जागतिक एड्स दिन : 'मला माझ्या मुलीच्या लग्नाआधी मरायचं आहे'

    • Author, सरोज सिंह
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

मला असं वाटतं की मी माझ्या मुलीच्या दुसऱ्या लग्नाच्या आधी मी मरून जावं. म्हणजे तिचे वडील HIV पॉझिटिव्ह होते हे तिच्या सासरच्यांना कळणार नाही.

स्वतःच्या मुलीला नवरीच्या पोशाखात बघणं त्यांचं स्वप्न आहे. पण हरीसिंह असे पहिले वडील असतील, ज्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या आधी मरण्याची इच्छा आहे.

गेल्या 23 वर्षापासून हरीसिंह HIVशी लढत आहेत. समाजाशी लढले आणि प्रत्येक आघाडीवर जिंकले. पण स्वत: च्या मुलीच्या सासरच्यांसमोर त्यांचा पराभव झाला.

2013साली त्यांनी आपल्या मुलीचं मोठ्या धुमधडाक्यात लग्न केलं. पण लग्नाच्या चार महिन्यांतच सासरच्यांना कळलं, की त्यांच्या सुनेचे वडील HIV पॉझिटिव्ह आहेत. तेव्हा त्यांनी सुनेला घराबाहेर काढलं. हरीसिंह यांची मुलगी HIV निगेटिव्ह आहे.

HIV आहे कसं कळलं?

बीबीसीशी बोलताना हरीसिंह ही घटना जशीच्या तशी सांगतात

ते दिवस आठवताना हरीसिंह सांगतात, "मी माझ्या बायकोच्या औषधोपचारासाठी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरनी मला एचआयव्ही टेस्ट करायला सांगितलं. मी खासगी रुग्णालयात जाऊन टेस्ट केली. टेस्ट पॉझिटिव्ह आली. या आजाराबद्दल कळताच हरीसिंह यांच्या पायाखालची वाळूच सरकली."

हरीसिंह सांगतात, "23 वर्षापूर्वी या आजाराबद्दल ना कुणाला फारशी माहिती होती, ना तर औषधोपचार उपलब्ध होते."

हरीसिंह यांच्यामते, "1994 साली या आजाराबद्दल कळलं आणि 1995 साली माझ्या वडिलांचं निधन झालं. घरात कमावणारा कोणी नव्हतं. त्या दिवसांत 25 हजार रुपये माझ्या औषधावर खर्च होत होते. आमचं 200 चौरस फुटाचं घर होतं. औषधोपचारातच माझं अर्ध घर विकलं गेलं.

HIVपॉझिटिव्ह लोकांसाठी काम करणाऱ्या NACO च्या आकडेवारीनुसार देशभरात 21 लाख लोक HIV पॉझिटिव्ह आहेत. ज्यापैकी 11 लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.

NACO चे आकडे सांगतात की, भारतात या आजाराच्या प्रमाणात वेगाने घट होत आहे. 2007-08 साली एचआयव्हीच्या सव्वा लाख केसेस समोर आल्या होत्या. तर त्यात घट होऊन 2015 साली 85000 नवीन केसेस समोर आल्या आहेत.

एचआयव्हीचा मोफत उपचार

आज देशात HIVवर उपचार मोफत होतात. पण आधी तशी परिस्थिती नव्हती.

सरकारच्या HIV आणि AIDS मोफत उपचाराची सुरूवात अँटी रेट्रो व्हायरल थेरेपी (ART) सेंटरपासून झाली. देशाच्या मोठ्या रुग्णालयात आज एकूण 535 अँटी रेट्रो व्हायरल थेरेपी सेंटर आहे.

पण या आजाराशी निगडित डॉक्टरांच्या मते भारतात HIVबद्दल जागरुकता फारच कमी आहे.

AIIMS (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) मधील एआरटी (ART) सेंटरचे डॉक्टर संजीव सिन्हा यांच्या मते, "लोकांच्या मनात आजही या आजाराबद्दल भीती आहे. या भीतीमुळेच लोक तपासणी करायला जात नाहीत."

कधी करावी HIVटेस्ट?

खरंतर बऱ्याच ठिकाणी नोकरकरता HIVटेस्ट करणं अनिवार्य आहे. गरोदर महिलांनीसुद्धा ही टेस्ट करावी, म्हणजे त्यांच्या मुलांना हा रोग होणार नाही. आईपासून मुलाला या रोगाचं संक्रमण होऊ नये म्हणून बाजारात औषधं उपलब्ध आहेत.

त्यांनंतर सीडी 4 टेस्ट केली जाते. सीडी 4 टेस्ट तुमच्या शरीरात रोगप्रतिबंधक शक्ती किती आहे हे सांगते.

यावरून रुग्ण HIVच्या कोणत्या स्टेजवर आहे आणि त्याला कोणत्या प्रकारच्या औषधोपचाराची गरज आहे, हे डॉक्टर सांगू शकतात.

भारताच्या HIV पॉझिटिव्ह रुग्णांना पहिल्या काही दिवसांत लाईन 1 ची औषधं घ्यावी लागतात. लाईन 1 म्हणजे स्टेज 1. पण एकाच प्रकारची औषधं घेऊन त्या औषधाचा परिणाम कमी होतो. तेव्हा डॉक्टराच्या सल्ल्याने लाईन 2 ची औषधं घ्यावी लागतात.

देशातील पाचशे एआरटी केंद्रावर लाईन 2 ची औषधं मोफत मिळतात. पण खासगी ठिकाणी या उपचारांचा खर्च वर्षाला 25 हजार रुपये खर्च होतो.

ज्यांच्यावर लाईन 2 औषधांचा परिणाम कमी व्हायला सुरुवात झाली की त्यांना लाईन 3 ची औषध घ्यावी लागतात.

अशा रुग्णांसाठी काही निवडक एआरटी केंद्रावर मोफत औषधं मिळतात. खासगी ठिकाणी लाईन 3 च्या औषधांचा खर्च वर्षाला एक लाख रुपये खर्च येतो.

भारतात HIV पॉझिटिव्ह रुग्णांसाठी लाईन 3पर्यंतचे औषधं मोफत मिळण्याची व्यवस्था केली आहे पण ते सगळ्या केंद्रावर उपलब्ध नाहीत.

हरीसिंह सध्या लाईन 2चे औषधं घेत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की, 2008 सालापासून त्यांना सरकारतर्फे मोफत औषधं मिळतात

हरीसिंह यांचा दावा आहे की आतापर्यंत त्यांच्या उपचारावर 25 लाख रुपये खर्च झाला आहे. रोज एका विशिष्ट वेळी गोळी घेतल्यामुळे HIVच रूपांतर AIDSमध्ये होण्यापासून थांबवलं जाऊ शकतं आणि दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित होण्याती शक्यता 93 टक्क्यांनी कमी होते.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)