प्रेस रिव्ह्यू - गौरी लंकेश यांचे मारेकरी त्यांच्या घराजवळच राहत होते?

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात विशेष तपास पथकानं 2 संशयित मारेकऱ्यांची रेखाचित्रे जारी केली आहेत.

यासंबंधी इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या वृत्तात,

गौरी लंकेश यांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी संशयित मारेकरी लंकेश यांच्या घराजवळच वास्तव्याला असल्याचं लिहीण्यात आलं आहे. एसआयटीच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आलं आहे.

मारेकरी त्यांच्या घराजवळ राहून त्यांच्यावर पाळत ठेवत असल्याचा अंदाज एसआयटीनं व्यक्त केला आहे. ते तब्बल सात दिवस त्यांच्या घराच्या परिसरात तळ ठेकून होते असं एसआयटीचं म्हणण आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला - पवार

समाज माध्यमांवर सरकार विरोधात लिहीलं म्हणून नोटीस मिळालेल्या तरुणांनी शनिवारी शरद पवार यांची भेट घेतल्याचं वृत्त लोकसत्ता या दैनिकानं दिलं आहे.

"पुरोगामी महाराष्ट्रात पोलिसांच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही," असा इशारा या भेटीनंतर शरद पवार यांनी दिला असल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

हा सगळा प्रकार गंभीर असून त्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचही पवार यांनी सांगितलं आहे.

कीटकनाशकांच्या बाजारात महाराष्ट्र अव्वल

2010 ते 2016 या सहा वर्षांत राज्यात सर्वात जास्त कीटकनाशकांची विक्री झाल्याचं वृत्त दिव्य मराठी या वर्तमानपत्रानं दिलं आहे. कीटकनाशकांच्या बाजारात पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश या आघाडीच्या राज्यांना मागे टाकून महाराष्ट्र सर्वात मोठं राज्य बनलं आहे.

तसंच या सहा वर्षात महाराष्ट्रातील कीटकनाशकांच्या विक्रीत चौपट वाढ झाली असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

विद्यमान लोकसभेच्या कृषी विभागाच्या संसदीय समितीनं गेल्या वर्षी सादर केलेल्या अहवालातून ही धक्कादायक आकडेवारी पुढे आली असल्याचं बातमीत स्पष्ट करण्यात आलं आहे.

हार्वी वाईनस्टेन ऑस्कर अकादमीतून निलंबित

बीबीसी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्कर अकादमीनं निर्माते हार्वी वाईनस्टेन यांना संस्थेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.

'यूएस अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅंड सायन्स'च्या एकूण सदस्यांपैकी दोन तृतीयांश सदस्यांनी वाईनस्टेन यांना त्वरित निलंबित करण्यासाठी पाठिंबा दिला.

अमेरिकी अभिनेत्री रोझ मॅकगोवन हीनं वाईनस्टेन यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे. तसंच आतापर्यंत जवळपास 24 महिलांनी यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे.

'रोहिंग्यांचं भारतात येणं हा एक कट'

हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार,

रोहिंग्या मुस्लीम भारतात आश्रय घेण्यासाठी नाही तर कट-कारस्थान करण्यासाठी येत आहेत. असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी शनिवारी केलं आहे.

तसंच रोहिंग्यांना म्यानमारमधून का हकलवून लावण्यात आलं, याची चौकशी व्हायला हवी असंही जोशी यांनी म्हटलं आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)