You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठमोळ्या विष्णुदासचा चित्तथरारक प्रवास
- Author, रोहन टिल्लू
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
हातात मोजकेच पैसे, जगभरात कोणाचीही ओळख नाही, फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा आधार आणि महाराष्ट्रातल्या मित्रांचा भक्कम पाठिंबा एवढ्या जोरावर परभणीतल्या कातनेश्वर गावातून आलेला विष्णुदास पृथ्वी प्रदक्षिणेला निघाला आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये सुरू झालेल्या या प्रवासात 16 महिन्यांनंतर अनेक अडचणींचा सामना करत तो आता दक्षिण अमेरिकेतल्या कोलंबियामध्ये पोहोचला आहे.
या प्रवासात विष्णुदासनं आतापर्यंत भारतासह म्यानमार, थायलंड, लाओस, व्हिएतनाम, चीन, ऑस्ट्रेलिया, चिली, अर्जेंटिना, ब्राझिल, बोलिव्हिया, पेरू, इक्वेडोर आणि कोलंबिया एवढे देश पादाक्रांत केले आहेत.
मुळच्या परभणीचा विष्णुदास मुंबईत पत्रकारिता करण्यासाठी आला. त्यानं पत्रकार म्हणून आठ वर्षं काम केलं. सात वर्षांपूर्वी एका मुलाखतीच्या निमित्तानं त्याची गाठ नौदलातचे माजी कॅप्टन दिलीप दोंदे यांच्याशी पडली.
पृथ्वी-प्रदक्षिणा करणारे कॅप्टन दिलीप दोंदे हे पहिले भारतीय! त्यांनी नौदलाच्या बोटीतून पृथ्वी-प्रदक्षिणा केली होती. त्यांची मुलाखत घेताना आणि त्यांच्यासह गप्पा मारताना जमिनीवरून पृथ्वीला प्रदक्षिणा मारण्याचा विचार आपल्या डोक्यात आला, असं विष्णुदासनं सांगितलं.
या धाडसासाठी किती खर्च येईल, हे विचारल्यानंतर कॅप्टन दोंदे यांनी सांगितलेला आकडा ऐकून विष्णुदासनं हा विचार आपल्या डोक्यातून काढला होता.
सात वर्षांनंतर विष्णुदासने आपली नोकरी सोडली. थायलंडपर्यंत प्रवास करून परत यायचा विचार करून विष्णुदासनं त्याच्या मुंबईच्या घरातली भागीदारी विकली.
प्रॉव्हिडंट फंडातून मिळालेले पैसे आणि घराची भागीदारी विकून मिळालेले पैसे घेऊन मार्च 2016 मध्ये विष्णुदासनं आपला प्रवास सुरू केला.
सुरुवातीला रेल्वेनं बंगालमध्ये पोहोचलेल्या विष्णुदासनं फेसबुकवर आसऱ्यासाठी मदत मागितली. विष्णुदासच्या या साहसाबद्दल वाचून मुंबईतल्या मित्रांनीही मदतीचा हात पुढे केला.
कोलकातामध्ये राहिल्यानंतर पुढे तो ईशान्य भारतात गेला. तिथून मग मिळेल त्या वाहनातून त्याने पुढला प्रवास सुरूच ठेवला.
असा होता विष्णुदासचा प्रवास!
ईशान्य भारत आणि पुढल्या प्रवासात विष्णुदासला मुख्य अडचण आली ती खाण्याची!
"ईशान्य भारतापासून पुढे जवळपास सगळ्याच देशांमध्ये प्रामुख्यानं मांसाहारी खाद्यपदार्थ मिळत असल्याने माझी चांगलीच पंचाईत झाली. मी ज्यांच्या-ज्यांच्या घरी राहायचो, ते माझ्यासाठी वेगवेगळे मांसाहारी पदार्थ बनवायचे. मी शाकाहारी आहे, हे कळल्यावर अनेकांची निराशा व्हायची. ईशान्य भारतात तर एका घरी मी मांसाहारी पदार्थ नाकारल्यावर त्यांना तो अपमान वाटला होता," विष्णुदास सांगतो.
हा प्रश्न मग पुढे विष्णुदासने सोडवला. छोट्या हॉस्टेलमध्ये, हॉटेलमध्ये किंवा कोणाच्या घरी राहायला गेल्यावर विष्णुदासनं आपल्या पद्धतीनं जमेल तसा स्वयंपाक करायला सुरुवात केली.
आपल्या यजमानांनाही तो भारतीय खाद्यपदार्थ बनवून खायला घालू लागला. "अनेक देशांमधल्या लोकांनी माझ्या हातची खीर चाखली आहे," विष्णुदास गमतीनं म्हणतो.
जेवणाबरोबरच त्याच्यासमोर मोठी अडचण होती ती भाषेची! पण इथेही तंत्रज्ञान त्याच्या मदतीला आलं. त्यानं गुगल ट्रान्सलेटरसारख्या अॅपच्या मदतीनं त्या-त्या देशांमधली भाषा जुजबी व्यवहारांपुरती आत्मसात केली.
अनेकदा तर खाणाखुणांच्या सहाय्यानं समोरच्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, हे समजावून दिलं. भाषेवाचून कधी अडलं नाही, असंही विष्णुदास आवर्जून सांगतो.
हा संपूर्ण प्रवासच विष्णुदाससाठी थरारक आहे. पण चीनमधले अनुभव जास्तच थरारक होते. एकदा तर कुठेच आसरा न मिळाल्यामुळे त्याला रेल्वे स्टेशनच्या परिसरातच झोपावं लागलं होतं.
चीनमध्ये फेसबुक-ट्वीटरसारख्या प्रसारमाध्यमांवर बंदी असल्यानं त्याच्यासमोर मोठ्या अडचणी होत्या.
तरीही तिथल्या स्थानिकांबरोबर राहून विष्णुदासनं चीनची संस्कृती, तिथली प्रेक्षणीय स्थळं बघण्याचा सपाटा लावला.
व्हिएतनाममधून चीनमध्ये जातानाही व्हिसा नाकारल्यानं त्याला अनेकदा व्हिएतनाम-चीनच्या सीमेवरून परत जावं लागलं होतं. पण या प्रवासात त्याला मदत करणारी अनेक माणसं भेटली.
ऑस्ट्रेलियातून दक्षिण अमेरिकेत जाण्यासाठी त्यानं विमानाचं तिकीट काढलं होतं. पण ठरावीक दिवसांमध्ये त्याला व्हिसा न मिळाल्याने त्याचं ते विमान हुकलं.
"त्या वेळी माझ्याकडचे पैसे संपत आले होते. माझ्या या वेडासाठी पैसे देण्याची कोणाची तयारी असेल, तर माझ्या खात्यात पैसे जमा करा, असं आवाहन मी केलं होतं. एका हितचिंतकाने मला माझ्या तिकिटाची रक्कम तर पाठवलीच, पण आणखीही पैसे माझ्या खात्यात जमा केले. माझ्या या मित्रांचे आभार कसे मानू, हेच मला कळत नाही," विष्णुदास सांगतो.
विष्णुदासचा हा मित्रपरिवार भारतापुरताच नाही, तर आता देशविदेशात पसरला आहे. या प्रवासात तर अनेकांशी त्याची मैत्री झाली. काहींनी तर त्याला अगदी मुलासारखंच वागवलं.
या आदरातिथ्याबद्दल विष्णुदास सांगतो, "प्रवासामुळे तुमच्या विचारांच्या कक्षा रूंदावतात. तुमचं मन मोकळं होतं, हे आतापर्यंत फक्त ऐकलं होतं. पण कोण कुठल्या चीनमधल्या आजी, त्यांनी मला अगदी त्यांच्या नातवासारखं वागवलं."
"हा अनुभव सगळ्याच देशांमध्ये आला. आता माझ्यासाठी माझं कुटुंब हे परभणीतल्या माझ्या घरापुरतं उरलेलं नाही. ते खूप मोठं झालं आहे."
हा प्रवास चालू असतानाच विष्णुदासनं पर्यावरणविषयक जागृतीची मोहीमही हाती घेतली.
त्यानं प्रत्येक देशात, त्या देशामधल्या भारताच्या दुतावासात, इतर सरकारी कार्यालयांच्या आवारात एक झाड लावायला सुरुवात केली. त्या देशांमधल्या लोकांनीही विष्णुदासला पाठिंबा दिला. तिथल्या प्रसारमाध्यमांनीही भारतातल्या या अवलियाची दखल घेतली.
आता विष्णुदास कोलंबियात पोहोचला आहे. पुढल्या प्रवासासाठी त्याला अमेरिका किंवा कॅनडा या दोनपैकी एका देशाचा व्हिसा मिळवणं गरजेचं आहे.
हा व्हिसा मिळाला नाही, तर विष्णुदासची ही पृथ्वी-प्रदक्षिणा अर्धवट राहणार आहे. म्हणूनच त्यानं पुन्हा एकदा जगभरातल्या आपल्या मित्रांना मदतीचं आवाहन केलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)