You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
का सोडत आहेत लाखो भारतीय महिला नोकऱ्या?
- Author, सौतिक बिस्वास
- Role, बीबीसी प्रतिनिधी
देशाच्या अलिकडच्या इतिहासात प्रथमच महिला कामगारांचा सहभाग घटला आहे. एवढंच नव्हे तर एकूण मनुष्यबळातही महिलांचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे.
- सुमारे २० लाख भारतीय महिलांनी २००४-०५ ते २०११-१२ या काळात नोकऱ्या सोडल्या आहेत.
- महिलांचा श्रमिक सहभाग दरही घटला आहे. जो दर १९९३-९४ मध्ये ४२ टक्के होता तो २०११-१२ मध्ये ३१ टक्क्यांवर आला.
- त्यात ५३ टक्के एवढं मोठं प्रमाण हे ग्रामीण भागातील १५ ते २४ या वयोगटातील महिलांचं आहे.
- ग्रामीण भागातील महिलांच्या सहभाग दरातही २००४-०५ च्या ४९ टक्क्यांवरून २००९-१० च्या ३७.८ टक्के एवढी घट झाली.
- २००४-०५ ते २००९-१० या काळात २४ लाख पुरूष कर्मचाऱ्यांची भर पडत असतानाच महिलांचं प्रमाण २१.७ लाखांनी कमी झालं.
असं का घडतंय, हे शोधण्यासाठी जागतिक बँकेच्या संशोधकांनी जनगणना आणि नॅशनल सॅम्पल सर्वेमधून मिळालेल्या आकडेवारीचा अभ्यास केला. या अभ्यास गटात लुईस अँड्रेस, बसाब दासगुप्ता, जॉर्ज जोसेफ, विनोज अब्राहम, मारिया कोरिया यांचा समावेश आहे.
या संशोधकांनुसार, एकीकडे आर्थिक वाढीचा वेग गाठून विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असताना महिला कामगारांचं हे घटतं प्रमाण चिंतेचा विषय आहे.
का कमी होत आहे महिलांचं प्रमाण?
भारतीय अर्थव्यवस्था सातत्यानं वाढत असताना महिलांचं प्रमाण कमी होणं, हे एक कोडंच आहे. लग्न, बाळंतपण, लिंगाधारित पक्षपात, पुरूषसत्ताक पद्धत, अशी सामाजिक अंगाकडे जाणारी कारणं त्यास जबाबदार आहेतच. पण, केवळ हिच कारणं आहेत, असं नाही.
लग्न हे नोकरी सोडण्याचं एक कारण आहेच. पण ग्रामीण भागात अविवाहित महिलांपेक्षा नोकरी करणाऱ्या विवाहित महिलांची संख्या जास्त आहे. शहरी भागात हे प्रमाण नेमकं उलटं आहे.
विशेष म्हणजे, वाढत्या आकांक्षा आणि संपन्नता यांच्यामुळे महिलांची मोठी फळी मनुष्यबळातून बाहेर पडते आहे. सर्वाधिक घट ही ग्रामीण भागात आहे, हे इथं लक्षात घ्यायला हवं.
ग्रामीण भागात काम करणाऱ्या १५ ते २४ वयोगटातल्या मुली आणि महिलांचं प्रमाण कमी होत आहे. त्याचं एक कारण म्हणजे शिक्षणाचा प्रसार तसंच रूढींपासून मुक्तता.
लहान वयातच नोकरी करणाऱ्या मुली आता पुढील शिक्षणाची वाट धरू लागल्या आहेत, असा अंदाज संशोधक वर्तवतात.
आर्थिक स्तराच्या बदलास श्रीमंताच्या तुलनेत गरीब जास्त प्रतिसाद देतात. हा प्रतिसाद मुलांना शाळेत पाठवून दिला जातो.
पुरूषांच्या पगारात वाढ झाल्यावर, बहुतांश वेळी, तात्पुरती कामं करणाऱ्या महिला नोकरी सोडतात. त्यामुळंच कौटुंबिक उत्पन्नात स्थैर्य हा महिलांना मनुष्यबळातून बाहेर काढणारा मुख्य घटक असल्याचं या अभ्यासात म्हटलं आहे. अर्थात, शिक्षण घेतलं म्हणजे भविष्यात त्या महिला नोकरी करतीलच, याची खात्री नसते.
महिलांचा सहभाग आणि शिक्षणाची पातळी यांचा अभ्यास केल्यास उच्च शिक्षण हे नोकरी करण्यास उत्तेजन देत नाही, असंही या अभ्यासात समोर आलं आहे.
शहरी आणि ग्रामीण भागात शालेय आणि उच्च शिक्षण झालेल्यांमध्ये सहभाग कमीत कमी आहे. तर अशिक्षित आणि पदवीधारकांमध्ये दर सर्वांत जास्त आहे.
पण अलिकडच्या काळात या दरात झालेल्या घसरणीवरून असं लक्षात येतं की, शैक्षणिक पात्रता विचारात न घेता, महिलांना नोकरी करण्यास प्रोत्साहन देण्यातही घट झाली आहे.
भारतातील कर्मचारी संख्येत महिलांचा सहभाग कमी आहे. आंतरराष्ट्रीय मजूर संस्थे (ILO) च्या आकडेवारीनुसार २०१३ मध्ये १३१ देशांत भारत १२१ व्या स्थानी होता.
चीनमध्ये २००४ ते २०१२ दरम्यान महिला कामगारांच्या सहभागाचा दर ६८ टक्क्यांवरून ६४ टक्क्यांवर आला. पण भारताच्या तुलनेत चीनची सहभाग टक्केवारी खूप जास्त आहे. श्रीलंकेत हा दर केवळ दोन टक्क्यांनी घटला आहे.
अल्पावधीत झालेल्या या वेगवान घसरणीमुळे भारत आंतरराष्ट्रीय क्रमवारीत तळाला आला असल्याचं संशोधकांनी सांगितलं.
भारतात महिलांना अधिक संधी देण्याची गरज संशोधकांनी व्यक्त केली.
महिलांना शेतीशिवाय नोकरीच्या आणखी संधी हव्या आहेत. ग्रामीण भागातील बाजारांनी महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना मान्य असलेल्या, आकर्षक नोकऱ्या देणं आवश्यक आहे.
महिला आणि पुरूषांच्या कामाविषयीच्या समाजिक मान्यतांमध्ये बदल झाल्याशिवाय लाभ किती झाला हे लक्षात येणार नाही, असं जागतिक बँकेच्या या अभ्यासात स्पष्ट केलं आहे.
त्यातल्या त्यात, शेतीवर आधारित कामं घटल्यानं महिलांनी घरांतील आर्थिक बाबींवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे, त्यांचीही कामगार म्हणून नोंद का होऊ नये, असा प्रश्न आणखी एका अभ्यासातून मांडण्यात आला आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)