‘आयएनएस तारिणी’ने केलं विषुववृत्त पार, केक कापून झालं सेलिब्रेशन

    • Author, आरती कुलकर्णी
    • Role, बीबीसी मराठी

भारतीय नौदलाच्या सहा महिला अधिकारी पृथ्वी प्रदक्षिणेला निघाल्या आहेत. नुकतंच त्यांनी विषुववृत्त पार केल्यावर त्यांच्या शिडाच्या बोटीवर केक कापला. आतापर्यंतच्या त्यांच्या या प्रवासाचा हा स्पेशल अपडेट.

"अथांग समुद्रात शिडाच्या बोटीने विषुववृत्त पार करणं खूपच थरारक अनुभव होता," लेफ्टनंट कमांडर बी. स्वाती 'आयएनएस तारिणी'वरून एका कॉलद्वारे सांगत होत्या.

"ती 25 सप्टेंबरची पहाट होती. आमच्या बोटीच्या इलेक्ट्रॉनिक नकाशात विषुववृत्त जवळ आल्याचे संकेत दिसत होते. आम्ही काउंटडाऊन सुरू केलं... बरोबर पहाटे साडेचार वाजता आम्ही पृथ्वीच्या बरोबर मध्यावरची ही रेषा पार केली."

स्वातीच्या सहा महिलांनच्या या टीमने 10 सप्टेंबरला गोव्याहून ही मोहिम सुरू केली. आणि दोनच आठवड्यांत त्यांनी हा महत्त्वाचा टप्पा पार केला.

तसं तर या टीमने पाच वेळा विषुववृत्त पार केलं आहे. "पण प्रत्येक वेळी ही रेषा पार करण्याचा अनुभव वेगळाच असतो," असं त्या सांगतात.

विषुववृत्तावर म्हटलं की ढगांची गर्दी, धुवाँधार पाऊस. आणि अशा वातावरणात दिवस-रात्र सेल करून नौका पार नेणं, हे मोठं आव्हानच.

म्हणूनच या यशाचं सेलिब्रेशन केक कापून झालं.

भारतीय नौदलाच्या या अधिकारी आता पूर्वेकडे ऑस्ट्रेलियाच्या दिशेनं निघाल्या आहेत. सध्या तरी या प्रवासात हवेची चांगली साथ असल्याचं त्या सांगतात.

पण पुढे दक्षिण समुद्राचं आव्हान आहे. जोराचे वारे, उंचच उंच लाटांचा सामना करून त्यांना दक्षिण अमेरिका आणि पुढे केप टाऊनपर्यंतचा पल्ला गाठायचा आहे.

या मोहिमेचं पूर्ण अंतर आहे 21,600 सागरी मैल, आणि यासाठी त्यांना सात महिने लागणार आहेत.

या मोहिमेची कॅप्टन लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी सध्या बोटीवर कामात व्यग्र आहे. ती सांगते, "आम्ही सध्या तीन हजार सागरी मैल आत आहोत. अशावेळी नौदलाचं हेलिकॉप्टरही तुमच्या मदतीला येऊ शकत नाही. तुमच्या समस्या तुम्हालाच सोडवाव्या लागतात."

ही मोहीम नौदलाची असल्याने या बोटीवर हायटेक जीपीआरएस सारखी अत्याधुनिक यंत्रणा आहे, ज्यांच्या मदतीने ही टीम नौदलतळाच्या संपर्कात आहे. याआधी शिडाच्या बोटीतून एकट्याने प्रवास करणारे कॅप्टन दिलीप दोंदे आणि निवृत्त व्हाईस अॅडमिरल मनोहर औटी, त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

उत्तराखंडच्या पहाडी भागातून आलेल्या लेफ्टनंट पायल गुप्ता सांगतात, "आयएनएस तारिणीचा प्रवास पूर्वेच्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे बोटीवरची सकाळ खूप लवकर होते. स्वच्छ हवा आणि चांगला सूर्यप्रकाश असला की कामासाठी नवी ऊर्जा मिळते."

सेलिंगबद्दल बोलताना तिला 'लाईफ ऑफ पाय' सिनेमाची आठवण होते. या सिनेमात वादळातून बचावलेला पाय नावाचा तरुणाचा एका वाघासोबत एकाच बोटीत जगण्याचा संघर्ष दाखवलाय.

तसाच काही अनुभव या टीमचा 'तारिणी'वर आहे.

बोटीवर धान्य, डाळी, कांदे, बटाटे यांचा भरपूर साठा आहे. पण फ्रीज मात्र नाही. त्यामुळे हा सगळा साठा जरा जपूनच वापरावा लागतो.

ती म्हणते, "हलत्याडुलत्या बोटीत डाळ-भात शिजवणं हा काय अनुभव आहे हे तुम्ही बोटीवर येऊनच पाहायला हवं."

कधीकधी बोटीवर कॉफी पिताना मैफलही रंगते.

मणिपूरची लेफ्टनंट विजया देवी निसर्गप्रेमी आणि रोमँटिक आहे. तिला बोटीच्या डेकवर उभं राहून सूर्यास्त न्याहाळायला खूप आवडतं.

बोटीच्या बाजूने विहरत जाणाऱ्या डॉल्फिन्सचे फोटो काढताना तिचा सगळा ताण हलका होतो. "अशा वेळी गजबजलेल्या जगाची आठवणही राहत नाही," ती आवर्जून सांगते.

'आयएनएस तारिणी'वर आता जरी सगळं आलबेल असलं तरी पुढे मात्र दक्षिण समुद्राचं आव्हान आहे. शिडाच्या बोटीतून प्रवास करताना इंजिन वापरण्याची परवानगी नसते. त्यामुळे खवळलेल्या समुद्रातून इंजिनाशिवाय बोट पुढे नेताना कसोटी लागणार आहे.

लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल सांगते, अशावेळी काहीही होऊ शकतं. बोटीमध्ये तांत्रिक बिघाड होऊ शकतात. यासाठी समुद्राच्या खाली जाऊन बोटीची दुरुस्ती करावी लागते. आतापर्यंत घेतलेलं जे तांत्रिक शिक्षण आहे याचा इथे कस लागणार आहे.

हैदराबादची लेफ्टनंट पी. ऐश्वर्या घरात वावरावं इतक्या सहजपणे या बोटीवर वावरते आहे. इथला प्रत्येक अनुभव तिच्या मोबाईलवर रेकॉर्ड करून ती सगळ्यांशी शेअर करते.

ऐश्वर्याचा नुकताच साखरपुडा झाला आहे. पण आधी लगीन मोहिमेचं असं तिने ठरवलं आहे.

'तारिणी'च्या या सहा सरखेल आता समुद्राशी कायमच्या जोडल्या गेल्या आहेत. त्या म्हणतात, "समुद्राने आम्हाला खूप काही शिकवलं. त्याबद्दल त्याचे आभार."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)