You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मायग्रेन डोकेदुखी : तुम्हालाही मायग्रेनचा त्रास आहे का? डोकेदुखीवर सुरू आहे नवीन उपचारांचा शोध
- Author, जेम्स गॅलाघर
- Role, आरोग्य आणि विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज
मायग्रेनच्या अटॅकची संख्या आणि तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीनं संशोधकांना यश आलं आहे. या नव्या उपचार पद्धतीच्या दोन क्लिनिकल ट्रायल्समधून ही उपचार पद्धती प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. अर्थात यात अजूनही नव्या चाचण्या होणे आवश्यक आहे.
या नव्या उपचार पद्धतीमुळं प्रत्येक महिन्यात मायग्रेनचा त्रास होणाऱ्या लोकांची संख्या अर्ध्यावर आली असल्याचं दिसून आलं आहे. किंग्स कॉलेज हॉस्पिटलच्या संशोधकांच्या मते ही एक मोठी उपलब्धी आहे.
ही उपचारपद्धती मायग्रेन थांबवण्यासाठी पहिल्यांदाच तयार करण्यात आली आहे. यामध्ये मेंदूत निर्माण होणाऱ्या रसायनाच्या प्रक्रियेला छेद देण्यासाठी अँटीबॉडीजचा वापर करण्यात आला आहे.
हे परिणाम दीर्घकाळ टिकतात का हे पाहण्यासाठी अधिक चाचण्यांची आवश्यकता आहे.
मायग्रेन संदर्भातील खालील आकडेवारी लक्षात घेतली तर हे आजाराची तीव्रता लक्षात येते.
- जगात सातपैकी एकाला मायग्रेनच्या त्रासाला सामोरं जावं लागतं.
- पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हा आजार तिपटीने आढळतो.
- मायग्रेन ट्रस्टच्या मते यूके मध्ये दर दिवशी 1,90,000 लोकांना अटॅक येतो.
- ज्या लोकांना एका महिन्यात 15 दिवस डोकेदुखीचा त्रास होतो त्यांना मायग्रेनचे प्रासंगिक अटॅक येतात.
- याचं प्रमाण जर पंधरा दिवसांपेक्षा अधिक असेल तर त्याला क्रॉनिक मायग्रेन म्हणतात.
चाचणीचे निकाल आश्वासक
संशोधनाअंती असं लक्षात आलं आहे की मायग्रेनमध्ये मेंदूत असलेले calcitonin gene-related peptide हे रसायन प्रकाश आणि आवाजामुळं होणाऱ्या वेदनांना कारणीभूत असतं.
या रसायनाचा प्रभाव थांबवण्यासाठी चार कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे. या संशोधनाचा काही मूळ रसायनाशी निगडित आहे तर काही भाग हा रसायनांची निर्मिती करणाऱ्या मेंदूच्या पेशींच्या भागशी संबंधित आहे.
'न्यु इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये' दोन अँटीबॉडीवर होत असलेल्या क्लिनिकल ट्रायलविषयीचं संशोधन प्रकाशित झालं आहे.
नोवार्टिस कंपनीने Erenumab या अँटीबॉडीची सतत मायग्रेनचा अटॅक येणाऱ्या 955 व्यक्तींवर चाचणी घेतली आहे.
जेव्हा चाचणीची सुरुवात करण्यात आली तेव्हा त्या रुग्णांना महिन्यातून आठ दिवस मायग्रेनचा त्रास होत होता.
अभ्यासाअंती असं लक्षात आलं की ज्यांना अँटीबॉडी दिल्या त्यापैकी 50 टक्के लोकांचा दर महिन्याला होणारा त्रास अर्ध्यावर आला आहे. 27 टक्के लोकांना हा परिणाम कोणत्याही उपचाराशिवाय दिसायला लागला.
टेवा फार्मास्युटिकल्स या आणखी एका कंपनीने तयार केलेल्या fremanezumab या अँटीबॉडीची चाचणी क्रॉनिक मायग्रेन होणाऱ्या 1130 लोकांवर घेण्यात आली.
त्यात 41 टक्के लोकांना जितके दिवस त्रास व्हायचा त्यात निम्म्याने घट झाली. 18 टक्के लोकांना हा फरक कोणत्याही उपचाराविना दिसला आहे.
प्रा. पीटर गॉड्सबाय हे किंग्स कॉलेज लंडन येथील NIHR रिसर्च सेंटर येथे या संशोधनाचं नेतृत्व केलं. बीबीसीशी बोलतांना त्यांनी सांगितलं की, "ही एक मोठी उपलब्धी आहे. कारण त्यामुळे हा आजार समजण्यास मदत होत आहे आणि त्यावर उपाययोजना करण्याची दिशा लक्षात येते."
"नव्या संशोधनामुळं डोकेदुखीची वारंवारता आणि तीव्रता कमी होत असल्याचं दिसून आलं आहे," असं ते म्हणाले.
"या रुग्णांना त्यांचं आयुष्य परत मिळेल आणि समाजाला सुद्धा हे लोक बरे होऊन कामाला लागलेले दिसतील," असं ते म्हणाले.
आणखी एका अभ्यासात असं लक्षात आलं आहे की या उपचारानंतर एक पंचमांश लोकांना हा रोग पुन्हा कधीही झाला नाही. ही माहिती सध्या प्रकाशित झालेली नाही.
चांगला पर्याय
मायग्रेनसाठी फक्त अँटीबॉडीज हा उपाय नाही. बोटॉक्स सर्जरी, अपस्मार आणि हृदयरोगावरसुद्धा या अँटीबॉडीज परिणामकारक ठरू शकतात.
मायग्रेन अॅक्शनचे मुख्य कार्यकारी सिमॉन इव्हान्स यांच्या मते, "या औषधाचे दुष्परिणाम होतात आणि ते प्रत्येकाला गुणकारी ठरतील असं नाही."
ते म्हणाले, "या औषधामुळे चिडचिड वाढेल किंवा स्थुलपणा आणि आळशीपणा वाढेल असं डॉक्टर सांगतात. यापैकी जो दुष्परिणाम रुग्ण निवडतो त्याप्रमाणे डॉक्टर औषधाची निवड करतात."
नव्या उपचार पद्धतीमुळं साईड इफेक्ट कमी होतील, अशी अपेक्षा त्यांनी केली व्यक्त केली. दोन्ही अभ्यासात दीर्घकाळासाठी या औषधापासून कोणताही धोका होणार नाही याची खात्री करण्याची गरज असल्याचं सांगण्यात आलं आहे.
अँटीबॉडी तयार करणे इतर उपचारांपेक्षा महाग आहे. या उपचाराचा हा एक मोठा तोटा आहे.
अँडी डाऊसन हे केन्ट आणि लंडन येथे डोकेदुखीसाठी उपचार करतात.
ते म्हणाले, "काहीतरी नवीन संशोधन होत आहे, याची मला फारच उत्सुकता आहे. पण त्याच्या किमतीचाही विचार करावा लागेल. त्याला कोण प्रतिसाद देतो आणि पुढे काय होतं आहे हेसुद्धा बघावं लागेल."
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)