प्रेस रिव्ह्यू : राम मंदिरानंतर सीतेचं मंदिर उभारण्याची सुब्रमण्यम स्वामी यांची घोषणा

आता सीतेचंही मंदिर बांधणार, असं भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे. हिंदुस्तानं हे वृत्त दिलं आहे.

अयोध्येत राम मंदिर उभारण्यात येईल, तर सीतेचं जन्मस्थान असलेल्या बिहारमधील सीतामढी इथं सीतेचं मंदिर उभारण्यात येईल, अशी घोषणा भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

तसंच हे मंदिर आशियातील सर्वोत्कृष्ट मंदिर असेल आणि प्राचीन भारतीय विचार आणि मूल्यांचा अभ्यास करण्यासाठी तिथं सीतेच्या नावानं विद्यापीठ स्थापन केलं जाईल, असं स्वामी म्हंटलं असल्याचं बातमीत नमूद करण्यात आलं आहे.

भाजपला आत्मचिंतनाची गरज

अभिनेते विनोद खन्ना हे पंजाबधील गुरदासपूर मतदार संघातून भाजपचे खासदार होते. त्यांच्या निधनामुळं गुरदासपूर मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात आली होती.

या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड हे तब्बल 1 लाख 93 हजार एवढ्या विक्रमी मतांनी विजयी झाले.

याविषयी लोकसत्ता या दैनिकानं दिलेल्या वृत्तानुसार, भाजप उमेदवाराच्या पराभवानंतर विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता खन्ना यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसंच भाजप पक्षाला आत्मचिंतन करायचा गरज असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

'...तर घरात घुसून डोळे काढू'

केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले होत असल्याच्या बातम्या माध्यमांतून येत आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी भाजपनं 3 ऑक्टोबरपासून जनरक्षा यात्रा सुरु केली आहे.

यासंदर्भात लोकसत्ता या दैनिकानं दिलेल्या वृत्तानुसार,

'संघ आणि भाजप कार्यकर्त्यांवरचे हल्ले थांबले नाहीत, तर घरात घुसून डोळे काढू', अशी धमकी भाजप नेत्या सरोज पांडेय यांनी दिली आहे.

या आधी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी, 'केरळसारख्या सुंदर राज्याचं सीपीएम सरकारनं राजकीय थडग्यात रुपांतर केलं आहे', असं वक्तव्य केलं होतं, असं सुद्धा या बातमीत लिहीण्यात आलं आहे.

मान्यता नसतानाही कीटकनाशकांची विक्री

अतिविषारी कीटकनाशकांच्या फवारणींमुळे विदर्भात काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

शेतकऱ्यांच्या मृत्युनंतर राज्य सरकारनं केंद्रीय कीटकनाशक मंडळ अर्थात सीआयबीची (सेंट्रल इन्सेक्टिसाइड बोर्ड) मान्यता नसलेल्या जैविक कीटकनाशकांच्या विक्रीला प्रतिबंध केला आहे.

पण तरीही सीआयबीची मान्यता नसलेली तब्बल 60 टक्के कीटकनाशकं आणि संजीवकांची बाजारपेठेत सर्रास विक्री होत असल्याचं वृत्त दैनिक दिव्य मराठीनं दिलं आहे.

'रामदेव यांना भेटायला नको होतं'

काळा पैसा देशात परत आणण्यासाठी 2011 साली बाबा रामदेव दिल्लीत आंदोलन करणार होते. यापासून त्यांना रोखण्यासाठी काँग्रेस सरकारनं त्यांचे दोन मंत्री विमानतळावर रामदेव यांची भेट घेण्यासाठी पाठवले होते. हे मंत्री म्हणजे प्रणब मुखर्जी आणि कपिल सिब्बल.

यासंदर्भात इंडियन एक्स्प्रेस या दैनिकानं दिलेल्या वृत्तानुसार, 'मी बाबा रामदेव यांना भेटायला नको होतं,' असं प्रणब मुखर्जी यांनी म्हटलं आहे.

"अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे सरकारसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते. रामदेव यांच्या आंदोलनामुळं सरकार आणखी अडचणीत येईल, म्हणून मी त्यांना भेटलो." असं स्पष्टीकरण प्रणब मुखर्जी यांनी दिलं आहे.

यशवंत सिन्हांची पुन्हा मोदींवर टीका

जीएसटी आणि नोटाबंदीचा निर्णय अविचारी होता. तसंच या निर्णयांमुळं देशाच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी झाल्याची टीका यशवंत सिन्हा यांनी केली. लोकसत्तानं हे वृत्त दिलं आहे.

तसंच क्लिष्ट स्वरूपाच्या जीएसटीमधील विसंगती दूर न केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा धोका निर्माण होण्याचा इशारा सिन्हा यांनी दिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

मर्यादित स्वरुपात शेतमाल खरेदी करण्याचे धोरण नाफेडने बदलावं, असंही सिन्हा म्हणाले आहेत.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)