EXCLUSIVE: अनेक पराभव पत्करावे लागले, तरी निवडणुका लढवतच राहणार - असदुद्दीन ओवेसी

    • Author, दीप्ती बत्तिनी
    • Role, बीबीसी तेलुगू

नांदेड महापालिका निवडणुकीत MIM चा दारूण पराभव झाला. गेल्या वर्षभरात ओवेसींच्या पक्षाला एकामागून एक पराभव स्वीकारावे लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर बीबीसी तेलुगूच्या प्रतिनिधी दीप्ती बत्तिनी यांनी असदुद्दीन ओवेसींची काही दिवसांपूर्वी घेतलेली ही मुलाखत.

सुरुवात काँग्रेसपासून करूया. त्यांचा आरोप आहे की तुमचं आणि मोदींचं संगमत आहे. खरंच तसं काही आहे का?

ओवेसी - कांशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली तेव्हा त्यांच्यावरही आरोप करण्यात आले. जेव्हा एखादा प्रादेशिक पक्ष स्थापन होतो आणि समोर जायचा प्रयत्न करतो तेव्हा त्यालासुद्धा अशाच आरोपांना सामोरं जावं लागतं.

आता आम्ही काँग्रेससोबत नाही म्हणून ते आमच्यावर आरोप करत आहेत. आंध्र प्रदेशात तब्बल नऊ वर्षं आम्ही काँग्रेससोबत होतो. तेव्हा मात्र त्यांच्यासाठी आम्ही अगदी जवळचे मित्र होतो.

प्रश्न हा आहे, की जिथे MIMने निवडणूक लढवली नाही तिथे काँग्रेसचा पराभव कसा काय झाला?

दिल्ली, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि झारखंडमध्ये काँग्रेस पराभूत झाली. यावरुन हे लक्षात येतं की काँग्रेसमध्येच अंतर्गत मतभेद आहेत.

ते सोडवण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी काँग्रेसचं माझ्यावर आरोप करणं आश्चर्यकारक बाब आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारच्या निवडणुकीवरून तुम्हाला देशव्याप्त मुस्लीम नेते व्हायची महत्त्वाकांक्षा आहे असं वाटतं. पण निकाल मात्र काही वेगळंच सांगतात. तिथल्या लोकांनी तुम्हाला पाठिंबा नाही दिला. याबद्दल काय सांगाल?

ओवेसी - देशव्याप्त मुस्लीम नेता होण्याची माझी कधीच आकांक्षा नव्हती. मी एक राजकीय पक्ष चालवतो. निवडणूक लढवणं तेवढं माझं काम आहे.

तुमचं बरोबर आहे की आम्ही बिहार आणि उत्तर प्रदेशात हरलो. काही हरकत नाही. मला खात्री आहे की पुढच्या वेळी आम्ही नक्की जिंकू. यासाठीच आम्हाला सतत निवडणूक लढवावी लागणार आहे.

मीही सातत्यानं निवडणूक लढवणार आहे, कारण या देशातील लोकांवर माझा प्रचंड विश्वास आहे.

एक नागरिक म्हणून मला भेडसावणारे प्रश्न मी राजकीय दृष्टीतून मांडतो. या अंगानं बघितलं तर निवडणुका लढवणं हेच माझं काम आहे.

इतर राज्यांत निवडणुका लढवण्याविषयी तुम्ही बोलत आहात. पण टीकाकारांच्या मते तुमचा राजकीय प्रभाव हैदराबादपर्यंतच मर्यादित आहे. तुमची हीच प्रतिमा तुम्हाला राष्ट्रीय नेता होण्यापासून आणि MIMला राष्ट्रीय पक्ष होण्यापासून परावृत्त करत आहे का ?

ओवेसी - राष्ट्रीय नेता बनण्याची माझी कोणतीही आकांक्षा नाही. मग मी हैदराबादच्या बाहेर का निवडणूक लढवत आहे?

आमचे महाराष्ट्रात दोन आमदार आहेत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आमचे नगरसेवकही आहेत. औरंगाबादमध्ये तर आम्ही मुख्य विरोधी पक्ष आहोत.

जर कुणी असं म्हणत असेल की ते स्वत: धर्मनिरपेक्ष आणि राष्ट्रवादी आहेत, म्हणून आम्ही हैदराबादच्या बाहेर निवडणूक लढवू शकत नाही, तर हे मला मान्य नाही.

शिवाय MIMच्या विस्तारामुळे काँग्रेस समोर प्रश्न निर्माण झाले आहेत. काँग्रेसमध्ये मतदारांची जी काही पोकळी निर्माण झाली आहे, त्याला काँग्रेसच कारणीभूत आहे.

भाजपविरोधात लढण्यासाठी त्यांच्याजवळ सक्षम उमेदवार नाहीत. आणि मी तर असं म्हणेल की, कांग्रेसमुळेच मोदी या देशाचे पंतप्रधान आहेत, ना की माझ्यामुळे. काँग्रेसच्या कारकीर्दीतील प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि भ्रष्टाचारामुळेच भाजप सत्तेत आलं.

तुम्ही भाजप आणि काँग्रेस या दोघांविरोधातही बोलता. तुमचे विरोधक तुम्हाला आधुनिक जिन्ना म्हणून संबोधतात. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे?

ओवेसी - बघा, सध्या आपण दारुसालम इथल्या आमच्या पक्ष कार्यालयात बसलेलो आहोत. आमच्या पूर्वी सुरींनी इथूनच सांगितलं होतं की आम्ही कधीच जीन्नांचं निमंत्रण स्वीकारणार नाही आणि आम्ही तसं केलं देखील.

जीन्नांनी एकदा या कार्यालयाला भेट दिली होती. पण तुम्ही या कार्यालयावर आपला राष्ट्रध्वजच पाहू शकता.

पक्षातील वरिष्ठ लोकांनी जिन्नांचं निमंत्रण धुडकावून लावलं होतं. असं असतानाही ते मला जीना म्हणत असतील तर ती त्यांची खूप मोठी चूक आहे.

जीन्नांनी भारत आणि पाकिस्तान अशा दोन राष्ट्रांचा सिद्धांत मांडला होता. त्याला भारतातील मुस्लिमांनी विरोध केला होता. तरीसुद्धा भारतीय मुस्लिमांना वाईट म्हटलं जातं, दूषणं दिली जातात, याचं मला वाईट वाटतं.

भाजपने राष्ट्रध्वज फडकावून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा केला. त्यावर तुम्ही म्हणालात की हैदराबाद भारताचा भाग होण्यात MIMची भूमिका होती. त्याच सभेत तुम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर काही आरोप केले. पण तेलंगणात तर भाजप समोर जाताना दिसत आहे. काय सांगाल?

ओवेसी - ऑपरेशन पोलोदरम्यान भाजपचा उदयही झाला नव्हता. आता ते म्हणत आहेत की, निजामापासून स्वातंत्र्य मिळालं म्हणून दरवर्षी 17 सप्टेंबरला ते तेलंगणात राष्ट्रध्वज फडकावणार आहेत. नागपूरमधील संघाच्या मुख्यालयात राष्ट्रध्वज फडकवायला 50 वर्षं लागले, हे खरं नाही का?

राष्ट्रध्वज फडकला तोही दोन तरुणांनी आरएसएसच्या मुख्यालयाचा ताबा मिळवला आणि तिथं ध्वजारोहन केलं म्हणून.

हे खरं नाही का, की भाजप नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नरांना भारत छोडो आंदोलन कसं कमजोर करता येईल याबद्दल लिहिलं होतं?

हे खरं नाही का, राष्ट्रध्वजात असलेल्या तीन रंगांना दुष्टपणाचं लक्षण ठरवून आम्ही तो स्वीकारणार नाही, असं गोळवलकर जाहीरपणे म्हणाले होते?

हे खरं नाही का, राष्ट्रध्वज हा फक्त भगव्या रंगाचा असायला हवा, असं सावरकर जाहीरपणे म्हणाले होते?

भाजप जर आज राष्ट्रवाद आणि राष्ट्रध्वज यांवर हक्क सांगत असेल तर हे त्यांच्या पूर्वीच्या वर्तनाशी विसंगत ठरतं.

लोकसभेत काँग्रेस प्रभावी विरोधी पक्षाची भूमिका निभावताना दिसून येत नाही. तुम्ही स्वत: खासदार आहात. MIMची यासंबंधी काय भूमिका असेल?

ओवेसी - हीच तर समस्या आहे. जर मी माझ्या राजकीय क्षितिजाला विस्तारण्याचा प्रयत्न केला तर मला दोष दिला जातो. खरं तर काँग्रेसने सामान्य जनतेपर्यंत पोहोचून काम करायला हवं, त्यांचे प्रश्न उचलून धरायला हवेत.

नुसतं दिल्लीत बसून ते प्रभावी अशा विरोधी पक्षाची भूमिका निभावू शकणार नाही. हे खरं आहे की, आज विरोधकांचा आवाज क्षीण झाला आहे. पण मला खात्री आहे की लवकरच भाजपच्या विरोधात उठणाऱ्या आवाजांची संख्या वाढेल.

तुमचे भाऊ अकबरुद्दीन ओवेसी त्यांच्या भडकाऊ भाषणांमुळे नेहमी बातम्यांमध्ये झळकतात. यावर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले आहेत?

ओवेसी - अकबरविरोधातली एक केस सोडता त्याच्याविरोधातल्या अन्य केस मला दाखवा. प्रश्न असा आहे, की ज्यानेही भडकाऊ भाषणं दिली असतील त्याला कारावास का होत नाही?

द्वेष पसरवत असल्याचा आरोप मात्र नेहमीच मजलिसवर केला जातो. हा असा काळ आहे जिथं राज्यकर्त्यानं जनतेशी संवाद साधणं खूप महत्त्वाचं आहे. अकबर हा आमच्या पक्षाचा सर्वांत जास्त प्रभावशाली वक्ता आहे. सध्य परिस्थितीत एखाद्याकडं वकृत्व कौशल्य नसेल तर बऱ्याच समस्या उद्भवतात.

मला वाटतं अकबर हा माझ्यापेक्षा चांगला वक्ता आहे. विधानभवनातील त्याचं कोणतंही भाषण पाहा. त्याने नेहमी लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे आणि सरकारला परिणामकारकपणे प्रश्न विचारले आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)