानंतर त्यांनी लंडनस्थित संडे टाइम्सचे पत्रकार पीटर हूनम यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना हे गोपनीय फोटो आणि माहिती पुरवली.

जगात खळबळ उडवणारी बातमी

या माहितीच्या आधारावर 5 ऑक्टोबर 1986ला संडे टाइम्समध्ये 'रीव्हील्ड : द सीक्रेटस् ऑफ इस्राईल न्युक्लिअर आर्सेनल' हे वृत्त प्रसिद्ध झालं. या वृत्ताने जगभरात खळबळ उडाली नसती तरच नवल!

'न्यूक्लिअर विपन्स अँड नॉनप्रोलिफिकेशनः अ रेफरेंस हँडबूक'नुसार इस्राईलजवळ फक्त 10 ते 15 अणूबाँब असावेत, असा अमेरिकन गुप्तहेर एजन्सी CIIचा अंदाज होता.

पण वनुनू यांची माहिती काही वेगळच सांगत होती. इस्राईलने प्लुटोनिअम सेपरेशनची यंत्रणा निर्माण केली असून इस्राईलकडे जवळपास 150 ते 200 अण्वस्त्र असावीत, अशी माहिती या वृत्तामुळे जगापुढे आली होती.

20व्या शतकातील घटनांवर द न्यूयॉर्क टाइम्सने 'पॉलिटिकल सेन्सरशिप' हे पुस्तक प्रसिद्ध केलं होतं. या पुस्तकात या संदर्भात माहिती आहे. यात म्हटलं आहे की वनुनू यांनी दावा केला होता की या गौप्यस्फोटानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल रिगन यांच्यासमोर इस्राईलचे तत्कालिन पंतप्रधान शिमोन पेरेस कधीही त्यांच्या देशाकडे अण्वस्त्र नसल्याचा बनाव करू शकले नाहीत.

संडे टाइम्सला संपूर्ण माहिती देण्यासाठी वनुनू लंडनला पोहचले होते. पण 1986मध्ये लेख छापून येण्याआधीच त्यांना ब्रिटनमधून बाहेर काढून अटक करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आलं होतं.

हे योजना बनवली होती इस्राईलची गुप्तहेर एजन्सी मोसादनं!

'पॉलिटीकल सेन्सरशिप' पुस्तकामध्ये ही माहिती आहे. मोसादने काहीही करून त्यांना लंडनहून इटलीमध्ये आणण्यासाठी एका महिला गुप्तहेराला पाठवलं होतं.

वनुनूसोबत जोरजबरदस्ती न करता त्यांना लंडनमधून बाहेर काढण्याचा त्याचा प्रयत्न होता. ते स्वतःच लंडनमधून बाहेर पडले, असं चित्र निर्माण करण सोईस्कर होतं. भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये, यासाठी ही दक्षता घेणं आवश्यक होतं.

कॉफीचा कप महाग पडला

पीटर हुनम यांनी 'द वूमन फ्रॉम मोसाद' हे पुस्तक लिहिलं आहे. त्यात या योजनेची माहिती देण्यात आली आहे.

या पुस्तकात लिहतात, एक दिवस (24 सप्टेंबर 1986) लंडनच्या रस्त्यावर वनुनू यांना स्वत:मध्ये हरवलेली एक सुंदर मुलगी दिसली. वनुनू यांनी तिला दिलेली कॉफीची ऑफर तिनं लाजत लाजत स्वीकारली. कॉफीवेळी झालेल्या चर्चेत तिनं तिचं नाव सिंडी असल्याचं आणि ती अमेरिकेत ब्यूटिशियन असल्याचं सांगितलं.

पहिल्याच भेटीत ते दोघं एकमेकांकडे आकर्षित झाले. बाहेर फिरायला जाण्याचे प्लॅनही बनले. पीटर लिहतात, सिंडीनं तिच्या घरचा पत्ता सांगितला नव्हता. पण वनुनू यांनी ते कोणत्या हॉटेलात, कोणत्या बनावट नावाने राहतात हे सगळं सांगून टाकलं होतं.

यानंतर एकीकडे संडे टाइम्ससोबत त्यांची लेखावर चर्चा सुरू होती तर दुसरीकडे सिंडीबरोबर त्यांच्या भेटीही वाढल्या होत्या.

एवढंच नव्हे तर सिंडीसोबत ब्रिटनच्या बाहेर फिरायला जाण्याचाही त्यांचा बेत ठरला होता. ही तारीख ठरली होती 30 सप्टेंबर आणि स्थळ होतं रोम!

ब्रिटनमधून गायब झाले, इस्राईलला पोहचले

पीटर लिहितात, वनुनू ब्रिटनमधून गायब झाल्यानंतर तीन आठवड्यांनी न्यूज वीकमध्ये एक बातमी छापून आली होती की वनुनू हे इस्राईलमध्ये आहेत आणि त्यांना 15 दिवसांची कोठडी मिळाली आहे.

वनुनू यांच्या एका मैत्रिणीनं इटलीमध्ये त्यांना यॉटमधून समुद्राच्या सफरीवर जाण्यासाठी तयार केलं होतं. इटली किंवा इतर देशाच्या समुद्री सीमाच्या बाहेर गेल्यानंतर मोसादच्या गुप्तहेरांनी त्यांना अटक करून इस्राईलमध्ये नेल्याचं या वृत्तात म्हटलं होत.

वनुनू यांचं रोम इथून अपहरण करण्यात आल्याची बातमी डिसेंबर 1986मध्ये लॉस एंजेलस् टाइम्सने पूर्व जर्मनीतील एका वृत्त संस्थेच्या हवाल्यानं दिली होती.

पीटर लिहतात की वनुनूची सिंडीवर इतक प्रेम होतं की सिंडी ही मोसाद एजेंट आहे, हे ते मान्यच करत नव्हते.

द संडे टाइम्सने वर्षभरानंतर 1987मध्ये सिंडी कोण आहे, हे सांगणारा एक लेख छापला होता. त्यावरही वनुनू यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला होता.

पण कालांतराने सिंडी ही मोसाद एजेंट असल्याचं आणि त्यांना फसवण्यात आल्याचं त्यांनी स्वीकारलं.

सिंडीची खरी ओळख काय होती?

सिंडीचं खरं नाव शेरिल हैनिन बेनटोव होतं.

सेंट पीटर्सबर्ग टाइम्सने 2004 मध्ये लिहलं होतं की, शेरिल हैनन बेनटोव ही 1978मध्ये इस्राईली सैन्यात भरती झाली होती. त्यानंतर ती मोसादमध्ये दाखल झाली आणि इस्राईलच्या दूतावासांशी संबधित कामं करू लागली.

असं म्हटल जातं की पीटर हुनम यांनी इस्राईलच्या नेतन्या शहरात शेरिलला शोधून काढलं होतं. तिथं ती आपल्या पतीसोबत राहत होती. आपण सिंडी असल्याचं नाकारत ती तिथून निघून गेली. पण पीटर यांनी तिची काही छायाचित्र कॅमेऱ्यात कैद केली होती. या घटनेनंतर अनेक वर्षं शेरिल कुणालाही दिसली नाही.

गोर्डन थोमस त्यांच्या 'गीडोन्स स्पाईसः मोसादस् सिक्रेट वॉरिअर्स' या पुस्तकात लिहतात,"1997मध्ये शेरिल हिला ऑरलँडोमध्ये पाहिलं गेलं होतं. इथं संडे टाइम्सच्या एका पत्रकारानं विचारल्यानंतर तिनं वनुनू यांचं अपहरण करण्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचं म्हटलं होतं."

वनुनू यांना शिक्षा आणि सुटकेची मोहीम

वनुनू यांना 1988ला इस्राईलमध्ये 18 वर्षांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यापैकी 13 वर्षं त्यांनी तुरुंगात काढली. 2004मध्ये त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं पण त्यांच्यावर कडक निर्बंध लादण्यात आले होते.

पण अण्वस्त्रमुक्त जग बनवण्यासाठी त्यांच्या योगदानाचीही प्रशंसा झाली. त्यांना वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहीम चालवण्यात आली होती.

वनुनू यांच्या सुटकेसाठी चालवण्यात आलेल्या एका अभियानानुसार 21 एप्रिलला तुरुंगातून सुटका झाल्यानंतर ते सेंट जॉर्ज कॅथेड्रलमध्ये राहत होते. तिथं जेरुसलेमच्या एपिस्कोपल बिशपने त्यांना आश्रय दिला होता.

11 नोव्हेंबर 2004 रोजी जवळपास 30 इस्राईली सुरक्षा रक्षकांनी त्यांना ताब्यात घेतलं. पण त्याच रात्री त्यांना सोडून देण्यात आलं.

पण इस्राईलने त्यांच्यावर लावलेले निर्बंध आज 32 वर्षांनंतरही तसेच आहेत.

गेल्यावर्षी नॉर्वेने वनुनू यांना ऑस्लोमध्ये आश्रय देण्याची तयारी दर्शवली होती. वनुनू यांची पत्नी ऑस्लोमध्ये राहते.

इस्राईलचा अण्विक कार्यक्रम

इस्राईलने 1950मध्ये फ्रांसच्या मदतीनं नेगवेमध्ये अणू संयत्र बनवलं होतं. जगाला ही यंत्रणा मात्र कपड्यांचा कारखाना वाटायची.

इस्राईल अणू कार्यक्रम तेजीने पुढं चालवत असेल अशी शंका 1958मध्ये यू-2 या हेरगिरी करणाऱ्या विमानांनी वर्तवली होती. 1960मध्ये शेवटी तत्कालीन पंतप्रधान डेविड बेन-गुरियोन यांनी डिमोना हे अण्विक संशोधन केंद्र असल्याचं मान्य केलं.

इस्राईलचा अण्विक कार्यक्रमात किती अग्रेसर आहे, याचा शोध घेण्यासाठी अमेरिकेच्या अनेक अधिकाऱ्यांनी इस्राईलचा दौरा केला होता. पण इथं नेमकं काय सुरू आहे, याचं खरं चित्र कधीच पुढं आलं नाही.

इस्राईलने अण्वस्त्र बनवण्यास सुरुवात केल्याचं 1968मध्ये CIIच्या एका अहवालात म्हटलं होतं. मात्र वनुनू यांच्या गौप्यस्फोटामुळे अमेरिकासहीत अनेक देशांच्या भूवया उंचावल्या.

शिमोन पेरेसने इस्राईलच्या गुप्त अण्विक कार्यक्रमाची सुरुवात केली होती. बेंजामिन नेत्यानाहू यांनी 2016मध्ये नेगवे इथल्या अणु संयंत्राचं नाव बदलून शिमोन पेरेस यांच नाव दिलं जाईल, अशी घोषणा केली होती.

तुम्ही ही क्विझ सोडवलीत का?

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)