You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सेबॅस्टियन कुर्झ होणार जगातील सर्वांत तरुण राष्ट्रप्रमुख?
- Author, बेथनी बेल
- Role, व्हिएन्ना
ऑस्ट्रियामध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकीमध्ये सेबॅस्टियन कुर्झ हे 31 वर्षांचे तरुण नेते निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्झ हे पीपल्स पार्टीचे नेते आहेत.
पीपल्स पार्टीला या निवडणुकीत 31 टक्के तर फ्रिडम पार्टी आणि सोशल डेमोक्रेट्स हे पक्ष या निवडणुकीत दुसऱ्या स्थानासाठी लढतील असा अंदाज निकालपूर्व चाचण्यांमधून वर्तवला जात आहे.
यावेळी निवडणुकांमध्ये स्थलांतरितांचा मुद्दा गाजला. स्थलांतर करणाऱ्यांवर काही प्रमाणात निर्बंध असावेत असं सेबॅस्टियन कुर्झ म्हणतात. त्यांचा पक्ष आणि फ्रीडम पार्टी हे नंतर युती करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.
युती केल्यास फ्रीडम पार्टीला सत्तेमध्ये येण्याची संधी मिळू शकते.
डिसेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फ्रीडम पार्टीचा परभाव झाला होता. फ्रीडम पार्टीचे नेते नॉर्बर्ट हॉफर यांचा अलेक्झांडर वॅन डर बेलेन यांच्याकडून पराभव झाला होता. बेलेन यांना 53 टक्के मतं मिळाली होती.
2015 पासून युरोपमध्ये स्थलांतरितांचा मुद्दा महत्त्वपूर्ण बनला आहे. शेजारीच असलेल्या जर्मनीमध्ये देखील निवडणुकी दरम्यान हा मुद्दा गाजला होता.
जर हे अंदाज खरे ठरले तर ही निवडणूक ऑस्ट्रेयाच्या भवितव्याच्या दृष्टीनं निर्णायक ठरेल.
गेल्या एक दशकापासून डेमोक्रेट्सची तिथं सत्ता आहे. सध्या जनतेच्या मनात वेगळं आहे. ऑस्ट्रियाची जनता उजव्या विचारसरणीच्या पक्षांकडे झुकत असल्याचं दिसत आहे.
बदलली पार्टीची रचना
पीपल्स पार्टीची सूत्रं हाती आल्यावर कुर्झ यांनी पक्षाची अंतर्गत रचना बदलली. त्यांनी आपले मुद्दे उजव्या विचारसरणीच्याच धर्तीवर पुढे नेले.
ज्या मार्गांनी स्थलांतरित येत आहेत ते मार्ग बंद करण्याचं आश्वासन त्यांनी दिले आहे.
स्थलांतरितांना मिळणाऱ्या अनुदानामध्ये कपात करणे आणि पाच वर्षांपेक्षा कमी काळ ऑस्ट्रियात राहिलेल्या परदेशी नागरिकांचं अनुदान बंद करणे ही आश्वासनं सुद्धा त्यांनी दिली आहेत.
सत्ताधारी सोशल डेमोक्रॅट्सनी सेबॅस्टियन कुर्झ यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. पण त्यांनी तो धुडकावून लावला होता. त्यांच्या या निर्णयामुळे कर्झ यांच्या लोकप्रियतेमध्ये वाढ झाली आहे.
फ्रीडम पार्टीचे नेते हेंझ ख्रिश्चन स्ट्रेची यांनी कर्झ यांची तोतया म्हणून संभावना केली होती. फ्रीडम पार्टीची धोरणं चोरल्याचा आरोप त्यांनी कर्झवर केला.
जर कर्झ यांचा पक्ष निवडणूक जिंकला तर ते युरोपातील सर्वांत तरुण नेते ठरतील. जरी सध्या फ्रीडम पार्टी त्यांच्यावर निशाणा साधत असली तरी निकालानंतर मात्र हे दोन्ही पक्ष एकत्र येतील असं तज्ज्ञांचं मत आहे.
दिशाहीन विरोधीपक्ष
"गेल्या काही दशकांतील सर्वांत महत्त्वाची वेळ" असं या निवडणुकीचं वर्णन विद्यमान चांसलर ख्रिश्चन कर्न यांनी केलं होतं.
कर्न यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते. त्यामुळं ते कर्झ यांच्याविरोधात प्रचारात प्रभावहीन ठरल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
त्यांच्या पक्षाचे मुख्य मुद्दे आर्थिक विकास, सामाजिक न्याय आणि नोकऱ्यांभोवती केंद्रित होते.
सेबॅस्टियन कुर्झ यांच्या पक्षाचं धोरण स्थलांतरितांच्या बाजूनं आहे. पण त्यांना यावेळी चार टक्क्यांपेक्षाही कमी मतं मिळतील असा अंदाज आहे.
1980 पासून आतापर्यंत ऑस्ट्रियामध्ये सर्व सरकारं ही युतीमध्येच स्थापन झाली आहे. यावर्षी यामध्ये काही बदल घडेल का याबाबत स्थानिकांमध्ये उत्सुकता आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)