वजन कमी करायचं असेल तर हे नक्की वाचा

दरवर्षी हजारो लोक वजन कमी करण्याचा, फिट राहण्याचा संकल्प करतात. पण फक्त शरीर मेहनत न घेता तुम्ही तुमच्या मेंदूला हॅक करून वजन कमी करू शकलात तर?

मेंदूसाठी चार व्यायाम केल्याने तुमचा संकल्प पूर्ण होऊ शकतो, असा दावा येल विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केला आहे.

एका संशोधनानुसार काही सोप्या टिप्स तुम्हाला पोषक आहार निवडण्यासाठी मदत करू शकतात. मानसिक प्रशिक्षणाच्या काही सोप्या टिप्स पाळून अनेकांची पोषणशून्य अन्नपदार्थांप्रतिची ओढ कमी झाली आहे आणि त्यांनी पोषक आहाराला पसंती दिली आहे.

मनोनिग्रहाच्या या टिप्स तुम्ही अंगीकारल्यास काय खावं, याचा विचार करतानाच तुमचा कल आपोआपच पौष्टिक पदार्थांकडे असेल.

गरजेपेक्षा जास्त खाणं ही हानिकारक आणि दिवसेंदिवस वाढत असलेली समस्या आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगभर 1.9 अब्ज लोक ओव्हरवेट म्हणजे अतिवजनी आहेत आणि 1975 पासून जगभरात लठ्ठपणा तिप्पटीने वाढला आहे.

मात्र अन्नपदार्थाविषयी आपण जो विचार करतो, त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलू शकतात आणि यातून वजन वाढण्याच्या समस्येचा आपण सामना करू शकतो, असं अमेरिकेतील येल विद्यापीठातील संशोधकांना वाटतं.

तर या संशोधकांनी परीक्षण केलेल्या आणि परिणामकारक ठरलेल्या चार मानसिक कसरती बघूया:

1.. जेवणापूर्वी जंक फूडविषयी नकारात्मक विचार करा

या संशोधनात लोकांना काही विशिष्ट पदार्थ केवळ सहा सेकंदांसाठी दाखवण्यात आले. मात्र त्या सहा सेकंदांसाठी त्यांना त्या पदार्थाच्या नकारात्मक बाजूंवर लक्ष केंद्रित करायला सांगण्यात आलं.

यात केवळ त्या पदार्थाचा आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचा विचार करावा, असं नाही, तर त्या पदार्थाची चव, त्याचा स्पर्श कशाबद्दलही विचार करण्याचं स्वातंत्र्य होतं.

यानंतर संशोधनात सहभाही सर्वांना त्या पदार्थाला गुण द्यायला सांगण्यात आलं. तेव्हा ज्यांनी असं प्रशिक्षण घेतलं आहे, त्यांची त्या पदार्थाविषयीची इच्छा किंवा क्रेव्हिंग इतर लोकांपेक्षा 20 टक्क्यांनी कमी झालेली आढळली.

एखाद्या पदार्थाप्रति तुमची इच्छा कमी करणं महत्त्वाचं ठरू शकतं, कारण पोषणशून्य आहार जसं की जंक फूड खाण्याची इच्छाच पुढे लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि वजन ठरवत असते.

2.जेवणापूर्वी पौष्टिक आहाराविषयी सकारात्मक विचार करा

यानंतर शास्त्रज्ञांनी उलट प्रयोग केला. त्यांनी लोकांना तेवढ्याच वेळेसाठी पोषक पदार्थाविषयी सकारात्मक विचार करायला सांगितलं.

याचाही चांगला परिणाम दिसला. लोकांची पौष्टिक पदार्थाप्रतिची इच्छा 14 टक्क्यांनी वाढली. याचाच अर्थ तुम्ही थोडावेळ जरी पौष्टिक आहाराच्या सकारात्मक बाजूंवर विचार केला तर तुमचा मेंदू तुम्हाला तो आहार घेण्यासाठी प्रवृत्त करू शकतो.

3. जंक फूड टाळण्यासाठी आधीच मनाची तयारी करा

पोषक आहाराची निवड करण्यासाठी आधीच मनाची तयारी करू शकतो का, याचाही येल विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यास केला.

लोकांना जंक फूडच्या दुष्परिणामांविषयी वाचायला सांगण्यात आलं. यानंतर या पोषणशून्य आहाराचा त्यांच्या शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी विचार करण्यासाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात आला.

यात पोषणशून्य पदार्थ खाल्ल्याने होणाऱ्या वाईट परिणामांचा विचार करत असताना त्या पदार्थांचे फोटो दाखवण्यात आले.

यानंतर त्यांना पोषणशून्य आणि पौष्टिक, यापैकी निवड करायला सांगण्यात आलं. तेव्हा त्यांच्यातील पौष्टिक पदार्थ निवडण्याची शक्यता 7.6 टक्क्यांनी वाढली होती.

4. पौष्टिक आहार निवडण्यासाठी आधीच मनाची तयारी करा

लोक स्वतःच पौष्टिक आहार निवडतात का, हे तपासून बघण्यासाठी संशोधकांनी पुन्हा एकदा उलट प्रयोग केला.

लोकांना पौष्टिक आहाराचे फायदे वाचायला सांगण्यात आलं आणि त्यानंतर त्याविषयी सकारात्मक विचार करताना त्यांना पौष्टिक पदार्थांचे फोटो दाखवण्यात आले.

याचाही परिणाम झाला. पौष्टिक आहार निवडण्याचं प्रमाण 5.4 टक्क्यांनी वाढलं.

बदल छोटे, फायदे मोठे

टक्केवारीत पाहिल्यास हा बदल खूप छोटा किंवा कमी वाटत असेल. मात्र या प्रशिक्षणात सहभागी झालेल्यांनी नंतर जेव्हा जेव्हा जेवण केलं, त्यावेळी त्यांनी सरासरी 107 कॅलरीज कमी ग्रहण केल्या.

एवढ्या कॅलरी जाळण्यासाठी एका सामान्य व्यक्तीला दहा मिनिटं धावावं लागतं.

या अभ्यासावर लेखन करणाऱ्या वरिष्ठ लेखिका आणि येल विद्यापीठात मानसोपचार आणि मानसशास्त्र विभागाच्या सहप्राध्यापिका हेडी कोबेर म्हणतात, "लठ्ठपणावर सध्या असलेल्या अनेक उपचारांइतकाच परिणाम या प्रयोगातून दिसला. मात्र मोठमोठे उपचार नव्हे तर केवळ एका छोट्या प्रशिक्षणातून हा परिणाम साधता आला."

त्या पुढे म्हणतात, "तुम्ही दिवसातून एकदा जरी पौष्टिक आहार निवडला तर भविष्यात वाढणारं अनेक किलो वजन तुम्ही कमी करता."

जवळपास 70% व्यक्ती त्यांनी तीन ते पाच वर्षांत कमी केलेलं वजन सामान्य आहार घेतल्याने पुन्हा वाढवतात. त्यामुळे माफक प्रमाणात कॅलरी कमी करणारं या पद्धतीसारखं कुठलंही नवं तंत्र मोलाचंच ठरतं.

तर मग जर नव्या वर्षात तुम्ही जिमची मेंबरशिप घेतली असेल किंवा नियमितपणे धावण्याचा संकल्प केला असेल, तर त्यासोबतच हा मेंदूचा व्यायामही करून पाहा.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)