राष्ट्रीय महिला शेतकरी दिन : काय आहेत महिला शेतकऱ्यांसमोरची आव्हानं?

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

महिला शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालयानं यंदाच्या वर्षापासून 15 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय महिला शेतकरी दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं आहे.

या दिनाचं औचित्य साधून बीबीसी मराठीनं राज्यातल्या काही निवडक महिला शेतकऱ्यांशी बातचीत केली. आम्ही तीन प्रकारच्या महिला शेतकऱ्यांशी बोललो. पतीच्या आत्महत्येनंतर शेती करणाऱ्या महिला, पतीसोबत शेती करणाऱ्या महिला आणि शहरातली उच्चशिक्षित महिला शेतकरी.

पुरुषांची कामं करताना दमछाक होते - सुरेखा आहेर

"मह्यासारख्या बाईला तर आत्महत्या करावं वाटते. पण, मुलांनी शाळा शिकावी, त्यांच्या पायावर उभं राहावं, म्हणून मी लोकांकडं दुर्लक्ष करते. कारण मानूस शिकलेला नसला की खूप ठेच लागते, हे मला ठाऊक आहे..." सुरेखा आहेर सांगतात.

नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यात सुरेखा आहेर राहतात. त्यांची अडीच एकर शेती आहे. त्यांचे पती कैलास आहेर यांनी 2015 साली कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. गेल्या दोन वर्षांपासून त्या स्वत: शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत आहेत.

महिला शेतकरी म्हणून जाणवणाऱ्या आव्हानांबद्दल सुरेखा सांगतात, "गरज पडल्यास शेतातल्या काही कामांसाठी, जसं औत हाकण्यासाठी पुरुषाची मदत घ्यावी लागते. मात्र असं केलं तर लोक संशयाच्या नजरेनं पाहायला लागतात. शेतातली काही कामं बाईमाणसाच्यानं होत नाहीत, मग अशावेळेस काय करावं?"

'शेती करताना आता जीवालाच धोका'

महानंदा धुळगंडे या परभणी जिल्ह्यातल्या सादलापूर गावात राहतात. गेल्या 25 वर्षांपासून त्या शेती करतात. त्यांना शेतीतील अडचणींबाबात विचारलं.

"पिढ्यानपिढ्या आम्ही शेती करत आहोत. शेती आता आतबट्ट्याचा व्यवहार झाला आहे. शेतीत खूप कष्ट करावे लागतात. पण, त्याबदल्यात मिळणारा फायदा मात्र खूपच कमी असतो. शिवाय शेतात वर्षभर राबावं लागतं. पाऊस-पाण्याचाही काही नेम नसतो."

त्या पुढे सांगतात, "शेती करताना सगळ्यांत मोठा धोका जीवाला असतो. कधी काय होईल सांगता येत नाही. परवाच गावातली गोदाबाई शेतातून सरपण घेऊन येताना वीज पडून गेली. मागच्या वर्षी एक बाई साप चावून मेली."

सरकारनं शेतकऱ्यांना सर्व गोष्टी वेळेवर द्यायला हव्या, म्हणजे शेतकरी व्यवस्थित जगू शकतील असं त्यांना वाटतं.

'...तर आज पळाटी शेतात उभी असती'

शोभा काकड बुलडाणा जिल्ह्यातल्या सिनगाव इथं राहतात. त्यांचे पती मानसिक रुग्ण आहेत. त्यामुळे त्या स्वत: शेती करतात.

"आमच्या माणसाला शेती करता येत नसल्यानं शेतीतलं सर्व काही मलाच बघावं लागतं. मागं पळाटीवर (कपाशी) कीटकनाशक फवारायचं होतं. पण, चुकून मी तणनाशक मारल्यानं सगळी पळाटी जळून खाक झाली. कोणी सांगायला असतं तर आज पळाटी शेतात उभी असती."

हलाखीची परिस्थिती असतानाही त्यांनी मुलीला इंजीनिअरिंगपर्यंतचं शिक्षण दिलं आहे.

'पीक आलं तरी पुरेसा भाव मिळत नाही'

दुर्गाबाई गाडे जालना जिल्ह्यातल्या सुभानपूर गावात राहतात. त्यांच्या पतीनं 2008 साली आत्महत्या केली. तेव्हापासून त्या स्वतः शेती करत आहेत.

शेतीसमोरील अडचणींबद्दल त्या सांगतात, "शेती कमी असल्यानं तिला कसणं परवडत नाही. शिवाय, पीक आलं तरी त्याला पुरेसा भाव मिळत नाही. वर मुलीचं डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे. सध्या ती बारावीत आहे. हुशारही आहे."

"पैसे नसल्यानं सध्या ती औरंगाबादमधल्या आत्महत्याग्रस्त मुलांच्या हॉस्टेलवर राहून शिक्षण घेत आहे. पण, खरा प्रश्न तिच्या बारावीनंतर येणार आहे. तिचं डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे, तिथपर्यंतच्या शिक्षणासाठी तिला पैसे पुरवणं माझ्यासाठी शक्य नाही."

असं असलं तरी, मी माझ्या परीनं कष्ट करून जिथपर्यंत शक्य असेल तिथपर्यंत तिला शिकवणार असल्याचं त्या पुढे सांगतात.

उच्चविद्याविभूषित शेतकरी

मयुरी खैरे ही एक उच्चविद्याविभूषित तरुणी. पण तिनं शेती करायचा निर्णय घेतला. पुण्यात फॅशन डिझायनिंगमध्ये मयुरीनं मास्टर्स केलं आहे. शिवाय इंग्रजी साहित्यातही तिनं एम.ए. केलंय.

त्यानंतर शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करायचा म्हणून तिनं मध्य प्रदेशात मोत्याची शेती करायला सुरुवात केली.

एक तरुण महिला शेतकरी म्हणून तिला भेडसावलेल्या आव्हानांबद्दल ती सांगते, "शेती करायला सुरुवात केल्यानंतर मला सर्वात जास्त त्रास लोकांच्या मानसिकतेचा झाला. तू एवढी शिकलीस तरीही आता शेती करत आहे. मग शिकली तरी कशाला? असं लोक म्हणायचे."

"पण, मला स्वत:ला सिद्ध करायचं होतं म्हणून मी शेती करण्याच्या निर्णयावर ठाम राहिले. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता कामावर फोकस करत राहिले", मयुरीनं सांगितलं.

"त्यामुळेच आता मी महाराष्ट्रामधील बुलडाणा जिल्ह्यात तसंच गुजरातमधल्या नवसारीमध्ये नवीन प्रोजेक्ट सुरू करणार आहे", मयुरी आत्मविश्वासानं सांगते.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)