You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमिता 'भाभी' चव्हाण : नांदेडच्या विजयाच्या शिल्पकार?
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
नांदेडमध्ये काँग्रेसच्या घवघवीत विजयाची अनेक कारणं सांगितली जात आहेत. काँग्रेसच्या यशाची अनेक कारणं तज्ज्ञांनी सांगितली असली, तर एक कारण अतिशय महत्त्वाचं आहे : अमिता अशोकराव चव्हाण.
अशोक चव्हाण यांच्या पत्नी आणि काँग्रेसच्या भोकरच्या आमदार. नांदेड शहर आणि जिल्ह्यात त्या 'अमिता भाभी' याच नावानं ओळखल्या जातात.
अशोक चव्हाण खासदार झाल्यानंतर अमिता चव्हाण यांची राज्याच्या राजकारणात आमदार म्हणून एंट्री झाली.
2014च्या विधानसभा निवडणुका ते आताच्या महापालिका निवडणुकीपर्यंत म्हणजेच गेल्या तीन वर्षांत त्यांच्या राजकारणाचा आलेख चढताच राहिला आहे.
नांदेडमधले ज्येष्ठ पत्रकार विनायक एकबोटे यांच्या मते काँग्रेसच्या या विजयामध्ये अमिता चव्हाण यांचा मोलाचा वाटा आहे.
"काँगेसच्या तिकीट वाटपापासून ते प्रचाराच्या मोहिमेपर्यंत अमिता चव्हाण यांचा प्रभाव होता. त्या अशोक चव्हाण यांच्या राजकारणात देखील अर्धांगिनी आहेत."
"त्यांचा थेट जनसंपर्क आहे, त्यामुळे प्रचारात त्या चांगल्या सक्रिय होत्या. किंबहुना अशोकरावांपेक्षा त्यांनी जास्त प्रचार केला असं म्हणणं योग्य ठरेल. त्या उच्चशिक्षित आहेत आणि चांगलं भाषणही करतात." असं एकबोटे सांगतात.
दोन दशकांचा प्रवास
नांदेडमध्ये जेव्हा अशोकरावांचे वडील- शंकररावांचं वर्चस्व होतं. त्या काळी अशोक चव्हाण मुंबईमध्ये अंधेरीच्या भवन्स कॉलेजात शिकत होते. त्या वेळी ते एका पंजाबी मुलीच्या प्रेमात पडले. मुलीचं नाव होतं अमिता शर्मा.
अमिता लग्न करून चव्हाण कुटुंबाच्या सून म्हणून आल्या तेव्हापासूनच त्यांचा राजकारणाशी संबंध आला.
"मला प्रचार काही नवा नाही. मी गेल्या 15 वर्षांपासून साहेबांचा (अशोक चव्हाण) प्रचार करत आहे. त्यामुळे मतदारसंघातले बहुतेक लोक मला ओळखतात. त्यांना काही अडचणी असल्या, तर ते माझ्याकडे येतात," असं अमिता चव्हाणांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं.
पुढे अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर आदर्श प्रकरणात अमिता चव्हाण यांच्या माहेरच्या नातेवाईकांची नावं आली. या प्रकरणी अशोक चव्हाणांचं 2010 साली मुख्यमंत्रिपद गेलं.
त्यानंतर 2014 साली अशोक चव्हाण लोकसभेत निवडून आल्यावर अमिता चव्हाण विधानसभेसाठी उभ्या राहिल्या. अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक माधव किन्हाळकर हे भाजपच्या तिकिटावरून अमिता चव्हाणांविरोधात उभे होते. पण ही कठीण निवडणूक त्या 80 हजारांच्या फरकाने जिंकल्या.
अरेरावी की स्पष्टवक्तेपणा?
अमिता चव्हाण या लोकप्रिय असल्या, तरी त्यांच्यावर अरेरावीचं राजकारण केल्याचा आरोपसुद्धा केला जातो. त्यावर विनायक एकबोटे सांगतात, "त्या स्पष्टवक्त्या आहेत. सडेतोड उत्तरं देतात. त्यामुळे त्या अरेरावीचं राजकारण करतात, असं म्हणता येणार नाही."
"शहराबाबातच्या महत्त्वाच्या निर्णयांवर अमिता चव्हाण यांचा प्रभाव असतो," असं तरुणांचं समाजकारण आणि राजकारणाचा अभ्यास असलेले संपादक संदीप काळे सांगतात.
"चव्हाण यांचा भाऊराव चव्हाण साखर कारखाना जिल्ह्यात रोजगाराचं मोठं साधन आहे. ते सुद्धा काँग्रेसच्या विजयाचं कारण आहे." अमिता चव्हाण या कारखान्याच्या संचालक आहेत.
"अमिता चव्हाण एकाच वेळी मराठा आणि शीख पंजाबी मतदारांशी कनेक्ट होतात. मराठा सून आणि पंजाबी मुलगी असणं या त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरतात," असंही काळे सांगतात.
अमिता चव्हाण या माहेरच्या पंजाबी असल्यामुळे त्यांनी पंजाबी भाषेतूनही प्रचार केला. 6 टक्के शीख आणि 26 टक्के मराठा समाजाच्या मतांसाठी हे फार महत्त्वाचं ठरतं.
महिला आघाडी मजबूत केली
अमिता चव्हाण यांनी नांदेडमधली काँग्रेसची महिला आघाडी चांगलीच मजबूत केली आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
"नांदेडच्या काँग्रेसमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय आहे. शिवसेनेच्या स्थानिक बड्या महिला नेत्यांना त्यांनी काँग्रेसमध्ये आणलं," असं संदीप काळे सांगतात.
"अमिता चव्हाण यांनी महिला उमेदवारांसाठी बराच प्रचार केला. त्यांनी सभा घेतल्या नाहीत, पण त्या दारोदार फिरल्या," असं टीव्ही नाईन या मराठी वृत्तवाहिनीचे स्थानिक पत्रकार राजू गिरी सांगतात.
"अमिता चव्हाण यांनी महिला आघाडी चांगली मजबूत केली आहे. नांदेड काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांत महिलांची संख्या चांगली वाढली आहे. महिला आघाडीचं नेतृत्व अमिता चव्हाण करत असल्यानं विजयात त्यांचा मोठा वाटा असं म्हणता येईल," असं गिरी सांगतात.
'यश अशोक चव्हाणांचंच'
स्थानिक पत्रकार राम शेवडीकर मात्र हे संपूर्ण अशोक चव्हाण यांचं यश असल्याचं मानतात.
"लोकांचा मूळ विश्वास अशोक चव्हाण यांच्यावर आहे. परिस्थिती प्रतिकूल होती. अनेक नगरसेवकांनी पक्ष बदलले, भाजपमय वातावरण निर्मिती झाली होती. पण तरी काँग्रेस विजयी झाली. हे यश अशोक चव्हाण यांनी केलेल्या कामांचं आहे," असं शेवडीकर सांगतात.
दैनिक सकाळचे निवासी संपादक संजय कुलकर्णी यांचंसुद्धा तसंच मत आहे. त्यांना या विजयात अमिता चव्हाण यांचा वाटा फारसा वाटत नाही.
"काँग्रेसची उमेदवारी मिळाली की त्या उमेदवाराला अशोक चव्हाणच निवडून आणतात, असं लोक समजतात. निवडणूक फक्त अशोक चव्हाण एके अशोक चव्हाण झाली," असं त्यांचं म्हणणं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)