You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
समुद्राच्या सहा सरखेल निघाल्या जगाच्या सफरीवर
- Author, आरती कुलकर्णी
- Role, प्रतिनिधी, बीबीसी मराठी
INSV 'तारिणी'च्या सहा नौदल अधिकाऱ्यांनी शिडाच्या बोटीतून आता कन्याकुमारी पार केलंय. भारतीय नौदलाच्या या पथकाने 10 सप्टेंबरला गोव्याहून या मोहिमेची सुरुवात केली.
आता त्यांना दक्षिण समुद्रातून केप टाऊनपर्यंतचा पल्ला गाठायचा आहे.
केप टाऊनची मजल मारून मग पुन्हा सात महिन्यांनी त्या गोव्याला परततील. हे अंतर आहे 21 हजार 600 किलोमीटरचं!
शिडाच्या बोटीतून जगाची सफर करणारं हे भारतीय महिलांचं पहिलंच पथक आहे.
'तारिणी'च्या पथकाने याआधी गोव्याहून मॉरिशसची मोहीम पार पाडली होती. पण यावेळी आव्हान आहे ते दक्षिण समुद्राचं.
गोठवणारी थंडी, उणे 55 डिग्री तापमान, उंचच उंच लाटा, जोराचे वारे या सगळ्याचा सामना त्यांना करावा लागणार आहे.
या मोहिमेची कॅप्टन वर्तिका जोशी सांगते, "या मोहिमेत एक असा टप्पा येणार आहे, जेव्हा आम्ही सगळ्याजणी एक हजार सागरी मैल आत असू.
अशा वेळी नौदलाचं हेलिकॉप्टरही तुमच्या मदतीला येऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या समस्या तुम्हालाच सोडवाव्या लागतात."
पहिला टप्पा
कॅप्टन लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर पी. स्वाती, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट विजया देवी, लेफ्टनंट पी. ऐश्वर्या आणि लेफ्टनंट पायल गुप्ता या नौदलाच्या सहा महिला अधिकारी गोव्याहून ऑस्ट्रेलियातल्या फ्री मँटलच्या दिशेने निघाल्या आहेत.
हे अंतर आहे, 4500 सागरी मैलाचं. हा टप्पा त्या 37 दिवसांत पार करतील.
पुढचे तीन टप्पे
दुसऱ्या टप्प्यात ऑस्ट्रेलियाहून न्यूझीलंडचा प्रवास आहे. हे अंतर 3,500 सागरी मैल एवढं आहे. यासाठी त्यांना 25 दिवस लागतील, असा अंदाज आहे.
तिसरा टप्पा विषुववृत्त आणि अंटार्क्टिकाच्या मधून असेल. हा टप्पा आहे 5000 सागरी मैलांचा आणि याला लागतील सुमारे 35 दिवस.
चौथा आणि अखेरचा टप्पा फॉकलंड ते केप टाऊन असा असेल. अंतर आहे 3800 सागरी मैलांचं. या कठीण प्रवासासाठी 40 दिवस लागतील.
परतीचा प्रवास केप टाऊनहून पुन्हा गोव्याच्या दिशेने होईल. हा प्रवास नॉनस्टॉप आहे. त्यासाठी 40 दिवस लागतील.
'तारिणी'वर कायकाय आहे?
- या महिला अधिकारी त्यांच्यासोबत अन्नधान्याचा साठा घेऊन निघाल्या आहेत.
- त्यांच्याकडे दोन LPG सिलेंडर्सही आहेत.
- बोटीवर पिण्याच्या पाण्याच्या चार टाक्या आहेत.
- प्रथमोचाराचं किटही आहे, पण सध्या तरी त्याच एकमेकींच्या डॉक्टर आहेत.
ही मोहीम नौदलाची असल्यामुळे बोटीवर अत्याधुनिक उपकरणं आहेत.
हायटेक जीपीआरएस यंत्रणाही या बोटीवर आहे. पण तरीही अन्नधान्य, पाणी याचा साठा मर्यादित असतो.
कधीकधी मात्र बोटीमध्ये पाणीटंचाई निर्माण होते. वर्तिकाला आठवतं, एकदा बोटीत पाण्याचा एक थेंबही नव्हता. बोट समुद्राच्या अगदी मध्यावर होती.
त्यावेळी आधार होता विषुववृत्तावर जमलेल्या ढगांचा. या सगळ्यांनी पावसाची वाट पाहिली.
खरंच धुवाँधार पाऊस आला! त्यांनी बोटीच्या शिडाची झोळी केली. या झोळीत पावसाचं पाणी भरून घेतलं आणि बादलीने पाणी काढून पाण्याच्या टाक्या भरल्या.
हे सगळं व्यवस्थित झाल्यावर त्यांनी या पावसात नाचही केला!
हायटेक साहस
लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल म्हणते, "शिडाच्या बोटीतून एवढी मोठी समुद्र सफर करायची तर तुम्ही हायटेक असायला हवं. इलेक्ट्रॉनिक कम्युनिकेशन मध्ये मी जे शिक्षण घेतलंय त्याचा खरा कस इथे लागणार आहे."
दक्षिण समुद्राच्या प्रतिकूल हवामानात काहीही घडू शकतं. जोराच्या वाऱ्यामुळे दिशा भरकटू शकते, बोटीत काही तांत्रिक बिघाडही होऊ शकतात.
वेळ आली तर समुद्राच्या खाली जाऊन बोटीची दुरुस्तीही करावी लागेल. त्यामुळेच या सहा जणींचं ट्रेनिंगही एखाद्या अंतराळवीरासारखंच झालंय.
या आधी नौदलाकडून गेलेल्या कॅप्टन दिलीप दोंदेंच्या बोटीचं स्टेअरिंग तुटलं होतं. बोट कशीबशी किनाऱ्यावर आणावी लागली होती.
पण असे अनुभव ऐकूनही या महिला अधिकाऱ्यांचं मनौधैर्य जराही कमी झालेलं नाही.
कोणंतही आव्हान असेल तरी आम्ही ही मोहीम पार पाडूच, असं प्रतिभा आत्मविश्वासाने सांगते.
आयएनएस तारिणीमध्ये सहभागी झालेल्या लेफ्टनंट कमांडर पी. स्वातीसाठी सेलिंग ही "लाइफटाईम कमिटमेंट" आहे. त्यामुळे अवघ्या जगापासून दूर अथांग समुद्रात दिवस-रात्र सेलिंग करत राहणं हे तिच्यासाठी नवं नाही.
INS महादई नंतर 'तारिणी'
या मोहिमेचे जनक आहेत निवृत्त व्हाइस अडमिरल मनोहर औटी. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी शिडाच्या बोटीतून जगप्रदक्षिणा करावी, हे त्यांचं स्वप्न होतं.
याआधी कॅप्टन दिलीप दोंदे आणि कमांडर अभिलाष टॉमी यांनी INS महादई या शिडाच्या बोटीतून एकट्याने सफर केली.
आता INS तारिणी या बोटीतून या सहा महिला अधिकारी समुद्र सफर करत आहेत.
शिडाच्या बोटीतला प्रवास म्हणजे वाऱ्याचा अदमास घेत पुढे जाणं. हवा अनुकूल नसेल तर दिशा बदलावी लागते, लांबचा रस्ता घ्यावा लागतो.
त्यामुळे सेलिंगने आम्हाला खूप संयम शिकवला, असं स्वाती सांगते.
बोटीवर सेलिंग करतानाच हलत्याडुलत्या बोटीत स्वयंपाक करणं हाही एक थरार आहे.
अशा वेळी या सहाजणी आळीपाळीने सगळी कामं करतात. याआधी केलेल्या चाचणी मोहिमांचा अनुभव गाठीशी असल्यामुळे प्रवास सोपा जातो.
लाईफ ऑफ पाय
"मी जेव्हा सेलिंग करते, तेव्हा मी जगातली सगळ्यात आनंदी व्यक्ती असते." हे सांगताना लेफ्टनंट पायल गुप्ताच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते.
सेलिंगबद्दल बोलताना तिला 'लाइफ ऑफ पाय' सिनेमाची आठवण होते. या सिनेमामध्ये पाय हा वादळात बचावलेला तरुण आणि त्याच्यासोबतचा वाघ अथांग समुद्रात एकटेच उरतात आणि तग धरून राहण्यासाठी त्यांना एकमेकांची मदत घ्यावीच लागते.
पायल म्हणते, आमची स्थिती अगदी 'लाइफ ऑफ पाय'सारखी भयावह नाही. पण अथांग समुद्रात जगापसून दूर आम्ही एकट्याच असणार आहोत आणि आमचा तग धरून राहण्याचा संघर्षही तसाच आहे!
समुद्राने बनवलं रोमँटिक
ईशान्य भारतातून आलेल्या लेफ्टनंट विजया देवीला बोटीच्या डेकवर उभं राहून समुद्राला न्याहाळणं फार आवडतं.
वेगवेगळ्या रंगांनी रंगलेलं आकाश, बोटीच्या बाजूने उसळत जाणारे डॉल्फिन्स, भराऱ्या घेणारे समुद्रपक्षी हे सगळं पाहताना ती स्वत:ला विसरून जाते.
या पूर्ण मोहिमेत तुम्ही ताण घालवण्यासाठी काय करता ? या प्रश्नावर विजया आणि तिच्या सहकाऱ्यांचं उत्तर आहे.
समुद्रामध्ये कोणतेही ताण - तणाव नसतातच. त्यामुळे ताण घालवण्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही!
आधी लगीन मोहिमेचं
या सगळ्याजणी आता तरी एकट्याच आहेत, पण ऐश्वर्याचा अलीकडेच साखरपुडा झाला आहे. आधी लगीन सागर मोहिमेचं, असं तिने ठरवलं आहे.
ऐश्वर्या सांगते, आमच्यापैकी कुणी एक जरी टीममध्ये नसेल तर आमची टीम पूर्णच होऊ शकत नाही.
या सगळ्यांची सफर तर साहसी आहे, पण या समुद्राची आव्हानं झेलत असतानाच बोटीवर वाढदिवस साजरे होतात, गाणी, चित्रकला हेही होतं.
मजामस्ती करत एकेक टप्पा पार होतो आणि परतीची वेळ कधी येते तेही कळत नाही.
INS 'तारिणी' या लढवय्या शिलेदार त्यांच्या प्रवासाचे सगळे अपडेट्स नौदलाच्या गोव्याच्या तळावर पाठवत आहेत.
त्यांचे हे फोटो, व्हीडिओ पाहताना आपणही त्यांच्यासोबत सफर करत आहोत, असं वाटत राहतं.
लेफ्टनंट पायल गुप्ताने अपडेट केलेलं हे स्टेटस फारच बोलकं आहे... ती म्हणते, 'प्रिय सागरा, एकाच वेळी आम्हाला नम्र, लीन, प्रेरित आणि खारट बनवल्याबद्दल तुझे खूपखूप आभार.'
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)